सुधीर पाठक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रत्येक सरसंघचालक हे एक आगळेवेगळे रसायन राहते. प्रत्येकाच्या जीवनातील उद्दिष्ट एकच होते, ते म्हणजे हिंदू राष्ट्र या विचाराचा प्रभाव समाजावर पडला पाहिजे. पण, प्रत्येकाच्या कार्यकाळात ज्यावर त्यांनी भर दिला असे उपविषय मात्र एका सूत्रातील असले, तरी त्यात भिन्नता होती. डॉ. हेडगेवारांनी संघाची स्थापना केली आणि १९३९ च्या ओ. टी. सी.त त्यांना अखिल भारताचे एक मिनी रूप बघता आले. श्रीगुरुजींनी तर डॉक्टरांनंतर जवळजवळ तीन दशके विभिन्न अडीअडचणी आणि संकटे यावर मात करत संघाला एक भरपूर स्थायित्व मिळवून दिले. श्रीगुरुजींची बैठक ही आध्यात्मिक बैठक होती, तर श्री. बाळासाहेब देवरसांनी ‘सेवा है यज्ञकुंड, समिधासम हम जले’ हा मंत्र दिला. रज्जुभय्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक वैज्ञानिक होते. त्यांनी त्या कृतिपरतेला एक वेगळा आयाम दिला होता. सुदर्शनजी यांनी या कृती प्रत्यक्षात आणून सामाजिक समरसता वेगळ्या अर्थाने प्रस्थापित केली. ते स्वत: दीक्षाभूमीवर गेलेत आणि त्यांनी ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्या प्रतिनिधींना संघकार्यालयात आमंत्रित केले.
सुदर्शनजींच्या जीवनात रेशीमबागला एक वेगळेच महत्त्व होते. त्यांची अंत्ययात्राही त्याच रेशीमबागमधून सुरू झाली होती, ज्या रेशीमबागमध्ये त्यांनी १० मार्च २००० अनुभवला होता. त्या दिवशी प्रतिनिधिसभेत व्यासपीठावर दोन खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. रज्जूभय्या अन् सुदर्शनजी त्या खुर्च्यांवर बसले होते. त्याच दिवशी रा. स्व. संघाचे पाचवे सरसंघचालक म्हणून सुदर्शनजींच्या नावाची घोषणा झाली होती. याच रेशीमबाग परिसरात सरसंघचालक म्हणून त्यांनी पहिला प्रणाम स्वीकारला होता. त्याच दिवशी या परिसराला लक्षात आले होते, एरव्ही इतरांबरोबर बोलतबोलत वा आपल्या विचारात असणारे सुदर्शनजी- फार झपझप चालत ध्वजापावेतो जात असत. ते काही क्षण हे फक्त एका राष्ट्रवादी-हिंदुत्ववादी अ.भा. संघटनेचे रा.स्व. संघाचे प्रमुख म्हणून तेच राहत असत.
सुदर्शनजींनी आपल्या पूर्वसुरींचे ऋण, श्रेय कधीच अमान्य केले नाही, पण आपला स्वतःचा असा वेगळा बाज निर्माण केला होता. सुदर्शनजी सरसंघचालक झाल्यावर एक दिवस संघकार्यालयातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे कार्यवाह श्री. सदानंदजी फुलझेले यांना फोन गेला की, सुदर्शनजी दीक्षाभूमीवर दर्शनाला येत आहेत. क्षणभर त्यांचा आपल्या कानांवर विश्वासच बसला नाही. त्यांना माहीत होते, तृतीय सरसंघचालक श्री. बाळासाहेब देवरस यांचे पुण्यातील वसंत व्याख्यानमालेतील भाषण- ‘‘जर अस्पृश्यता वाईट नसेल, तर या देशात काहीच वाईट असू शकत नाही.’’ पण, स्वतः सरसंघचालक दीक्षाभूमीवर येतील, असे त्यांना कधीच वाटले नव्हते. पण, तो क्षण प्रत्यक्षात आला होता. ‘‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही,’’ हे सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दीक्षाभूमीवर धम्मचक्रप्रवर्तन केले होते. आपल्या लाखो अनुयायांसह याच दीक्षाभूमीवर बौद्धधर्माची दीक्षा घेतली होती. त्यानंतर राजकारणात एक शक्ती म्हणून बौद्धधर्मीय रिपब्लिकन पक्ष उभा राहिला. प्रत्यक्ष व्यवहारातील अनुभव काहीही असला, तरी राजकारणापायी प्रत्येक दलित नेता ब्राह्मणत्वाचे प्रतीक म्हणून संघाला शिव्याशाप घालून आपली मतपेटी मजबूत करून जात असे. रा. स्व. संघाने त्याबद्दल कधीही वैषम्य व्यक्त केले नाही. संघजीवनात तर जातीला स्थानच नव्हते. बाजूला फक्त स्वयंसेवक राहत असे. तो कोणत्या जातीचा आहे, याची विचारपूसही कधी होत नसे. सुदर्शनजी जवळजवळ तासभर दीक्षाभूमीवर होते. त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण केली. एका महामानवाला अभिवादन केले. स्मारक समितीनेही सुदर्शनजींचे स्वागत केले होते. त्यावेळच्या चर्चेत बौद्धधर्माबद्दल इतके अचूक ज्ञान, माहिती सुदर्शनजींकडून त्यांना मिळत होती की, ती मंडळीदेखील आश्चर्यचकित झाली होती. सुदर्शनजी ही भेट आटोपून कार्यालयात परतले आणि नागपूरच्या सामाजिक जीवनात विलक्षण उलथापालथ सुरू झाली. अनेकांना सुदर्शनजींनी दीक्षाभूमीवर जावे हे मान्य नव्हते. नागपुरातील दहा-बारा जणांनी दीक्षाभूमीवर जाऊन हा पुतळा धुवून काढला होता. यात एकही दलित बांधव नव्हता. बव्हंशी समाजवादी विचारवंत होते. त्यांच्या या कृत्यालाही प्रसिद्धी मिळाली, पण सुदर्शनजी फक्त स्मित करीत होते. ‘‘अरे, ते मला भेटले असते तर मी त्यांना माझी भूमिका सांगितली असती,’’ हेच त्यांचे शब्द होते. त्यानंतर या कृत्यामागे जे प्रमुख विचारवंत होते, त्यांच्या विचाराची कीव करण्यासाठी आम्ही तरुण भारतमधून त्यांच्यावर अघोषित बहिष्कार घातला. हे बहिष्कार घालणेही सुदर्शनजींना अमान्य होते. काही वर्षांनी त्या विचारवंताला महाराष्ट्रातील मोठा पुरस्कार मिळाला अन् तरुण भारतने वृत्त छापले नाही, तर पहिला फोन सुदर्शनजींचा आला होता, ते वृत्त तरुण भारतमध्ये का नाही म्हणून. शेवटी त्या विचारवंताच्या निधनानंतर हा बहिष्कार भाग आम्ही थांबविला होता व त्यावर अग्रलेखही लिहिला होता.
फक्त दीक्षाभूमीवर जाऊनच सुदर्शनजी थांबले नव्हते, तर पुढे त्यांच्याच काळात ख्रिश्चन व मुस्लिमबंधूही संघकार्यालयात, महालावरील डॉ. हेडगेवार भवनात आले होते. या दोन्ही धर्मांचा सुदर्शनजींचा मोठाच अभ्यास होता. ख्रिश्चनांचे एखादे शिष्टमंडळ संघकार्यालयात येण्याचा तो पहिला प्रसंग होता. त्याच वेळी सुदर्शनजींनी ‘भारतीय चर्च’ ही संकल्पना मांडली होती.
मुसलमान बांधवांना तर ते नेहमीच सांगत असत, ‘‘तुम्ही कोण वेगळे आहात, तुम्ही-आम्ही याच मातीचे. याच मातेचे पुत्र आहोत. तुमची श्रद्धा व्यक्त करण्याची पद्धती वेगळी आहे. तुम्ही मूर्तिपूजा मानीत नाही, पण अल्ला मानता ना? आपण वेगळे मुळीच नाही.’’ मुस्लिम बांधवांचे हे प्रतिनिधिमंडळ कार्यालयात असताना, चर्चा सुरू असताना अचानक त्यांच्यात चुळबूळ सुरू झाली. सुदर्शनजींनी पृच्छा केली- ‘‘काय झाले?’’ उत्तर आले- ‘‘आमच्या नमाजाची वेळ झाली आहे.’’ सुदर्शनजी म्हणाले, ‘‘मग काय अडचण आहे? आपण चर्चा थांबवू. तुम्ही इथेच नमाज पढा आणि पुन्हा चर्चा करू.’’ अन् त्या दिवशी संघाच्या मुख्यालयात वजू झाली, नमाज अदा झाला! हा एक वेगळाच इतिहास होता. संघ हा मुस्लिमविरोधी आहे मानणार्यांना ती एक चपराक होती. फक्त त्यात, चपराक हाणतो आहे, हा आविर्भाव नव्हता.
सुदर्शनजींमध्ये लहान बालकांतील निरागसता होती. एखादी गोष्ट, कल्पना स्फुरली की, त्यांचे निळे डोळे मंदपणे चमकत असत. या निरागसतेमुळेही अनेकदा ते वादळाचा केंद्रबिंदूही ठरत. पण अगदी खरं सांगायचं, तर वाद अंगावर घ्यायला त्यांना मनापासून आवडत असे. रामजन्मभूमी आंदोलन काळात बाबरी ढांचा पडला त्या वेळी सुदर्शनजी अयोध्येत रामललाच्या मूर्तीच्या प्रांगणातच होते. प्रभू राम हा त्यांच्या श्रद्धेचा विषय होता. बाबरी ढांचा हा बॉम्ब लावून उडविण्यात आला, असे एक विधान त्यांनी केले होते. त्यासाठी त्यांनी संदर्भ दिला होता, तो सर्वोदयी नेत्या निर्मलाताई देशपांडे यांचा. त्यांच्या या विधानावरून चांगलाच वाद उत्पन्न झाला होता. त्यातूनच पुढे सुदर्शनजींना न्या. लिबरहान आयोगापुढे साक्ष द्यायलाही जावे लागले होते. सरसंघचालकांनी अशाप्रकारे आयोगापुढे साक्ष द्यायला जाऊ नये, असे मानणारा एक मोठा वर्ग संघपरिवारात होता. पण, सुदर्शनजी मात्र आयोगापुढे साक्ष द्यायला ठाम होते- ‘‘त्यात काय आहे? आयोग त्याला सोपविलेले काम करीत आहे. त्या वेळी त्याला सहयोग द्यायलाच पाहिजे.’’ सरसंघचालक या अतिशय मोठ्या पदावर असतानाही सामान्य माणूस म्हणून चिंतन करायला त्यांना नेहमीच आवडत असे. त्यांच्यातील निरागसतेमुळे हे त्यांना जमत असे. आपल्या मागेपुढे कमांडोज राहणे वा आपण जनतेपासून वेगळे एका सुरक्षित आवरणात राहणे, हे त्यांना कधीच आवडले नाही. अगदी संघकार्यालयासमोर सुरक्षेसाठी भिंत घालण्याचा प्रस्ताव आला तेव्हाही त्यांचा विरोध होता. हे त्यांना मान्य नव्हते. पदामुळे काही निर्बंध तुम्हाला सहन करावेच लागतील, हे जेव्हा त्यांना ठामपणाने सांगण्यात आले, तेव्हाच त्यांनी या निर्बंधांना मान्यता दिली.
त्यांच्या सुरक्षापथकात असणारा माझा एक मित्र सांगत असे, ‘‘आम्ही तर या महापुरुषासोबत राहून धन्य होतो. क्वचित एखाद नेता बघायला मिळतो, जो आपल्या स्टाफच्या जेवणाखाण्याची, चहापाण्याची काळजी घेत असतो. सुदर्शनजी आम्हा सर्वांची काळजी करायचे. जेवण झाले की नाही, हेही विचारायचे. आम्हा सर्वांना ते नावाने ओळखत असत. फक्त काही निर्बंध त्यांच्या हालचालीवर, सुरक्षेच्या दृष्टीने घातले तर ते नाराज व्हायचे. घरातील आजोबांनी रुसून बसावे तसे रुसतही असत. काही वेळाने त्यांना आमची अडचण समजत असे आणि ते सहकार्य करत.’’
एक सहजता सुदर्शनजींच्या वागण्यात होती, पण जरूर तेव्हा ठामपणाही त्यांच्या ठायी होता. रा. स्व. संघाच्या एका समारंभात ओटीसी समाप्तीला निवृत्त एअर चीफ मार्शल ए. वाय. टिपणीस प्रमुख अतिथी म्हणून आले होते. पाकिस्तानचे सर्वेसर्वा जनरल मुशर्रफ भारत दौर्यावर आले होते, तेव्हा त्यांना सॅल्युट न करणारे जिगरबाज वायुसेनाप्रमुख म्हणून त्यांच्याबद्दल तरुणवर्गात खूप आदराची भावना होती. त्यांच्यामागे मोठे वलय होते. त्यांनी बोलताना काही प्रतिपादन केले होते, ते संघतत्त्वज्ञानाला मान्य होणारे नव्हते. सर्वांसमोर प्रश्न होता की, याचा प्रतिवाद करायचा का? असा प्रतिवाद करणे त्यांचा अपमान करणे तर ठरणार नाही ना? पण प्रतिवाद केला नाही, तर संघ ते विचार मानतो, असे होणार होते.
सुदर्शनजी समारोपाच्या भाषाला उभे झालेत. त्यांनी सुरवातीला एअर चीफ मार्शल टिपणीस यांचे भरपूर कौतुक केले. त्यांच्या राष्ट्रभक्तीला अभिवादन केले आणि नंतर ठामपणाने त्यांचे प्रतिपादन खोडून काढणे सुरू केले. या प्रतिपादनातील शब्द सौम्य होते. त्यात कुठेही अपमान होईल, असा शब्दप्रयोग नव्हता, पण विचारांतील स्पष्टता जागोजागी जाणवत होती. त्या क्षणाला त्या रेशीमबाग मैदानावरील सर्वांना जाणवून गेले की, एक सरसंघचालक संघतत्त्वज्ञान जीवनशैली उलगडून दाखवीत आहेत. एका सच्च्या राष्ट्रभक्ताला संघ समजावून सांगत आहेत. संपूर्ण भाषण संपले, पण कुठेही कटुतेचा लवलेश त्यांच्या भाषणातून झाला नाही. हा अनुभव एअर चीफ मार्शल टिपणीस यांनाही नवीन होता. निरागसतेचा एक वेगळा पैलू त्या वेळी बघता आला.
सुदर्शनजी नागपूरला असलेत की, तभा नियमितपणे वाचत असत. त्यातील एखादे प्रतिपादन आवडले नाही, काही चूक असेल, तर लागलीच शेजारी ठेवलेला फोन फिरवीत असत. त्या क्षणी ती चूक दाखविल्याविना त्यांना चैन पडत नसे. पण, ही चूक दाखविताना त्यांच्याशी जे बोलणे होई, त्यातून त्यांचे चिंतन, अभ्यास, विषयातील सखोल जाण स्पष्टपणाने दृग्गोचर होत असे, दिसून येत असे. जीवनातील सहजता एवढी होती की, कुणाला सांगून फोन करणे वगैरे भाग राहतच नसे. संघकार्यालयातून बोलतो आहे, वगैरे उल्लेख अनेक जण फोनवर करीत असत, पण सुदर्शनजींचा त्यावर विश्वास नव्हता.
एकदा रात्री ११ वाजताची घटना होती. पेजेस गेल्यामुळे संपादक विभाग काहीसा सुस्तावला होता. फोन वाजला. त्या वेळी बिसन मानकर नावाचे एक शिपाई आत होते. ते फोनजवळ होते. त्यांनी फोन उचलला. फोनमधून शब्द आलेत- ‘‘मी सुदर्शन बोलतो आहे. सुधीर आहे?’’ फोन खाली ठेवून बिसन ओरडत निघाला- ‘‘पाठकसाहेब, कुणी सुदर्शन बोलतो आहे.’’ लागलीच धावत येऊन मी फोन घेतला. तो फोन सुदर्शनजींचा होता. त्यांचे बोलणे संपल्यावर फोन खाली ठेवला. बिसनला जवळ बोलावले. म्हटले, ‘‘असे ओरडत सांगू नये. माऊथपीसवर हात ठेवून बोलावे. ते रा. स्व. संघाचे सरसंघचालक सुदर्शनजी बोलत होते.’’ तो तर फक्त पाया पडायचाच बाकी राहिला होता. संपूर्ण तरुण भारतभर तो सांगत फिरत होता की, ‘‘मी सुदर्शनजी साहेबांचा फोन घेतला होता. त्यांनी मला सांगितले. मी सुदर्शन बोलतो. मी तसेच साहेबांना सांगितले. पण तो सुदर्शनजींचा फोन होता.’’ बिसन मानकरचे संपूर्ण जीवन त्या फोनने धन्य होऊन गेले होते. त्याला जमिनीवर यायला चार-दोन दिवस लागले होते.
कार्यालयातून फोन करताना त्यांनी स्वतः फोन न करता स्वीय सहायकाला फोन लावायला सांगावे वगैरे अधिकारीवर्गाने सांगावे, असा प्रयास केला, पण त्यांना ते शेवटपावेतो मान्य झाले नाही. तरुण भारतात फोन करायला कशाला हवी आहे औपचारिकता, यावर ते ठाम होते. त्यांनी आपली शैली कधीच बदलली नाही.
१९९७-९८ चा सुमार असेल. दै. तरुण भारतात परिवर्तनाचे वारे सुरू झाले. तत्कालीन संपादक श्री. लक्ष्मणराव जोशी वर्षभराने निवृत्त होणार होते. नवीन संपादक येणार होते. एके दिवशी नरकेसरी प्रकाशनाचे अध्यक्ष प्राचार्य विनायकराव फाटक घरी आलेत आणि म्हणाले, ‘‘दिल्लीला दै. जागरणमध्ये प्रशिक्षणासाठी जाता येईल काय? महिना-दीड महिना कितीही काळ थांबावे लागेल.’’ राहण्याची व्यवस्था काय वगैरेही विचारणा झाली. तशी कल्पना नव्हती म्हणून झंडेवालात राहण्याची व्यवस्था झाली. झंडेवालामध्ये सुदर्शनजींची भेट झाली. तेच दै. जागरणच्या संपादकांना पत्र देणार होते. ते पत्र घेतले आणि दै. जागरणला रोज जाणे सुरू झाले. कधी आय.एन.एस. भवनातील कार्यालयात, तर कधी नोएडात जावे लागत असे. या कालावधीत अधूनमधून सुदर्शनजींची भेट होत होती आणि काय प्रगती आहे, याबाबत ते विचारणा करीत असत. दीड महिन्याने सुदर्शनजींशी सविस्तर भेट ठरली. त्यानंतर मी नागपूरला परत जाणार होतो.
ती भेट खरोखर संस्मरणीय होती. एका अर्थानं ती मुलाखत होती, म्हटले तर संवाद होता. सुदर्शनजींसोबत तास-दीड तास बसण्याची ती पहिली वेळ होती, पण त्याचा कसलाही तणाव सुदर्शनजींनी माझ्यावर येऊ दिला नाही. त्या वेळी मला माहीत नव्हते, पण दै. जागरणच्या संपादकांकडून त्यांनीही माझ्या कामाची माहिती घेतली होती. भेट चांगली संस्मरणीय झाली. शेवटी मी त्यांना माझ्याकडून सांगितले, ‘‘मी शालेय व महाविद्यालयीन जीवनात अ. भा. विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होतो. मध्यप्रदेश, विदर्भ व महाराष्ट्र प्रदेशात काम केले होते, पण या कालावधीत दैनंदिन शाखेत जाणे मात्र थांबले होते. मी तृतीय वर्ष काय, प्रथम वर्षही केले नव्हते.’’ माझे बोलणे संपल्यावर हसतहसत सुदर्शनजी विचारते झालेत- ‘‘अरे, तू किती वर्षं तरुण भारतात आहेस?’’ मला पंचवीस वर्षे झाली होती. मी तसे सांगितले. ते म्हणाले, ‘‘इतके वर्षं तरुण भारतात राहणे हे तृतीय वर्ष होण्यासारखेच आहे.’’ पुढे एकदा तरुण भारतच्या दिवाळी अंकासाठी सुदर्शनजींची मुलाखत मी घेत होतो तेव्हा असाच एक प्रश्न त्यांना विचारला होता, ‘‘स्वयंसेवक हा भाजपाचा असणे, परिषदेचा असणे, विहिंपचा असणे हे पर्याय असू शकतात काय?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुझा अनुभव काय म्हणतो? पण तुम्ही कुठेही असा, रोज संघस्थानावर एक तास जा. मनावरील मळभ दूर होते. कशासाठी आपण कार्यरत आहोत, याचे भान येते. जाणिवा प्रगल्भ होतात.’’
प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती पदावर आरूढ झाल्यात. त्यांना इंग्रजीत तर ‘राष्ट्रपती मॅडम’ संबोधता येत होते. पण, मराठीत काय? तरुण भारतात प्रसिद्ध झाले, ‘राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील’ अन् त्यावर आक्षेप घेणारा फोन रात्री नऊ-सव्वानऊ वाजता आला. तो सुदर्शनजींचा होता- ‘‘प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती पदावर आहेत, असे जरूर म्हणा, पण जेव्हा त्यांना त्या पदाने संबोधण्याची वेळ येईल, त्या वेळी त्यांना राष्ट्राध्यक्षा म्हणा.’’ हे त्यांचे आग्रही प्रतिपादन होते. राष्ट्राध्यक्ष हा शब्दप्रयोग आपण अध्यक्षीय शासनप्रणालीत करू, हे त्यांना मान्य नव्हते. आजपावेतो आपल्याकडे राष्ट्राध्यक्षपद नाही. त्यामुळे आपण कुणालाच राष्ट्राध्यक्ष संबोधत नाही. प्रजातांत्रिक लोकशाहीवादी भारतात पद राष्ट्रपतींचं आहे हे सर्वांना ज्ञात आहे. त्यांना इंग्रजीतही अध्यक्ष संबोधिले जात नाही. त्यामुळे आपल्या राजकीय प्रणालीत अध्यक्षपद नाही. पण, राष्ट्रपती हे पद आहे व त्या पदावर स्त्री आहे म्हणून त्या पदावरील स्त्रीचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ करणे व्याकरणदृष्ट्या कदाचित बरोबर राहील, पण व्यवहारात ‘पत्नी’ या शब्दाचा अर्थ वेगळा आहे म्हणून तो शब्दप्रयोग वापरता येणार नाही. आपण मराठीत राष्ट्राध्यक्षा हाच शब्दप्रयोग रूढ करायला हवा. त्यातून अध्यक्षीय प्रणाली ध्वनित होणार नाही.
त्यांच्या या प्रतिपादनावर आमच्या संपादक विभागात चर्चा झाली. अनेकांना असे वाटत होते की, पंतप्रधान हा शब्दप्रयोग आपण जसा वापरतो तसे राष्ट्रपती प्रतिभाताईंना संबोधिले जावे. हा पर्याय मान्य नसणार्या काही सहकार्यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. आपल्या शैलीपुस्तिकेप्रमाणे आपण ‘राष्ट्राध्यक्षा’ हा शब्द प्रयोग वापरू, असा निर्णय संपादक म्हणून मी घेतला आणि प्रतिभाताई राष्ट्रपती पदावरून निवृत्त होईस्तोवर आम्ही कसोशीने वापरला. कुणीतरी प्रयोग करावा लागतो, आघाडी घ्यावी लागते, त्यामागे प्रेरणास्थान सुदर्शनजी होते.
साधारणत: दै. तरुण भारताला रा. स्व. संघाचे मुखपत्र मानण्याची फॅशन आहे. जेव्हा की माझा स्वतःचा जवळजवळ चार दशकांचा अनुभव आहे की, संघकार्यालयातून कधीही संपादकांना सूचना येत नाहीत की, अमुक विषयावर तुम्ही लिहा, असे मुद्दे घ्या, तमुक विषयावर लिहू नका. एखाद्या प्रश्नावर संपादकाचे जे स्वतःचे आकलन असते त्याप्रमाणे तो लिहितो. ते आकलन संघाचे मत आहे, असे समजून त्यावर टीकाटिप्पणी होत राहते. भाजपा-एनडीए सत्तेवर होते तेव्हा संघ- भाजपात-एनडीएत प्रत्येक विषयात एकमत नव्हते, एकवाक्यता नव्हती. रा. स्व. संघाच्या प्रतिनिधिसभेने त्या वेळी आयोडीनयुक्त मिठाची सक्ती अन् विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक या विषयावर नापसंती व्यक्त करणारे ठराव केले होते व त्या भूमिकेची अंमलबजावणी न केल्याबद्दल रालोआ सरकारवर टीका केली होती. सहसरकार्यवाह म्हणून सुदर्शनजींनी त्या पत्रपरिषदेला संबोधित केले होते व लागलीच प्रमोद महाजन यांनी नागपूरला येऊन पक्षाची भूमिका मांडली होती. हा सगळा प्रसंग गंभीर, आगळावेगळा होता. तो विषय मी सोडला असता तरी हरकत कुणीही घेतली नसती, पण मी तो विषय अग्रलेखासाठी घेतला. त्या संपूर्ण प्रश्नाबाबत माझे जे आकलन होते त्यानुसार अग्रलेख लिहिला. ते आकलन नक्कीच प्रतिनिधिसभेच्या आकलनापेक्षा भिन्न होते. दुसर्या दिवशी सकाळी खूप गोंधळ होईल, वगैरे माझी अपेक्षा होती. पण, सकाळी सकाळी सुदर्शनजींचाच फोन होता- कौतुक करणारा. वेगळा विचारबिंदू त्या अग्रलेखात आहे, याबाबत.
त्या अग्रलेखात मी पाञ्चजन्यच्या दिल्लीतील कार्यक्रमाचा उल्लेख केला होता. पंतप्रधान अटलजींना त्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलविले होते व सरसंघचालक श्री. रज्जूभय्या अध्यक्षस्थानी राहणार होते. तुघलकचे संपादक चो रामास्वामी यांना सन्मानित करण्याचा तो सोहळा होता. पंतप्रधानपद व त्यांची सुरक्षाव्यवस्था याची माहिती आयोजकांना नव्हती. सहा वाजताचा कार्यक्रम व बरोबर सहा वाजता अटलजी आपल्या निवासस्थानाहून निघाले आणि कार्यक्रमस्थळी जाणारे सर्व रस्ते सुरक्षापथकाने बंद केलेत. त्यात पूजनीय सरसंघचालकांना घेऊन येणारी कार अडकली होती. अटलजी कार्यक्रमस्थळी आलेत अन् सरळ व्यासपीठावर गेले. रज्जूभय्यांची गाडी सोडा, असे संदेश गेलेत, पण तब्बल चाळीस मिनिटांनी सरसंघचालक व आयोजन समितीचे प्रमुख कार्यक्रमस्थळी पोहोचले. तोवर अटलजी एकटे व्यासपीठावर होते. समोर चो रामास्वामी, लालजी वगैरे बसले होते. हे उदाहरण नमूद करून मी लिहिले होते की, पंतप्रधान कार्यालय कसे चालते, त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेआड स्वतः पंतप्रधानही येऊ शकत नाही, हे आयोजकांना उमगले नाही म्हणून सरसंघचालक कार्यक्रमस्थळी उशिराने आलेत व नंतर उशिराने कार्यक्रम सुरू झाला. आमच्या लेखी कुणी कितीही महत्त्वाचा असला, वंदनीय असला तरी सुरक्षापथकाच्या दृष्टीने पंतप्रधान आणि फक्त पंतप्रधानच महत्त्वाचे राहतात. आयोजकांनी सरसंघचालकांना पंतप्रधान घरून निघण्याआधीच कार्यक्रमस्थळी आणले असते, तर अटलजी चाळीस मिनिटे फक्त श्रोत्यांकडे बघत व्यासपीठावर उपस्थित आहेत, असा प्रसंग घडला नसता.
सरकार म्हणून सरकारचे आकलन, सरकारला असणारी माहिती व बाकी इतर सर्वांना असणारी माहिती भिन्न राहते. त्यामुळे भाजपा व संघाच्या प्रतिनिधिसभेच्या आकलनात भिन्नता आहे, असे मी नमूद केले होते.
तसाच नाजूक प्रसंग भामसंचे दत्तोपंत ठेंगडी अन् अटलजी यांच्या संदर्भात नागपूरला उद्भवला होता. पंतांनी अटलजींना ‘गिनिपिग’ संबोधिले होते. त्यावरही माझा अग्रलेख वादळी ठरला होता. त्याच्याही भूमिकेबाबत सुदर्शनजींची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडली होती.
चालताबोलता ज्ञानकोश असणार्या सुदर्शनजींबरोबर संवाद साधणे हा विलक्षण आनंदाचा भाग राहत असे. आपल्याला त्यातून भरपूर ज्ञानाचा साठा मिळत असे. आसाम प्रश्न असो, की पंजाबचा विषय असो, इतरांना असते त्यापेक्षा वेगळी माहिती सुदर्शनजींजवळ राहत असे.
स्वदेशीबाबत ते फार आग्रही राहत असत. संघाचे एक ज्येष्ठ अधिकारी परदेश दौर्यावर गेले होते. त्या ठिकाणी त्यांना ५० शिट्ट्यांचा संच भेट म्हणून मिळाला होता. नागपूरला आल्यावर त्यांनी त्या शिट्ट्या विभिन्न कार्यकर्ते, स्वयंसेवक, अधिकारी यांना देण्याचे ठरविले. पण, त्या शिट्ट्या विदेशी. संघात चालतील काय, हा प्रश्न होता. त्यांनी सुदर्शनजींना विचारले. सुदर्शनजींनी लागलीच होकार भरला, पण होकार भरताना सांगितले, ‘‘या शिट्ट्या त्या देशातील पैशातून निर्माण झाल्या आहेत. तो पैसा आपला नाही. त्यामुळे या शिट्ट्या भेट देणार्यांसाठी देशीच होत्या. त्या आपण वापरायला हरकत नाही.’’
वैचारिक स्पष्टता असली तरी इतरांचे विचारस्वातंत्र्य, चिंतनस्वातंत्र्य त्यांना मान्य होते. वैचारिक मतभेद असले तरी त्यांच्याशी मैत्री करायला सुदर्शनजींना आवडत असे. साम्यवादी नेता श्रीपाद अमृत डांगे यांची कन्या- माजी खासदार रोझा देशपांडे व त्यांचे पती बानी देशपांडे हे सुदर्शनजींच्या अभिन्न मित्रांपैकी होते. मुंबईत गेल्यावर त्यांच्याशी गप्पा मारल्याविना सुदर्शनजी मुंबई सोडत नसत.
नागपूरलाही ख्यातनाम साहित्यिक प्राचार्य राम शेवाळकर त्यांचे खास मित्र होते. ‘पाणियावर मकरी’ हे आपले आत्मचरित्र सुदर्शनजींना द्यायची रामभाऊंची इच्छा होती. त्यांनी ‘कधी भेटायला येऊ’ वगैरे म्हणून संपर्क साधला. दुसर्या दिवशी नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात कुठला तरी कार्यक्रम होता. कार्यक्रम आटोपल्यावर सुदर्शनजी थेट रामभाऊंच्या घरी पोहोचले. सुदर्शनजींचे आगतस्वागत झाले. प्यायच्या पाण्याचे ग्लास घेऊन रामभाऊंच्या सुनबाई समोर आल्यात. सर्व ग्लासेस पाण्याने भरलेले होते. सुदर्शनजी हसत हसत म्हणाले, ‘‘सर्वांना पूर्ण ग्लासभर पाणी प्यावे एवढी तहान नसते. आपण अर्धा ग्लास द्यावा. ज्याला अजून लागेल तो मागून घेईल. पण बाकीच्या ग्लासमधील पाणी वाया जात नाही.’’ अशा लहानलहान बाबींबाबत सुदर्शनजी फार आग्रही होते.
ते संघाचे बौद्धिकप्रमुख होते तसेच शारीरिकप्रमुखही होते. नियुद्धातील ते आक्रमक खेळाडू होते. ही दोन्ही पदे भूषविणारे ते संघातील एकमेव अधिकारी होते. या दोन्ही क्षेत्रांत त्यांची तज्ज्ञता वादातीत होती.
२१ मार्च २००९ याच रेशीमबागेत उगवला होता. संघाचे सरकार्यवाह असणारे डॉ. मोहनजी भागवत यांनी सरकार्यवाह पदाचे दायित्व सोडले होते. सुदर्शनजींनी त्यांना जवळ बसवून घेतले आणि आपले उद्बोधन सुरू केले. ‘‘माझी प्रकृती आता पूर्वीसारखी दायित्व उचलण्यासाठी चांगली राहत नाही. विस्मरणाचा एक भाग आता जीवनात आला आहे. तासभर एखाद्या व्यक्तीशी गप्पा मारल्यावरही ती व्यक्ती आठवते, पण नाव आठवत नाही. कोण भेटले होते हे समोरच्याला काय सांगावे, असा प्रश्न पडतो. ही स्थिती सरसंघचालकाला चांगली नाही म्हणून मी हे पद सोडत आहे व ही जबाबदारी डॉ. मोहन भागवतांवर सोपवत आहे.’’
जितक्या सहजतेने जबाबदारी स्वीकारली होती, तेवढ्याच सहजतेने त्यातून सुदर्शनजी मुक्तही झाले होते. त्यानंतर चार-दोन दिवसांनी महालातील संघ मुख्यालयात जाण्याची वेळ आली. संध्याकाळची मोहिते शाखा लागली होती अन् चार-दोन दिवसांपूर्वीपावेतो सरसंघचालक असणारे सुदर्शनजी बालगण घेत होते. त्यांचे गणशिक्षक झाले होते. एवढी सहजता, साधेपणा संघाशिवाय अन्य संघटनेत बघणेही शक्य नाही. फार कशाला, मार्च १२ मध्ये झालेल्या प्रतिनिधिसभेत सुदर्शनजी सर्व प्रतिनिधींबरोबर खाली सतरंजीवर बसले होते व सांगत होते, ‘‘माजी सरसंघचालक. पण स्वयंसेवक तर आयुष्यभर राहणार आहे. तेव्हा इथे बसणं हे कर्तव्य आहे.’’
एका अर्थाने बघितले, तर सुदर्शनजी आगळेवेगळे होते. प्रत्येकाच्या मनात ते स्वत:चे स्थान कधी निर्माण करून जात ते समजतही नव्हते. म्हणूनच सुदर्शनजींच्या निधनाचे वृत्त येताच फक्त संघस्वयंसेवक आणि भाजपाचेच नेते त्यांच्या अंत्यदर्शनाला आले होते असे नाही, तर विविध पक्षांतील आणि विविध धर्मांतील लोकही त्या ठिकाणी आले होते. त्यात मुसलमान होते, ख्रिश्चन होते, बौद्धधर्मीय होते आणि विविध राजकीय छटांचे प्रतिनिधित्वही त्यांत होते. असे सुदर्शनजी प्रत्येकाच्या मनात स्वत:चे चिरंतन स्थान निर्माण करून राहतील, यात शंका नाही. जे जीवनकार्य सुदर्शनजींनी स्वीकारले होते, ते पूर्णत्वाला नेणे हीच पुरुषोत्तम मासाच्या अखेरच्या दिवशी दिवंगत झालेल्या रा. स्व. संघाच्या पाचव्या सरसंघचालकांना खरी श्रद्धांजली ठरेल.