महात्मा गांधी यांच्या आंदोलनतून कधी, कुठल्या व किती मागण्या लगेच मंजुर झाल्या होत्या? नसतील तर ती आंदोलने फ़सली होती म्हणायचे काय? आणि फ़सलीच असतील तर त्यानंतर स्वातंत्र्य कशाला मिळाले असते? कुठलेही आंदोलन हे दिर्घकालिन प्रक्रियेचा एक भाग असते. मोठा वृक्ष तोडताना जसे त्यावर एकामागून एक घाव घातले जात असतात, तेव्हा प्रत्येक घावाबरोबर झाड पडले किंवा नाही, असे घावागणिक त्या कामाचे मुल्यमापन होऊ शकत नाही. ती दिर्घकालीन प्रक्रिया असते. त्याचप्रमाणे लोकपाल किंवा काळापैसा मायदेशी परत आणायची आंदोलने, ही दिर्घकालिन प्रक्रिया आहे. त्यातली ही धरणी किंवा उपोषणे एक एक घाव आहेत. शेवटचा किंवा शंभरावा घाव बसतो, तेव्हा वृक्ष कोसळताना दिसतो. पण ते काम त्य शंभराव्या घावाने केलेले नसते, तर प्रत्येक घावाने जो इवला तुकडा पाडलेला असतो. त्याचा एकत्रित परिणाम शेवटच्या घावानंतर दिसत असतो. तशीच आंदोलनाची प्रक्रिया असते. गांधीजींच्या आंदोलनातही दांडीयात्रा, असहकार आंदोलन अशा अनेक चळवळी झाल्या. त्या प्रत्येकातून स्वातंत्र्याची चळवळ पुढे जात होती. त्यातून ब्रिटीश सराकारची मर्जी संपादन करणे व त्यांच्याकडून काही पदरात पाडून घेणे; असा कुठलाही उद्देश महात्माजींनी डोळ्यासमोर ठेवला नव्हता. त्या प्रत्येक आंदोलनातून लोकांची हिंमत वाढवणे व जनमानसात सत्तेविषयी व कायदा प्रशासनाविषयी असलेली भिती संपवणे; हे त्यांचे खरे उद्दीष्ट होते. जसजशी ती भिती कमी होत गेली व भीड घटत गेली; तसतसा लोकांचा आंदोलनातील सहभाग वाढत गेला होता. आपली शासनाविषयीची नाराजी मनातल्या मनात न ठेवता प्रदर्शित करण्यासाठी लोक अधिकाधिक संख्येने पुढे येऊ लागले. तोच त्या आंदोलनांचा खरा हेतू होता. तो साध्य होत असला तरी त्यांचे आंदोलन कसे फ़सले, ते तेव्हाचा टाईम्स ऑफ़ इंडीया लिहित होता. म्हणूनच आजचे डझनावारी टाईम्स काय लिहितात वा अक्कल पाजळतात, त्याकडे बघण्याची गरज नाही. कारण अशी माध्यमे व वृत्तपत्रे किंवा त्यातले बुद्धीमंत; हे नेहमी सरकारचे मानसिक गुलाम असतात. त्यांच्या निदानावर जाण्याचे काही कारण नाही.
अण्णा टीमचे जंतरमंतर येथील आंदोलन फ़सले असेल तर त्याला सरकार नव्हेतर तीच मंडळी जबाबदार आहेत. कारण त्यांना आंदोलनाची व्याप्ती किंवा दिशा अजून ठरवता आलेली नाही. वास्तविक हे उपोषण केजरिवाल व त्यांचे अन्य सहकारी करणार होते. मग त्यात अण्णांनी उडी घेतली. याचा अर्थच काही जमेना तेव्हा या लोकांनी त्यात अण्णांना पणाला लावले. मग आपल्याला सरकार वा पोलिस कसे जबरदस्तीने इस्पितळात भरती करणार ,याच्या बातम्या केजरीवालच देत होते. ते त्यांचा धीर सुटल्याचे लक्षण होते. मग त्यांची खिल्ली माध्यमांनी उडवली, तर दोष माध्यमांना देता येणार नाही. मुळातच अण्णा टीमने माध्यमांच्या आहारी जाण्याचे कारण काय? त्यांचे आंदोलन मुद्द्याचे असेल तर माध्यमे प्रसिद्धी देवोत किंवा न देवोत, त्याने आंदोलकांना काय फ़रक पडतो? उद्दीष्ट महत्वाचे. गर्दी नव्हेतर उद्दीष्ट महत्वाचे असते, हे गांधींचे नाव घेणार्यांना कोणी सांगायचे? महात्माजी म्हणतात, उद्दीष्ट नक्की करा, मग साधने आपोआप जमा होतात. पण मुंबईच्या उपोषणापासून मी बघतो आहे, की अण्णा टीम उद्दीष्ट विसरून साधने जोडण्यात अधिक गर्क असते. तिथेच त्यांच्या अपयशाची कारणे सामावलेली आहेत. मात्र म्हणून त्यांनी जो प्रयत्न केला त्याचे फ़लित मी नाकारणार नाही. लोकांना ते अपयश आवडलेले नाही. आणि लोकांचे त्याबद्दलचे दु:ख वा लोकांच्या मनातली ती बोच, हेच त्यातले एक यश आहे. कारण ज्यांना जंतरमंतर फ़सल्याचे दु:ख झाले आहे; त्यांना त्यांना सरकारचा अधिकच राग आलेला आहे. आणि कुठल्याही आंदोलनात तेच तर मुख्य साध्य असते. कारण लोकशाहीत असा नाराज वर्गच शेवटी मतदार असतो. आणि त्याच्याच कृपेने सत्ताधार्यांना सता मिळत असते. तो हातातून सुटेल याची भिती सत्ताधार्यांना भयभीत करत असते. म्हणून तर रामलिला मैदानावरून संसदेकडे निघालेल्या रामदेव यांच्या शांत समर्थकांना अटक केली जाते. पण आझाद मैदान परिसरात प्रचंड हिंसक दंगा करणार्याना, रमझानचा सण चालू असल्याने हात लावायची हिंमत सरकारला होत नाही. असे का?
त्यातच सगळे राजकारण दडलेले आहे. ज्यांनी मुंबईच्या आझाद मैदान भागात दंगल केली ते मुस्लिम आहेत आणि ते एकगठ्ठा मतदान करतात. ज्या पक्षाच्या विरोधात त्यांचे धार्मिक नेते फ़तवा काढतील; त्याच्या विरोधात सरसकट मतदान करतात. त्यामुळे मुस्लिमांचा रोष म्हणजे किमान आठदहा टक्के मते इकडची तिकडे होणे असते आणि त्याने विजयाचे पारडे पराजयाकडे झुकू शकत असते. म्हणुनच तिथे सरकार संयम पाळते. ते मुस्लिमांविषयी आस्था आहे म्हणून नव्हेतर मतांचे ते राजकारण आहे. हिंदूधर्मियांचा जगतगुरू म्हटल्या जाणार्या शंकराचार्याला पकडताना इथला कायदा किंवा पोलिस डरत नाहीत. पण रझा अकादमीच्या गुंडांनी धुडगुस घातला जाळपोळ केली, तर गुन्हा दिसणारा गुन्हा असूनही त्याला हात लावताना इथल्या कायद्याचे पाय डगमगतात. त्याचे कारण काय? मुस्लिम मते धर्मगुरूच्या फ़तव्यानुसार इकडची तिकडे होऊ शकतात. तसे हिंदू मतदार कुणा धर्ममार्तंडाच्या आदेशानुसार मत देण्याचा धोका नसतो. शिवाय हिंदू धर्ममार्तंड कधी त्या निवडणूकीच्या भानगडीत पडत नाहीत. म्हणुनच हिंदूंच्या धार्मिक भावनांची सरकारला भिती वाटत नाही. तेव्हा मुद्दा इतकाच, की सरकार किंवा सत्ताधारी जे असतात वा सत्ताधारी होऊ इच्छित असतात, त्याना धर्म किंवा तत्वज्ञानाशी कर्तव्य नसते, त्यांना निवडणूकीत पडणार्या मतांशी कर्तव्य असते. त्या मतांना अण्णा किंवा रामदेव किती धक्का लावू शकतील, यानुसारच सरकार झुकत असते किंवा झुकते माप देत असते. आणि त्याच निकषावर दोन्ही आंदोलानांच्या फ़लनिष्पत्तीचे निदान करणे आवश्यक आहे.
जंतरमंतरचे अण्णा टिमचे उपोषण आणि रामलिला मैदानावरील रामदेव समर्थकांचे धरणे; यांनी काय मिळवले किंवा साधले याचा हिशोब त्याच पद्धतीने करायला हवा. अण्णा टीमने नवा राजकीय पर्याय देण्याचा पवित्रा घेऊन आपले आंदोलन आवरले. काही मान्यवरांनी त्यांना तसे आवाहन केले आणि ते मान्य करीत अण्णा टीमने विषय संपवला. पण रामदेव यांची कहाणी वेगळी आहे. त्यांनी आपल्या आंदोलनाला थेट सत्ताधारी कॉग्रेस पक्षाच्या विरोधात आणुन उभे केले आहे. मात्र त्यांनी नवा राजकीय पक्ष किंवा पर्याय देण्याची भाषा केलेली नाही. तर आज जे कोणी सरकार विरोधी राजकारणात आहेत; त्यांना आपल्या सोबत आणण्यात रामदेव यशस्वी झाले आहेत. गेल्या वर्षी रामलिला मैदानावरील त्यांच्या आंदोलनावर सरकारने लाठ्य़ा उगारल्यापासून रामदेव यांनी आपला कॉग्रेस विरोध उघडपणे मांडण्याचा पवित्रा घेतलेला होता. किमान तो लपवण्याचा प्रयास केला नाही. यावेळच्या आंदोलनात त्यांनी उघडपणे कॉग्रेस म्हणजेच कालाधन किंवा भ्रष्टाचार इथपर्यंत मजल मारली आहे. आणि त्यात त्यांनी बिगर कॉग्रेस पक्षांना आपल्या व्यासपीठावर एकत्र आणण्यात यश मिळवले आहे. त्याला यश म्हणायचे की अपयश म्हणायचे?
कॉग्रेसचे दिग्विजय सिंग तोंडाळ नेते आहेत आणि त्यांनी हा सगळा संघाचा व भाजपाचा डाव असल्याचा जुनाच आरोप केला आहे. माध्यमांनी त्याचीच री ओढावी यातच माध्यमांच्या अकलेचे प्रदर्शन होते. कारण अण्णा आणि रामदेव यांना एकाच तागडीने मोजता येत नाही. त्यांच्या आंदोलनाचे विषय समान असले तरी दोघांच्या ताकदीमध्ये व आवाहनामध्ये जमीन अस्मानाचा फ़रक आहे. अण्णांचे आवाहन निवडणूकीत फ़रक पाडू शकत नाही. पण रामदेवांचे आवाहन मोठाच फ़रक पाडू शकते. त्याची प्रायोगिक झलक गोव्यात नुकतीच मिळालेली आहे. उत्तरप्रदेश बरोबर ज्या विधानसभा निवडणूका झाल्या, त्यातच गोवा या छोट्या राज्य विधानसभेची निवडणूक झाली. त्यात भाजपाने इतिहास घडवला. त्याचे श्रेय कोणी कधी रामदेव यांना दिले नसले, तरी तो माणूस ऐन मतदानाच्या कालखंडात तिथे ठाण मांडून बसला होता. योग शिबीरे घेऊन त्यात त्यांनी कॉग्रेस विरोधी प्रचाराची धमाल उडवून दिली होती. रामदेव यांच्या शिबीरात सर्वधर्मिय मोठ्या संख्येते हजेरी लावतात. तेवढेच नाही तर त्यांच्या भक्तीला लागतात. त्यामुळेच मतांवर त्यांचा किती प्रभाव पडतो; त्याची चुणूक गोव्यात मिळाली आहे. कारण दि्र्धकाळानंतर तिथे प्रथमच भाजपाला स्वत:चे बहुमत मिळाले आहे. पण त्या बहुमताचे वैशिष्ट्य असे, की भाजपाचे उमेदवार म्हणून चार कॅथलिक ख्रिश्चन निवडून आले आहेत. त्यांपैकी एकाला मंत्रीपदही देण्यात आले आहे. हे कसे घडते याचा बारकाईने अभ्यास केला; तरच रामदेव मतांचे पारडे कसे झुकवू शकतात, त्याचा थोडाफ़ार अंदाज येऊ शकतो. अटीतटीच्या लढाईत किरकोळ मतेही पारडे फ़िरवत असतात. एकदोन टक्क्यांनीही चमत्कार घडतो. 1984 साली राजीव गांधींच्या कॉग्रेसला पन्नास टक्क्यांपेक्षा किंचित कमी मते पडली होती. पण लोकसभेत त्यांनी 78 टक्के जागा जिंकल्या होत्या. 1998 सालात कॉग्रेसची मते भाजपापेक्षा थोडी जास्तच होती, पण जागा भाजपापेक्षा कमी मिळाल्या होत्या. असे निवडणूकीचे गणीत चमत्कारिक असते. आतासुद्धा बघा. तीन वर्षापुर्वी 2009 सालात झालेल्या निवडणुकीत दोन पक्षात दहा टक्के मतांचा फ़रक आहे पण जागांमध्ये मात्र दुपटीचा फ़रक आहे. तिथेच मोठा फ़रक असतो. तो फ़रक जो पाडू शकतो, तोच निवडणू्क निकालांना कलाटणी देऊ शकतो. ते गणित कळले वा समजून घेतले, तर रामदेव बाबा काय चमत्कार घडवू शकतील त्याचा अंदाज येऊ शकेल.
2009 च्या निकालाचे आकडे बघा. कॉग्रेसला मिळालेली मते 28 टक्के तर भाजपाला मिळालेली मरे 18 टक्के होती. नेमक्या आकड्यात सांगायचे तर कॉग्रेसला 11 कोटी 91 लाख मते मिळाली. भाजपाला 7 कोटी 84लाख मते पडली. एकूण 41 कोटी 71 लाख लोकांनी केलेल्या मतातील मिळालेली ही मते आहेत. साधारण 70 कोटी मतदारांपैकी 42 कोटी मतदान झाले; म्हणजे 60 टक्केपेक्षा कमी मतदान झालेले आहे. यातला जो 40 टक्के म्हणजे 28 कोटी मतदार उदासिन आहे, त्यातला किती मतदानासाठी बाहेर काढला जातॊ त्यावर निकाल किती बदलू शकतात? किंवा जे मतदान होते, त्यात प्रभाव पाडणारा कोणी राजकारणबाह्य घटक असेल तर किती फ़रक पडू शकतो? मुस्लिम मौलवी किंवा इमाम जे करतात, तसाच फ़रक रामदेव पाडू शकतील का? सतरा टक्के मुस्लिम मतांपैकी आठदहा टक्के मुस्लिम मतदान करतात, ते अशा फ़तव्यामुळे एकगठ्ठा मतदान करतात, त्यातून ते निकालाचे पारडे झुकवत असतात. म्हणूनच भारतातले सर्वच पक्ष मुस्लिम भावनांना जपत असतात. ते आजवर हिंदूंच्या बाबतीत झालेले नाही. पण योगसामर्थ्याने रामदेव यांनी धर्मापलिकडचा प्रभाव हिंदूंसह अन्य धर्मियांवर निर्माण केला आहे. तो निवडणूकीत वापरायचे ठरवले तर मोठाच चमत्कार घडू शकतो. कुणा राजकीय अभ्यासकाला माझे हे मत किंवा निष्कर्ष हास्यास्पद वाटेल. कारण त्यांना रामदेवाची भगवी वस्त्रे तेवढी दिसत आहेत. पण त्याचे योगाने निर्माण केलेले स्थान बघता आलेले नाही. ते समजून घेतले तर त्याचा मतांवर पडू शकणारा प्रभाव समजू शकेल. त्याचे आवाहन धर्माचे नाही तर चिंतामुक्त, भ्रष्टाचारमुक्त, महागाईमुक्त, व काळापैसामुक्त राज्याचे आहे. आणि त्याला प्रतिसाद देणारा वर्ग त्याने वेळोवे्ळी समोर आणलेला आहे. तो वर्ग बाबाच्या आवाहनानुसार मतदानाला बाहेर पडू शकतो का?
हा बाबा जिल्हा तालुक्याच्या गावात आठवडाभर भल्या पहाटे योगाची शिबीरे भरवतो, त्यासाठी पदरमोड करून लोक हजारांनी गर्दी करतात. नुसते पैसेच मोजत नाहीत तर अवेळी पहाटे उठून तिकडे हजेरी लावतात. त्यांची बाबावरील निष्ठाच त्यातून समोर येत नाही का? त्याच जोरावर त्यांनी आठवडाभर लाखभर लोकांना रामलिला मैदानावर आणून बसवले होते. ज्या निष्ठेने एवढे लोक तिकडे जमा होतात, त्याच्या शेकडोपटीने लोक जिल्हा तालुका पातळीवर बाबाला मतदानाचा प्रतिसाद द्यायला बाहेर पडू शकतात ना? ते काम योगशिबीरापेक्षा खुपच सोपे व कमी त्रासदायक आहे. सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या वेळेत जाऊन बाबा म्हणतील त्या उमेदवार किंवा पक्षाला मत द्यायचे आहे. असे किती मतदार असू शकतात? कुणा राजकीय विश्लेषकांनी विचार तरी केला आहे काय? मागल्या दहापंधरा वर्षात या बाबाने किमान हजारापेक्षा अधिक योग शिबीरातून दहापंधरा कोटी लोकांना प्रभावित केले आहे. त्यातले निम्मे तरी त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यास मतदानाला निष्ठापुर्वक बाहेर पडले, तर त्यांची संख्या पाचसहा कोटींच्या घरात जाऊन पोहोचते. त्यामुळे 42 कोटी ऐवजी एकुण मतदान 50 कोटींच्या घरात जाऊन पोहोचू शकते. किंवा जे मतदान आहे त्यातलेच तो पाचसात कोटी मतदार त्याला हवे तिकडे फ़िरवू शकतो. त्यामुळेच आजवरचे जे निवडणूकीचे समिकरण आहे, ते पुर्णपणे विस्कटून टाकायची कुवत त्याच्या आवाहनामध्ये आहे. आणि त्या बाबाने आपला कल रामलिला मैदानावरचे उपोषण आवरताना दाखवून दिला आहे.
कालाधन वापस लाना है, कॉग्रेसको हराना है; लोकतंत्र बचाना है, कॉग्रेसको हराना है, याच रामदेव यांनी समारोप केलेल्या मेळाव्याच्या घोषणा होत्या. त्याचा अर्थच साफ़ आहे, की आजवर ज्यांनी मुस्लिम एकगठ्ठा मतांचे राजकीय हिशोब मांडले आहेत; त्यांना आता रामदेव बाबाच्या योगाने प्रभावित झालेल्या एकगठ्ठा मतांचा विचार करावाच लागणार आहे. त्यात अण्णा टीमच्या आंदोलनाप्रमाणे बेबनाव निर्माण करता येणार नाही. कारण रामदेव यांचे आंदोलन हे लोकशाही पद्धतीने विचारविनिमय करून चालत नाही, की आयोजीत केले जात नाही. त्याची धोरणे समिती बसून चर्चेनंतर निश्चित करत नाही. तिथे कुठली टीम वगैरे नाही. बाबा वाक्यम प्रमाणम अशी स्थिती आहे. शिवाय त्या बाबाला सेक्युलर वगैरे मुखवटा लावायची गरज भासलेली नाही. त्यामुळेच त्याच्यावर संघपरिवाराचे आरोप करून उपयोग नाही. त्यांनी थेट गुजरातमध्ये जाऊन नरेंद्र मोदी यांच्यासह व्यासपीठावर बसून मोदींचा गौरवही केला आहे. त्यामुळे त्यानंतर लगेच दिल्लीत रामलिला मैदानावर झालेल्या उपोषणाच्या गर्दीत कुठला फ़रक पडू शकला नाही. आणि सर्व विरोधी पक्षांना व्यासपीठावर घेताना बाबांना कुठलीही अडचणही आलेली नाही. दिग्विजय सिंग किंवा अन्य कोणाचे संघसंबंधाचे आरोप बाबावर निरूपयोगी ठरले आहेत. थोडक्यात मुस्लिम मतांच्या एकगठ्ठा प्रभावाला शह देणारा दुसरा मतांचा गठ्ठा रामदेव यांनी तयार केला आहे. आणि त्यांनी मोदी यांचा खुल्या भाषेत सन्मान करून आपला भावी उमेदवार कोण तेही सुचित केले आहे. मात्र मोदींचे नाव आताच घेतलेले नाही.
रामदेव बाबांनी आपले वजन नरेंद्र मोदी यांच्या पारड्यात टाकले तर त्याचा अर्थ पा्चसहा कोटी मते असा होतो आणि त्याचाच दुसरा अर्थ मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा 30 टक्क्यांच्या पलिकडे जाणे असा होतो. आधीच उद्योगपतींनी मोदींच्या पारड्यात वजन टाकले आहे. मतचाचण्यांमध्ये मोदींनी मनमोहन सिंग यांना मागे टाकले आहे. त्यात पुन्हा रामदेव बाबांच्या पाठींब्याचे वजन पडले तर 2014 सालच्या निवडणुकांचे निकाल काय लागू शकतात? भाजपाकडे आहेत त्या जागा टिकवू शकेल असा नेता दुसरा कोणी नाही. पण असेल तर तो मोदीच आहे. पण त्यामुळे नितीश वा अन्य कुणी मित्रपक्ष विचलित होऊन बाजूला झाले, तर त्यांच्याशिवाय बाजी मारायला लागणारी मते द्यायला रामदेव बाबा पुढे येऊ शकतो. नव्हे त्यांनी तसा कल दाखवलाच आहे. अण्णा टीम आणि रामदेव यांच्यातला हाच मोठा फ़रक आहे. अण्णा टीमसमोर राजकीय पर्याय सोडा हेतूही स्पष्ट नाही की आपला चेहरा वा आपला मतदारही स्पष्ट नाही. तर रामदेव यांच्याकडे मोदी नावाचा चेहरा आहे. योगनिष्ठ मतदार ठरलेला आहे आणि कॉग्रेसला पराभूत करण्याचा राजकीय हेतूही स्पष्ट आहे. त्यांच्या योगनिष्ठेमध्ये गुंतलेल्या व त्यासाठी बाबांच्या इच्छेला प्रमाण मानणार्या पाचसात कोटी मतदाराला हिशोबात घेऊनच त्याचे राजकीय परिणाम मोजता येऊ शकतात. पण त्यासाठी पक्षनिरपेक्ष चष्मा राजकीय विश्लेषकांना डोळ्य़ावर चढवावा लागेल. तरच हे सत्य डोळसपणे बघता येईल वा सांगता येईल.
( १९/८/१२) http://panchanaama.blogspot.in/