Home » Blog, उद्योग भरारी, उद्योग भरारी :अमर पुराणिक, औद्योगिक, स्थंभलेखक » कटारे उद्योगसमूह : सोलापूरच्या उद्योगातील महामेरू

कटारे उद्योगसमूह : सोलापूरच्या उद्योगातील महामेरू

• उद्योग भरारी : अमर पुराणिक•
सतत धोरणे बदलल्याने देशातील उद्योगांना अवकळा आली आहे. पतधोरणे ठरताना त्यात सातत्य आणि स्थिरता असणे बंधनकारक असल्याचे सांगून किशोर कटारे यांनी ‘अस्थिर धोरणांचा विपरित परिणाम गुंतवणूकदारांवर होतो’’ हे विधान अधोरेखित केले. ‘केवळ सवलती दिल्याने उद्योग वाढेल ही संकल्पना चुकीची आहे. मानसिकता बदलल्याशिवाय प्रगती होणे कदापी शक्य नाही, भारतात सर्वात जास्त जकात सोलापूर महानगरपालिका आकारते. जकात रद्द केली तर मनपाला फारसा फरक पडणार नाही. महानगरपालिकेने तज्ज्ञांची समितीच अर्थसंकल्पासाठी नेमावी. त्यामुळे मनपाचा महसूल सर्वसामान्य सोलापूरकरांच्या खिशाला चटका न देता, उद्योजकांच्या उद्योगाला धक्का न देता वाढवता येणे सहज शक्य आहे. कोणत्याही प्रगतीत यंत्रणा काम करीत असते, योजना नव्हे. त्यामुळे नुसत्याच योजना करून काहीही होणार नाही, तर त्या राबविण्यासाठी कुशल यंत्रणा असणे अत्यावश्यक असते.
tripursundari_hotel-building-katare-uduogअर्थ आणि परमार्थ, व्यवसाय आणि अध्यात्म, कार्यप्रवणता आणि ध्यानधारणा असा समतोल साधणार्‍या कटारे कुटुंबाचे सोलापूरच्या औद्योगिक विकासाला मोठे योगदान लाभले आहे. कटारे उद्योगसमूहाने उद्योगाच्या संहिता पाळत विस्तृत व व्यापक दृष्टिकोन ठेवून विकास साधला. सोलापूरवासीयांना रोजगार उपलब्ध करून दिला. आज शहरात कटारे उद्योगसमूहाचा विभाग असलेल्या जगन्मातेच्या नावाने परिचित असलेले ‘हॉटेल त्रिपुरसुंदरी’ मोठ्या दिमाखात उभे आहे. अशा उद्यमशील कटारे परिवारातील कटारे उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक किशोर कटारे यांनी दै. ‘तरुण भारत’च्या ‘उद्योग भरारी’शी संवाद साधला.

कटारे टेक्स्टाईल्सची स्थापना कटारे उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक किशोर कटारे यांचे वडील तिप्पण्णा तुळशीराम कटारे यांनी सन १९४९ साली करून आपल्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. ६१ वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सध्या कटारे उद्योगसमूहाची धुरा विजय तिप्पण्णा कटारे, सुभाष तिप्पण्णा कटारे आणि किशोर तिप्पण्णा कटारे बंधुत्रयी वाहतात. यापैकी विजय कटारे हे अध्यक्ष आहेत, तर किशोर कटारे हे व्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा संभाळतात आणि सुभाष कटारे हे संचालक आहेत. कटारे कुटुबीयांची तिसरी पिढी देखील आता व्यवसायात उतरली असून, राकेश कटारे व सचिन कटारे हे देखील कटारे उद्योगाच्या संवर्धनात कार्यरत आहेत.
UDYOG BHARARI LOGOसुरुवातीला तिप्पण्णा कटारे यांनी ‘कटारे टेक्स्टाईल्स’ या नावाने साड्यांचा कारखाना सुरू केला. सुरुवातीला साखरपेठेत ४ लूम्सवर हा व्यवसाय सुरू केल्याचे सांगून किशोर कटारे म्हणाले की, नंतर त्यांनी साड्यांबरोबरच चादरींचेही उत्पादन सुरू केले. त्यानंतर १९६२ साली अशोक चौक येथे उद्योगाचे विस्तारीकरण केले. सन १९७४ साली तुळशीदास कटारे यांनी अक्कलकोट रोड एमआयडीसीत सूत उत्पादनाचा (स्पिनिंग मिल) प्रकल्प सुरू केला. त्यानंतर तामलवाडी येथे सन १९७९ साली २५ हजार स्पिंडल आणि १० हजार डब्लिंग अशी एकूण ३५ हजार क्षमतेची सूतगिरणी उभी केली आणि १९८२ साली या सूतगिरणीत सुताचे उत्पादन सुरू झाले.१९९२ साली कटारे स्पिनिंग मिलच्या दुसर्‍या युनिटची सुरुवात करण्यात आली. तामलवाडीतील कमलानगर येथे सुरू केलेल्या या युनिटमध्ये १२ हजार ५०० स्पिंडलची सूतगिरणी सुरू केली. सूत उत्पादन उद्योगवृद्धीच्या एकेक पायर्‍या पादाक्रांत करणार्‍या कटारे उद्योगाच्या या यशस्वी वाटचाली बरोबरच कटारेबंधूंनी नव्या क्षेत्रात उडी घेतली आणि २० मार्च १९९७ साली सोलापूर शहराचे वैभव ठरलेल्या ‘हॉटेल त्रिपुरसुंदरी’ची सुरुवात केली. आज सोलापूरच्या प्रगतीत आघाडी घेतलेले त्रिपुरसुंदरी हॉटेल सोलापूरचे नामांकित हॉटेल ठरले आहे.

विजय कटारे, अध्यक्ष

विजय कटारे, अध्यक्ष

सुभाष कटारे, संचालक

सुभाष कटारे, संचालक

त्यानंतर २००० साली नव्या शतकात कटारे उद्योग समूहाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. कटारे उद्योगसमूहाने ऊर्जानिमिर्तीच्या क्षेत्रात प्रवेश केला. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात व्यंकुसावाडी येथे ३.५ मेगावॅट क्षमतेचा पवनऊर्जा प्रकल्प सुरू केला असल्याचे सांगून, आता आणखीन २.५ मेगावॅट क्षमतेच्या वीजनिमिर्तीचे विस्तारीकरण लवकरच करणार असल्याचा मानस किशोर कटारे यांनी व्यक्त केला. तसेच तुळजापूर मार्गावर नवीन पंचतारांकित हॉटेल येत्या दोन वर्षांत सुरू करणार असल्याचा संकल्प किशोर कटारे यांनी बोलून दाखवला. या पंचतारांकित हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.
कटारे उद्योगसमूहांतर्गत कटारे स्पिनिंग मिल्स, कटारे कॉटन वेस्ट स्पिनिंग मिल, कमल मार्केटिंग प्रा. लि., श्री कमला साखर उद्योग लि., कटारे पॉवर्स लि. आणि कमला शैक्षणिक आणि वैद्यकीय संशोधन केंद्र आदी प्रकल्प चालविले जातात. कटारे उद्योगसमूहाची मागील वर्षाची उलाढाल ३०० कोटी रुपयांची होती. तर येत्या वर्षात ३६० कोटी रुपयांच्या उलाढालीचे उद्दिष्ट आहे. कटारे उद्योगसमूहाला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यापैकी उद्योगश्री, उद्योगरत्न, विजयरत्न असे काही सन्माननीय पुरस्कार लाभलेले आहेत. भारतातील बहुसंख्य मोठे उद्योजक, औद्योगिक घराणी ही टेक्स्टाईल्स उद्योगातूनच पुढे आलेली असल्याचे किशोर कटारे यांनी सांगितले. त्यापैकी, रिलायन्सचे धीरूभाई अंबानी (विमल), मफतलाल, रतन टाटा, बिर्ला आदींसारख्या काही उद्योजकांकडे किशोर कटारे यांनी लक्ष वेधले. कटारे परिवाराबद्दल व उद्योगांविषयी लिहीत असताना कटारे कुटुंबीयांच्या आध्यात्मिक व धार्मिक कार्याचा उल्लेख टाळता येणार नाही. जगन्माता त्रिपुरसुंदरी महालक्ष्मीचे कटारे कुटुंबीय भक्त आहेत, तसेच साधक देखील आहेत. रोजची संध्यासाधना नियमित होत असल्याचे किशोर कटारे यांनी सांगितले. कटारे यांनी कमलानगर (तामलवाडी) येथे महालक्ष्मीचे भव्य मंदिर बांधले आहे. अतिशय प्रसन्न वातावरण लाभलेले हे मंदिर म्हणजे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराची प्रतिकृती आहे. येथे अनेक धार्मिक सेवा चालवल्या जातात. अशाप्रकारे कटारे परिवाराने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साधले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही!

सोलापूरचा औद्योगिक विकास – व्यवस्थापकीय संचालक किशोर कटारे

किशोर कटारे, व्यवस्थापकीय संचालक

किशोर कटारे, व्यवस्थापकीय संचालक

शासनाकडे अखंड प्रगतीसाठी योग्य दिशेच्या आणि लांब पल्ल्याच्या योजना असणे नितांत गरजेचे असल्याचे किशोर कटारे म्हणाले. दर ५ वर्षाला सरकारने योजना बदलणे हे उद्योगवाढीला घातक आहे. दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे. कारण आज उद्योगात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. अशा वातावरणात सतत धोरणे बदलल्याने देशातील उद्योगांना अवकळा आली आहे. शासनाने लघूद्योग, मध्यमोद्योग आणि मोठ्या उद्योगांसाठी पतधोरणे ठरताना त्यात सातत्य आणि स्थिरता असणे बंधनकारक असल्याचे सांगून किशोर कटारे यांनी ‘अस्थिर धोरणांचा विपरित परिणाम गुंतवणूकदारांवर होतो’ हे विधान अधोरेखित केले. केवळ सवलती दिल्याने उद्योग वाढेल ही संकल्पना चुकीची आहे. त्यामुळे मानसिकता बदलल्याशिवाय प्रगती होणे शक्य नाही, असे ठाम प्रतिपादन किशोर कटारे यांनी केले. सोलापूर महापालिकेने जकात हटवावी किंवा ती माफक ठेवावी. कारण आज भारतात सर्वात जास्त जकात सोलापूर महापालिकाच आकारते. जर जकात उठवली गेली तर मनपा बजेटमध्ये फारसा फरक पडणार नाही. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात अर्थतज्ज्ञ, अभ्यासक, उद्योजकांचे मार्गदर्शन मनपाने घ्यावे किंवा अर्थतज्ज्ञांची समितीच अर्थसंकल्पासाठी नेमावी. त्यामुळे मनपाचा महसूल सर्वसामान्य सोलापूरकरांच्या खिशाला चटका न देता, उद्योजकांच्या उद्योगाला धक्का न देता आणि सर्वसामान्य सोलापूरकरांवर अवास्तव कर न लादता वाढवता येणे सहज शक्य आहे. अर्थसंकल्पावर अभ्यास, पृथ्थकरण आणि समीक्षण होणे आवश्यक आहे. मनपाने सोलापूरकरांवर जकात न लादता, ती मोकळी करावी. त्यामुळे चोर्‍या कमी होतील. सोलापूरच्या उद्योगवाढीबाबत बोलताना किशोर कटारे म्हणाले की, सोलापूर शहरात लेेबर ओरिएंटेड उद्योग उभारणे आवश्यक आहे. कॉमन इंडस्ट्री सिस्टिम (सीकेटी) असलेल्या उद्योगांमुळे शहराची वेगात प्रगती होते. रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. सोलापुरात रोजगार नसल्याने सोलापूरकर सोलापूर सोडून जात आहेत. जगात लोकसंख्या कमी होणारे सोलापूर हे एकमेव शहर असल्याचे नमूद करून किशोर कटारे म्हणाले की, कोणत्याही प्रगतीत यंत्रणा काम करीत असते, योजना नव्हे! त्यामुळे नुसत्याच योजना करून काहीही होणार नाही, तर त्या राबविण्यासाठी कुशल यंत्रणा असणे अत्यावश्यक असते. महानगरपालिकेने एक बिझनेस कमिटी नेमावी. यात अर्थतज्ञ, उद्योजक, व्यवस्थापनतज्ज्ञ असावेत. मनपाच्या अर्थसंकल्पाचे प्रेझेंटेशन या बिझनेस कमिटीकडून घ्यावे. त्यामुळे विकासयोजनेचा आराखडा तयार करून त्या नियोजनाप्रमाणे काम केल्यास शहरविकास, उद्योगविकास होईल. त्यामुळे मनपाचा महसूल वाढण्यासही मोठी मदत होणार आहे. राज्य व केंद्र सरकारची अनुदाने सोलापूर प्रशासन, मनपाने उपयोगात आणावीत. प्रगतीची काही सूत्रे सांगताना कटारे म्हणाले की, प्रत्येकाच्या कामाचे मूल्यमापन झाले पाहिजे. कडकपणे धोरणे राबविली पाहिजेत. घर स्वच्छ ठेवले नाही तर पाहुण्यांना कसे बोलावणार? त्यासाठी शहर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. यातून अनेक स्रोत निर्माण होतील. कचर्‍यापासून वीजनिर्मिती प्रकल्प, पवनऊर्जा प्रकल्प राबविल्यास ‘बँकिंग ऍन्ड विलिंग’ पद्धतीने मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होऊ शकते व वीज वापरता येऊ शकते. जर मनपाला असले प्रकल्प करता येणार नसतील, तर असे प्रकल्प किंवा छोट्या छोट्या गोष्टी जसे, शहरातील दिवाबत्ती आदीचे मेंटेनन्स शहरातील इच्छुक कंपन्यांना द्यावे, त्यामुळे सोलापूरकरांना सोयी उपलब्ध करून देता येऊ शकतील.

………………………………………………………………………………………….
दै. तरुण भारत, सोलापूर. सोलापूरची उद्योग भरारी, रविवार, दि. २४ ऑक्टोबर २०१०

Posted by : | on : 31 January 2011
Filed under : Blog, उद्योग भरारी, उद्योग भरारी :अमर पुराणिक, औद्योगिक, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *