•चौफेर : अमर पुराणिक•
मागच्या निवडणूकीत लालूप्रसाद यादव यांच्या ‘जंगलराज’च्या विरोधात प्रचार करुन नीतिश कुमारांनी सत्ता काबिज केली होती. आता तेच लालूप्रसाद यादव यांच्या ‘जंगलराज’मध्ये सामिल झाले आहेत. त्यामुळे जनता यावेळी नीतिश कुमार यांना साथ देण्याची शक्यता नाही. नीतिश कुमार यांना आसंगाशी संग भोवणार आहे.
बिहार विधानसभा निवडणूकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. जशा तारखा जाहीर झाल्या तसा निवडणूकीला रंग चढला आहे. १२ ऑक्टोबर पासून ५ नोव्हेंबर दरम्यान ५ टप्प्यात होणार्या या निवडणूकीचे निकाल दिवाळीपुर्वीच म्हणजे ८ नोव्हेबर रोजी जाहीर होतील. तेव्हा जिंकणार्या पक्षाची दिवाळी आणि हरणार्यांचा शिमगा होणार हे सांगायला नको. प्रत्येक पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. जागावाटप जाहीर करण्यात भाजपाने बाजी मारली आहे. युती-प्रतियुतीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. शिवाय महत्त्वाची बाब म्हणजे बिहारमधील ३७ जिल्ह्यांपैकी २९ जिल्हे नक्सल प्रभावीत आहेत त्यामुळे निवडणूकीत जास्त सावधता बाळगण्याची जबाबदारी प्रशासनावर येऊन पडली आहे.
निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून बिहारमधील राजकारणाने वेगवेगळे मांडे घेण्यास सुरुवात केली आहे. विद्यमान मुख्यमंत्री नीतिश कुमार, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव आदींनी जनता परिवार स्थापन केला आणि लगेच काडीमोडही घेतला. त्यामुळे आता लालूप्रसाद यादव आणि नीतिश कुमार एकटे पडले आहेत. बिहारमध्ये चाललेल्या राजकीय गदारोळाकडे पाहता असे दिसून येतेय की, प्रत्येक बाब भाजपाच्या पथ्यावर पडते आहे. अनेकांची राजकीय समिकरणे आणि आखाडे भाजपाचा विजयाचा मार्ग प्रशस्त करत आहेत असे सध्यातरी चित्र आहे. कालच मुलायमसिंह यादव यांनी तीसरी आघाडी जाहीर केली आहे. त्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस, पी.ए. संगमा यांचा पक्ष, देवेंद्र प्रसाद यादव यांचा समाजवादी जनता दल यांचाही समावेश आहे. हे कमी होते म्हणून की काय असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमनेही अकस्मातपणे बिहार विधानसभा निवडणूकीत उडी घेतली आहे. एमआयएम मोठ्याप्रमाणात उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे नीतिश कुमार, लालूप्रसाद यादव व कॉंग्रेस यांचे धाबे दणाणले आहेत.
आजपर्यंत बिहारचे राजकारण हे मोठ्याप्रमाणात दलित मते आणि मुस्लिम मतपेटीवर नजर ठेवूनच खेळले गेले आहे. लालूप्रसाद यादव, नीतिश कुमार आणि कॉंग्रेसने मुसलमान मतांवर नजर ठेऊन आजपर्यंतच्या सर्व खेळी खेळल्या आहेत. त्यामुळे आता ओवेसींच्या एमआयएमने बिहारच्या निवडणूकीत उडी घेतल्यामुळे कॉंग्रेस, लालू आणि नीतिश यांच्या मुस्लिम मतांच्या गणिताचा फज्जा उडाला आहे. एमआयएम मोठ्याप्रमाणात मुस्लिम मते काबीज करण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर लालू, कॉंग्रेस आणि नीतिश यांची दयनिय अवस्था होणार आहे. बिहारमध्ये मुस्लिम मतांची संख्या १६ टक्क्याहूनही अधिक असल्याचे बोलले जातेय काही ठिकाणी मुस्लिम मतांची टक्केवारी २२ टक्के नोंदवली आहे. त्यामुळे नेमका आकडा जरी मिळाला नसला तरी १६ टक्के मुस्लिम मते कॉंग्रेस, नीतिशकुमार आणि लालूप्रसाद यांच्यापासून दुरावली आहेत. ही एक गठ्ठा मते ओवेसीच्या एमआयएमला जातील. सेक्यूलरवादाचे घाणेरडे राजकारण खेळत सत्तेला सोकावलेल्या कॉंग्रेसला आणि लालूप्रसाद यादव, नीतिश कुमार यांना मात्र याचा खूप मोठा फटका बसणार आहे. एमआयएमला जास्त जागा जिंकता येणार नसल्या तरी ओवेसीचे उमेदवार मोठ्याप्रमाणात कॉंग्रेस, लालू, नीतिश कुमार यांचे उमेदवार पाडणार हे मात्र निश्चित आहे.
हे कमी होते की काय म्हणून मुलायमसिंह यादव यांचा समाजवादी पक्ष आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने तिसरी आघाडी स्थापन करुन आणखी गोची करुन ठेवली आहे. काल मुलायमसिंह यादव यांनी भाजपा आणि कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही तिसरी आघाडी उघडली असल्याचे सांगितले. मुळात कॉंग्रेसचे बिहारमधील अस्तित्व खुप नगण्य आहे. त्यामुळे कॉंग्रेस सत्तेत येण्याचा प्रश्नच येत नाही. राहता राहिला भाजपा. भाजपा सत्तेचा सर्वात प्रबळ दावेदार आहे. जनतेचा कौल, मोदींच्या विकासकामांचा सपाटा आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे सुत्रबद्ध नियोजन यामुळे भाजपा बिहार विधानसभेच्या निवडणूकीतही बाजी मारेल अशीच सध्याची स्थिती आहे. भाजपाने १६० जागा घेतल्या आहेत. तर रामविलास पासवान यांच्या पक्षाला ४० जागा दिल्या आहेत. जागावाटपाचे हे प्रमाण असे असले तरीही भाजपा कमी जागा घेऊन जास्त जागा निवडून आणण्यात यशस्वी होईल. साधारणपणे लोकसभेच्या निवडणूकांप्रमाणेच बिहार विधानसभेतही भाजपा १६० पैकी कमीतकमी १२० जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करेल. बिहारमधील काही तज्ज्ञांच्यामते भाजपा एकटाच बहूमताचा आकडा गाठेल अशी स्थिती आहे. एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की बिहार विधानसभेच्या २४३ जागांपैकी एकटी भाजपा १२५ जागा जिंकेल. शिवाय रामविलास पासवान यांचा पक्षही बळकट आहे. यावेळी दलित मते मोठ्याप्रमाणात पासवान यांना मिळतील. शिवाय जितनराम मांझी हे देखील युतीत आहेत. त्यांचा किती प्रभाव पडेल हे सांगणे सध्यातरी अवघड आहे पण रालोआला त्यांचा उपयोग नक्कीच होईल.
बिहारमध्ये आजपर्यंत जातीचे राजकारण मोठ्याप्रमाणात चालत आले आहे. त्याचाच आखाडा बांधून नीतिश कुमार, लालू आणि कॉंग्रेस चालली आहे. बिहार मध्ये यादव १४ टक्के, दलित १५ टक्के, राजपूत ५ टक्के, वैश्य ७ टक्के, ब्राह्मण ६ टक्के, कायस्थ २ टक्के, भूमिहार ५ टक्के, कोइरी ७ टक्के, कुर्मी ४ टक्के आणि मुसलमान १५ टक्के आहेत. या जातींच्या मतांची विभागणी कशी होते ते निकालाच्यावेळीच कळणार आहे. अशी जातींची आकडेवारी असली तरी यावेळी खरा निर्णायक मतदार ठरणार आहे तो वेगळाच. साडे सहा कोटी बिहारी मतदारांपैकी ५६ टक्के मतदार हा १८ ते ४० वयोगटातील आहे आणि जवळजवळ ४२ लाख तरुण मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहे. आणि हा पहिल्यांदा मतदान करणारा मतदारच निर्णायक ठरेल. कारण बिहारमधील ‘जंगलराज’ला बिहारचा तरुण कंटाळला आहे. मागच्या निवडणूकीत लालूप्रसाद यादव यांच्या ‘जंगलराज’च्या विरोधात प्रचार करुन नीतिश कुमारांनी सत्ता काबिज केली होती. आता तेच लालूप्रसाद यादव यांच्या ‘जंगलराज’मध्ये सामिल झाले आहेत. त्यामुळे जनता यावेळी नीतिश कुमार यांना साथ देण्याची शक्यता नाही. नीतिश कुमार यांना आसंगाशी संग भोवणार आहे.
पंतप्रधान मोदींचा जादूई करिश्मा बिहारच्या निवडणूकीतही दिसणारच आहे. कारण मोदी यांनी गेल्या वर्षभरात ज्या पद्धतीने विकासकामे सुरु केली आहेत ती बिहारची जनता पहातच आहे. शिवाय बिहारच्या निवडणूकीत पुन्हा एकदा अमित शहा यांचे निवडणूक नियोजन कौशल्य दिसू लागले आहे. बिहारमध्ये ज्यापद्धतीने त्यांनी नियोजन केले आहे ते पाहता भाजपा स्पष्ट बहूमत मिळवेल असे दिसते. अमित शहा यांनी बिहारच्या भाजपा कार्यकर्त्यात चांगले चैतन्य निर्माण केले आहे. त्याचे परिणाम निवडणूकीच्या निकालात दिसून येतीलच. अर्थात निवडणूकीला अजून महिनाभराचा अवधी आहे. या कालावधीत कोणाचे फारडे झुकते आणि कोणाचे रिकामे होते हे दिसेलच. पण भाजपा आपले पारडे शेवटपर्यंत झुकतेच राखेल अशी शक्यता आहे.