Home » Blog » देशोद्धार फक्त गांधी-नेहरू घराण्यांनीच केला काय?

देशोद्धार फक्त गांधी-नेहरू घराण्यांनीच केला काय?

अमर पुराणिक

पल्या कोणत्याही भाषणात सोनिया गांधी आणि कॉंग्रेस नेते जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची तोंड फाटेस्तोवर प्रशंसा करतात आणि लालबहादूर शास्त्री यांचा उल्लेख टाळतात किंवा ओझरता उल्लेख करतात.  मात्र सोनियांना नरसिंह राव यांच्या नावाचा उल्लेखही करावासा वाटत नाही. मुळात ही पंरपरा नेहरूंपासून चालत आलेली आहे. गांधी-नेहरू घराण्यांपलीकडे इतरांना श्रेय देण्यात कायमच या घराण्याने कंजुषी दाखवली आहे आणि ही परंपरा चालवण्यात सोनिया गांधीही आघाडीवर आहेत. पी.व्ही. नरसिंहराव देशाच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पंतप्रधान झाले व त्यांनी देशाच्या प्रगतीत कॉंग्रेसच्या कार्यकालातील इतर पंतप्रधानांच्या तुलनेत सर्वात मोठे योगदान दिले होते. भारतासाठी मोठे योगदान देणार्‍या नेत्यांचे नाव घेताना फक्त नेहरू-गांधी कुटुंबांचाच उल्लेख करणे हे सोनिया किंवा कॉंग्रेसच्या आत्मप्रौढी मिरवण्याच्या स्वभावाला अनुषंगूनच आहे. जर सोनिया गांधीद्वारा नरसिंह राव यांचे श्रेय लाटण्याच्या वृत्तीचा कोणीच विरोध केला नाही, तर भारताच्या खर्‍या नायकांचे राष्ट्रासाठी केलेले योगदान विसरण्याच्या कृतघ्नपणाचा संदेश देत आहेत, असे म्हणावे लागेल.
कॉंग्रेसेतर नेत्यांचे देशाच्या प्रगतीत असलेले योगदान मान्य करणे ही तर खूप लांबची गोष्ट आहे. कमीकमी कॉंग्रेसच्या नरसिंहराव किंवा लालबहादूर शास्त्रीजींसारख्या नेत्यांचा तरी उल्लेख टाळण्याचा कृृतघ्नपणा सोनिया आणि कॉंग्रेसने करू नये इतकीच माफक अपेक्षा आहे. नरसिंह राव २१ जून १९९१ रोजी पंतप्रधान बनले होते. जेव्हा त्यांनी देशाच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार सांभाळला तेव्हा देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली होती. देशाची आर्थिक व सामाजिक घडी पूर्णपणे विस्कटलेली होती आणि महागाईचा दर १३ टक्क्यांवरून वाढत वाढत १७ टक्क्यांवर पोहोचला होता.
देशाचे दिवाळे निघण्यापासून वाचण्यासाठी तेव्हाचे चंद्रशेखर यांच्या नेतृत्वातील सरकारला २० कोटी डॉलर मिळवण्यासाठी बँक ऑफ इंग्लंडकडे सोने तारण ठेवावे लागले होते. परकीय चलनाच्या भांडारात फक्त २१ अब्ज डॉलरच शिल्लक राहिले होते. इतक्या रकमेत फक्त दोन आठवड्यांचे आयात बिल देणे शक्य होते. अशा परिस्थितीत नरसिंह राव यांनी देशाचा कारभार सन १९९१ साली हाती घेतला आणि जेव्हा १९९४ मध्ये नरसिंह राव यांनी पंतप्रधान पद सोडले तेव्हा तीच भारताच्या परकीय चलनाची गंगाजळी १४० अब्ज  डॉलरवर पोहोचली होती.
देशाच्या प्रगतीच्या, विकासासंदर्भात बोलताना सोनिया गांधी यांना नरसिंह राव यांच्यासारख्या व्यक्तींचा उल्लेख करणे जरुरीचे वाटत नसावे, पण नरसिंह राव यांच्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या दमदार कारकीर्दीमुळे आज त्याच भारताची परकीय चलनाची गंगाजळी २८५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. परकीय चलनाच्या गंगाजळीशिवाय देशातील प्रतिव्यक्ती उत्पन्न देखील वाढले आहे.  ज्या प्रसारयंत्रणा, माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार उद्योगाने आज प्रचंड मोठी भरारी मारली आहे. त्याचे श्रेय कोणताही संबंध नसताना राजीव गांधींना दिले जाते. या क्षेत्रातील भारताच्या आघाडीचे श्रेय फक्त आणि फक्त भाजपालाच जाते. विशेषत: प्रमोद महाजनांनी प्रसारयंत्रणा, माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार आदी क्षेत्रांत भरीव कामगिरी केली होती, पण कोणताही संबंध नसताना याचे श्रेय राजीव गांधींना देणे म्हणजे निव्वळ निर्लज्जपणाच म्हणावा लागेल! देशाच्या प्रगतीत भाजपा व्यतिरिक्त कोणी प्रयत्न केले असतील तर ते नरसिंह राव यांनी. सरकारची एकाधिकारशाही संपवून नुकसानीत चालणार्‍या संस्था स्वतंत्र करण्याचेही श्रेय देखील भाजपाचेच आहे. रालोआ सरकारच्या काळात केवळ यासाठीच निर्गुंतवणूक मंत्री नेमण्यात आला होता, ते निर्गुंतवणूक मंत्री भाजपा नेते व ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी हे होते. नुकसानीतली शासकीय एकाधिकारशाही संपवण्यासाठी सर्वांचा वाईटपणा घेऊन अरुण शौरी यांनी यशस्वीरीत्या ही जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे सरकारची अब्जो रुपयांची ‘डेड इन्व्हेस्टमेंट’ (कुचकामी गुंतवणूक) इतर विकासकामांसाठी मोकळी करता आली, याचा विसर जनतेला तरी पडलेला नाही. आज भारताची अर्थव्यवस्था  जगातील सर्वात वेगाने वाढणारी दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि प्रत्येक देश याचा लाभ उठवण्यासाठी उत्सुक आहे. थोडक्यात सांगायचे म्हटले तर भारतीय मानस जागृतीचे काम फक्त माजी राष्ट्रपती महामहिम डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि नरसिंह राव या ‘त्रिमूर्तींनी’च केले आहे.
पी.व्ही. नरसिंह राव यांची दुसरी आणि महत्त्वपूर्ण उपलब्धी म्हणजे आतापर्यंतच्या कॉंग्रेस नेत्यांपेक्षा ते जास्त साहसी व दूरदर्शी नेते होते. ज्याच्या बळावर त्यांनी इंदिरा गांधी यांनी पेटवलेला व राजीव गांधी यांनी भिजत ठेवलेला पंजाबमधील आतंकवादाचा नायनाट केला होता. पंजाबमध्ये विघटनवादाचे बीज इंदिरा गांधी यांनी पेरले होते आणि राजीव गांधी यांनी त्याला खतपाणी घातले होते. १९८९ मध्ये जेव्हा राजीव गांधी यांनी पदत्याग केला, तेव्हा पंजाबमधील स्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली होती. नरसिंह राव यांनी पंजाब देशापासून वेगळा होण्यापासून वाचवला आणि तरीही कॉंग्रेसजन आणि विशेषत: गांधी घराणे त्याचे श्रेय देणे तर लांबच, पण नरसिंह राव यांचे स्मरण करणे किंवा त्यांचा उल्लेख करणे देखील टाळतात.
गांधी परिवाराची आपल्या परिवाराव्यतिरिक्त अन्य कोणत्याही राष्ट्रीय व्यक्तीच्या राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाचा स्वीकार करण्याची मानसिकताच नाही. हा मानसिक साथीचा रोग विशेषत: जवाहरलाल नेहरूंपासून सुरूच आहे. ५६४ संस्थानांचे अखंड भारतात यशस्वीरीत्या विलीनीकरण करणार्‍या सरदार पटेल आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही महत्त्वपूर्ण कार्य दाबून टाकण्याचे सर्वतोपरी प्रयत्न याच नेहरूंनी केलेले आहेत. याच वळणावर इंदिरा गांधी आणि राजीव गांधीही गेले. आता हेही स्पष्टच आहे की, सोनिया गांधीही या परिवाराची हीच समृद्ध(?) परंपरा पुढे चालवीत आहेत.
सर्व कॉंग्रेसजनांसह सोनिया गांधी केवळ नरसिंह राव यांच्या कार्याकडेच कानाडोळा करीत नाहीत, तर नरसिंहराव यांच्या कारकीर्दीतील आर्थिक प्रगतीचे श्रेय  आपले दिवंगत पती राजीव गांधी यांच्या खात्यात जमा करून मोकळ्या झाल्या आहेत. ही आणखी एक गांधी-नेहरू घराण्यांची विशेषता आहे. ते सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यही स्वत:च्या खात्यावर जमा करतात, तेथे नरसिंह रावांच्या कार्याची काय अवस्था? माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आदी कॉंग्रेसेतर रालोआ सरकारमधील दिग्गज नेत्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यांचा नुसता नामोल्लेख करणे तर लांबची गोष्ट आहे. सोनिया गांधी आणि कॉंग्रेस नेते आणखी एक अवास्तव असा दावा करतात की, राजीव गांधी हे माहिती-तंत्रज्ञान आणि दूरसंचार युगाचे प्रणेते आहेत. राजीव गांधींच्या निधनानंतर जवळ जवळ १२ वर्षांनी दूरसंचार व माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांत भारताने मोठी झेप घेतली होती, याची साधी आठवण सोनिया गांधी आणि कॉंग्रेस नेत्यांना कोणीतरी करून द्या हो! असे म्हणण्याची पाळी आज आपल्यावर आली आहे आणि या काळात न कॉंग्रेसचे सरकार होते न कॉंग्रेसच्या सत्ताकाळात याची पायाभरणी झाली. भाजपा आणि रालोआ सरकारला याचे श्रेय कॉंग्रेसला द्यायचे नसेल तर देऊ नका, पण कॉंग्रेसच्या नरसिंह रावांच्या काळातील भारताच्या आर्थिक धोरणांचे श्रेय तरी किमान नरसिंह रावांना द्या!
कॉंग्रेस आणि सोनिया गांधी करीत असलेल्या या वल्गनांची उलटतपासणी करणे आता गरजेचे झाले आहे. कारण ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी राजीव गांधी  ५ वर्षांसाठी पंतप्रधान झाले होते. या काळातील देशाच्या प्रगतीचा आलेख पाहिला तर आपल्या असे लक्षात येईल की, देशाची सर्वात मोठी अधोगती याच काळात झाली होती. पंतप्रधानपदावरून हटल्यावर एका वर्षातच देशाला बँक ऑफ इंग्लंडकडे सोने तारण (गहाण) ठेवण्याची पाळी आली होती. सोनिया गांधींच्या म्हणण्याप्रमाणे जर राजीव गांधींच्या काळात देशाने इतकी प्रगती केली होती, तर मग केवळ २० कोटी डॉलरसाठी सोने तारण ठेवण्याची पाळी कशी काय आपल्या देशावर आली? पण सोनिया गांधी मात्र बेधडकपणे ठोकून देताहेत की, देशाची आर्थिक उन्नती राजीव गांधी यांनी केली. त्यांच्या या दाव्याला मिथ्याच (धादांत खोटारडेपणाच) म्हणावे लागेल. त्यांच्या दाव्यातील आणखी एक ‘मिथ्य’ म्हणजे राजीव गांधी यांनी देशातील अशांत भागात शांती प्रस्थापित केली. इंदिरा गांधी यांनी पंजाब प्रश्‍न पेटवला, तर राजीव गांधी यांनी काश्मीर प्रश्‍न भिजत ठेवला. तसेच आजपर्यंत धुमसत राहिलेला काश्मीर प्रश्‍नही असाच पेटवत ठेवला. त्यांनी नोव्हेंबर १९८४ मधील बोट क्लब येथे झालेल्या आपल्या कुप्रसिद्ध भाषणात राजीव गांधी यांनी शिखांच्या नरसंहाराचे समर्थनच केले होते, हे भारतीय जनता विशेषत: शिख बांधव अजूनही विसरलेले नाहीत. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याच काळात पंजाबमध्ये देशातील अशांती आणि हिंसाचार आपल्या चरमसीमेवर पोहोचला होता. राजीव गांधींच्या काळात दिल्ली आणि पंजाबमधील कोणत्याही चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी किंवा या भागात यात्रा करण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती. नंतर ज्या व्यक्तीने पंजाब शांत केला, ती व्यक्ती होती नरसिंह राव!
वास्तवात सोनिया गांधी आणि त्यांचे कॉंग्रेसजन सत्तांध झाले आहेत. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत पुन्हा सत्तेवर आल्यावर तर सतत असत्य वल्गनाच करीत आहेत. आता खर्‍या विचारवंतांवरच सतत काय खरे आणि काय खोटे? याचा पडताळा घेत राहण्याची वेळ आली आहे, तेथे सर्वसामान्य जनतेची काय कथा? सामान्य जनता मात्र यामुळे संभ्रमात पडली आहे. कायद्याच्या पुस्तकात सत्याला दाबून असत्याला प्रस्थापित करण्याचे ‘एक आदर्श उदाहरण’ म्हणून याचा समावेश करता येऊ शकेल.

http://amarpuranik.in/?p=125
Posted by : | on : 31 March 2012
Filed under : Blog.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *