Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, सांस्कृतिक, स्थंभलेखक » मेहदी हसन : अबके हम बिछडे

मेहदी हसन : अबके हम बिछडे

•अमर पुराणिक•
आषाढातल्या मेघांसारखा घनगंभीर खर्जातला आवाज, विरहाच्या करूण भावनांच्या धारदार ताना, हृदय हेलावणारं आशयघन गमक अंग, ऐकणार्‍या रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत काळीज चिरणारी आकारयुक्त आलापी आणि शायरांच्या शायरीचे रागांच्या चौकटीतून आपल्यासमोर स्पष्ट चित्र उभे करणारे महान गजल सम्राट मेहदी हसन यांच्या गायकीचा महिमा काय वर्णावा? या महान कलावंताच्या निधनाने गजल पोरकी झाली. एक ‘दादा कलावंत’ आपल्यातून गेला, पण आपल्यासाठी अमूल्य गजलांचा, गायकीचा, स्वरांचा ठेवा ठेवून!
Mehdi_Hassanअबके हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोंमे मिले…’ आषाढातल्या मेघांसारखा घनगंभीर खर्जातला आवाज, विरहाच्या करूण भावनांच्या धारदार ताना, हृदय हेलावणारं आशयघन गमक अंग, ऐकणार्‍या रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत काळीज चिरणारी आकारयुक्त आलापी आणि शायरांच्या शायरीचे रागांच्या चौकटीतून आपल्यासमोर स्पष्ट चित्र उभे करणारे महान गजल सम्राट मेहदी हसन यांच्या गायकीचा महिमा काय वर्णावा? या महान कलावंताच्या निधनाने गजल पोरकी झाली. एक ‘दादा कलावंत’ आपल्यातून गेला, पण आपल्यासाठी अमूल्य गजलांचा, गायकीचा, स्वरांचा ठेवा ठेवून!
कलेची सुंदरता, संगीत, अध्यात्म केवळ समजता किंवा अनुभता येऊ शकते, पण ते समजावून सांगणे अशक्यप्राय आहे! जेव्हा आपण मेहदी हसन यांच्या गजला, ठुमरी, दादरा ऐकतो, तेव्हा आपल्या अंतर्मनात असे भाव निर्माण होतात की जे भाव केवळ अनुभवता येऊ शकतात पण सांगता येत नाहीत. अशीच स्थिती मेहदी हसन यांच्या गायकीचे वर्णन करताना होते. मेहदी हसन यांनी आपल्या गायकीला शास्त्रीय संगीत ऐकवण्याचे माध्यम बनवले. शास्त्रीय संगीत गाऊन नव्हे तर विशेषत: गजल गाऊन गजलांच्या भावनांना त्या त्या रागांच्या माध्यमातून प्रकट केले. जेव्हा ते गजल गातात तेव्हा रागांचेही वेगळे-वेगळे अंग प्रकट होते. त्यामुळे रागांनाही नवे आयाम मिळाले. म्हणूनच त्यांनी गायिलेल्या गजला आजही चिरतरुण, नित्य स्मरणात राहतात. हे वैशिष्ट्य त्यांच्या प्रत्येक रचनेत स्पष्टपणे अनुभवता येते. जेव्हा ते विशिष्ट गजल विशिष्ट रागात गातात तेव्हा एक वेगळा अनुभव आपल्याला येतो. स्टुडिओ रेकॉर्डिंगपेक्षा लाईव्ह कार्यक्रमात याची प्रचिती प्रकर्षाने जाणवते. याचे कारण म्हणजे ‘राग’. कोणताही भाव प्रकट करण्यासाठी रागांसारखे साधन नाही, नव्हे केवळ रागच साधन आहे. मेहदी हसन यांच्या लाईव्ह कार्यक्रमांच्या रेकॉर्डिंगमध्ये हे आपल्याला जाणवतेच जाणवते. स्टुडिओ ध्वनिमुद्रणाला वेळेच्या मर्यादा आहेत. रसिकांची दाद मिळत नाही, पण लाईव्ह शोचे तसे नाही. त्यामुळे मेहदी हसन लाईव्ह शोमध्ये गाताना प्रत्येक गजल रागागांचा व्यवस्थित विस्तार करून गातात. त्या रागांच्या स्वरांमुळे वातावरणनिर्मिती किंवा त्या रागांची पार्श्‍वभूमी निर्माण होते व त्यानंतर गायिलेल्या गजलचे अंतरंग दिलखुलासपणे प्रकट होतेे. त्यामुळे मेहदी हसन यांच्या स्टुडिओ रेकॉर्डेड गजलांपेक्षा लाईव्ह शोमधील गजला जास्त प्रभावी ठरतात.
शब्दांना अर्थ असतो, त्या अर्थाला भावनाही असतात. त्या अर्थाच्या माध्यमातून भावनांना भेदण्याचे, रसिकांपर्यंत पोहोचविण्याचेे काम, सुरांच्या, आवाजाच्या खांद्यावर असते आणि ही जबाबदारी मेहदी हसन यांनी आपल्या गंभीर आवाजातून लीलया पेलली. खर्‍या गजलांचा गाभा कळायला आणि त्यांचा आस्वाद घेण्याची योग्यता प्राप्त व्हायला अनेक वर्षे जावी लागतात, अभ्यास लागतो, सतत ऐकणं लागतं. गजलांसाठी तर आवाज, स्वर यांबरोबरच साहित्य प्रतिभेचाही सर्वोच्च आविष्कार व्हावा लागतो. गजलेतील अर्थ, सुप्तअर्थ प्रकट होण्यासाठी तशाच पद्धतीचे भाव प्रकट करणारे किंवा त्या गजलेतील भावना जिवंत करणारे राग वापरून मेहदी हसन यांनी उत्तमोत्तम गजला रसिकांसाठी तयार केल्या. मेहदी हसन यांसारखे श्रेष्ठ गायक, मिर्झा गालिब, मिर तकी मीर, अहमद फराज असे अनेक शायर आणि दर्दी रसिक अशा दुर्मिळ योगांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा स्वर्गीय गजल जन्माला येते. गजल गायकीचा उंच हिमालयासारखा मनोरा बांधून रसनिर्मितीचा उत्कट आविष्कार पेश करणार्‍या मेहदी हसन यांनी गजलला इतकी प्रचंड उंची दिली की, त्यांच्या पश्‍चात ती जपणेही अवघडच आहे. शास्त्रीय रागांचे मखमली पांघरूण आणि उर्दूच्या नजाकतीची झालर लावून आलेली ‘तेहजीब’युक्त गझल मेहदी हसन यांच्या वाणीतून प्रकट होते. गझल हा प्रकारच मुळात कातरतायुक्त असा आहे. विरह, प्रेमभंग, प्रतीक्षा अशा प्रेमाच्या अत्युच्च भावना व्यक्त करण्यासाठी मेहदी हसन यांनी गजलमध्ये अक्षरश: प्राण ओतले. मेहदी हसन यांचा आवाज, त्यांचा रागाभ्यास, फारसी-उर्दू भाषेवरील पकड म्हणजे मणिकांचन योगच होता. मेहदी हसन यांच्या गझला ऐकताना आधी त्यांचा आवाजच मनाची पकड घेतो. त्यांची स्वर आणि रागांवरील हुकुमत ही अवर्णनीय होती. मिर्जा गालिब, मिर तकी मीर, फैज अहमद फैज, अहमद फराज अशा दमदार शायरांच्या गजलांना खरा न्याय दिला तो  मेहदी हसन साहेबांनी. आशयघन गजलांना अमरत्व दिले.
‘अबके हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोंमे मिले… ’ या ‘भूपेश्‍वरी’ रागातील गजलेतून विरहातही दुर्दम्य आशावाद त्यांच्या गायकीतून प्रकट होतो, नव्हे लख्ख समोर उभा राहतो. त्यांच्या गायकीवर वर्णन केलेल्या वैशिष्ट्यांचा उत्तम नमुना आहे. भूपेश्‍वरी राग हा संधिप्रकाश राग आहे, तो तिन्ही सांजेच्या, कारतवेळेच्याच भावना प्रकट करतो. ‘अबके हम बिछडे’ या गजलसाठी त्यांनी हा राग निवडला, यातच अर्धे यश आहे. भूपेश्‍वरी रागातील तीव्र ‘रिषभ’बरोबर कोमल ‘धैवता’चा संवाद करुणा प्रकट करतो. मेहदी हसन यांच्या आवाजात ‘मंद्र धैवता’बरोबर ‘तीव्र रिषभा’चा संवाद म्हणजे या गजलमध्ये शायराने मांडलेले भाव-भावनांची घालमेल, विरह, प्रतीक्षा आणि पुन्हा आशावाद हे सर्व अतिशय प्रभावीपणे प्रकट होतात.
मेहदी हसन यांनी बहुदा सर्वच गजला रागांमध्येच बांधल्या आहेत. त्यात भूपेश्‍वरी रागातील ‘अब के हम बिछडे है’बरोबरच मेहदी हसन यांची सर्वात लोकप्रिय गजल यमनकल्याणमधील ‘रंजीशी सही’, ‘जिंदगी मे तो सभी’ या गजला, ‘भंखार’ रागातील ‘खूली जो आँख’, मल्हार रागातील ‘एक बस तू ही नही मुझसे खफा हो बैठा’,  किरवानी रागातील ‘शोला था जल बुझा हूं’, नटभैरव मधील ‘गो जरासी बात पर’, ‘एक खलीश को भी कभी’ या गजलांप्रमाणेच ‘उमड घुमड घीर आयी रे बदरा’ ही देस-तिलक कामोद रागातील ठुमरी, ‘तीर नैनो का जालीम ने’ हा दादरा, मांड रागातील ‘केसरिया बालम ओ जी पधारो म्हारे देस’ हे राजस्थानी लोकगीत अशी अनेक उदाहरणे आहेत.
‘जिंदगी मे तो सभी प्यार किया करते है |’ ही गजल ऐकताना प्रेमाची खोली काय आहे, त्याची व्याप्ती किती गहरी आहे? याचा अनुभव येतो. प्रेमावर विश्‍वास न ठेवणाराही ही गजल ऐकल्यावर प्रेमावर विश्‍वास ठेवू लागतो. इतक्या  प्रभावीपणे, उत्कटतेने मेहदी हसन साहेबांनी ती गायिली आहे. ‘‘प्यार भरे दो शर्मिले नैन, दिल की बात जुबां पर लाकर, कैसे छुपाऊं राज ओ गम,  तूने ये फूल जुल्फो में लगा रखा है |’’ अशा अनेक गजलांतून भावप्रकटीकरणाचा हा उत्तुंग नमुना आपल्याला ऐकायला मिळतो. अशा गजलसम्राटाची थोरवी काय वर्णावी! सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्यांच्या गायकीचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे! पण तरीही हा मोह आवरत नाही. त्यांच्या निधनाने त्यांचा दैवी स्वर हृदयात रुंजी घालतोय आणि मला लिहितं करतोय…!
राजस्थानमधील लुना या गावी दि. १८ जुलै १९२७ रोजी जन्मलेल्या मेहदी हसन यांच्या घराण्यातच गायकीचा वारसा होता. तब्बल चौदा पिढ्यांमधून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. वडील उस्ताद अजीम खॉं आणि काका उस्ताद इस्माईल खॉं हे दोघेही त्या काळातील नावाजलेले गायक. ते धृपद-धमार गायक होते. त्यांच्याकडून मेहदी हसन यांनी संगीताचे धडे गिरविले. तारुण्यात पदार्पण करतानाच त्यांनी मोठ्या भावासोबत मैफली सादर करायला सुरुवात केली. त्यांच्या पहिल्या मैफिलीत त्यांनी धृपद गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
मेहदी हसन यांनी गजल, गीत, चित्रपट, रेडिओ, टीव्ही आदी सर्व मिळून आजपर्यंत रसिकांच्या सेवेसाठी ५४ हजार गाणी, ध्वनिमुद्रित केलेली आहेत. १९५१ पर्यंत गजलचे रूप संपत आले होते. कारण बेगम अख्तर, उस्ताद बरकत अली खॉं आदींचा काळ संपत आला होता. रागांचा प्रचार हिंदुस्थानात जास्त होता, पण पाकिस्तानमध्ये मात्र हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रचार खूपच कमी होता. पाकमध्ये सलामत अली, नजाकत अली व मेहदी हसन यांनी नंतर प्रचार केला. पाकिस्तानी लोकांमध्ये शास्त्रीय संगीत रुजवण्याचा प्रयत्न केला. शास्त्रीय संगीत कसे ऐकावे, हे पाकिस्तानी लोकांना शिकविले. अस्थाई अंतरा काय आहेत, तिय्या काय आहे, याची चव तेथील लोकांना शिकवली.
पहिल्यांदा १९५२ मध्ये मेहदी हसन यांना पाकिस्तानी चित्रपट शिकारसाठी गाणे गाण्याची संधी मिळाली. तोेपर्यंत ते शास्त्रीय संगीतच गात होेते. शिकारची गाणी खूप लोकप्रियझाली, मोठा धमाका झाला. मेहदी हसन हे नाव सर्वतोमुखी झाले. नंतर रेडिओ पाकिस्तानसाठी गाण्याची संधी चालून आली. काही दिवस रेडिओसाठी गायिल्यानंतर त्यांच्या मनात एक विचार आला की, गजल नामशेष होते की काय? या विचारांनी मनात घर केले. त्यामुळे १९५७ नंतर गजल गाण्यास प्रारंभ केला. शास्त्रीय संगीताप्रमाणेच गजल गायनासाठी त्यांचा आवाज सुयोग्य होता. त्यांनी तत्कालीन गजल नव्या रूपात आणावी असे ठरवले. गजलांना चिरतारुण्य देण्यासाठी गजलला हिंदुस्थानी शास्त्रीय रागांनी सजवायचे ठरवले आणि तेथून गजलचे नवे रूप लोकांसमोर आले. भूपाली रागातील ‘बात करनी मुश्किल कभी ऐसी तो न थी’ ही बहादूरशाह  जफरची गजल खूप लोकप्रिय झाली. फैज अहमद फैज यांची ‘गुलो मे रंग भरे’, मिर तकी मीर यांची ‘देख तो दिल की जॉं से उठता है, ये धूवॉं कहॉंसे उठता है.’ या गजल देखील खूप गाजल्या. येथून गजल गायकीचा यशस्वी प्रवास सुरू झाला. हा प्रवास असा होता की, मागे वळून पाहावे लागले नाही. तेव्हापासून प्रत्येक  मैफल दर्दी रसिकांसाठी मेजवानी ठरली. रसिकांंचा उदंड प्रतिसाद मिळाला, ही यशाची कमान कायम चढतीच राहिली.
जेव्हा गजलांना रागांचा चेहरा मिळाला तेव्हा खरी शायरी, खरे भाव बाहेर येऊ लागले. कारण राग तर कधी जुने होत नाहीत. हजारो वर्षांपासून राग गायिले जात आहेत. ते कधीही जुने झाले नाहीत. आजही त्यातील रस तितकाच आहे आणि पुढेही राहील. कारण प्राचीन ऋषी-मुनींनी त्या रागांची रचनाच अशी केलेली आहे की, राग त्रिकालाबाधित राहावेत, अजरामर राहावेत. मेहदी हसन म्हणतात, ‘‘जेव्हा आपण राग वापरतो किंंवा गातो, तेव्हा राग आपला प्रभाव सोडतोच. आपले संगीत वृद्ध झाले नाही, संपले नाही. या रागांमुळेच माझ्या गजला आजही तितक्याच ताज्या राहिल्या आहेत.’’ हिंदुस्थानी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतात प्रत्येक संगीत प्रकाराचा रंग वेगवेगळा आहे. ठुमरीचा रंग वेगळा आहे, दादर्‍याचा रंग वेगळा आहे, गझलचा रंग वेगळा आहे आणिगीतांचाही रंग वेगळा आहे. याबाबतीत आपण बेफिकीर राहिलो तर संगीत भ्रष्ट होते. जुने जाणते म्हणतात की, गाणं असेल तर गाण्यासारखंच राहू द्या! गजल गजलसारखीच राहू द्या. ठुमरी गाताना दादर्‍याचा बेहलावा घेऊ नका. दादरा गाता गाता ठुमरीच्या पद्धतीने गाणे, किंवा ठुमरी गाण्यात ख्यालाच्या ताना  किंवा धृपद अंगाच्या गमकयुक्त ताना असे करणे निषिद्ध ठरवले, कारण सर्वात महत्त्वाची आहे ती शुद्धता. हे नियम मेहदी हसन यांनी कटाक्षाने पाळले. मेहदी हसन यांनी धृपद-धमार, ख्याल, ठुमरी, दादरा, गजल, लोकगीत असे सर्व शास्त्रीय, उपशास्त्रीय प्रकार लीलया हाताळले, पण यात कधी मिश्रण किंवा भेसळ होऊ दिली नाही. हे प्रकार तीच व्यक्ती करू शकते, जी चार मतांशी अभ्यस्त असेल. शिवमत, कृृष्णमत, हनुमानमत, भरतमत ही चार मते आहेत. शिवमत आणि हनुमानमत धृपदमध्ये वापरली जातात. भरतमत हे ख्याल आणि कृष्णमत ख्याल आणि ठुमरी, दादरा अशा उपशास्त्रीय संगीतात वापरले जाते. ही चारी मतं वेगळी ठेेवण्याची क्षमता असणाराच हे चारही प्रकार गाऊ शकतो. अशा गवयांत मेहदी हसन यांचेे नाव वरच्या स्थानावर आहे. या सगळ्यांंचा विचार केल्यानंतर मेहदी हसन म्हणतात,‘‘हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत माझ्यासाठी समुद्र झाला आहे. हा ज्ञानसमुद्र काय आहे, ते मी शोधण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करतोय.’’ किती मोठेपणा आहे मेहदी हसन यांच्या या वक्तव्यात! ज्ञानाचा आदर, कायमची विद्यार्थीवृत्ती यातून दिसून येते. इतके यश मिळवूनही मेहदी हसन यांचे पाय जमिनीवरच आहेत, याचा हा पुरवाच आहे. स्थितप्रज्ञता म्हणजे काय, तर ती हीच! मेहदी हसन यांच्या जाण्याने गजल व हिंदुस्थानी शास्त्रीय गाण्यांच्या चाहत्यांची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्यानंतर आणखीन त्यांची गाणी ऐकण्याची ओढ निर्माण झाली आहे, पण मेहदी हसन म्हणतात…
‘‘शोला था जल बुझा हूँ हवाये मुझे न दो |
मै कब का जा चुका हूँ सदाये मुझे न दो ॥
रविवार दि. १ जुलै २०१२ तरुण भारत.

Posted by : | on : 2 July 2012
Filed under : Blog, चौफेर : अमर पुराणिक, सांस्कृतिक, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *