राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात नागपूर येथे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे अत्यंत चिंतनशील असे भाषण झाले. सरसंघचालकांची विजयादशमी उत्सवातील भाषणे हा ऐतिहासिक दस्तऐवज असतो, इतकेच त्याचे महत्त्व असते, असे नाही. प्रत्येक वर्षी विजयादशमीला झालेली भाषणे आणि त्यानंतरचे राष्ट्रजीवन यांचा अभ्यास केला, तर या भाषणांचे महत्त्व जास्त ठळकपणे लक्षात येईल. संघाने ही पुण्यपावन भारतभूमी परम्वैभवाला नेण्याचे ध्येय ठरविले आहे. स्वराज्यानंतर आज पासष्ट वर्षे होत आली, मात्र देशात स्वार्थ बाजूला ठेवून अत्यंत प्रामाणिकपणे राष्ट्रचिंतन करणारी संघटना आणि त्या चिंतनामागे आपल्या समर्पणाचे बळ उभे करणारे देवदुर्लभ कार्यकर्ते, हे फक्त रा. स्व. संघातच बघायला मिळते आहे. हळूहळू या देशातील सर्वसामान्य जनता, विचारी समुदाय यांना प्रत्यक्ष अनुभवाच्या दिव्यदृष्टीने पाहिल्यानंतर, गैरसमजाच्या धुक्यातून असे स्पष्ट दिसू लागले आहे की, देशाचे हित पाहणारी संघ ही एकमेव संघटना आहे. त्यामुळे संघ जी भूमिका घेतो, मांडतो ती राष्ट्रहिताची आणि समाजहिताचीच असणार, असा विश्वास कधीही संघाच्या शाखेवर न जाणार्या कोट्यवधी लोकांच्या मनात तयार झाला आहे. त्यामुळे संघ काय भूमिका घेतो, याला या दृष्टीने फार महत्त्व आले आहे. त्याचबरोबर संघाचे लाखो स्वयंसेवक संघाची भूमिका हीच आपली जीवननिष्ठा मानून त्यादिशेने आपल्या जीवनाची रचना करत आले आहेत. त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची सहज मानसिकता स्वयंसेवकांनी तयार केलेली आहे. अशा अनेक दृष्टीने सरसंघचालकांचे विजयादशमीचे भाषण हे या सर्व गोष्टींना दिशादर्शन करणारे असते. या वर्षाच्या भाषणात सरसंघचालकांनी आंतरराष्ट्रीय घडामोडी, देशांतर्गत समस्या, सरकारची भूमिका, जातीय हिंसाचारविरोधी विधेयक अशा अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर भाष्य केले आहे. भारतासारख्या देशाच्या सरकारने आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे भान ठेवूनच आपल्या भूमिका ठरविल्या पाहिजेत. संघाने नेहमीच याबाबत सरकारला सावध केले आहे. अगदी चीनने १९६२ साली भारतावर आक्रमण केले त्याआधीच तत्कालीन सरसंघचालकांनी सरकारला सावध केले होते. ‘हिंदी चिनी भाई भाई’ ही घोषणा कुचकामी आहे, असे सावध केले होेते. मात्र, त्याकडे केलेले दुर्लक्ष कसे अंगलट आले, ते जगाने पाहिले. आता सरसंघचालकांनी चीनच्या कागाळ्या, सीमेपलीकडे चीनने चालविलेल्या हालचाली याकडे आपल्या भाषणात विशेष लक्ष वेधले आहे. आज चीन कागाळ्या करतो आणि सरकार त्यावर कठोर भूमिका घेण्याऐवजी माध्यमांसमोर असे काही घडलेच नाही हे सांगण्यात शक्ती खर्च करते, असे वारंवार घडते आहे. सरकारने चीनबाबत दुर्लक्ष न करता स्वसंरक्षणाची कडेकोट व्यवस्था आणि चीनवर आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. जगातील महासत्तांच्या संघर्षात भारताने दक्षिण-पूर्व आशियातील देशांचे नेतृत्व करावे, असे सरसंघचालकांनी सूचित केले आहे. नेपाळमध्ये स्थिरता आणण्यासाठी प्रयत्न करणे, बांगला देशी घुसखोरांना रोखणे, श्रीलंकेतील तामिळींची समस्या संपविण्यासाठी प्रयत्न करणे, तिबेटच्या जनतेचा आवाज जगात पोहोचविणे अशा अनेक गोष्टी यांमध्ये अंतर्भूत आहेत. शेजारी देशातील परस्परसंबंध म्हणजे केवळ औपचारिक करार इतकीच मर्यादा न मानता दोन देशांतील सौहार्दाला जागतिक राजकारणातील मुत्सद्देगिरीतील एक भाग बनविले पाहिजे, असा संकेत फार महत्त्वाचा आहे. देशांतर्गत जम्मू-काश्मीरच्या समस्येकडे सरसंघचालकांनी लक्ष वेधले आहे. चीन आणि पाकिस्तान हे दोघेही काश्मीरवर डोळा ठेवून आहेत. भारतभक्त अशा नागरिकांना काश्मीरमध्ये प्रस्थापित करणे, हा या समस्येवरचा दीर्घकालीन उपाय अमलात आणला पाहिजे. काश्मीरमधील फुटीरतावाद्यांची मानसिकता बदलण्यासाठी कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. पूर्वांचलातील सामान्य माणसांच्या वेदना लक्षात न घेता सरकार दहशतवाद्यांशी चर्चा करत त्यांचे मनोधैर्य कसे वाढविते, त्याकडे सरसंघचालकांनी लक्ष वेधले आहे. आसाममधील घुसखोरी हासुद्धा राजकारण्यांकडून दुर्लक्षित विषय आहे. देशाच्या हिताच्या प्रश्नाकडे राजकीय लाभाच्या दृष्टिकोनातून पाहण्याची सवय राजकारण्यांनी सोडली पाहिजे, असे सरसंघचालकांनी म्हटले आहे. दहशतवादाकडे पाहताना कमी-अधिक अशाप्रकारे त्यामध्ये फरक करता येत नाही हे सांगत सरसंघचालकांनी, राजकीय चष्म्यातून या विषयाकडे पाहिले की, माजी पंतप्रधानांची हत्या करणार्या आरोपींची फाशी रद्द करण्याचा ठराव थेट विधानसभेत मंजूर होतो किंवा संसदेवर हल्ला करणार्या अतिरेक्याची फाशी रद्द करण्याची भाषा होते, याकडे लक्ष वेधले. आपल्याच देशाचा पाया खिळखिळा करणार्या दहशतवादाला आपण आश्रय देतो आहोत की काय? असा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. राजकीय हालचालीत राष्ट्रीय दृष्टिकोनाचा अभाव दिसतो आहे, हे चिंताजनक आहे. सरसंघचालकांनी आपल्या भाषणात देशातील अर्थिक स्थिती आणि सरकारची धोरणे यावर अतिशय मर्मग्राही भाष्य केले आहे. केवळ पाश्चात्त्यांचे अंधानुकरण न करता भारताच्या गरजा आणि परिस्थिती लक्षात घेऊन आपला आपला विकासाचा मार्ग निश्चित करावा लागेल, यावर त्यांनी भर दिला आहे. गरिबी दूर करण्याचा विचार करण्याऐवजी सरकार गरिबीची व्याख्या करण्यातच परेशान झाले आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार गरजा पूर्ण करण्यासाठी शेती, जनावरे, वने यांचे संरक्षण करण्याऐवजी सेझच्या नावाखाली शेतजमिनी अन्य कारणासाठी जबरदस्तीने देण्याचे कारस्थान चालले आहे. उर्जास्रोेतांच्या बाबतीतही आपल्याकडे उपलब्ध नैसर्गिक उर्जास्रोेतांचा विकास न करता पाश्चात्त्यांकडून महागड्या अणुउर्जेचे तंत्र आणण्याचे जे प्रयत्न चालले आहेत, त्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. भारतातून लुटून परकीय बँकांत ठेवलेला काळा पैसा परत आणण्याबाबत सरकार चालढकल का करत आहे, हा सरसंघचालकांचा सवाल महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची गरज प्रतिपादित करून या संदर्भात वेगवेगळे प्रयत्न करणार्या छोट्या-मोठ्या शक्तींनी एकत्र येऊन संघटित प्रयत्न केले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे, ते फार महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचाराच्या सर्व मोठ्या प्रकरणांत परकीय शक्ती या ना त्या संबंधाने गुंतल्या आहेत याकडे लक्ष वेधत, या लोकांनी देशाच्या एकात्मता, सार्वभौमत्व यांनाच एकप्रकारे आव्हान दिले आहे. भ्रष्टाचाराचे निर्मूलन केवळ कायद्याने होणार नाही त्यासाठी व्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन करावे लागेल, असे सांगत असतानाच सरसंघचालकांनी अतिशय नेमकेपणाने या विषयावरचा अंतिम उपाय सांगितला आहे. समाजात जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, विशुद्ध चारित्र्य, नि:स्वार्थ सेवाभाव, परोपकार या जीवनमूल्यांचे संस्कार करणे जास्त आवश्यक आहे. आपल्या प्रत्यक्ष व्यवहारातून याची उदाहरणे समाजासमोर ठेवल्याशिवाय हे घडणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. देशहितासाठी चालविले जाणारे आंदोलन छळ आणि कपटकारस्थान करत शक्तिप्रयोग करत दाबून टाकण्याची सरकारी वृत्ती जी दिसली त्याबाबत चिंता व्यक्त करताना, या अशा राज्यकर्त्यांच्या हाती देशाचे भवितव्य सुरक्षित कसे राहणार, असा त्यांनी विचारलेला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. जातीय आणि हेतूत: हिंसेच्या विरोधी जे विधेयक मांडण्याचा प्रयत्न चालला आहे तो देशातील जनतेला एकसंध ठेवण्याला मोठा घातक असून, याला प्रखर विरोध करण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे. हे विधेयक आणण्यापूर्वी शासनाने याचा नीट विचार करावा. हे विधेयक आले तर समाजातून त्याला होणारा प्रखर विरोध आणि असंतोषाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा सरसंघचालकांनी दिला आहे. देशापुढील या सर्व समस्यांचा आढावा घेतल्यानंतर सरसंघचालकांनी म्हटले आहे की, देशातील सज्जनशक्ती जागविणे आणि संघटित करणे हाच यावर एकमेव मार्ग आहे. रा. स्व. संघ स्थापनेपासून त्यासाठीच काम करत आहे. समाजाने संघाच्या या प्रयत्नात सहयोगी बनून समाजात सद्भावना, निर्भीडता आणि राष्ट्रीय वृत्तीचा संचार करावा, असे आवाहन सरसंघचालकांनी केले आहे. यात संघाच्या स्वयंसेवकांनाही सज्जनशक्तीचे जागरण करून त्यांना संघटित करण्याचे आवाहन दडलेले आहे. सरसंघचालकांचे हे भाषण म्हणजे भारतापुढील समस्यांचे राष्ट्रीय दृष्टिकोनातून केलेले अतिशय सुस्पष्ट विवेचन आहे. देशातील विचारी व्यक्तींपासून देशाचा कारभार चालविणार्या सत्ताधार्यांपर्यंत प्रत्येकाने या भाषणातील मुद्यांची दखल घेऊन आपल्या दृष्टिकोनात, आचरणात, भूमिकांत बदल केला, तर सरसंघचालकांनी म्हटल्याप्रमाणे हे राष्ट्र विजयी होण्यास काही वेळ लागणार नाही. स्रोत: तरुण भारत : 10/7/2011
Posted by : AMAR PURANIK | on : 16 Oct 2011 Filed under : Blog Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper.. You can follow any responses to this entry through the RSS 2.0 You can leave a response or trackback to this entry