Home » Blog » एका संन्याशाच्या लंगोटीची गोष्ट

एका संन्याशाच्या लंगोटीची गोष्ट

पंचनामा : भाऊ तोरसेकर

क संन्याशी होता. संसारी जगाला व त्यातल्या कट्कटींना कंटाळून त्याने संन्यास घेतला होता. गाववस्तीपासून दुर रानात एकटाच जीवन कंठत होता. कसला संसार नाही, की कसल्या दगदगी नाहीत. थंडीवार्‍यापासून बचाव करणारी एक पर्णकुटी बांधून तिथेच वास्तव्य करीत होता. त्या रानात मिळतील ती फ़ळे कंदमुळे खाऊन गुजराण करत होता. जवळच्या एका तळ्यात अंघोळ करायची व तिथेच जाऊन पाणी प्यायचे. बाकी त्याला कशाची गरज नव्हती. जीवनावश्यक वस्तूही नव्हत्या त्याच्यापाशी. संसार म्हणायचा तर अवघ्या दोन लंगोट्य़ा. त्यातली एक अंगावर असे तर दुसरी अंघोळीनंतर धुवून वाळत घातलेली असे. तळ्यावर जाई तेव्हा त्याला संसारात गांजलेले लोक दिसत व त्यांची त्याला खुप दया येत असे. पण तेवढाच त्याला जनसंपर्क होता. जनसंपर्क म्हणजे संसारी जगाशी तेवढाच संबंध. त्या गावातल्या भोळ्याभाबड्या लोकांना इतके कष्टप्रद जीवन जगणार्‍या संन्याशाविषयी भितीयुक्त आदर होता. तो सिद्धपुरूष आहे की नुसताच गोसावडा आहे, अशी चर्चा दबल्या आवाजात चालत असे. पण कोणी त्याला तो कुठून त्या रानात आला किंवा कधीपासून संन्यास घेतला; असे पश्न विचारण्याचे धाडस केले नाही. कधी एखादी देवभोळी महिला किंवा पुरूष आडरानात जाऊन सणासुदीला घरच्या पक्वान्नाचे जेवणाचे ताट त्या संन्याशाला भक्तीभावाने देत असत. तेवढाच त्याचा संसारी जगाशी संबंध येत असे. संन्यास किती सोयीचा असतो ना? कसल्या म्हणून कटकटी नाहीत. असे गावातल्या संसारी लोकांना वाटत असे. पण म्हणून खरेच त्या संन्यासाला कुठलीच समस्या नव्हती का?

   त्याचे जीवन असे विनासायास चालु असताना एक बारीकशी समस्या त्याला भेडसावू लागली. गावातून कधीतरी येणारे पक्वान्नाचे जेवण खाऊन जे खरकटे तो संन्याशी जवळच फ़ेकून देत होता, त्याचा एक उकिरडा तिथे तयार होत गेला आणि त्यातल्या नासल्या कुजल्या अन्नाची विल्हेवाट लावण्याचे काम निसर्गाला करायची वेळ आली. अर्थात निसर्गाचे काम कुठला कायदा वा घटनेनुसार चालत नसते. त्याने सर्वच शक्यता व शंकांचे उपाय खुप आधीपासून काढून ठेवलेले असल्याने संन्याशाच्या समस्येचा उपाय आपोआप कार्यरत झाला. त्याने आपल्या पर्णकुटीच्या जवळपास जो उकिरडा निर्माण केला होता त्याची विल्हेवाट लावायला तिथे एका उंदराची नेमणूक झाली. म्हणजे तिथे वास काढत एक उंदिर येऊन थडकला. तिथेच एक बिळ जमीनीत पोखरून वास्तव्य करू लागला. आता  पोटपाण्याची सोय लागली आणि बिळाच्या रुपाने वास्तव्याला घर मिळाल्यावर त्या उंदराच्या जीवनात स्थैर्य आले होते. मग त्याने सुखी संसाराची स्वप्ने बघितली तर नवल कुठले? कारण त्याने संन्यास वगैरे घेतला नव्हता. संसार, संन्यास अशा मानवी संकल्पनांची बाधा त्याला झालेली नव्हती. त्यानेही एक सहचरी शोधून आणली आणि संन्याश्याच्या पर्णकुटीजवळच्या बिळात आपला संसार थाटला. लौकरच त्याच्या संसारात बहार आली आणि त्याचा त्रास बिचार्‍या संन्याशाला सुरू झाला.
   उंदराची पिल्ले बिळाच्या बाहेर पडून खेळूबागडू लागली. एकेदिवशी त्यांना एका नव्याच खेळण्याचा शोध लागला. त्यांना आसपासच्या रानातल्या नैसर्गिक वातावरणात न शोभणारी कापडी वस्तु दिसली आणि ती एका झुडूपावर लटकत होती, वार्‍याने उडत फ़डफ़डत होती. उंदराच्या पोरांसाठी ती नवीच वस्तू म्हणजे खेळणेच होते ना? त्यांनी आपला मोर्चा तिकडे वळवला आणि मग खेळून दमल्यावर असेल तिथेच ते कापड सोडुन बिळात विश्रांतीसा्ठी निघून गेली. हा ने्हमीचा प्रकार झाला. पण त्याचा त्या बिचार्‍या संन्याशाला मनस्ताप होऊ लागला. कारण रोज सकाळी आंघोळ केल्यावर वाळत घातलेली लंगोटी त्याला दुसर्‍या दिवशी सकाळी जागच्या जागी सापडेना. त्याने शेवटी दबा धरून शोध घेतला, तेव्हा त्याला जवळच उंदराने बिळ केल्याची व उंदिरच ही उचापत करीत असल्याचा शोध लागला. त्याचा बंदोबस्त कसा करावा ही त्याच्यासाठी समस्या तयार झाली. दिवसेदिवस त्या उंदरांच्या टोळीने उच्छादच मांडला आणि त्यांचा बंदोबस्त आवश्यक असल्याचे संन्याशाला जाणवले. त्याने गावातल्या जा्णकारांशी प्रथमच संपर्क साधून सल्ला घेतला तर त्याला खुप आश्चर्य वाटले. उपाय खुपच सोपा होता आणि आपल्यासारख्या तपस्व्याला तो का सुचला नाही, याचे त्या संन्याशाला वैषम्य वाटले.
   गावातल्या जाणत्यांनी त्याला एक मांजर पाळण्याचा सल्ला दिला. तेवढेच नाही तर त्याला एक मांजराचे पिल्लूसुद्धा भेट दिले. पण एकदोन दिवसापेक्षा अधिक काळ तिथे पर्णकुटीच्या परिसरात ते मांजर टिकेच ना. एकदोन दिवस झाले की मांजर गावात पळून जायचे. मग त्याला शोधत फ़िरायची वेळ संन्याशावर यायची. त्याचा तपोभंग होऊ लागला. पण जेवढा वेळ मांजर तिथे असायचे, तेवढा काळ उंदरांचा बंदोबस्त चांगला होत असे. पण हे मांजर टिकवायचे कसे? तेव्हा गावकर्‍यांनी सल्ला दिला, की मांजराच्या दूधाची व्यवस्था करायला हवी. त्यासाठी संन्याशाने म्हैस पाळणे आवश्यक होते. जागच्या जागी दूध मिळू लागले तर मांजर कशाला पर्णकुटी सोडून जाईल? संन्याशाला ती आयडीया पटली आणि गावकर्‍यांनीच त्याला एक चांगली दुभती म्हैस भेट देऊन टाकली. पण मांजराच्या दूधाची समस्या सुटली तरी म्हैस बांधायची कुठे आणि तिला चारायचे कधी; ही समस्या दोनच दिवसात समोर आली. तेव्हा पुन्हा संन्याशाला बुजूर्ग गावकर्‍यांचा सल्ला घ्यायची वेळ आली. त्यांनी त्यासाठी छान उपाय सुचवला आणि त्यातून सर्वच समस्या सुटून गेल्या. म्हशीचा संभाळ व दूध काढण्याचे काम करायला एक परित्यक्ता संन्याशाच्या वस्तीवर येऊन राहिल आणि त्या दोघांसाठी छोटीशी झोपडी गावकरी बांधून देतील असा तो उपाय होता. आठवड्याभरात तेही काम मार्गी लागले आणि उंदरांचा कायमचा बंदोबस्त होऊन गेला. आता संन्याशाची लंगोटी जागच्या जागी राहू लागली. उंदराची वर्दळ संपली. फ़ार कशाला संन्याशाला पाण्यासाठी तळ्याकडेही फ़िरकण्याची गरज उरली नाही. ती म्हशीचा संभा्ळ करण्यासाठी आलेली महिला पाणी भरत होती, स्वत:सा्ठी स्वयंपाक करताना संन्याशालाही दोन घास घालत होती. त्याच्या अंघोळीचे पाणी गरम करून देत होती. संन्याशाचे जीवन सुखात व्यतीत होऊ लागले होते. इतक्या आपुलकीने आपली सेवा करणार्‍या त्या महिलेबद्दल त्याच्या मनात स्नेहभाव निर्माण झाला नसता तरच नवल. आणि त्या स्नेहभावानेच तो संन्याशी कधी संसारी पुरूष होऊन गेला त्याचा त्याला किंवा गावकर्‍यांना पत्ता लागला नाही.
   एका पर्णकुटिच्या जागी चांगले शाकारलेले संसारी घर तिथे तयार झाले आणि तिथल्या अंगणातही मुले बागडू लागली. गावातल्या कुठल्याही घरात जशी भांडणे होतात व धिंगाणा होतो, तसाच तिथेही सुरू झाला आणि त्यात नवराबायकोच्या विसंवादाचाही भाग होताच. तपश्चर्या आणि संन्यास बाजूला पडला आणि कुठल्याही संसारी पुरूषाप्रमाणे तो संन्याशी गृहस्थ होऊन गेला होता. रोजच्या जीवनातील कटकटींना विटून गेला होता. ज्या महिलेविषयी स्नेहभावातून हे सर्व घडून आले, तिचा त्याला तिटकारा येऊ लागला. मग एकेदिवशी मोठेच भांडण जुंपले आणि ते ऐका्यला अवघा गाव गोळा झाला. तेव्हा संताप अनावर झालेला तो गृहस्थ आपल्या पत्नीला धमकी देत म्हणाला, “हे सर्व सोडून निघून जाईन, संन्यास घेईन.” तेव्हा मात्र तिचा उसळलेला राग कुठल्या कुठे गायब झाला आणि मनसोक्त हसत ती उत्तरली, “मग हा संसार कशातून उभा राहिला? त्या तुमच्या संन्यासातूनच तयार झाला ना? साधी लंगोटी संभाळता येत नाही आणि संन्यासाच्या गप्पा कुणाला सांगता?” आपल्या सहचारिणीचे हे बोल ऐकल्यावर त्या गृहस्थाचे सर्व अवसान गळाले. हे वेगळे सांगायची गरज आहे काय? सुरूवात कुठून झाली होती? एका लंगोटीपासून ना? एका लंगोटीला उंदरांच्या तावडीतून वाचवताना तो संन्यासी कधी संसारी पुरूष होऊन गेला, त्यालाच काय पण गावकर्‍यांनाही कळले नव्हते. आणि एवढे झाल्यावर त्याने त्यातून सुटण्याचा उपाय कोणता काढला, तर पुन्हा लंगोटी नेसून संन्यास घेण्याचा. एक इवली लंगोटी सुद्धा कशी मोहाच्या जाळ्यात ओढत जाते, त्याचा हा किस्सा कुठल्या गावात घडला असेल?
   या गोष्टीतली सत्यता तपासून बघण्याची गरज नाही. ती नेहमी आपल्या इर्दगिर्द घडत असते. जेव्हा आपण समस्या किंवा सत्य नाकारून त्यापासून पळ काढत असतो तेव्हा अधिक समस्या निर्माण करत असतो. एक साधी गोष्ट आहे. ज्याने या संसारी जगाकडे पाठ फ़िरवली होती, त्याला लंगोटीची तरी काय गरज होती? झाडपालासुद्धा अब्रू झाकायला पुरेसा असतो. पण त्यापेक्षा लंगोटी अधिक सोयीची असते. सोयीसुविधांचा मोह टाळण्याची मानसिकता संन्यासामध्ये अगत्याची असते. आपल्याला घोर तप करायचे आहे आणि त्यासाठी आपल्या देहाच्या विकारांवर मात करण्याचा निर्धार म्हणजे तपश्चर्या असते. त्यात एका लंगोटीला शरण जाणारा माणूस संन्याशी होऊ शकत नसतो. आणि संन्याशीच कशाला आपल्या सामान्य जीवनातही आपल्याला अनेक कठोर निर्णय घ्यावे लागत असतात. दोन किंवा अनेक गोष्टींमधून एकीची निवड करावी लागत असते. त्याला प्राधान्य म्हणतात. जनलोकपाल किंवा भ्रष्टाचाराचे कठोर निर्मुलन करू शकणारा लोकपाल कायदा, हेच अण्णा टीमचे प्राधान्य आहे काय? असेल तर त्यांनी त्यासाठी कुठलीही तडजोड करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आरपारची लढाई होते, तेव्हा आपले कोण व परके कोण याचे निश्चितपणे ठरवणे भाग असते. पहिल्या दिवसापासून ही लढाई राजकीय होती आणि सताधारी कॉग्रेस पक्षाने ती राजकीय लढाई म्हणुनच लढवली होती. पण अण्णा त्याला राजकीय लढाई नाही म्हणून लढायचा हट्ट करत बसले. ही अण्णांची चुक होती. कॉगेसने पहिल्या दिवसापासून अण्णा टीमच्या विरोधात राजकीय अपप्रचार चालू केला होता, अण्णांच्या मागून राजकारण खेळले जात आहे असे एकटी कॉग्रेसच म्हणत होती. म्हणजेच कॉग्रेसने अण्णांवर चढवलेला प्रतिहल्ला राजकीय होता. त्याला अण्णांनी राजकीय प्रतिकार किंवा प्रत्युत्तर देण्याचे टाळले, ही गंभीर चुक होती. कारण त्या लढाईत अण्णांच्या बाजूने जे कोणी राजकारणी उभे रहातील, त्यांनाही अण्णा जवळ करू शकले नाहीत. किंबहूना त्यांना अण्णांपासून दुर करण्यात व अण्णांना एकाकी पाडण्यात कॉग्रेस यशस्वी झाली. त्यानंतर अण्णा टीमला जाग आली आहे व त्यांनी राजकीय पर्यायाची भाषा वापरली आहे.
   राजकीय पर्याय म्हणजे काय? अण्णा टीम आपला स्वत:चा राजकीय पक्ष काढणार आहे काय? त्याच्यातर्फ़े उमेदवार रिंगणात उतरवणार आहे काय? त्यासाठी पक्ष म्हणून जी भूमिकेची एकवाक्यता आवश्यक असते ते आजच्या अण्णा टीममध्ये आहे काय? लोकपाल विधेयकासाठी एकत्र आलेल्या विविध राजकीय भूमिकांच्या संस्था संघटनांच्या नेत्यांची एक अस्थायी हंगामी समिती; असेच आजच्या अण्णा टीमचे स्वरुप आहे. त्यात नक्षलवाद, जिहाद किंवा राष्ट्रवाद अशा अनेक मुलभूत मुद्द्यावर त्यांचे तीव्र मतभेद आहेत. साध्या लोकपाल विषयावर चालू असलेल्या लढ्यात कोणाला बरोबर घ्यायचे, याबद्दल त्या टीममध्ये अनेक मतभेद आहेत. अशा टीमकडून राजकीय पक्ष चालवणे किंवा त्याला नेतृत्व देणे शक्य आहे काय? त्याचे उत्तर फ़क्त नकारात्मक आहे. म्हणुनच नवा राजकीय पर्याय ही बाब बोलणे सोपे असले तरी तिला वास्तविक आकार देणे पराकोटीचे अशक्य आहे. आधी टीम म्हणवून घेतात, त्यांच्यात राजकीय विषयावर एकवाक्यता निर्माण करावी लागेल. संघटनात्मक स्वरुप ठरवावे लागेल. त्यासाठी पक्षशिस्त नावाचे स्वयंनिर्बंध लावुन घ्यावे लागतील. यातली एकही गोष्ट आजच्या अण्णा टीमच्या आवाक्यातली नाही. म्हणुनच कॉग्रेसने पहिल्या दिवसापासून राजकारणात येण्याचे आमंत्रण अण्णा टीमला दिलेले आहे. आणि त्याच सापळ्यात अण्णा टीम आज फ़सली आहे. कारण त्यातल्या एकालाही राजकारण कशाशी खातात, त्याचा काडीमात्र अनुभव नाही. शिवाय एका लोकपाल किंवा भ्रष्टाचार निर्मुलनासाठी राजकीय पर्याय असू शकत नाही. राजकारण समाजाचे सर्वव्यापी नियंत्रण करत असते. म्हणुनच राजकारण करणार्‍याला समाजजीवनाच्या सर्वच अंगाविषयी आपली स्वतंत्र भूमिका असावी लागते. ती असते त्याला राजकीय पक्ष किंवा राजकीय पर्याय म्हणतात. मग त्यात राष्ट्रवादी, सेक्युलर, समाजवादी, जातियवादी असे भेदाभेद पडतात. अण्णा टीमची त्यातली भूमिका नेमकी काय आहे?
म्हणजेच निवडणूक ही नुसते उमेदवार उभे करून लढता येत नाही तर व्यापक भूमिकेतून लढवावी लागते. अण्णा आज कॉग्रेस विरोधी आहेत, तसाच भाजपा किंवा डावी आघाडी कॉग्रेस विरोधातच आहे. पण ते दोघे आपल्या राजकीय भूमिकेमुळे एकत्र येत नाहीत. त्याचाच फ़ायदा कॉग्रेसला मिळत असतो. उद्या नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या राजकारणा उडी घेतली आणि त्यांनी सत्ता हाती आल्यास अण्णा टीमला हवा तसा लोकपाल कायदा बनवण्याचे वचन दिले तर काय? ते सेक्युलर नाहीत म्हणून अण्णा टीम मोदीच्या विरोधात उभी रहाणार आहे काय? म्हणजेच मोदींसह लोकपाल किंवा भ्रष्ट कॉग्रेससह सेक्युलर राजकारण यातून निर्णायक निवड करावी लागणार आहे. त्यात अण्णा टीम कुठला पर्याय निवडणार आहे? निदान ज्याप्रकारे राजकीय बिछायत आज समोर दिसते आहे; त्यात भ्रष्टाचारासह सेक्युलर राजकारण किंवा विकासाचे मोदीप्रणीत हिंदुत्ववादी राजकारण असेच पर्याय पुढल्या लोकसभा निवडणूकीत लोकांसमोर असणार आहेत. अण्णा टीमला त्यातून एकाच्या बाजूने कौल देणे अपरिहार्य ठरणार आहे. इथले थोडे आणि तिथले थोडे अशी निवड करायची सोयच नाही. जंतरमंतरच्या एप्रिल २०११ पहिल्या उपोषणानंतर अण्णांनी उघडपणे मोदीचे विकासासाठी कौतुक केले होते. तेव्हा त्यांच्याच सेक्युलर समर्थकांनी त्यांच्यावर आक्षेप घेतले होते. आजही अण्णांशी सहकार्य करायला रामदेव बाबा पुढे आल्यावर अण्णा टीमच्या अनेकांना पोटदुखी होते. यातून अण्णा कशी वाट काढणार आहेत? राजकीय पर्याय पत्रकार वा कॅमेरासमोर बोलताना सोपा वाटतो, तेवढा सोपा विषय नाही. नवा पक्ष काढणे तर अशक्यच आहे. म्हणजेच आहेत त्या उपलब्ध मालातुनच निवड करणे भाग आहे.
   पण अण्णा टीमची स्थिती पहिल्या दिवसापासून त्या संन्याशासारखी गोंधळलेली आहे. त्यांना आपले प्राधान्य ठरवता आलेले नाही. कुठल्याही किंमतीत लोकपाल अशी ठाम भूमिका असती तर आजपर्यंत मोठा पल्ला गाठता आला असता. जे लहानमोठे पक्ष प्रचलित राजकारणात आहेत, त्यांच्या मदतीने पुढे घोडे दामटता अले असते. पण आपण राजकारणी नाही वा सेक्युलर आहोत, असे भासवण्याच्या नादात अण्णा टीम कॉग्रेसने लावलेल्या सापळ्यात फ़सली आहे. “होय, लोकपाल मोदी आणणार असतील तर आम्ही त्यांनाही पाठींबा देऊ” इतकी ठाम भूमिका अण्णा टीम घेऊ शकते का? जो कोणी लोकपाल देईल त्याच्या राजकिय भूमिकेशी आम्हाला कर्तव्य नाही, इतके प्राधान्य अण्णा टीम देऊ शकते का? त्याला राजकीय पर्याय म्हणतात. मगच लोकांना स्पष्टपणे मतदान करताना पर्याय मिळू शकतील. लोकपाल हवा असेल व भ्रष्टाचार निपटून काढणारा पर्याय हवा असेल; तर लोकांना एकाच पक्ष वा आघाडीच्या मागे ठामपणे उभे रहाता येईल. ज्यांना सेक्युलर भ्रष्टाचारापेक्षा लोकपाल महत्वाचा नाही असे वातत असेल त्यांना लोकपालवादी असतील त्यांच्य विरोधात ठामपणे उभे रहाता येईल. कारण आता कॉग्रेसनेच अण्णा टीमसमोर आणि सामान्य जनतेसमोर दोन राजकीय पर्याय ठेवले आहेत. भ्रष्टाचारासह सेक्युलर राजकार्ण किंवा सेक्युलर नसलेले पण स्वच्छ असू शकणारे विकासवादी राजकारण, असे ते दोन पर्याय आहेत. त्यापलिकडे अण्णा कुठला पर्याय देऊ शकणार आहेत? कारण अण्णांना वा त्यांच्या सहकार्‍यांना आपली निवड लोकांसमोर ठेवावी लागणार आहे.
   एका लंगोटीच्या संभाळासाठी त्या संन्याशाला जसा हळुहळू करत सगळा संसारच उभा करावा लागला आणि मग त्याच संसाराच्या कटकटीचा कंटाळा आल्यावर पुन्हा संन्यास घेण्याची वेळ आली, त्यातलाच हा प्रकार आहे. आपला राजकारणाशी संबंध नाही म्हणुन रस्त्यावरच्या पादचार्‍याला भागत नाही तिथे एक देशव्यापी कायदा बनवायला निघालेल्या अण्णा टीमला राजकारणापासून पळ काढता येईल काय? कसोटीच्या वेळी कुठल्या तरी बाजूने उभे रहावेच लागते. संन्यास वाटतो तेवढा सोपा नसतो. उलट संसारी जीवनापेक्षा तो अधिक कष्टप्रद असतो. संसारी जीवनात तुम्ही दुसर्‍या कोणाच्यातरी डोक्यावर खापर तरी फ़ोडू शकता असता. संन्यासी जीवनात सगळेच गुणदोष आपले म्हणुन निमूट स्विकारावे लागत असतात. आत्मपरिक्षण व आत्मचिंतन अपरिहार्य असते. तोच आव आणणार्‍या अण्णा टीमने राजकीय पर्यायाची वेळ त्यांच्यावर का आली त्याचे आत्मपरिक्षण करावे. त्यासाठी त्या संन्याशाचा अनुभव मार्गदर्शक ठरू शकेल.
(५/८/१२)  http://panchanaama.blogspot.in/
Posted by : | on : 6 Aug 2012
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *