स्वदेशी तंत्रज्ञानाने अमाईन्स उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही एकमेव आणि जगातील पहिली कंपनी आहे. रेड्डी बंधूंनी १९८८ मध्ये एका प्लांटपासून सुरुवात करून आज १० प्लांट उभे करीत मोठी भरारी घेतली आहे. बालाजी अमाईन्सने सुरुवातीपासून संशोधन व विकासावर जोर दिलेला असून, त्यांचे प्रत्येक नवीन उत्पादन हे स्वत:च्या संशोधन व विकास विभागामधून बाहेर पडलेले आहे. यासाठी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ‘रेकग्नायझेशन ऍन्ड इन-हाऊस आर ऍन्ड डी’ चा दर्जा देण्यात आलेला आहे. साधारणपणे जी कंपनी एखादे स्वतंत्र नवे उत्पादन देशात पहिल्यांदा करते, त्याच कंपनीला हा दर्जा दिला जातो. दर्जेदार व संशोधित उत्पादनांमुळे जागतिक स्थरावर बालाजी अमाईन्सला मोठा दर्जा लाभला आहे. बालाजी अमाईन्सच्या या योगदानामुळे भारताबरोबच सोलापूरच्याही शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. आता बालाजी अमाईन्स ‘बालाजी सरोवर पोर्टिको’ नावाचे पंचतारांकित हॉटेल सुरू करीत हॉटेल उद्योगात पदार्पण करीत आहे.
सोलापूर शहर एकेकाळचे उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य शहर. जुने जाणकार म्हणतात की, सोलापूरच्या गिरण्यांमधून सोन्याचा धूर निघत होता, पण गेल्या २०-३० वर्षांत सोलापूर रसातळाला गेले. आपल्या सोलापूरच्या उद्योगनगरीला अशाही प्रतिकूल परिस्थितीत काही उद्योग व उद्योजकांनी तारून नेले. फक्त तारूनच नेले नाही, तर राखेतून उठणार्या फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उंच उद्योगभरारी घेतली. या यशस्वी भरारीत अनेक उद्योजकांचा सिंहाचा वाटा आहे. काही उद्योजकांनी तर सोलापूरची मान जागतिक स्थरावर उंचावली आहे. यात अग्रगण्य नाव म्हणजे ‘बालाजी अमाईन्स. ’बालाजी अमाईन्सच्या रेड्डी बंधूंनी १९८५ साली उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली आणि पाहता पाहता बालाजी अमाईन्सने उत्तुंग गरुडझेप घेत आपल्या कक्षा रुंदावल्या. या देदीप्यमान भरारीने, वैशिष्टपूर्ण व एकमेवाद्वितीय उत्पादनांमुळे बालाजी अमाईन्सचे आणि सोलापूरचेही नाव जगभर आदराने घेतले जाते.बालाजी अमाईन्सचे संस्थापक, संचालक आणि संवर्धक म्हणजे ए. प्रताप रेड्डी, एन. राजेश्वर रेड्डी आणि डी. राम रेड्डी ही त्रिमूर्ती बंधुत्रयी होत. कार्यकारी संचालक ए. प्रताप रेड्डी हे असून, एन. राजेश्वर रेड्डी आणि डी. राम रेड्डी हे संचालक आहेत. रेड्डी घराण्यातील उद्योगक्षेत्रात उतरणारी ही पहिलीच पिढी. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रेड्डी बंधूंनी १९८५ मध्ये सिमेंट पाईप उत्पादनाचा पहिला लघुउद्योग प्रकल्प सुरू केला. पुढे १९८८ मध्ये ‘बालाजी अमाईन्स’ हा प्रकल्प धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी येथे सुरू केला. कठोर परिश्रम, चिकाटी, व्यावसायिक सचोटी, सतत संशोधन आणि कामाप्रती निष्ठा जपत रेड्डी बंधूंनी बालाजी अमाईन्सला जगद्विख्यात केले.
स्वदेशी तंत्रज्ञान : अमाईन्स हे रासायनिक उत्पादन तयार करणार्या जगात दोनच कंपन्या अमेरिका व जर्मनी येथे आहेत. अमाईन्ससारख्या गुंतागुंतीच्या रसायन उत्पादनासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करणारी बालाजी अमाईन्स ही एकमेव व जगातील पहिली कंपनी आहे. १९८८ मध्ये एका प्लांटपासून सुरुवात करणार्या बालाजी अमाईन्सचे आज १० प्लांट सोलापूर परिसर व आंध्र प्रदेशात कार्यरत आहेत. बालाजी अमाईन्सला सन २००२ साली आयएसओ ९००१ : २००० चे मानांकन प्राप्त झाले. आयएसओ १४००० : १८००० मानांकन प्रमाणपत्र लवकरच मिळेल, असा विश्वास बालाजी अमाईन्सचे संचालक डी. राम रेड्डी यांनी ‘तरुण भारत’शी खास बातचित करताना व्यक्त केला.
उत्पादने : जीवनावश्यक औषधे, शेती फवारणी औषधे, जलशुद्धीकरण, रबर रासायनिक शुद्धीकरण आदी उत्पादने तयार करण्यासाठी लागणारी मूल रसायने म्हणजे कच्चा माल बालाजी अमाईन्स तयार करते. औषधांपैकी मधुमेहाच्या रुग्णांना दिल्या जाणार्या औषधांत वापरल्या जाणार्या रसायनाचे उत्पादन बालाजी अमाईन्स करते. हे उत्पादन जगभर वितरित होत असून, त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्याची क्षमता असलेली ही एकमेव कंपनी आहे. बालाजी अमाईन्समध्ये बरीच विशेष रासायनिक उत्पादने उत्पादित केली जातात. त्यातील ‘एनएमपी, मोरफोलिन’ ही उत्पादने अशी आहेत की, जी भारतात फक्त बालाजी अमाईन्स येथेच उत्पादित केली जातात. ही उत्पादने मागील वर्षापर्यंत भारतात आयात केली जात होती, पण आता बालाजी अमाईन्सने याचे उत्पादन सुरू केल्यापासून याची आयात जवळजवळ बंद झालेली आहे. ही आयात केवळ बंदच झालेली नसून, मागील वर्षापासून परदेशात निर्यात होऊ लागली आहेत, ही भारताच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे! तर सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी आहे. २००३ साली बोल्लारम, हैदराबाद येथे नैसर्गिक उत्पादनांचा प्रकल्प सुरू झाला. तेथे तंबाखूपासून ‘सीओ-क्यू १०’ उत्पादित केले जाते. एड्स, मधुमेह, रक्तदाबाच्या रुग्णांना दिल्या जाणार्या औषधात याचा वापर केला जातो.
संशोधन आणि विकास : बालाजी अमाईन्सने आरंभापासून संशोधन व विकासावर जोर दिलेला असल्याचे सांगून डी. राम रेड्डी पुढे म्हणाले की, बालाजी अमाईन्सचे प्रत्येक उत्पादन हे स्वत:च्या संशोधन केंद्रामध्ये विकसित झालेले आहे. तसेच जगातील अत्याधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. प्रबळ संशोधन आणि विकास यंत्रणा व अद्ययावत तंत्रज्ञान हीच बालाजी अमाईन्सच्या जोमदार प्रगतीची बलस्थाने आहेत. संशोधनासाठी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ‘रेकग्नायझेशन ऍन्ड इन-हाऊस आर ऍन्ड डी’ चा दर्जा बालाजी अमाईन्सला मिळालेला आहे. जी कंपनी एखादे स्वतंत्र नवे उत्पादन देशात पहिल्यांदा करते, त्याच कंपनीला हा दर्जा दिला जातो.
निर्यात : आज बालाजी अमाईन्स आपल्या एकूण उत्पादनांपैकी ३० टक्के उत्पादने जगातील ४० ते ४५ देशांत निर्यात करते. त्यामुळे भारत सरकारच्या वाणिज्य संचालनालयाकडून ‘स्टार एक्स्पोर्ट हाऊस’ चा दर्जा देण्यात आला आहे.
विस्तारीकरण : चिंचाळी औद्योगिक वसाहतीत तिसरा प्रकल्प सुरू केला असून, तेथे जीवनावश्यक औषधे व सौदर्यप्रसाधनांच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे ‘पीव्हीपीके-३०’ हे उत्पादन डिसेंबर २००९ पासून सुरू केले आहे. या उत्पादनात बालाजी अमाईन्स भारतामध्ये एकमेव असून, जागतिक स्थरावर चीन वगळता तिसर्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत भारतात हे उत्पादन जर्मनी व अमेरिकेतून आयात केले जात होते. बालाजी अमाईन्सने हे उत्पादन सुरू केल्याने आयात करणे बंद तर झालेच, शिवाय येत्या काळात भारतातून निर्यात केले जाईल. चिंचोळी एमआयडीसी येथे वर्ष २०१० करिता ६० कोटींची गुंतवणूक करीत असून, विस्तारीकरणाचे काम ऑक्टोबर २०१० पर्यंत पूर्ण होईल. पुढील दोन वर्षांत कंपनीची संकल्पित उलाढाल ही ५०० कोटींची असेल.आज या कंपनीवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष १००० कुटुंबे अवलंबून आहेत. तसेच रेड्डी बंधूंच्या सोलापूर व परिसरातील ४ लघुउद्योग प्रकल्पांवर ४०० कुटुंंबांना रोजगार मिळतो. कंपनीची मागील वर्षाची उलाढाल २४० कोटी असून, चालू वर्षाचे उद्दिष्ट हे ३०० कोटींचे आहे.
वीजनिर्मिती प्रकल्प : तामलवाडी येथे स्वत:च्या वीजनिर्मिती प्रकल्पातून (कॅपटिव्ह पॉवर प्लांट) प्रत्यक्ष वीजनिर्मिती नोव्हेंबर २००९ पासून सुरू केली आहे. या प्रकल्पात एकूण गुंतवणूक १४.५० कोटी रुपयांची केली गेली आहे.
पवनऊर्जा प्रकल्प :- उपलब्ध ऊर्जास्रोत आणि ऊर्जेची गरज लक्षात घेऊन सातारा व सांगली जिल्ह्यांत बालाजी अमाईन्सने दोन पवनऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले असून, प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात देखील झाली आहे.
सीएफएल लॅम्प उत्पादन :- बालाजी अमाईन्सने ग्रीनटेक प्रॉडक्टस् लि.च्या संयुक्त विद्यमाने सीएफएल लॅम्पचे उत्पादन आंध्र प्रदेशातील सदाशिव पेठ येथे होत आहे. ही उत्पादने ‘झोरा’ व ‘बालाजी’ या नावाने प्रसिद्ध आहेत.
बालाजी अमाईन्सचे सामाजिक कार्य
सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत बालाजी अमाईन्सने ‘बालाजी फाऊंडेशन व रिसर्च सेंटर’ ही ट्रस्ट सुरू करून त्याच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पुस्तके, शालेय साहित्य दिले जाते. तसेच उच्च शिक्षणासाठी मदत केली जाते. बर्याच शाळांना विज्ञान प्रयोगशाळा साहित्य आणि खेळाचे साहित्य पुरविले जाते. बालाजी अमाईन्स व संचालकांच्या नफ्यातील काही हिस्सा सामाजिक कार्यासाठी या ट्रस्टकडे वर्ग केला जातो.
पुरस्कार आणि सन्मान
बालाजी अमाईन्सला भारत सरकारच्या वाणिज्य संचालनालयाकडून ‘फर्स्ट ऍवॉर्ड फॉर एक्स्पोर्ट परफॉरमन्स फॉर द ईयर ऑफ २००७-०८’ पुरस्कार जाहीर झाला. ‘फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन’ तसेच सन २००८-०९ करिता ‘निर्यात श्री’ हे पुरस्कार जाहीर झाले असून, पुढील महिन्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. बालाजी अमाईन्सच्या या प्रगतीला सोलापूरकरांच्या आणि दै. तरुण भारतच्या हार्दिक शुभेच्छा!
•हॉटेल उद्योगात पदार्पण
‘बालाजी सरोवर’ नावाचे पंचतारांकित हॉटेल सुरू करीत असल्याचे डी. राम रेड्डी यांनी सांगितले. होटगी मार्गावर १५० खोल्या, २००० क्षमतेचे बॅकेट हॉल, हेल्थ क्लब, जलतरणाची सोय असणार आहे. या प्रकल्पात सुमारे ४० कोटींची गुंतवणूक केली जात आहे. हॉटेलचे व्यवस्थापन सरोवर हॉटेल प्रा. लि.ही करणार आहे. हा हॉटेल प्रकल्प ‘ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट’नुसार असून, ‘इको फ्रेंडली’ प्रकल्प म्हणून ओळखला जाईल.
•सोलापूरचा विकास
सद्यस्थितीत सोलापूर हे उद्योगधंद्यांसाठी अनुकूल असून, पुढील ५ वर्षांत सोलापूरचा विकास अतिशय तीव्रगतीने होणार आहे यात शंका नाही! असा आत्मविश्वास डी. राम रेड्डी यांनी व्यक्त केला. त्यासाठी सोलापूरकरांचे सहकार्य आणि अधिकारी व नेते मंडळींनी उद्योगवाढीसाठी सोयी-सुविधांवर भर देणे अत्यंत आवश्यक आहे. उद्योगवाढीमुळे सोलापुरात कुशल कामगारांची उणीव भासण्याची शक्यता असल्याचे राम रेड्डी म्हणाले.
……………………………………………….
दै. तरुण भारत, सोलापूर. सोलापूरची उद्योग भरारी, रविवार, दि. १९ सप्टेंबर २०१०