संधी हुडकल्यास यशाचे शिखर पादाक्रांत करणे शक्य : रिचवुडचे संचालक ऋषीकेश बदामीकर
• उद्योग भरारी : अमर पुराणिक
‘‘फर्निचर निर्मिती आणि विक्रीबरोबरच ‘रिचफिल क्रॅक फिलर’ व ‘रिचफिल वुड बुट्टी’ या लाकडातील खड्डे व भेगा बुजवणार्या अद्भुत व अनुपम उत्पादनाच्या आधारे फर्निचर उद्योगाच्या क्षेत्रात देशभर आपला नावलौकिक करणार्या व त्या अनुषंगाने सोलापूरचे नाव देशभर गाजवणारे उद्योजक आपल्या सोलापुरात आहेत. अशा उद्योजकात सोलापुरातील सुप्रसिध्द उद्योजक ‘रिचवुड’चे ऋषीकेश बदामीकर यांचा समावेश होतो. भारतभरातील उद्योग क्षेत्रात सोलापूरचा दबदबा निर्माण करण्यात रिचवुडच्या ऋषीकेश बदामीकरांचाही मोठा वाटा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरकरांच्या मनात आणि घरात स्थान पटकावणारे ‘रिचवुड’ हे ग्राहकांना मोठे विश्वासाचे स्थान वाटते, पण त्यापाठीमागे मोठी तपश्चर्या आहे. हे श्रम काय आहेत आणि यशाचे गमक काय आहे? याबद्दल तरुण भारतशी ऋषीकेश बदामीकर यांनी दिलखुलास बातचित केली.’’
जग बदतंय, विचार बलताहेत आणि त्याबरोबरच माणसाची जीवनशैली देखील बदलत चाललीय. बदलत्या काळाबरोबर प्रत्येकजण आपली जीवनशैली अधिकाधिक उंचावण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येकाला वाटतंय की आपलं घर, कार्यालय आधुनिक आणि सुंदर असावं. हे करीत असताना सर्वप्रथम गरज पडते ती अद्ययावत फर्निचरची. कारण आजच्या काळात व्यक्तीच्या राहणीमानाचा दर्जा हा त्याचे घर आणि विशेषत: घरातील फर्निचरवर ठरवला जातोय आणि समाजमनाची ही गरज पूर्ण करण्यात सोलापुरातील अग्रेसर नाव म्हणजे आहे, बदामीकर यांचे ‘रिचवुड’ फर्निचर.
फर्निचर निर्मिती आणि विक्रीबरोबरच ‘रिचफिल क्रॅक फिलर’ व ‘रिचफिल वुड बुट्टी’ या लाकडातील खड्डे व भेगा बुजवणार्या अद्भुत व अनुपम उत्पादनाच्या आधारे फर्निचर उद्योगाच्या क्षेत्रात देशभर आपला नावलौकिक करणार्या व त्या अनुषंगाने सोलापूरचे नाव देशभर गाजवणारे उद्योजक आपल्या सोलापुरात आहेत. अशा उद्योजकांत सोलापुरातील सुप्रसिध्द उद्योजक ‘रिचवुड’चे ऋषीकेश बदामीकर यांचा समावेश होतो. भारतभरातील उद्योगक्षेत्रात सोलापूरचा दबदबा निर्माण करण्यात रिचवुडच्या ऋषीकेश बदामीकरांचाही मोठा वाटा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आजच्या बदलत्या काळात जनसामान्यांची सुबत्ता जशी वाढतेय, तशी सौदर्यदृष्टीही वाढत आहे. आपलं घर सुंदर असावं असं प्रत्येकालाच वाटू लागलं आहे. त्यामुळे प्रत्येकजणच आता फर्निचर खरेदीबाबत जागरूक झालेला आहे. आशा जागरूक ग्राहकाला तितक्याच जागरूकतेने आणि सचोटीने अत्याधुनिक व दर्जेदार फर्निचर पुरवण्यात बदामीकरांचा हातखंडा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरकरांच्या मनात आणि घरात स्थान पटकावणारे ‘रिचवुड’ हे ग्राहकांना मोठ विश्वासाचे स्थान वाटते, पण त्या पाठीमागे मोठी तपश्चर्या आहे. हे श्रम काय आहेत आणि यशाचे गमक काय आहे? याबद्दल तरुण भारतशी ऋषीकेश बदामीकर यांनी दिलखुलास बातचित केली.
ऋषीकेश राघवेंद्र बदामीकर यांचे बी.कॉम.पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे आपल्या वडिलांना त्यांच्या फर्निचर व्यवसायात मदत करीत असताना केवळ जिद्द, आत्मविश्वास, कल्पकता, निरीक्षण व अभ्यास या जोरावर फर्निचर व्यवसाय वाढीबरोबरच अथक परिश्रम करून व संशोधन करून लाकडातील खड्डे व भेगा बुजवणारे ‘रिचफिल क्रॅक फिलर’ हे आज भारतभर प्रसिद्ध असणारे दर्जेदार उत्पादन तयार केले व त्यांनी त्यांच्या या उत्पादनाला संशोधनाचे पेटंट देखील मिळवले. त्यानंतर त्या उत्पादनातील गुण व दोषांचा अभ्यास करून लाकडासाठी लागणारी, सर्वांना उपयुक्त होईल अशी ‘लांबी’ तयार केली, जी लाकडांच्या भेगांमध्ये भरल्यावर लाकडासारखी मजबूत होते व त्या लांबीवर लाकडाप्रमाणे सर्व कामे करता येतात. त्या लांबीचे नाव आहे ‘रिचफिल वुड पुट्टी’ ही भारतातील पहिली इको फें्रंडली लांबी आहे. या उत्पादनाच्या पेटंटसाठी नोेंदणी केलेली आहे. सध्या हे उत्पादन भारतातील सर्वच राज्यांत पाठवले जात असून, या उत्पादनाला भारतभरातून जोरदार मागणी आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात ‘रिचफिल प्लायवुड प्लस’ नावाचे उत्पादन बाजारात आणले असून, याही उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ऋषीकेश बदामीकर यांनी सांगितले.
व्यवसाय सुरू केला तेव्हा एकाच प्रकारचे उत्पादन होते, पण ग्राहकांची वाढती मागणी पाहून वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांसाठी ५ वेगवेगळी उत्पादने बनवली जातात. सन २००४-२००५ साली या उत्पादनाच्या विक्रीसाठी सोलापूर, लातूर, कोल्हापूर अशा ठिकाणी प्रयत्न केला होता, पण यश मिळाले नाही परंतु अपयश आले म्हणून न थांबता सतत प्रयत्न सुरू ठेवल्याचे सांगून ऋषीकेश बदामीकर पुढे म्हणाले की, सन २००५-०६ साली बंगळुरू येथे ‘इंडियन वुड’ नावाचे प्रदर्शन पाहायला गेलो होतो. तेथे फर्निचरसाठी लागणारी मशिनरी व कच्चा माल पुरवठा करणार्या कंपन्यांचे स्टॉल्स होते. त्या स्टॉल्समध्ये ऑस्ट्रेलिया येथील ‘टिंबरमेट’ या कंपनीचा पण स्टॉल होता. ही कंपनी फक्त लाकडाची लांबी विकत होती. या कंपनीचा स्टॉल पाहिल्यानंतर जाणवायला लागले की, आपणसुद्धा आपल्या कंपनीचा स्टॉल या प्रदर्शनात लावला पाहिजे. कारण त्या प्रदर्शनाला भारतातील सर्व राज्यांतून फर्निचर व्यावसायिक व लाकूडकामाशी संबंधित व्यक्ती भेट देत होत्या आणि व्यवसाय वाढीचा तो सर्वात चांगला मार्ग होता. मधल्या काळात मी आमच्या फर्निचर व्यवसायाची अद्ययावत व्यवस्थापनाच्या आधारे घडी नव्याने बसवली. ही घडी बसल्यानंतर २००७-०८ च्या प्रदर्शनात सहभाग घेतला. या प्रदर्शनात रिचवुडच्या उत्पादनांना उदंड प्रतिसाद मिळल्याचे बदामीकरांनी सांगितले.
उमेदवारीच्या काळात आमच्या बदामीकर ऍन्ड सन्स या दुकानात केलेल्या कामाचा व अनुभवाचा मला हे उत्पादन विकताना खूप फायदा झाला. व्यवसायात पुढच्या पिढीनेही आपल्या पायावर उभे राहावे म्हणून धाकट्या भावाची पत्नी सौ. पूनम हिला देखील आमच्या या व्यवसायात गुंतवले. सुरुवातीला मी व्यवसाय करताना व्यवसाय माझ्याभोवतीच फिरायचा. व्यवसायाची तंत्रं, उधारी, देणी-घेणी फक्त मलाच माहीत असायची, पण सौ. पूनम बदामीकर या व्यवसायात आल्यानंतर मात्र व्यवसायाचे विकेंंद्रीकरण सुरू केले. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात मला लक्ष घालावे लागत नाही. संपूर्ण व्यवहार पूनम बदामीकर याच पाहतात. त्यामुळे मला व्यावसायवृध्दी व संशोधनावर पूर्ण लक्ष देता येऊ लागल्याचे ऋषीकेश बदामीकर म्हणाले.
आम्ही ग्राहकांना चांगल्या प्रतीचे फर्निचर योग्य किमतीत देत असल्याने ग्राहक पूर्ण समाधानी असल्याचे सांगून बदामीकर पुढे म्हणाले की, त्यामुळे आमचा व्यवसाय वाढण्यासाठी हा समाधानी ग्राहकच मोठी मदत व प्रयत्न करतो. रिचवुड फर्निचर हे आमचे दुकान मुख्य रस्त्यावर नसून, होटगी रोड येथे किनारा हॉटेलच्या पाठीमागे आहे. ग्राहकाला आमच्या दुकानापर्यंत येण्यासाठी शोधाशोध करावी लागते. त्यामुळे मलासुद्धा सुरुवातीला वाटायचं की आपला व्यवसाय कितपत चालेल. कधी कधी दैनिकांमधून जाहिरात करीत होतो, पण नुसतीच जाहिरात करून ग्राहक दुकानापर्यंत येत नाही. कारण ती जाहिरात वाचून ग्राहकाला या दुकानातून एखादी वस्तू घेतल्यास आपल्याला फायदा होईल असे वाटावे लागते, तेव्हाच तो दुकानापर्यंत येत असल्याचे व्यावसायिक मर्म बदामीकर यांनी सांगितले. असे असताना वाजवी किंमत व उत्तम दर्जाचे फर्निचर आम्ही ग्राहकाला देत असल्यामुळे ग्राहकाचा आमच्यावरचा विश्वास वाढत गेला. आमच्याकडे नुसती भेट द्यायला येणारा ग्राहक सुद्धा आमच्याकडून कोणती ना कोणती वस्तू आज ना उद्या खरेदी करायचा निश्चय करतो. आम्ही काही चांगल्या यंत्रणा कार्यान्वित केल्यामुळे आणि पूनम बदामीकर यांनी पूर्ण जबाबदारी यशस्वीरीत्या पेलल्यामुळे तसेच मिलिंद चक्रदेव सर, राजू, राकेश, श्रीकांत हे सर्वजण आपापली जबाबदारी उत्तमरीतीने पार पडत असल्यामुळे व्यवसायात वृद्धी होत राहिली.
बंगळुरूच्या इंडिया वुड या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात मी आमच्या रिचफिल क्रॅक फिलर हे उत्पादन भारतभराच्या बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी भाग घेतला. तेथे भारतातील सर्व भागातून फर्निचर उत्पादक, प्लायवुड उत्पादक, खेळणी व खेळाच्या साहित्यांचे उत्पादक, पॅकिंग बॉक्स निर्माते असे लाकूड व्यवसायातील लोक आले होते. तेथून आम्हाला काही चांगले ग्राहक मिळाले. रिचफिल क्रॅक फिलर हे आमचे पहिले प्रॉडक्ट ‘रेडी टू मिक्स’ प्रकारातले होते. त्यामुळे फेविकॉलसारखे ऍडेसिव्ह वेगळे घालावे लागायचे. आमच्या ग्राहकांची अशी मागणी होती की, आम्हाला पूर्ण तयार व परिपूर्ण उत्पादन द्या. त्याआधी पाच ते सहा वर्षे परिपूर्ण उत्पादन देण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. मोठ्या ग्राहकांची ही मागणी लक्षात घेऊन आणखी जोमाने प्रयत्न केल्यानंतर सन २००८-०९ मध्ये मी एक परिपूर्ण असे इको फ्रेंडली प्रॉडक्ट तयार केले आणि त्याला नाव दिले, ‘रिचफिल वुड बुट्टी.’ त्यावर्षी दिल्लीमध्ये प्रगती मैदान येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भाग घेतला. तेथे आमच्या या नव्या उत्पादनाने ‘रिचफिल वुड बुट्टी’ने ग्राहकांची मने जिंकली, अनेक मोठ्या ग्राहकांना हे उत्पादन आवडले. त्यानंतर लाकूड व प्लायवुडशी संबंधित मासिकांमध्ये आमच्या या नवीन उत्पादनाबद्दल माहिती येऊ लागली. त्यामुळे भारतभरातून विचारणा होऊ लागली. आमचे हे उत्पादन इको फ्रेंडली असल्यामुळे तसेच एकदा लाकडाच्या भेगांमध्ये, खड्ड्यांमध्ये भरल्यानंतर परत लाकडाला भेगा जाऊ देत नाही. लाकडात भरल्यानंतर त्याची मजबुती लाकडाप्रमाणेच होते. लाकडासारखे कोरीव काम त्यावरही करता येते, अशा अनेक बहुगुणी वैशिष्ट्यांमुळे मागणी वाढली. भारतातील अग्रगण्य कंपन्या हे उत्पादन आवर्जून घेतात.
बदामीकरांच्या एका पश्चिम बंगालमधील ग्राहकाने ‘रिचवुड’च्या उत्पादनांवर कविता करून पाठवली आहे. ती कविता वाचून मी तर भारावूनच गेलो! असे उद्गार ऋषीकेश बदामीकर यांनी काढले. गेल्यावर्षी आमचेे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेतील नंदीध्वजाच्या काठ्यांमध्येही माझ्या उत्पादनांचा वापर केला, त्यावेळी मला खूपच अभिमान वाटला व श्री शिवयोगी सिद्धेश्वरांनी हा आपल्याला आशीर्वादच दिला आहे असे वाटले, हे ऋषीकेश बदामीकर यांनी अतिशय श्रद्धापूर्वक भावनेने सांगितले. मार्च महिन्यात डेहराडून येथील ‘फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटने वुड सबस्टिट्यूट ऍन्ड ऍडव्हान्सेस इन वुड सायन्स ऍन्ड टेक्नॉलॉजी’ या विषयावर परिषद भरवली होती. तेथे भारतातील वुड सायन्समध्ये काम करणारे ५० ते ६० वैज्ञानिक आले होते. मी केलेल्या कामाबद्दल त्यांनी सुद्धा प्रशंसा केली. तेव्हाचा अनुभव देखील खूप चांगला होता, असे प्रतिपादन बदामीकर यांनी केले.
बदामीकरांचा ग्राहक दिल्लीपासून केरळपर्यंत आहे. वुड इंडस्ट्रीतील बहुसंख्या कंपन्या आमच्या ग्राहक आहेत. जयपूर, जोधपूर येथील हँडिक्राफ्ट बनवणारे व विशेषत: परदेशी निर्यात करणारे उद्योजक ग्राहकांचा ‘रिचफिल’ वापरण्याचा आग्रह असतो, हेच रिचवुडच्या उत्पादनांचे मोठे यश म्हणाले लागेल!
रिचवुडच्या उत्पादनांचे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करीत असताना मी प्रो. श्रीकांत लोणीकर, प्रो. शेडजाळ सर यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. त्यांनी न कंटाळता मला योग्य मार्गदर्शन केले, त्यामुळे मी येथपर्यंत पोहोचू शकलो, असे नम्रपणे नमूद करून बदामीकर पुढे म्हणाले की, तत्पूर्वी माझ्या विचारांना खरी दिशा मिळाली ती आमचे गुरुजी संगीत शिक्षक गुरुवर्य श्री. रामाचार्य बागेवाडीकर यांच्यामुळे. ते सांगायचे की, कोणत्याही गोष्टीत वाहत जाऊ नका, जे काम हाती घेतले ते आधी करा आणि मग इतर छंद जोपासा. त्यांच्याकडे मला तबला वादनाच्या शिक्षणाबरोबरच जीवनविषयक तत्त्वज्ञान त्यांच्याकडून शिकायला मिळाले, हे माझे परमभाग्य!
भविष्यातील आपल्या योजनांबद्दल सांगताना ऋषीकेश बदामीकर म्हणाले की, येत्या काळात पार्टीकल बोर्ड मशिनरी येणार असून, त्यामुळे पार्टीकल बोर्डपासून फर्निचरचे उत्पादन करता येणार आहे. याबरोबरच ‘फुल कुशन सोपा’ हे नवे उत्पादन देखील आम्ही बाजारात आणत आहोत. या सोफ्याचे संपूर्ण कुशन डिटॅचेबल व वॉशेबल म्हणजे काढून धुता येते, हा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. हे उत्पादन आम्ही ग्राहकांच्या गरजा व मागणी लक्षात घेऊन तयार केले आहे. त्याचप्रमाणे ‘फ्रेन्डली मेटल फ्रेम सोफा’ सुद्धा उत्पादित करीत आहोत. हा सोफा लोखंडी फ्रेमचा असून, पूर्णपणे वेगळा करता येतो. याशिवाय अनेक नवी उत्पादने बाजारात आणण्याचा प्रयत्न असून, त्यावर संशोधन व अभ्यास सुरू असल्याचे बदामीकर यांनी सांगितले.
पुरस्कार – रिचवुडच्या माध्यमातून ऋषीकेश बदामीकर यांनी केलेल्या संशोधनाची दखल घेऊन रोटरी क्लबच्या ‘व्यवसाय सेवा पुरस्काराने’ त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्थरावर प्रसिद्ध असलेले कोट्टायम (केरळ) येथील ‘रबर बोर्ड इन्स्टिट्यूट’ या संस्थेने ‘रिचफिल वुड पुट्टी’ या उत्पादनास मानांकन दिले असून, हे मानांकन लाकूड उद्योगाच्या क्षेत्रात अतिशय मानाचे समजले जाते. याशिवाय अनेक छोटे-मोठे सन्मान रिचवुडला मिळाले आहेत.
•सोलापूरचा औद्योगिक विकास : ऋषीकेश बदामीकर
|
ऋषीकेश बदामीकर |
टेक्स्टाईल डेव्हपमेंटमुळे सोलापूरचे उद्योगक्षेत्रात नाव झाले, पुढेही खूप प्रगती होईल असे वाटत होते. याच विचाराने माझे आजोबा शामराव बदामीकर सोलापुरात आले. परिवार मोठा असल्याने त्यांनी काही काळ नोकरीही केली, पण सोलापूरची उद्योगवाढ १५, २० वर्षांपूर्वी थांबली आणि नंतर सोलापूर अधोगतीला लागल्याची खंत ऋषीकेश बदामीकर यांनी व्यक्त केली. औद्योगिक शहर म्हणून सोलापूरचे नाव विस्मृतीत गेले असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, पण आता पुन्हा सोलापूरच्या उद्योगांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी शासनाने मदत करणे गरजेचे आहे. शासनाच्या मदतीशिवाय उद्योगांना लागणारी पायाभूत सुविधा देणे अशक्य आहे आणि या पायाभूत सुविधा मिळाल्या तर सोलापूरचा पुन्हा नव्या जोमाने औद्योगिक विकास होईल. सोलापुरातील उद्योजकांना प्रोत्साहीत करण्याबरोबरच बाहेरील उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी योजना झाल्या पाहिजेत. सोलापूरकरांना नोकरी, उद्योग न मिळाल्यामुळे ते सोलापूर सोडून जात आहेत. कारण त्यांना येथे नोकर्या मिळत नाहीत किंवा समाधानकारक पगार दिला जात नाही. कमी पैशात त्यांच्याकडून काम करवून घेतले जाते. या दोषाचे निराकारण केले तर सोलापूरकर सोलापुरातच राहतील आणि कुशल, अकुशल कामगार व अधिकारी दर्जाच्या उच्चशिक्षित मंडळींची चणचण भासणार नाही, असा विश्वास बदामीकर यांनी व्यक्त केला.
सर्वसामान्य व्यवसाय करण्यासाठी कदाचित जास्त शालेय शिक्षणांची गरज नसेलही, परंतु व्यावहारिक ज्ञान, वेगळे काही करण्यासाठी डोळे उघडे ठेवून संधी हुडकल्यास तसेच आपल्या कल्पनाशक्तीला ताण दिल्यास कोणीही यशाचे शिखर पादाक्रांत करू शकतो, असा अनुभवाचा संदेश ऋषीकेश बदामीकर यांनी नव्याने उद्योग क्षेत्रात येऊ पाहणार्यांना दिला आहे.
तरुण भारत, सोलापूर, सोमवार, दि. ०२ मे २०११