Home » Blog » श्रीनिवास रामानुजन

श्रीनिवास रामानुजन

श्रीनिवास रामानुजन

(२२ डिसेंबर १८८७ : तंजावर –२६  एप्रिल  १९२०)
·अमर पुराणिक· 

श्रीनिवास रामानुजन हे महान भारतीय गणितज्ञ होते. त्यांची प्रतिभा अलौकिक होती. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे. आणि म्हणूनच की काय कोण जाणे पण अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.
अशा या महान गणितज्ञाचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांना या शाळेत शिष्यवृत्तीही मिळाली. माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.
रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. 
१९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजन यांनी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.
१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरूणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी – एप्रिल २६, १९२० रोजी – हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचीच नव्हे तर संपूर्ण गणिती विश्वाचीच अपरिमित हानी झाली.
Posted by : | on : 9 Jan 2012
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *