Home » Blog » विज्ञाननिष्ठ निबंध : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार

विज्ञाननिष्ठ निबंध : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार

विज्ञाननिष्ठ निबंध :  स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार

       वाहत्या नदीत काठी आपटली असता त्या नदीच्या अखंड धारेचे पळभर दोन भाग झालेले भासतात. संध्याकाळी अंधुकलेल्या अखंड आकाशात मध्येच कुठे जी पहिली चांदणी लुकलुकू लागते ती तशी चमकण्यासरशी ह्या अखंड आकाशाला एक गणनबिंदू मिळून त्याच्या चारीकडे चार बाजू चट्‌कन वेगळ्या झाल्याशा भासतात.

ह्या पदार्थजगतातही मनुष्याच्या जाणिवेची चांदणी चमकू लागताच त्याचे अकस्मात्‌ दोन भाग पडतात. उभे विश्व, अनंताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चरकन्‌ कापले जाऊन दुभंग होऊन पडते. सुरूप आणि कूरूप, सुगंधी आणि दुर्गंधी, मंजुळ आणि कर्कश, मृदूल आणि कठोर, प्रिय आणि अप्रिय, चांगले आणि वाईट, दैवी आणि राक्षसी, ही सगळी द्वंद्वे मनुष्य हा ह्या यच्चयावत् ‌विश्वाचा, वस्तुजागताचा, केंद्र कल्पिल्यामुळेच मध्यबिंदू समजला जाताच अकस्मात्‌ उत्पन्न होतात. मनुष्यास जो सुखद तो विश्वाचा एक भाग, मनुष्यास जो दु:खद तो दुसरा पहिला चांगला, दुसरा वाईट.
ज्याने विश्वाचा मनुष्यास सुखद होणारा हा चांगला भाग निर्मिला तो देव; मनुष्यास दु:ख देणारा तो दुसरा वाईट भाग निर्मिला तो राक्षस.
मनुष्याच्याच लांबीरुंदीचा गज घेऊन विश्वाची उपयुक्तता, बरेवाईटपणा, मोजला असता ह्या मोजणीचा हा निकाल फारसा चुकत आहे असे काही म्हणता येणार नाही.
विश्वाची उपयुक्तता आपल्या मापानेच मनुष्याने अशी मापावी हेही अपरिहार्यच होते. विश्वाचे रसरूपगंधस्पर्शादि सारेच ज्ञान मनुष्याला त्याच्यापाशी असलेल्या पाच ज्ञानेंद्रियांनीच काय ते कळू शकतात. विश्वातील वस्तूजात एकेकी गणून, तिचे पृथक्करण करून, ते घटक पुन्हा मोजून त्या अमर्याद व्यापाची जंत्री करीत राहिल्याने विश्वाच्या असीम महाकोषातील वस्तुजाताचे मोजमाप करणे केवळ अशक्य असे समजून आपल्या प्राचीन तत्त्वज्ञान्यांनी, आपल्या पाच ज्ञानेंद्रियानीच ज्या अर्थी हे सर्व विश्व केव्हाही जे काही आकळले जाऊ शकणारे आहे ते जाऊ शकते, त्या अर्थी त्याचे “पंचीकरण’ करणे हाच वर्गीकरणाचा उत्कृष्ट मार्ग होय असे जे ठरविले ते एका अर्थी क्रमप्राप्तच होते. इतकेच नव्हे, तर तो त्यांच्या अप्रतिम विजयच होता. ज्ञानेंद्रियेच जर पाच तर विश्वाचे यच्चायावत्‌वस्तुजात त्यांच्या त्या पाच गुणांपैकी कोणत्यातरी एका वा अनेक गुणांचेच असणार. अर्थात्‌त्या पाच गुणांच्या तत्त्वांनी, पंचमहाभूतांनीच, ते घडलेले असणार. ह्या विश्वदेवाचा आम्हाशी जो काही संवाद होणे शक्य आहे तो ह्या त्याच्या पाचमुखांनीच काय तो होणार म्हणूनच तो विश्वदेव, तो महादेव पंचमुखी होय! आपल्या ज्ञानेंद्रियांनी विश्वाच्या गुणधर्मांचे आकलन करण्याचा मनुष्याचा हा यत्न जितका अपरिहार्य नि सहज, तितकाच स्वत:च्या अंत:करणाने त्या विश्वाला निमिणार्‍या देवाच्या अंत:करणाची कल्पना करण्याचा मनुष्याचा यत्नही साहजिकच होता. त्यातही मनुष्याला सुख देण्यासाठीच कोण्या दयाळू देवाने ही सृष्टि निर्मिली असली पाहिजे, ह्या मानवी निष्ठेला अत्यंत प्रबळ असा पाठिंबा ही सृष्टिदेवीच प्रतिपदी, प्रतिपली तिला तशी लहरच आली की सारखी देत राही, आजही देतेच आहे!
खरोखर, मनुष्याच्या सुखसोयीसाठी त्या दयाळू देवाने ही सृष्टीची रचना किती ममताळूपणाने केली आहे पहा! हा सूर्य, हा समुद्र – किती प्रचंड ही महाभूते ! पण मनुष्याच्या सेवेस त्यांना देखील त्या देवाने लावले. दुपारी तहान तहान करीत मुले खेळत दमून येतील तेव्हा थंडगार नि गोड पाणी मिळावे म्हणून आई सकाळीच विहिरीचे पाणी भरून “कुज्या’त घालून गारत ठेवते, तशा ममतेने उन्हाळ्याने नद्या सुकून जाण्याच्या आधीच हा सूर्य त्या समुद्रातले पाणी किरणांचे दोर खोलखोल सोडून भरतो, मेघांच्या “कुज्या’तून साठवून ठेवतो, आणि तेही मध्यंतरी अशी काही हातचलाखी करून, की असमुद्रात असताना तोंडी धरवेना असे खारट असणारे ते पाणी किरणांच्या कालव्यातून त्या आकाशाच्या विस्तीर्ण सरोवरात साचताच इतके गोड नि गार व्हावे की जे पाणी पिण्यासाठी देवांच्याही तोंडास पाणी सुटावे ! पुन्हा समुद्राचे खारट पाणी माणसासाठी गोड करून देण्याच्या धांदलीच साराचा सारा समुद्र गोड करण्याची भलतीच चुकीही न होईल अशी तो दयालू देव सावधगिरीही घेववितो – एका वर्षात हवे तितकेच पाणी गोड करून आटविण्याइतकीच शक्ति सूर्यकिरणात आणि साठविण्याइतकीच शक्ति मेघात ठेविली जाते. नाहीतर सारा समुद्रात गोड झाल्याने मनुष्यास मीठ मिळणे बंद होऊन त्याचा सारा संसार अळणी व्हावयाचा !
हे पशु पहा ! मनुष्यांच्या सेवेला आणि सुखाला हवे तसेच विविध, हवे तितकेच बुद्धिमान, वाळवंटातील ते मनुष्याचे तारू – म्हणून काटे खाऊन पाण्यावाचून महिनोगणती चालण्याची युक्ति त्या उंटाला शिकविली. तो घोडा किती चपल ! त्याच्यावर स्वारी भरणार्‍या मनुष्यास भर रणांगणाताही सांभाळून वहाण्याइतकी नि मनुष्याशी अत्यंत प्रामाणिकपणे वागण्याइतकी बुद्धि त्याला देवाने दिली. पण मनुष्यावरच स्वारी भरण्याइतकी बुद्धिमात्र दिली नाही! ही गाय पहा. एका बाजूला सुके गवत ढकलावे नि दुसर्‍या बाजूला त्याचे बनलेले त्याचे ताजे जीवनप्रद दूध चरव्या भरभरून काढीत बसावे ! असे ते आश्चर्यकारक रासायनिक यंत्र ज्या देवाने घडविले तो खरोखरच किती दयाळू असला पाहिजे! आणि पुन्हा प्रत्येक वेळी जुने यंत्र मोडताच नवे घडण्याचे श्रमसुद्धा मनुष्याला पडू नयेत अशी सोय त्यातच केलेली; पाहिल्या यंत्रातच गवताचे दूध करून देता देताच तसलीच नवीन अजब यंत्रे बनविण्याचीही व्यवस्था केलेली !
एक गव्हाचा दाणा पेरला की त्याचे शंभर दाणे ज्या जगात होऊन उठतात; एक आंबा! रसाने, स्वादाने, सत्त्वाने कोण भरपूर भरलेले ते देवफळ! पण तरीही ते इतके सुपीक की एक आंबा रुजविला की त्याचा वृक्ष होऊन प्रतिवर्षी हजार हजार आंबे त्याला लागावे नि असा क्रम वर्षानुवर्षे चालावा; फार काय सांगावे, एका आंब्याच्या फळापासून होणारी ती लाखो फळे सगळीची सगळी जरी मनुष्यांची खाल्ली तर पुन्हा आंब्याचा तोटा म्हणून पडून नये, यासाठी आंब्याच्या झाडाच्या फांदीचीच कलमे करून त्यांच्या आंबरायांच्या आंबराया भरभराटण्याची सोय ज्या जगात देवाने केलेली आहे; एका कणाचा मण होणारी ही तांदूळ, बाजरी, जोंधळे प्रभृति नानाविध सत्त्वस्थ धान्ये, एक बी पेरले की एका पिढीस सहस्त्रावधि रसाळ फळष पुरविणारी ही फळझाडे; हे फणस, पपनस, अननस, द्राक्षे, डाळिंबे, या गवतसारख्या उगव म्हणताच उगवणार्‍या अति रुचकर बहुगुणी, विविधरस शाकभाज्या, फळभाज्या; ज्या जगात पुरून उरताहेत, ज्याचा गाभाच गोड आहे, तो साखरेच्या पाकाने उरताहेत, ज्याचा गाभाच गोड आहे, तो साखरेच्या पाकाने ओतप्रोत भरलेला ऊस देखील ज्या जगात इतका पिकतो की त्याचे मळेचे मळे माणसांना नकोसे झाले म्हणजे बैल खाऊन टाकतात. त्या जगास निर्मिण्यात देवाने मनुष्यावर जी अमर्याद दया केली आहे तीविषयी मनुष्य त्याचा उतराई होणार तरी कसा!!
तशीच ही मनुष्याच्या देहाची रचना! पायाच्या तळव्यापासून तो मज्जातील सूक्ष्मातिसूक्ष्म पिंडानुपिंडापर्यंत ह्या शरीराची रचना मनुष्याला सुखदायी होईल अशीच सुसंवादी करताना हे मनुष्यच्या देवा, तू जी केसानुकेसागणीक काळजी घेत आला आहेस ती कुठवर सांगावी ! मनुष्याचा हा एक डोळा जरी घेतला तरी, किती युगे, किती प्रयोग, किती अनवरत अवधाने करून तू हा आज आहे तसा घडवू शकलास! प्रथम प्रकाशाला किंचित्‌संवादी असा एक नुसता त्वग्बिंदु; प्रकाशाला नव्हे तर त्याच्या सावलीला तेवढा जाणणारा; अंधेर नि उजेड इतकाच फरक काय तो जाणणारा तो पहिला त्वग्बिंदु; त्याच्यात सुधारणा करता करता किती प्रयोग करून, किती रद्द करून, पुन्हा प्रयोग रचता रचता शेवटी आज मनुष्याचा सुंदर, टपोरा, पाणीदार, महत्त्वाकांक्षी डोळा तू घडविलास! इतका महत्त्वाकांक्षी डोळसपणा त्या मनुष्याच्या डोळ्यात मुसमुसत आहे की, देवा, तुझ्याच कलेत तुझाच पाडाव करण्यासाठी दुर्बिणीचे प्रतिनेत्र निर्मून तो तुझ्या त्या आकाशातील प्रयोगशाळेचेच अंतरंग पाहू इच्छीत आहे! नव्हे तुलाही त्या दुर्बिणीच्या टप्यात गाठून कुठेतरी प्रत्यक्ष पाहता येते की नाही याचे प्रयोग करू म्हणत आहे!!!
आणि त्या मनुष्याच्या डोळ्यास प्रसादविण्यास्तव सौंदर्याचा नि सुरंगाचा जो महोत्सव तू त्रिभुवनात चालू केलास त्याची आरास तरी काय वर्णावी? हे पारिजाताचे सुकोमल फूल, ते सोनचाफ्याचे सुवासमत्त सुमन! हा मोराचा पिसारा पहा, एकेका पिसाची ती ठेवण, ते रंगकाम, ती जिवंत चमक, ते तरल नटवेपण! आद्य कलावन्त! तशा अनेक सुंदर पिसांचा तो पिसारा पसरून तो तुझा मोर जो जो आनंदाने उन्मत्त होऊन नाचू लागतो तो तो देवा, तुझी ललित कलाकुसरी पाहून “धन्य, देवा हृदयही नाचू लागते! आणि जसा पिसारा मनुष्यासही तू का दिला नाहीस म्हणून किंचित रुसूही लागते! हे नयनाल्हादायक रंगांचे नि श्रवणाल्हादक गोड लकेर्‍या घेणारे शतावधि पक्ष्याचे थवेच्या थवे ज्या जगात मंजूळ आनंदाचे किलबिलाट करीत आहेत; गुलाब, चमेली, बकूळ, जाईजुई, चंपक, चंदन, केतक, केवड्यांची बनेची बने सुंदर फुलांचे सडे पाडीत आहेत आणि सुगंधाने सारा आसमंत दरवळून सोडीत आहेत; माणसातून ह्या प्रीतिरति आणि मानसरोवरातून ह्या कमलिनी, कुमुदिनी विकसत विलसत आहेत; ज्या जगात रात्री चांदण्या आहेत, उष:काल गुलाबी आहेत, तारुण्या टवटवीत आहे, निद्रा गाढ आहे, भोगात रुचि आहे, योगात समाधि आहे-देवा! ते हे जग ज्या तू आम्हा मनुजांना इतके सुखमय होऊ दिलेस, होऊ देत आहेस, त्या तू ते आमच्या सुखासाठीच असे निर्मिलेस असे आम्हास का वाटू नये? आम्हाला, जशी आमच्या लेकरांची माया आहे म्हणूनच आम्ही त्यांच्या सुखासाठी जपतो तसेच आमच्या सुखासाठी इतके जपणार्‍या देवा, तुला आम्हा मनुष्यांची माया असलीच पाहिज. आम्ही माणसे, देवा, तुझी लेकरे आहोत. तू आमची खरी आई आहेत! आईला देखील दूध येते-तू दिलेस म्हणून! आम्ही मनुष्ये मुझे भक्त आहोत, आणि देवा, तू आम्हा मनुष्यांचा देव आहेस.
इतकेच नव्हे, तर तू आम्हा मनुष्यांचाच देव असून तूझ्यावाचून दुसरा देव नाही! हे सारे जगत्‌तू आमच्या सुखसोयीसाठीच घडविले आहेस!
मनुष्याच्या इच्छेस जुळेशी ही विचारसरणी, सत्यास जुळेल अशीही ठरली असती-जर या जगातील प्रत्येक वस्तु नि प्रत्येक वस्तुस्थिति मनुष्याला सुखकारक नि उपकारक अशीच असती तर! पण मनुष्याच्या दुर्दैवाने या सार्‍या जगातील तर राहोतच, पण ज्या पृथ्वी तो मनुष्य प्रथम प्रथम तरी “सारे जग’ म्हणून स्वाभाविकपणेच संबोधित होता, जिला विश्वंभरा, भूतधात्री, अशा नावाने तो अजूनही गौरवितो, त्या पृथ्वीवरील वस्तुजातही वा वस्तुस्थितिही मनुष्यास सर्वस्वी अनुकूल नाही; इतकेच नव्हे, तर उलट अनेक प्रकरणी मारकच आहे.
ज्या सूर्याचे नि समुद्राचे मनुष्यावर झालेले उपकार आठवून आठवून आताच त्यांची स्तोत्रे गाइली तो सूर्य नि तो समुद्रच पहा! उन्हाने तापून चक्कर येऊ लागलेल्या अवश वाटसरूवर, लाठीच्या पहिल्या दोनचार तडाख्यांनी अर्धमेला होऊन गेलेल्या सापावर आपण जसा शेवटचा टोला मारून तो साप पुरता ठार करतो तसा-हा सूर्य आपल्या प्रखर किरणांचा शेवयचा तडाखा मारून त्या मनुष्यांना ठिकच्या ठिकणी ठार करण्यास चुकत नाही! ज्या भारतात त्या सूर्यास लक्षावधि ब्राह्मण, सकाळ संध्याकाळ अर्ध्य देण्यास उभे असत, त्याच भारतात, त्या धर्मशील काळीही दुर्गादेवीच्या दुष्काळाचा सुकाळ करून बाराबार वर्षे आपली प्रखर आग सारखी वर्षत लाखो जीवास जिवंत भाजून काढीत आला आहे! कुराणात, तौलिदांत, भाविक पैगंबरांनी स्तुति केली आहे की “मनुष्यासठी, हे देवा, हे किती असंख्य मासे, किती रुचकर अन्नाचा हा केवढा अखंड साठा तू या समुद्रात ठेवला आहेस!’ पण तोच समुद्र मनुष्यास जशाचा तसाच गिळून पचवून टाकणार्‍या अजस्त्र सुसरींना आणि प्रचंड हिंस्त्र माशांनाही तसेच नि:पक्षपाताने पाळीत आहे! मनुष्यांची तारवे पाठीवर वाहून नेता नेता, सदय वाटाड्याचे सोंग घेऊन चाललेला वाटमार्‍या जसा भर रानात त्याच बायाबापड्या वाटसरूंवर उलटून त्यांचे गळे कापतो तसा हा समुद्र अकस्मात हजारो माणसांनी भरलेली ती तारवे नि त्या प्रचंड टिटानिका बोटी आपल्या पाठीवरून फेकून आपल्या भयंकर जबड्यात ढकलतो- गट्‌कुनी गिळून टाकतो! एखादी राक्षरीण रागावली तर एकाद्या लेकराची मानगुटी नदीत दाबून, त्याचा गुदमरून जीव जाईतो धरील! एखादी हिंस्त्र सुसर फार तर दोनतीन सुरेख कुमारिकांना नदीत उतरून लाजत लाजत स्नान करीत असता त्यांचे काकडीसारखे कोवळे लुसलुशीत पाय दातात धरून हिसडून गटकन्‌गिळून टाकील; पण ही गंगामाय, ही जमनाजी, ही देवनदी जार्डन, हा फादर थेम्स, हजारो कुमारींची-मुलालेकरंची-मान एका मानेसारखी, आपल्या पाण्यात यांचा अवश जीव गुदमरून ठार होईतो दाबील, नगरेची नगरे त्यांचा पाया हिसडून गिळून टाकील.
अंजिलकुराणादिक धर्मग्रंथात भाबडी भक्ति लिहून गेली की, बोकड, कोंबडी, ससा, शेळी, हरिण हेही नानाविध प्राणी मनुष्यांना पुष्कळ मांस मिळावे म्हणून, हे दयाळू देवा, तू निर्मिलेस! पण त्यांच्या रुचकर मांसाने, स्मरणाने तोंडास पाणी सुटलेल्या त्या भक्तीस ह्याचे अगदीच कसे विस्मरण पडते की ह्याच जगात त्याच देवाने मनुष्याचेही मांस खाण्यासाठी सिंह, वाघ, चित्ते, लांडगे हेही निर्मिलेले आहेत. हे दयाळू देवा, तू माणसांची कोवळीकोवळी मुले अशाचसाठी निर्मिलीस की, आम्हास काकडीसारखी मुखशुद्धि सदोदित मिळावी अशी मनुष्यास फाडून चिरफाडून खाल्ल्यानंतर त्यांच्या हाडांवर ढेकरा देत बसलेल्या सिंहाच्या नि लांडग्यांच्या रक्ताळलेल्या तोंडातली कृतज्ञ स्तुतिही त्याच देवास पावत आहे! आशिया आणि आफ्रिका यांस जोडणारे खंडच्या खंड ज्या दिवशी महासागरात, त्या खंडावरील वर माला घेऊन उभ्या असलेल्या लक्षावधि कुमारिकांसह, दूधपाजत्या आयालेकरांसह, अर्धभुक्त प्रणयी जनांसह, पुजांजलि वाहत्या भक्तांसह, त्याच देवाची स्तुती चाललेल्या लाखो देवालयांसह ते खंडच्या खंड त्याच देवाने ज्या दिवशी त्या महासागरात गणपति हबकन्‌ बुडवावा तसे बुडविल, त्याच्या दुसर्‍या दिवशी हीच उषा, हीच वेदांनी गाइलेली उषा, असेच गोड गुलाबी हास्य हसत त्या शुकशुकाट दृश्याकडे पहात होती! कुराणात म्हटले आहे की, “चंद्र निर्मिला, अशासाठी की, मनुष्याला निमाज पढावयाच्या वेळा कळाव्या!’ पण जो जो निमाज पुढे त्या त्या इस्लामियांची, त्या मुल्लामौलवी मशिदीसुद्धा कत्तल करून, त्या खलिफाच्या घरण्याची राखरांगोळी उडवून त्या लाखो मुस्लिमांच्या कापलेल्या डोक्यांच्या ढिगावर ज्या दिवशी तो निमाजाचा कट्टर शत्रू चेंगिझखान चढून जाऊन शांतपणे बसला, त्या रात्री त्या बगदाद नगरी हाच चंद्र त्या चेंगिझखानालाही त्याच्या वेळा पले पले मोजून असाच बिनचूक दाखवीत शांतपणे आपळी कौमुदी विचरीत होता!
सुगंधी फुले, हे सुस्वर पक्षी, तो मनोहर पिसारा पसरून नाचणारे हे सुंदर मोरांचे थवे, रानचे रान अकस्मात्‌ पेटून भडकलेल्या वणव्यात, चुलीत वांगे भाजावे तसे फडफड करतात न करतात तोच भाजून राख करून टाकतो-तो कोण? गाय दिली तो दयाळू, तर त्याच गाईचे दूध पिऊन तिच्याच गोठ्यात बीळ करून राहणारा तो विषारी साप, त्या गाईचे दूध देवाच्या नैवेद्यासाठी काढावयास येणार्‍या व्रतस्थ साध्वीला कडकडून डसून तिचा जीव घेणारा तो साप, तो ज्याने दिला तो कोण? प्रत्येक भोगामागे रोग, केसागणीक ठणठणणारे केसतोड, नखानखांचे रोग, दातादातांचे रोग, ते कण्ह, त्या कळा, ती आग, त्या साथी, ती महामारी, ते प्लेग, ती अतिवृष्टि, ती अनावृष्टि, ते उल्कापात! जिच्या मांडीवर विश्वासाने मान ठेवली ती भुईच अकस्मात्‌उलटून मनुष्यांनी गजबजलेले प्रांतचे प्रांत पाताळात जिवंत पुरून गडप करून टाकणारे ते भूमिकंप!! आणि कापसाच्या राशीवर जळती मशाल कोसळावी तसे ह्या पृथ्वीच्या अंगावर कोसळून एखाद्या गवताच्या गंजीसारखी भडभड पेटवून देणारे ते दुष्ट धूमकेतु- ते कोणी केले ?
जर ह्या विश्वातील यच्चयावत्‌ वस्तुजातीच्या मुळाशी त्यांना धारण करणारी, चालन करणारी, किंवा जिच्या क्रमविकासाचे ते परिणाम होत आले आहेत अशी जी शक्ति आहे तिला देव म्हणावयाचे असेल तर त्या देवाने हे सारे विश्व मनुष्यास त्याचा मध्यबिंदु कल्पून केवळ मनुष्याच्या सुखसोयीसाठीच निर्मिले ही भावना अगदी भाबडी, खुळी आणि खोटी आहे असे मानल्यावाचून वरील विसंगतीचा उलगडा होऊच शकत नाही.
कोणत्या हेतूने वा हेतूवाचून हे जगड्‌व्याळ विश्व प्रेरित झाले ते मनुष्याला तर्किता देखील येणे शक्य नाही. जाणता येणे शक्य आहे ते इतकेच की, काही झाले तरी मनुष्य हा ह्या विश्वाच्या देवाच्या खिसगणतीतही नाही, जशी कीड, मुंगी, माशी, तसाच ह्या अनादि अनंत कालाच्या असंख्य उलाढालीतील हा मनुष्यही एक अत्यंत तात्पुरता आणि अत्यंत तुच्छ परिणाम होय. त्याला खायला मिळावे म्हणून धान्य उगवत नाही, फळे पिकत नाहीत. कोथिंबीर खमंग झालेली नाही. धान्यपिकते म्हणून तो ते खाऊ शकतो, इतकेच काय ते. त्याला पाणी मिळावे म्हणून नद्या वाहत नाहीत. नद्या वाहतात म्हणून पाणी मिळते इतकेच काय ते. पृथ्वीवर जेव्हा नुसत्या प्रचंड सुसरीच सुसरी नांदत होत्या नि मनुष्याचा मागमूसही नव्हता तेव्हाही नद्या वाहत होत्या, झाडे फुलत होती, वेली फुलत होत्या, मनुष्यावाचून तर काय, पृथ्वी नव्हती तेव्हांही हा सूर्य असाच आकाशात भटकत फिरण्यास भीत नव्हता, आणि या सूर्यही जरी त्याच्या सार्‍या ग्रहोपग्रहांसुद्धा हरवला तरी, एक काजवा मेला तर पृथ्वीला जितके चुकलेसे वाटते तितके देखील या सुविशाल विश्वाला चुकलेसे वाटणार नाही. ह्या विश्वाच्या देवाला ओक पलाचेही सुतक, असे शंभर सूर्य एखाद्या साथीत एका दिवीसात जरी मरू लागले तरी धरावे लागणार नाही!
तरीदेखील ज्या कोणच्या हेतूने वा हेतूवाचून ही विश्वाची प्रचंड जगड्‌व्याळ उलाढाल चालू आहे तीत एक अत्यंत तात्पुरता नि अत्यंत तुच्छ परिणाम म्हणून का होईना, पण मनुष्याला, त्याच्या लांबीरुंदीच्या गजाने मापता यावे असे, त्याच्या संख्येत मोजता यावे असे, इतके सुख नि इतक्या सोयी अपभोगिता येतात हा मात्र आणि एढाच काय तो ह्या विश्वाच्या देवाचा मनुष्यावर झालेला उपकार होय! मनुष्याला ह्या जगात जे सुख मिळू शकते तेवढेही मिळू न देण्यासारखीच जर ह्या विश्वाची रचना ह्या विश्वाच्या देवाने केली असती, तर त्याचा हात कोण धरणार होता! हे सुगंध, हे सुस्वर, हे सुखस्पर्श, हे सौंदर्य, हे सुख, ह्या रुचि, ह्या सोयी आहेत, त्याही अमूप आहेत! ज्या योगायोगाने मनुष्यास ह्या सर्व लाभत आहेत त्या योगायोगाला शतश: धन्यवाद असोत! ज्या विश्वशक्तींनी कळत न कळत असा योगायोग जुळवून आणला त्यांना त्या अंशापुरते मनुष्याचा देव म्हणून संबोधिल्याचे समाधान आपल्यास उपभोगिता येईल, उपकृत भक्तीचे फूल वाहून त्यास पूजिताही येईल!
परंतु त्या पलीकडे ह्या विश्वाच्या देवाशी, वाटच्या भिकारड्याने सम्राटाशी जोडू पहावा तसा कोणचाही बादरायण संबंध जोडण्याची लचाळ हाव मनुष्याने आमूलात्‌ सोडून द्यावी हेच इष्ट! कारण तेच सत्य आहे! आपले चांगले ते देव करील, देव चांगले करील तर मी सत्यनारायण करीन, ही आशा, ही आशा, हा अवलंब, अगदी खुळचट आहे! कारण तो अगदी असत्य आहे. ज्या ज्या संकटातून आपणास सोडविले म्हणून आपण देवाचा सत्यनारायण करतो त्या त्या संकटात प्रथम आपणास ढकलतो कोण? तोच सत्यनारायण, तोच देव! जो प्रथम आपला गळा कापतो आणि नंतर त्यास मलम लावतो त्याची मलम लावण्यासाठी पूजा करावयाची तर प्रथम गळा का कापलास म्हणून त्याची आधी यथेच्छ शोभाही करावयास नको काय? विश्वाच्या देवाच्या ठायी ह्या दोन्हीही भावना अनाठायी नि असमंजस आहेत.
ती विश्वाची आद्यशक्ति ज्या काही ठराविक नियमांनी वर्तते आहे ते तिचे नियम समजतील ते समजून घेऊन त्यातल्या त्यात आपल्या मनुष्यजातीच्या हिताला नि सुखाला पोषक होईल तसा त्यांचा साधेल तितका उपयोग करून घेणे इतकेच मुनष्याच्या हातात आहे. मुनष्यजातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले, प्रतिकूल ते वाईट. अशी निती-अनीतीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे. देवास आवडते ते चांगले आणि मनुष्यास जे सुखदायी ते देवास आवडते ह्या दोन्ही समजुती खुळचट आहेत; कारण त्या असत्य आहेत. विश्वात आपण आहोत पेक्षा विश्व आपले नाही; फार फार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे; फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे-असे जे आहेत ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे! आणि विश्वाच्या देवाची खरी खरी तीच पूजा!!
Posted by : | on : 28 Dec 2011
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *