‘‘पाणी, अखंड वीज, रस्ते आदी मूलभूत सुविधांबाबत सोलापूर मागे असल्याने ‘फॉरीन बायर्स’ सोलापूरमध्ये यावयास इच्छुक नाहीत. आजचे बहुसंख्य उद्योग हे निर्यातीवर आधारित आहेत. साधारणपणे ६० टक्क़े उत्पादने निर्यात होतात. नवे उद्योजक व खरेदीदाराला जर मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत, तर तो सोलापुरात यायला तयार होणार नाही. त्यामुळे सोलापुरातील उद्योजक हे परदेशी व देशातील इतर ग्राहकांना मुकतात. हे टाळायचे असेल तर प्रथम मूलभूत सुविधा उपलब्ध करणे महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन रंगनाथ बंग यांनी केले. पाणी आणि विजेचा प्रवाह सुरळीत नसल्यामुळे वेस्टेज वाढते, त्यामुळे नुकसान वाढते आणि हे उद्योजकांवर गंडांतर यायला कारणीभूत ठरू शकते. कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज महाग आहे आणि वीज पुरवठाही सुरळीत नाही. हे विजेचे दर कमी होणे गरजेचे आहे. त्यामुळेच बरेच उद्योजक कर्नाटक, आंध्रकडे वळले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यात सोलापूर, मुंबई, गुलबर्गा, बंगळूर, हैदराबाद शहरात आपल्या उद्योगांची व्याप्ती पसरवणार्या रंगनाथ बंग यांच्या बंग उद्योग समुहाला बहुराज्यिय उद्योग समुह असे नामाभिधान देणे योग्य ठरेल. सोलापुरात अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे सन १९८९ साली रंगनाथ बंग यांनी डेटा फॉर्म प्रा.लि. ची स्थापना करून सोलापूरात आपल्या उद्योगांची मुहुर्तमेढ रोवली. येथे कॉम्प्युटर स्टेशनरीचे उत्पादन सुरु केले. दुसरे युनिट १९९६ साली चिंचोळी एमआयडीसीत सुरु केले. १९९६ साली बंग पॉलिपॅक्स प्रा.लि. ची स्थापना करून सीमेंट, खते आदींसाठी वापरल्या जाणार्या प्लास्टिक पोत्यांच्या उत्पादनास प्रांरभ केला. याचा एक विभाग गुलबर्गा येथे तर दुसरा विभाग हैदराबाद येथेही सुरू आहे. २००१ मध्ये सुप्रीम पॉलिविव्ह प्रा.लि. ला सुरुवात झाली. तर बंग ओव्हरसीज लि. याद्वारे ‘थॉमस स्कॉट’ नावाने ओळखली जाणारी प्रिमियम दर्जाची गारमेंट्स बनविली जातात.
रंगनाथजी बंग म्हणजे सोलापूरच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रांतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. भारतीय परंपरा, संस्कार रक्तारक्तात भिनलेले रंगनाथजी अतिशय साधकवृत्तीचे असून, परिवारात आणि समाजात ते ‘बाबुजी’ म्हणून ओळले जातात. त्यांचे उद्योगक्षेत्राबरोबरच सामाजिक, धार्मिक, आध्यत्मिक क्षेत्रांतील कार्य मोठे आहे. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक आहेत. संघसंस्कारांना ते आयुष्यातील मोठी पुंजी मानतात. उद्योगातील सचोटी आणि निष्ठेमुळे रंगनाथजी बंग हे सोलापूरच्या औद्योगिक, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रांतील अग्रगण्य नाव ठरले आहे.
रंगनाथजी बंग यांच्या पूर्वजांचा म्हणजे आजोबा, वडील यांचा पारंपरिक सोन्याचा व्यापार. खरेदी-विक्री ही पारंपरिक व्यवसायपद्धती होती. त्यांचे वडील शिवनारायण बंग यांचा आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे सोन्याचा व्यवसाय होता. सन १९५६ साली सोन्याच्या व्यवसायाबरोबरच कागद उद्योगात त्यांनी प्रवेश केला. त्या काळात कागद उत्पादनाच्या व्यवसायाला अनन्यसाधारण महत्त्व होते, ते आजही तितकेच आहे. याशिवाय बंग परिवाराने अन्नधान्य, ज्यूट आदी व्यवसाय देखील केले आहेत. बंग कुटुंब म्हणजे उद्योगातील एक आदर्श भारतीय कुटुंब आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचे आदर्श म्हणून बंग परिवाराकडे पाहता येईल.
५ भावांच्या या एकत्र कुटुंबात ७० लोक आहेत. रंगनाथजी बंग यांचे एक बंधू कै. संपतकुमार बंग व दुसरे बंधू कै. रामकुमार बंग यांनी राजमहेंद्री येथे व्यवसाय संवर्धित केला. आंध्र प्रदेशातील विजयवाडा, राजमहेंद्री, हैदराबाद, विशाखापट्टणम् आदी ठिकाणी कागद वितरणाचा व्यवसाय ते करीत होते. बंग कुटुंबाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या कुटुंबात सर्व क्षेत्रांतील उच्चशिक्षित तज्ज्ञ व्यक्ती आहेत. रंगनाथ बंग यांच्या कुटुंबात मुले व पुतणे मिळून ८ इंजिनीअर्स, ४ सी.ए., ५ एम.बी.ए. पदवीप्राप्त व्यक्ती आहेत.
रंगनाथ बंग यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सन १९८२ साली राजमहेंद्री आणि त्यानंतर मुंबई येथे व्यवसायाला सुरुवात केली. सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे सन १९८९ साली रंगनाथ बंग यांनी डेटा फॉर्म प्रा.लि.ची स्थापना करून येथे सन १९९० पासून कॉम्प्युटर स्टेशनरीच्या उत्पादनास सुरुवात केली. दुसरे युनिट सन १९९६ साली चिंचोळी एमआयडीसी, सोलापूर येथे सुरू केले. या दोन्ही ठिकाणी सिक्युरिटी प्रिंटिंग परमिशन उत्पादने, जसे की बँकांचे चेक्स, डिमांड ड्राफ्ट, रेल्वे तिकिटे आदींची निर्मिती व छपाई केली जाते. त्यानंतर आपल्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावत रंगनाथ बंग यांनी १९९६ साली बंग पॉलिपॅक्स प्रा.लि.ची स्थापना करून सीमेंट, खते आदींसाठी वापरली जाणार्या प्लास्टिक पोत्यांच्या उत्पादनाला प्रारंभ केला. सुरुवातीला एक मशीन होती, नंतर वाढवत आज ५ मशीन आहेत. सुरुवातील ८० टनापासून उत्पादनास प्रारंभ केला. आज महिना ६०० टन उत्पादन केले जाते. यासाठी संपूर्ण उत्पादन एकाच छताखाली करणारा अद्ययावत असा या प्रकल्पाचा एक विभाग गुलबर्गा येथे सुरू केला आहे. असाच प्रकल्प हैदराबाद येथेही सुरू केला आहे. येत्या वर्षात १ हजार टन उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. गेल्यावर्षी म्हणजे २००९-१० या आर्थिक वर्षातील उलाढाल १०३ कोटी होती. येत्या वर्षात ही उलाढाल ११० कोटींपर्यंत अपेक्षित आहे. एकूण उत्पादनांपैकी ३०० टन उत्पादन युरोप, अमेरिका, लॅटीन अमेरिका, युनायटेड अरब अमिराती आदी देशांत निर्यात केले जाते.
यानंतर बंग उद्योग समूहाने मोठी गरुडझेप घेत सन २००१ मध्ये सुप्रीम पॉलिविव्ह प्रा.लि. या नव्या प्रकल्पाची सुरुवात चिंचोळी एमआयडीसी येथे केली. रंगनाथजी बंग यांना दोन मुले असून, ज्येष्ठ चिंरजीव वरदराज रंगनाथ बंग यांचे शिक्षण बी.ई (इलेक्ट्रॉनिक्स) असून, ते डेटा फॉर्म प्रा.लि.ची जबाबदारी सांभाळतात, तर कनिष्ठ चिरंजीव वासुदेव रंगनाथ बंग यांचे शिक्षण बी.ई.(पॉलिमर्स) असून, ते बंग पॉलिमर्स व सुप्रीम पॉलिविव्हची धुरा वाहतात. बंग उद्योग समूहाचा मुंबईत टेक्स्टाईल उद्योग देखील आहे. तेथे गारमेंट्सचे उत्पादन केले जाते. ‘थॉमस-स्कॉट’ हा सुप्रसिद्ध बॅ्रंड बंग ओव्हरसीज लिमिटेडचा आहे. थॉमस-स्कॉटच्या शर्टस, ऍपरल्सच्या उत्पादनांबरोबरच त्याची भारतातील ४५ शहरात रिटेल आऊटलेटस आहेत. याचे दुसरे युनिट बंगळुरू व तिसरे युनिट विशाखापट्टणम येथे आहे. बंग ओव्हरसीज लि.ची चालू वर्षाची उलाढाल ३०० कोटी असून, मुंबई स्टॉक एक्सचेंजला या कंपनीची नोंद सन २००७ ला झाली आहे.
सामाजिक कार्य :-
रंगनाथजी बंग हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासून म्हणजे १९५३ पासून स्वयंसेवक आहेत. जनकल्याण समितीचे ते सोलापूर जिल्हाध्यक्ष आहेत. माहेश्वरी समाजाच्या माहेश्वरी भवनचे अध्यक्ष आहेत. यमगरवाडी प्रकल्पाच्या विकासासाठी ते कार्यरत आहेत. हरी सत्संग समिती, मुंबई या संस्थेचे कार्य सोलापुरात रुजविण्याचे काम सुरू आहे.
भारतीय समाज पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करीत असल्याने त्यांच्यात भारतीय संस्कृतीची बीजे पुन्हा रुजविण्यासाठी सोलापुरात हिंदू नववर्ष साजरे करण्याची अभिनव प्रथा सुरू केली.
हिंदूंनी पाश्चिमात्यांचे नूतन वर्ष असलेले ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी हे दिवस साजरे न करता हिंदू नववर्ष गुढीपाडव्याला साजरे करावे म्हणून प्रयत्न केले, त्यासाठी त्यांनी हिंदू नववर्ष समितीची सोलापुरात स्थापना केली व गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्ष सोलापुरात मोठ्या प्रमाणात साजरे केले जाऊ लागले. याचे श्रेय रंगनाथजी बंग यांना जाते. तेच सोलापूरच्या हिंदू नववर्ष समितीचे उद्गाते आहेत.
नव्या पिढीने एककल्ली न होता सर्वच क्षेत्रांत संचार करावा : रंगनाथ बंग
|
उद्योजक रंगनाथजी बंग |
सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी आवश्यक आहेत त्या मूलभूत सुविधा. मूलभूत सुविधा पुरविल्याशिवाय सोलापूरचा विकास कसा होणार? असा प्रश्न सोलापुरातील ज्येष्ठ व प्रसिद्ध उद्योजक रंगनाथजी बंग यांनी तरुण भारतशी बोलताना उपस्थित केला. उद्योजकांच्या उद्योगवाढीसाठी लागते पाणी, अखंड वीज, रस्ते (दळणवळण) आणि जागा. यातील सर्वच बाबतीत सोलापूर मागे असल्याने ‘फॉरीन बायर्स’ सोलापूरमध्ये यावयास इच्छुक नाहीत. आजचे बहुसंख्य उद्योग हे निर्यातीवर आधारित आहेत. साधारणपणे ६० टक्क़े उत्पादने निर्यात होत असतात. खरेदीदाराला जर मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत, तर तो सोलापुरात यायला तयार होत नाही. त्यामुळे सोलापुरातील उद्योजक हे परदेशी व देशातील इतर ग्राहकांना मुकतात आणि ग्राहक नाही म्हणून मग पुढे उद्योगांवर गंडांतर येते. हे टाळायचे असेल तर प्रथम मूलभूत सुविधा उपलब्ध करणे महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन रंगनाथ बंग यांनी केले. पाणी आणि विजेचा प्रवाह सुरळीत नसल्यामुळे उत्पादनातील वेस्टेज वाढते आणि उत्पादनांच्या दर्जावर देखील परिणाम होतो. जितके वेस्टेज वाढेल तेवढे नुकसान वाढण्याचा धोका बळावतो आणि हेच नुकसान उद्योजकांवर गंडांतर यायला कारणीभूत ठरू शकते. सोलापुरात आता शिक्षित कर्मचारी वर्ग मिळतो आहे, पण हेल्पर आदींसारखे अर्धशिक्षित किंवा अकुशल कामगार कमी आहेत. शिक्षणाच्या प्रगतीमुळेही असेल कदाचित की आज अकुशल कामगार मिळत नाहीत.
पॉलिमर्स विव्हिंग उद्योग हा टेक्स्टाईल्स उद्योगातच मोडतो. हे केंद्र शासन मान्य करते आणि त्याप्रमाणे सुविधा देते, पण राज्य सरकार मात्र पॉलिमर विव्हिंग उद्योगाला टेक्स्टाईल उद्योगवर्गामध्ये वर्गीकृत असल्याचे मानायला तयार नाही. राज्य सरकारच्या या आडमुठ्या धोरणांमुळे टेक्स्टाईल उद्योगांना मिळणार्या सुविधांपासून हा उद्योग वंचित राहिला आहे. ‘टफ’ अर्थात ’टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड’ उपलब्ध न झाल्याने या क्षेत्रातील बरेच उद्योग अडचणीत आले आहेत.
कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज महाग आहे आणि वीज पुरवठाही सुरळीत नाही. हे विजेचे दर कमी होणे गरजेचे आहे. त्यामुळेच बरेच उद्योजक कर्नाटक, आंध्रकडे वळले आहेत. येत्या काळात ट्रेड कमी होत आहे. मध्यस्थ, दलाल आदी प्रणाली संपवण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे ट्रेडला भविष्य नाही. नवउद्योजक होऊ पाहणार्यांना आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा सल्ला देताना रंगनाथ बंग म्हणतात की, उत्पादन आणि विशेषत: मोनोपॉली उत्पादन करणार्यांना येत्या काळात विशेष महत्त्व राहील. सध्या सगळाच तरुणवर्ग आयटी क्षेत्राकडे वळत आहे, त्यामुळे इतर क्षेत्रांतील संधी वाढल्या आहेत. आयटीच्या तुलनेत इतर क्षेत्रांतील कौशल्य असलेला तरुणवर्ग आज मिळत नाही. आयटी क्षेत्रात काम करणार्यांचे देशाच्या प्रगतीतील योगदान हे इतर क्षेत्रातील विशेषत: इंजिनीअरिंग क्षेत्रातील लोकांंच्या तुलनेत कमी आहे. नव्या पिढीने एककल्ली न होता सर्वच क्षेत्रांत संचार करणे गरजेचे आहे.