•सडेतोड : अरुण रामतीर्थकर•
सेक्युलर बनण्याच्या नादात भाजपचे नुकसान होत आहे. उत्तर प्रदेशात तिसर्या क्रमांकावर फेकले जाणे आणि हिमाचल प्रदेशात ४१ वरून २६ होत सत्ता जाणे यामागे हेच कारण आहे. सध्या भाजपची ओळख कट्टर हिंदू अशीही नाही आणि सेक्युलर अशीही नाही. कितीही कसोशीने प्रयत्न केले तरी भाजपच्या सेक्युलॅरिझमवर कोणी विश्वास ठेवणार नाही; मग एकच पर्याय उरतो. गुजरातसारखे घवघवीत आणि लागोपाठ यश मिळवायचे तर हिंदुत्ववादाशिवाय पर्याय नाही.
जरात विधानसभेच्या निकालाचे यथार्थ वर्णन म्हणजे हे एकच वाक्य, ‘विजय भाजप आणि नरेंद्र मोदींचा झाला.’ मोदींचे नाव आता जगभर झाले. मात्र राहुल, सोनिया आणि कॉंग्रेसचे काय? मरणासन्न अवस्थेतील गुजरात मधील कॉंगे्रस सत्तेवर येईल असे वेडा माणूसही म्हणत नव्हता. ठार वेडे असलेले कॉंग्रेसवालेच राहुल, सोनियाच्या प्रचाराने कॉंग्रेसला प्रचंड अनुकूल वातावरण निर्माण झाले असे म्हणत होते. तरीही कल्पना करू, कॉंग्रेसला ९३ जागा मिळाल्या असत्या तर…. अमेठीसह उत्तर प्रदेश किंवा बिहार किंवा पंजाबात राहुल, सोनिया यांना मतदारांनी हुसकावले. ते तिहेरी अपयश एकट्या गुजरातच्या विजयाने धुवून निघाले असते. राहुलच्या राज्यारोहणाचे नगारे वाजायला लागले असते. राहुल आणि सोनिया यांना कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले असते.
आत्ताही तसेच झाले आहे. बोट उंचावत, ‘मै पूँछना चाहती हूँ’, असे म्हणत सोनिया जे प्रश्न विचारतात (गुजरातमे गॅसपर सबसिडी क्यूँ नही |) ते निर्बुद्ध असतात. बाह्या सावरत राहुल जी भाषणे करतो ती भंपक असतात. त्यांच्या सभेची गर्दी जमवलेली असते. ही दुक्कल कोणत्याही राज्यात यशस्वी ठरलेली नाही. खर सांगायचं तर उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत रायबरेली, अमेठीतील विधानसभेच्या सर्व जागा सपा, बसपाने जिंकल्या. त्यामुळे सोनिया, राहुल २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत निवडून येतील का हीच शंका आहे.
अशा सोनिया, राहुलच्या प्रचारावर कॉंग्रेस पक्ष विसंबून राहीला. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अर्जुन मोडवाडिया किंवा विरोधी पक्षनेते शक्तीसिंह गोहील यांना गुजरातमध्ये कोणी ओळखत नाही. दोघांचा निवडणुकीतील पराभव हेच दर्शवतो. शंकरसिंह वाघेला हे तिसरे नाव. ते तर पूर्वीचे संघ स्वयंसेवक. मोदी विरोधकांनी त्यांच्यावर का विश्वास ठेवावा. थोडक्यात कॉंग्रेसकडे प्रचारासाठी एकही नेता नव्हता तर दुसरीकडे नरेंद्र मोदी एकटे किल्ला लढवत होते. कॉंग्रेसलाही हे दौर्बल्य लक्षात आलेच. केशुभाईना १७० उमेदवार उभे करण्यासाठी कॉंग्रेसने रसद पुरवलीच असणार. केशुभाई जेवढी मते खातील तेवढा कॉंग्रेसचा फायदा हे कॉंग्रेसचे गणित. केशुभाईंबरोबर कॉंग्रेसलाही माती खावी लागली.
मणिनगरमध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कॉंग्रेसला स्वतःचा उमेदवार देता आला नाही. १० जनपथवर कॉंग्रेसी नेत्यांना घरगड्याची वागणूक देणारे अहमद पटेल गुजराती आहेत. नरेंद्र मोदींना हरवण्याचे आव्हान घेत, अहमद पटेल मणिनगरमध्ये का उभे राहिले नाहीत? पैसा तर बक्कळ होता. जायंट किलर म्हणून भाव वाढला असता. गुजरातेत सत्ता मिळो न मिळो, अहमद पटेलनी मोदींना हरवले असते तर कॉंग्रेसचा तो केवढा मोठा विजय ठरला असता, पण हे होणे नव्हते. मोदीविरोधात कॉंग्रेसला श्वेता भट हा उसना उमेदवार आयात करावा लागला. मुळात तिचा नवरा संजीव भट्ट याची जनमानसातील प्रतिमा काय याची तरी चाचपणी करायला हवी होती. मोदींना पराभूत करण्यासाठी केशुभाई पटेल, श्वेता भट्ट, जागृती पंड्या ही कॉंग्रेसची हत्यारे होती. यातच कॉंग्रेसचा पराभव दडलेला होता. मोदींचे या उलट होते. कॉंगे्रसला दिल्ली, पंजाबची सत्ता मिळाली, पण त्यापूर्वी १९८४ शीख हत्याकांडाबद्दल कॉंग्रेसने माफी मागितली. २००२ च्या दंगलीबद्दल माफी मागा, गुजरातेत मुस्लिम मतदार भाजपला मते देतील अशी ऑफर प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मोदींना मुस्लिम धर्मगुरूंनी दिली. मुस्लिमांची राज्यभर अशी गठ्ठा मते मिळणार असतील तर कॉंग्रेसवाल्यांनी कमरेचे सोडून डोक्याला गुंंडाळून नाक घासत माफी मागितली असती. मोदी काय करतात याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यांनी उत्तर न देण्याएवढे हा प्रश्न दुय्यम ठरवला. सांगा, असे धाडस किती जणांत आहे? उलट इफ्तार पार्टीला टोपी घालून जायचे, फोटो काढून पेपरात छापायचा; यातच सारे धन्यता मानतात. मोदींनी व्यासपीठावर, टी.व्ही. कॅमेर्यापुढे गोलटोपी नाकारली. १८२ मध्ये एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिली नाही. इतरांच्या दृष्टीने कडाडून टीका करायचे हे विषय. पण गुजरातमधील हिंदू मते त्यामुळेच एकवटत गेली. मुस्लिमांचे लांगुलचालन न करता सत्ता मिळवता येते हा मोदींनी इतर पक्षांना दिलेला धडा आहे.
माझ्या मते गुजराती जनतेतच हिंदुत्व पूर्वीपासून आहे. नरेंद्र मोदी यांनी त्याला मुरड न घालता ते फुलवले. ‘इंडिया टूडे’ची गुजराती आवृत्ती ९० साली सुरू झाली. ९२ साली खप १ लाखावर होता. बाबरी मशीद पाडल्यावर इंडिया टुडेने ‘शेम टू इंडिया’ आणि गुजरातीत ‘देशना माथानु कलंक’ अशी कव्हर स्टोरी केली. निवासी संपादकाने शीर्षक बदलायला सांगितले, पण वरिष्ठांनी ते न ऐकताच कायम ठेवले. विक्रेत्यांनी हा अंक न विकता परत पाठवला. ज्यांनी वाचला त्यांच्याकडून ३ पोती भरून धिक्काराची पत्रे आली. ‘इंडिया टुडे’च्या ऐवजी ‘इस्लाम टुडे’ असे नाव घ्या अशी अनेकांची सूचना होती. ‘देशना माथानु कलंक’ या कव्हरस्टोरीने इंडिया टुडेचा खप झपाट्याने कमी होऊन तोटा होत ९४ साली गुजराती आवृत्ती बंद झाली. यावेळी नरेंद्र मोदी कोण होते? २००० नंतर मोदींनी हीच हिंदुत्व भावना प्रामाणिकपणे जोपासली. त्याचे हे यश आहे. यालाच मोदी पॅटर्न म्हणतात. २०१४ मध्ये लोकसभेत भाजपला २०० चा टप्पा गाठायचा असेल तर देशभर विनासंकोच मोदी पॅटर्न राबवला पाहिजे. बाबरी पतनानंतर ती संधी मिळाली, पण सेक्युलर बनण्याच्या नादात भाजपचे नुकसान होत आहे. उत्तर प्रदेशात तिसर्या क्रमांकावर फेकले जाणे आणि हिमाचल प्रदेशात ४१ वरून २६ होत सत्ता जाणे यामागे हेच कारण आहे. सध्या भाजपची ओळख कट्टर हिंदू अशीही नाही आणि सेक्युलर अशीही नाही. कितीही कसोशीने प्रयत्न केले तरी भाजपच्या सेक्युलॅरिझमवर कोणी विश्वास ठेवणार नाही; मग एकच पर्याय उरतो. गुजरातसारखे घवघवीत आणि लागोपाठ यश मिळवायचे तर हिंदुत्ववादाशिवाय पर्याय नाही. हा मोदी पॅटर्नखुद्द मोदी यांच्याशिवाय दुसरा कोण राबवणार!
रविवार, दि. २३ डिसेंबर २०१२