• सडेतोड : अरुण रामतीर्थकर•
शीर्षक वाचून निश्चितपणे काही जणांच्या चेहर्यावर प्रश्चचिन्ह उमटलेले असेल. कारण सध्याचे युग म्हणजे ‘स्त्री सबलीकरण आणि स्त्री मुक्ती’ वगैरेचे आहे. मुली शिकत आहेत. मुलांप्रमाणे पँट घालून हिंडत आहेत. देवाने दिली नाही म्हणून, अन्यथा दाढीही वाढली असती. करिअर म्हणून शिकत शिकत तिशीच्या आसपास लग्न करतात. शिकून नोकरी लागल्यावर लग्न करायलाच पाहिजे का असे म्हणत एखाद्या तरुणासोबत नवरा बायकोप्रमाणे राहणारी जोडपी पुण्यात अनेक आहेत. त्यातून लग्न केलेच तर ४-६ महिन्यात घटस्फोटाचा निर्णय होतो. पूर्वी शंभरातील एखादा विवाह घटस्फोटाच्या पातळीवर जायचा. हल्ली ९९ टक्के विवाह घटस्फोटात परावर्तित होतात. घटस्फोटांची कारणे पाहिली तर हसावे की रडावे हेच कळत नाही. पूर्वी बायका उभ्याने सासरी जात आणि बाहेर पडत ते आडव्या होऊनच. हा थोडा अतिरेक झाला तरी सासरप्रती निष्ठेला किती प्राधान्य होते ते दिसते. सासू काम सांगते, सासू गाऊन घालून देत नाही यासाठी घटस्फोट झालेत. आता सासू-सासरे घरात नकोच ही सार्वत्रिक भावना आहे. महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा ४९८ आहे. त्यातील ९७ टक्के तक्रारी या खोट्या निघतात. घरात सासू आहे हाच मुलींना अत्याचार वाटतो. पूर्वी अक्षर ओळख झाली, वयात आली की लग्न होत असे. तो टिकत असे. त्यामुळे समाजाचे काडीचे नुकसान होत नव्हते. आज मात्र मुली खूप शिकल्यामुळे कुटुंब व्यवस्थेची शकले उडताना मी पाहतो. मुली शिकल्यामुळे समाजाचा घात होणार असेल तर ते शिकवणे काय कामाचे? माझी आई आणि काकू दोघी चौथी पास. दोघींचे ६०-७० वर्षाचे प्रपंच झाले. सर्व मुले, नातवंडे शिकली. काही म्हणजे काहीही अडले नाही. अनेकांचा अनुभव असाच असेल. पूर्वीच्या बायकांचे संसार झाले. आजचे लग्न टिकणे हा योगायोगाचा भाग झाला असे का? वाढते वय आणि नको एवढे शिक्षण हेच कारण आहे.
भगवान मनुने ‘न स्त्री स्वातंत्र्यर्हती’ असे म्हटले. स्त्रीला स्वातंत्र्य नाही असा अर्थ घेऊन भगवान मनुंना प्रतिगामी ठरवले. हे स्वातंत्र्य आर्थिक आहे. बाईला पैसे मिळवण्याची वेळ येऊ नये ही अपेक्षा चूक आहे! बाई नोकरी करणार म्हणजे चूल व मूल या पासून सुटका. खानावळीतून डबा आणणे आणि मुले पाळणाघरात सोडणे. किती जणांना ही व्यवस्था मान्य आहे. ही व्यवस्था नाकारली तर बाईने नोकरीवरून येताच पदर बांधून स्वयंपाकाला लागणे हे तरी किती उचित आहे. त्यापेक्षा बाईने चूल आणि मूल यात रममाण होण्यात काय गैर आहे.
बाईने शिकून नोकरी करण्याने काय होते याचे काही उदाहरणे आहेत. लग्न झाल्यानंतर सासरच्यांनी हौसेने शिकवले. सून वकील झाली, न्यायाधीश पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली नेमणूक होताच तिला किराण दुकानदार नवरा गावंढळ वाटला. ५ वर्षाचा मुलगा असतानाही आर्थिक स्वातंत्र्य मिळताच तिने संसार लाथाडला. एका डी.एड. कॉलेजात एक विवाहिता होती. शिकताना एका तरुणाशी ओळख झाली. डी.एड.झाल्यावर दोघांनी एकत्र राहिले तर दोघांचा पगार किती, त्यातून संपन्न जीवन. बाईने नवरा, मूल याचा विचार न करता डी.एड. होताच प्रियकराचा हात धरून पळून गेली. सासर्यांनी कौतुकाने शिकवले त्याचा हा परिणाम.
अशीच एक आय.ए.एस. झालेली तरुणी. घरी वर्षाचे बाळ. प्रशिक्षणासाठी मनालीला जायचे होते. सासू म्हणाली, ‘‘तू जा मी सांभाळते बाळ.’’ सून गेली तेथेही दुसरा भेटला. आपण आय.ए.एस, नवराही आय.ए.एस सारे कल्पना रम्य. पूर्वीच्या संसाराची शिसारी आली. मनालीला गेली ती परत आलीच नाही. आता तिचे पोस्टींग सांगून घरच्यांची अब्रू घालवायची नाही. याचा अर्थ १०-१२ वी नंतर डी.एड करा वा आय.ए.एस परिणाम हा असा होत असेल तर शिकवण्याचा काय फायदा? लग्नाआधी खूप शिकवले तर लग्न टिकत नाही. लग्नानंतर शिकवले तर प्रपंच मोडतो. ‘न स्त्री स्वातंत्र्यामर्हती’ असे मनुवचन खोटे कसे म्हणावे. तुम्ही मला दूषणे द्या, प्रतिगामी म्हणा. सुशिक्षित सुनेमुळे आपल्या मुलाच्या सुखाला ग्रहण लागले असे म्हणणार्या प्रौढ दांपत्यांना भेटा म्हणजे कळेल. ही आता फक्त सुरुवात आहे. प्रमाण नगण्य आहे. मात्र हे असेच चालत राहिले तर भारताचे वैशिष्ट्य असलेली ‘कुटुंबव्यवस्था’ संपेल.
दि. २९ मे २०११, तरुण भारत, सोलापूर