•चौफेर : अमर पुराणिक•
र्कॉग्रेसने ६० वर्षे सत्ता उपभोगूनही देशाचे हित, महाराष्ट्राचे हित, शेतकर्यांची भरभराट का साधली नाही? कॉंग्रेसला इतकी वर्षे सत्ता उपभोगूनही जनतेचे, शेतकर्यांचे भले का करता आले नाही? भाजपा-सेनेच्या सरकारकडून मात्र केवळ ९ महिन्यात विकास होणे कॉंग्रेसला अपेक्षित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतोय त्याचे कारण काय? याचा विचार कॉंग्रेसच्या नेत्यांनीच करावा. इतक्या प्रदिर्घ सत्ताकाळात शेतकर्यांच्या सामान्य गरजाही कॉंग्रेस पुर्ण करु शकलेली नाही त्यामुळे आज शेतकर्यांसमोर आत्महत्येशिवाय दूसरा पर्याय उरलेला नाही.
१३ जुलैपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. कामकाजाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी दिवंगत सदस्यांच्या शोकप्रस्तावावरुन गदारोळ केला तर महाराष्ट्रातील शेतकर्यांची कर्जमाफी करा अशी मागणी करत महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकर्यांना श्रद्धांजली वाहताना कॉंग्रेसने स्वत:च्याच अब्रुचे धिंडवडे काढले. तिकडे दिल्लीतही लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पहिले दोन दिवस कामकाजावीना तर तिसर्या दिवशी विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज तहकूब झाले. एकंदर काय तर राज्याचे असो की केंद्राचे असो अधिवेशन चालू न देण्याची भूमिका कॉंग्रेसने घेतली आहे.
महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरुन आणि आत्महत्येच्या मुद्यावरुन सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकर्यांना श्रद्धांजली वाहताना निर्लज्जासारखे हसत श्रद्धांजली वाहिली. स्वत:ची हसरी छबी छायाचित्रकारांसमोर झळकवत आत्महत्या केलेल्या शेतकर्यांना श्रद्धांजली वाहताना उभ्या महाराष्ट्राने पाहिले. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना लाज वाटली नसेल, पण उभ्या महाराष्ट्राला याची लाज नक्कीच वाटली. जवळ-जवळ साठ वर्षे सत्ता उपभोगलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांना इतकंही सोयरसूतक असू नये की आपण दिवंगतांना श्रद्धांजली वाहतोय, त्याचे गांभीर्य उभ्या महाराष्ट्राचे नेतृत्व करणार्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना कळू नये हे महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल. त्यांनी या कृतीतून शेतकर्यांच्या भावनेची आणि दूर्दशेची टिंगल उडवली आहे, अशीच भावना नागरिकांची झाली आहे. सोशल मिडीयातून यावर खूप तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नेटीझन्सनी यावर अतिशय तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुद्दा मात्र शेतकर्यांचा कैवार घेण्याचा आणि कृती मात्र टिंगलखोरपणाची. जर यांना शेतकर्यांच्या प्रश्नाबद्दल खरच काही कळवळा असेल तर ही गोष्ट गंभीरपणे हाताळली असती. आता जनतेकडे यांची कृत्य पहाण्याची अत्याधूनिक माध्यमांद्वारे सोय झाली आहे आणि आपलं मत व्यक्त करण्याची सोशल मिडियातून सोय झाली आहे. त्यामुळे कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेले हे अश्लघ्य कृत्य पाहताक्षणी सोशल मिडीयातून यावर जळजळीत मत मांडली गेली.
जवळ-जवळ साठ वर्षे कॉंग्रेसच्या हातात देशाची आणि राज्याची सत्ता होती. गेल्या वर्षी राज्यात भाजपा-सेनेचे आणि देशात भाजपाप्रणीत रालोआ सरकार आले आहे. एक वर्षात जादूची कांडी फिरवून भाजपा-सेना सरकारने शेतकर्यांचे भले करावे अशी अपेक्षा न जनतेची आहे न शेतकर्यांची आहे. जनता हे जाणून आहे. पण केवळ विरोध करायचा म्हणून आणि जवळ कोणताही मुद्दा नाही म्हणून काहीतरी पोरकट मुद्दे उचलून धरण्याचा प्रकार कॉंग्रेस करत आहे. जर कॉंग्रेसला इतकी घाई आहे तर गेली ६० वर्षे देशात आणि राज्यात कॉंग्रेसचीच सत्ता होती. मग र्कॉग्रेसने ६० वर्षे सत्ता उपभोगूनही देशाचे हित, महाराष्ट्राचे हित, शेतकर्यांची भरभराट का साधली नाही? कॉंग्रेसला इतकी वर्षे सत्ता उपभोगूनही जनतेचे, शेतकर्यांचे भले का करता आले नाही? भाजपा-सेनेच्या सरकारकडून मात्र केवळ ९ महिन्यात विकास होणे कॉंग्रेसला अपेक्षित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतोय त्याचे कारण काय? याचा विचार कॉंग्रेसच्या नेत्यांनीच करावा. इतक्या प्रदिर्घ सत्ताकाळात शेतकर्यांच्या सामान्य गरजाही कॉंग्रेस पुर्ण करु शकलेली नाही त्यामुळे आज शेतकर्यांसमोर आत्महत्येशिवाय दूसरा पर्याय उरलेला नाही. मूलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी आज शेतकर्याला हतबल व्हावे लागतेय. पायाभूत सुविधांचाच साठ वर्षात अजून पत्ता नाही तर अद्ययावत सुविधांनी युक्त अशी प्रगत शेती करणे हे तर स्वप्नवतच राहिले आहे.
शेतकर्यांची ही दारुण अवस्था कॉंग्रेसमुळेच झाली आहे. साठ वर्षे केवळ खुर्च्या उबवणे आणि यथेच्च सत्ता उपभोगणे इतकेच काम कॉंग्रेसने केले असे खेदाने म्हणावे लागते. कॉंग्रेसला त्यांच्या सत्ता काळात देशहिताचे निर्णय घेऊन लांब पल्ल्याच्या योजना व शिघ्र योजना राबवता आल्या नाहीत, राबवल्या गेल्या नाहीत. केवळ निसर्गाच्या जोरावर आणि शेतकर्याच्या मेहनतीवरच जी काही आजपर्यंत प्रगती झाली ती झाली. साठ वर्षात नागरिकांनी सरकार निवडले ते देशाच्या भल्यासाठी नव्हे तर केवळ कॉंग्रेसचे भले करण्यासाठीच असा त्याचा अर्थ होतो. असे असताना स्वत:च्या पापाचे खापर दूसर्यावर फोडण्याची मात्र कॉंग्रेसला घाई झाली आहे.
कॉंग्रेसला सत्तासुंदरीचा विरह बिल्कूल सहन होत नाहीये, हाच याचा अर्थ आहे. केवळ एक वर्षात सत्तेपासून दूर राहिल्यामुळे कॉंग्रेस सैरभैर झाली आहे. त्यांना कशाचे ताळतंत्र राहिले नाही. सक्षम विरोधकांची भूमिका निभावणे तर लांबच राहिले, कोणत्याही मुद्द्यावर विरोध करत सरकारचे कामकाज रोखणे इतकाच अजेंडा कॉंग्रेसने ठरवला आहे. किमान शेतकर्यांच्या प्रश्नावर तरी कॉंग्रेसने गंभीरपणे वागणे आणि प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सरकारचा पाठपूरावा करणे अपेक्षित होते. पण जनतेने तशी अपेक्षा ठेवणे म्हणजे पालथ्या घागरीवर पाणी ओतण्यासारखेच आहे. देशभरात शेतकर्यांची मूलभूत गरज म्हणजे पाणी आहे. सिंचन योजना राबवण्याच्या दृष्टीने ज्या योजना राबवल्या गेल्या त्या अजूनही पुर्णत्वास गेल्या नाहीत. योजनांचा खर्च मात्र फुगतच गेला आहे. या योजना म्हणजे केवळ भ्रष्टाचाराची कुरणेच ठरली आहेत. साठ वर्षे केवळ ही कुरणे चरण्याचाच उद्योग केला गेला. त्यामुळे आज शेतकरी देशोधडीला लागला आणि आत्महत्येचा मार्ग धूंडाळू लागला. याला जबाबदार कॉंग्रेसच आहे हे जनता विसरलेली नाही आणि विसरणार ही नाही.
इकडे सोलापूरातही शेतकर्यांच्या मागण्यासाठी आणि आरक्षणाच्या मुद्यावरुन माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे रस्यावर उतरले. शिंदे अनेक वर्षे केंद्रात आणि राज्यात मंत्री होते मग त्यांना इतक्या वर्षाच्या सत्ताकाळात सोलापूरचा विकास आणि सोलापूरच्या शेतकर्यांचा विकास का साधता आला नाही. सत्ता असताना कधी ते शेतकर्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरले नाहीत. सत्ता गेल्यावर मात्र अचानक त्यांनाही सोलापूरच्या विकासाची आणि शेतकर्यांच्या हिताची आठवण झाली, याला काय म्हणावे. शेतकर्यांच्या हिताचा कॉंग्रेसला आलेला पुळका किती नाटकी आणि स्वार्थीपणाचा आहे याची शेतकर्यांना पुर्ण कल्पना आहे. त्यामुळे असली नाटकबाजी करुन स्वत:ची किंमत कॉंग्रेस कमी करुन घेत आहे. कॉंग्रेसने खरे तर चांगल्या विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणे अपेक्षित असताना खोटे नाटे आरोप करण्याचा उद्योग चालवला आहे. कोणतेही तथ्य नसताना पंकजा मुंडे यांच्यावर आरोप केला. माध्यमांनीही आरोपांची सरबत्ती करत खर्याखोट्याची चहाड ठेवली नाही. चिक्की खरेदीला चिक्की घोटाळा असा मथळा देऊन मोकळे झाले.
बातम्या न देता आपली मतं मांडत आरोपांचे सत्र सुरुच ठेवले आहे. राज्यातील आणि केंद्रातील सध्या सुरु असलेल्या अधिवेशनावरुन ‘मोदी चूप क्यो है’, ‘कॉंग्रेस आक्रमक’ म्हणत माध्यमं आपलेच वाजवून घेत आहेत. आक्रमक म्हणजे काय? आक्रमक शब्दाची व्याख्या काय? कॉंग्रेस सध्या आक्रमक नव्हे तर विकृत झाली आहे. कॉंग्रेसच्या या विकृतीला माध्यमं आक्रमक म्हणत आहेत. असे जर असेल तर आक्रमक शब्दाची व्याख्या बदलण गरजेच आहे. कॉंग्रेसला आता विरोध करायला मुद्दे सापडत नाहीयेत त्यामुळे सैरभैर होऊन कॉंग्रेस काहीही करत सुटली आहे. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राहूल गांधी यांनी तर लोकसभेत गंमतच चालवली आहे. त्यांना राज्याचे मुद्दे, केंद्राचे मुद्दे, लोकसभेचे कामकाजाचे विषय हे देखील कळत नाहीयेत असे दिसते. कॉंग्रेसचे इतर जाणकार नेते मात्र श्रेष्ठींना बोलून का दुखवा, म्हणून राहूलचा तमाशा पहात बसले आहेत. कॉंग्रेसची केंद्रात एक तर्हा तर महाराष्ट्रात दूसरी तर्हा चालली आहे. यातून केवळ एकच गोष्ट स्पष्ट होते की कॉंग्रेस स्वत:ची कबर स्वत:च खोदून ठेवते आहे. शेतकर्यांच्या हिताचे नाटक करत चालवलेला तमाशा येत्या काळात कॉंग्रेसलाच गोत्यात आणेल हे मात्र नक्की.