सडेतोड : अरुण रामतीर्थकर
मुंबईवरील हल्ल्यात ४० भारतीयांचा सहभाग होता असा पाकचा दावा होता. गेवराई, उदगीर होटगी अशा छोट्या गावांतून अतिरेकी तयार झाल्यावर हा दावा खोटा कसा मानायचा. दाऊद इब्राहिम, अबु सालेम, अफझल गुरू आणि आता अबु जिंदाल हे पाकिस्तानी होते का भारतीय.
एखाद्या गुन्ह्यातील आरोपी सापडल्यावर पोलीस त्याच्याकडून कबुली जबाब घेतात. तो कसा घेतात हे आपणा सर्वांना माहिती आहे. टायरमध्ये घालून मारणे, मिरच्यांची धुरी देणे, उलटे टांगणे, तळपायावर मारणे वगैरे, अंगावर जखम होऊन रक्त येणार नाही याची काळजी घेत त्याला कबुली देण्यास भाग पाडतात. काही वेळेस निरपराध्यांनाही असा प्रसाद मिळतो. गुन्हेगार संभावितासारखे किंवा संभावित गुन्हेगार निघत असल्याने पोलिसांचा एखादवेळी होरा चुकतो. मात्र गुन्हेगाराच्या पाया पडून विनवण्या करत एखादा इन्स्पेक्टर गुन्हेगारास आदरपूर्वक वागवत असल्याचे आपण कधी पाहिलेत? कबुली जबाब घ्यायचा तर प्रथम चार लाथांनीच संवादाला प्रारंभ होतो.
देशाचे गृहमंत्री चिदंबरम् हे नेभळटपणे बावळटपणे २६/११ च्या हल्ल्यातील सहभागाची पाकिस्तानाकडून कबुली मागत आहेत. इस्त्रायलने पॅलेस्टीनींकडे अशी कबुली एकदाही मागितली नाही. एक तर दुसर्याच्या अंतर्गतबाबीत लक्ष घालायचे नाही हे पथ्य अमेरिका सोडून जगातील बहुतेक सर्व देश पाळतात. शेजार्याने कुरापत काढली तर त्याला सरकारतर्फेच उत्तर दिले जाते. आपल्या देशातील एखाद्याने दुसर्या देशाची कुरापत काढली तर त्याला पकडून त्या देशाच्या हवाली केले जाते. लिबिया, इजिप्तने आपल्या देशातील अतिरेक्यांना पकडून अमेरिकेच्या हवाली केले. अबु सालेम या अतिरेक्याला पोर्तुगालने पकडून आपल्या हवाली केले.
पाकिस्तान हा जगातील एकमेव देश आहे जो सरकारी पातळीवर मैत्रीचे नाटक करून नागरी पातळीवर शत्रुत्व करतो. पाकिस्तानचा हा दुटप्पीपणा त्याच्या पश्चिम सीमेवरील अफगाणिस्तानबाबतही आहे. काबूलशी मैत्रीचे नाटक आणि तालिबान्यांना सर्व ती मदत पाकिस्तान करत आहे. या दुटप्पी धोरणाचा अतिरेक होऊन अराजक माजले आहे. सत्तांतर होऊन पुन्हा लष्करी राजवटीची शक्यता परवेझ मुशर्रफ यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्राध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप. त्याच्यावर कारवाई करायला कचरला म्हणून एक पंतप्रधान गेला. दुसरा नेमला तर शपथविधीपूर्वीच न्यायालयाने त्याची विकेट काढली. तिसरा नेमला. लवकरच न्यायालय त्याचाही बळी घेईल. घरची लफडी इतक्या शिगेला पोहोचली असताना आपले चिंदबरम् साहेब पाकिस्तानला विनवतात की कबूल करा. याला अज्ञान म्हणावे की वेडेपणा.
गेवराईचा अबु हामजा पकडल्यावर पाकिस्तानचा सहभाग उघड झाला. तसा तो या पूर्वी कसाब आणि हेडलीच्या जबानीतून स्पष्ट झाला आहे. पाकिस्तान चूक कबूल करणारच नाही हा भाग वेगळा, पण समजा चिदंबरम्च्या मागणीनुसार पाकिस्तानने चूक कबूल केली तरी काय फरक पडणार आहे, ठोस लष्करी कारवाई, समझोता एक्सप्रेस बंद करणे, श्रीनगर मुझफराबाद बस बंद करणे, राजदूत परत बोलावणे किंवा राजनैतिक संबंध तोडणे या पैकी एक तरी गोष्ट आपले सरकार करणार आहे का? मग उगीच कबुली जबाब मागण्याचे नाटक कशाला? हे नाटक अंगलट येते हे चिदंबरम्नी लक्षात घ्यावे.
या पूर्वी भारतातील दहशतवादी कारवायात पाकिस्तानी लष्कर सहभागी असल्याचा आरोप आपण केला. त्याच वेळी व्होट बँक सांभाळण्यासाठी समझोता एक्स्प्रेसमधील स्फोटाबद्दल कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक केली. ४ वर्षे होऊन गेली अजून पुरावा सापडला नाही. ‘हिंदू दहशतवाद’, असा शब्द रूढ करण्याच्या नादात आपण पाकिस्तानला मुद्दा मिळवून दिला. तुमचाही कर्नल दहशतवादात गुंतला तसा आमचाही एखादा असेल असा प्रतिवाद पाकिस्तानला करता आला. राजकारणाच्या लाभासाठी ‘हिंदू टेररिस्ट’ हा शब्द चिदंबरम् यांनीच काढला. शरद पवारांनी तर पुढे जाऊन साध्वीला अटक झाल्यावर आता देशातील बॉंबस्फोट थांबतील अशी अचाट प्रतिक्रिया दिली. याचा अर्थ मालेगावपूर्वी झालेले सर्व बॉंबस्फोट, घातपात हे हिंदूंनी केले. मग पाकिस्तानकडे कबुली कशाची मागता? आपली वक्तव्ये आपल्याला गोत्यात आणतील याची साधी अक्कल असू नये.
चिदंबरम् यांनी पाकिस्तानाकडे कबुली मागताच पाकिस्तानने या २६/११ च्या हल्ल्यात ४० भारतीयच होते, असा प्रतिवाद केला. तो असत्य म्हणण्याची हिम्मत आपल्या सरकारमध्ये आहे. कसाबबरोबरचे ९ जण कोण होते, त्यांची ओळख का जाहीर केली नाही, ते पाकिस्तानी होते तर रेड क्रॉसच्या हवाली त्यांची प्रेते का दिली नाही? पाकिस्तानने या उप्पर नाकारली असती तर लादेनप्रमाणे समुद्रात फेकून द्यायची. तसे न करता त्यांचे गुपचूप अज्ञातस्थळी दफन केले कारण ते भारतीयच होते.
दाऊद इब्राहिम कासकर, अबु सालेम, अफजल गुरूपासून गेवराईच्या अबु जिंदालपर्यंत पकडले गेलेले यात कसाब सोडला तर सारे भारतीयच आहेत. होटगी आणि उदगीरमधून अतिरेकी जन्माला येत असतील तर ती चूक आपली की पाकिस्तानची? परवा अक्कलकोटमध्ये ५०० रु. च्या बनावट नोटा खपवताना एक मुस्लिम तरुण सापडला. तो गेवराईचाच होता. यापूर्वी नळदुर्ग येथेही असाच एक तरुण हजाराच्या नोटा खपवताना सापडला. पाकिस्तान भलेही भारतीय चलनी नोटा छापत असेल, त्या येथे खपवणारे येथीलच लोक आहेत ना? पाकिस्तानातून नेपाळमार्गे प्रचंड शस्त्रसाठा वेरूळपर्यंत आला. कसा आला? स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय हे झाले का?
१९८०ते ९० या दशकात पंजाबमध्ये दहशतवाद शिगेला पोहोचला होता. पाकिस्तानच्या मदतीने मोजके खलीस्तानवादी रोज निरपराध लोकांना मारत होते. रोज १० ते १५ लोक मारले जायचेच. मुख्यमंत्री बेअंतासिंग आय.जी.पी.अतवाल यांच्यासह दूरदर्शनच्या निवेदकाही मारल्या. अतिरेक्यांना खडकू (स्वातंत्र्यवीर) असे म्हणा असा अतिरेक्यांनी आदेश देऊनही खडकू न म्हणता बातम्यात अतिरेकी म्हटले म्हणून निवेदिकांना ठार केले. अशा पंजाबमध्ये आज त्या दहशतवादाचे नामोनिशाण तरी आहे का? हे घडले कारण त्या हिंसाचाराला स्थानिक जनतेचा अजिबात पाठिंबा नव्हता. अकाल तख्तवर तोफा डागल्याचा राग होता, पण देशद्रोह शीख जनतेच्या मनात कधीच आला नाही. त्यामुळेच पूर्व पाकिस्तानचा बदला घेण्याचे पाकिस्तानचे स्वप्न अपूर्ण राहिले.
बाबरी मशिदीच्या पतनापासून या देशात दहशतवादाचा नवा अध्याय सुरू झाला. मुळात ती रामजन्मभूमी होती. त्यावर मशीद जुलमाने उभी केली. हा इतिहास सरकारने का नजरेआड केला. हीच गोष्ट सर्वोच्च न्यायालयाने आता मान्य केली आहे, पण ९३ पासून बाबरी वरून हिंदू संघटनांना झोडपून काढताना मशीद पाडून आपल्यावर अन्याय झाला. ही भावना मुस्लिम आतंकवादाला जन्म देणारी ठरेल. हे सरकारच्या ध्यानी आले नाही. गुजरात दंगलीचे तसेच कारसेवकांचे हत्यांकाड दुर्लक्षून त्यानंतरच्या दंगलीवरच सरकारनेच लक्ष केंद्रित केले. त्यामुळेही मुस्लिम युवकांच्या भावना भडकवण्यास पुन्हा सरकारी धोरणच कारणीभूत ठरले. मतांसाठी असले बिनडोक उद्योग केल्यावर त्याचा फायदा पाकिस्तान उचलणारच. कारण ते शत्रूराष्ट्र आहे. शत्रू वागतो तसेच वागत आहे. आता परराष्ट्र सचिव पातळीवर चर्चा गरजेची नव्हती. पाकिस्तानी सचिव आला तो प्रथमच काश्मीर खोर्यात जाऊन फुटीर नेत्यांना आधी भेटला. त्यावरून चर्चाच रद्द करायला हवी. पण तेवढी धमक आपल्यात नाही. आहे ती तोंडाची वाफ.
१९७१ साली पूर्व पाकिस्तानात सेना घुसवून ९० हजार पाक सैनिकांना पकडणारा हाच देश आहे का असा प्रश्न पडतो. व्याप्त काश्मिरमधील लष्करे तोयबाचे, जैशे मोहम्मदचे अड्डे उद्ध्वस्त करून हजार-पाचशे अतिरेक्यांना मारणे आपल्याला जमत नाही. पाकिस्तान ते अड्डे चालू ठेवत असेल तर तुम्ही बंद करा. कारण पाकिस्तानच्या दृष्टीने आझाद काश्मीर हा स्वतंत्र देश आहे.
मुंबईवरील हल्ल्यात ४० भारतीय असे पाकिस्तानने म्हणताच त्या दाण्याची आपण टर उडवली. १२० कोटी भारतीयांपैकी एकही भारतीय पाकिस्तानप्रेमी (टेररिस्ट अँगल) नाही असे आपण छाती ठोकपणे म्हणू शकतो का?
रविवार, दि. १५ जुलै २०१२