सडेतोड : अरुण रामतीर्थकर
दर रविवारी दूरदर्शनवर आणि आणखी ४-५ वाहिन्यांवर आमीर खानचा ‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम गेले काही आठवडे चालू आहे. एकाच दिवशी अनेक वाहिन्यांवर होणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे. तो कमी म्हणून की काय दोन रविवारदरम्यान या आमीर खानच्या मुलाखतीही चालू असतात. वृत्तपत्रांनी हा कार्यक्रम उचलून धरला. अर्थात रामायण, महाभारत या मालिकांना मिळालेल्या लोकप्रियतेची सर कोणालाच येणार नाही. सत्यमेव जयते चालू कार्यक्रमात अधिक प्रेक्षकप्रिय ठरला ही गोष्ट मान्य.
गेल्या रविवारचा म्हणजे ८ जुलैचा त्याचा कार्यक्रम एक गोष्ट सिद्ध करतो की, आता हा खानही माय नेम इज खान म्हणायला लागला आहे. या पूर्वीच्या भागात बिनडोकपणा होता, पण ही छटा नव्हती. आता प्रेक्षकप्रियता लाभल्यावर तो आपली नखे बाहेर काढत आहे. यापूर्वी वैद्यकीय व्यवसायावर एक भाग झाला. या व्यवसायातील दुष्प्रवृत्ती दाखवल्या गेल्या. त्याचवेळी जेनेटिक औषधांचा वापर हाही विषय आला. मी खरेच एकही भाग पाहिला नाही. कारण, मागे एका खानाने ‘पटी तो पटी नही तो राखी बांधी’ असे म्हणत रक्षाबंधनाचा घोर अपमान केला होता. दुसर्या खानने लघुशंका आणि चर्च यांचा संबंध जोडून ख्रिश्चनांच्या भावना दुखावल्या होत्या. स्वधर्मातील एखाद्या गोष्टीची टिंगल करण्याचे धाडस या खानापैकी एकातही नाही. मग पैसे खर्चून स्वधर्माची टिंगल बघायची कशाला? त्यामुळेच आमीर खानचा ‘सत्यमेव जयते’ म्हणजे केव्हा तरी हिंदू धर्मावर तो घसरणार हे गृहित होते. यास्तव ते पाहणेच टाळले. मात्र अन्य वारी कोणत्या वाहिनीवर काय आहे याचा धावता आढावा घेताना आमीर खानची मुलाखत दिसली. त्यावेळी जेनेटिक औषधांचा मुद्दा चालू होता.
महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी जेनेटिक औषधे सरकारी रुग्णालयात लगेच वापरायला प्रारंभ करू, असे जाहीर केले. त्याला १५ दिवस झाले. टी.व्ही. वर नुसतीच पाठ थोपटून घेण्याचा प्रकार झाला.
जेनेटिक म्हणजे बाजारातील औषधांचे मूलसूत्र. ते शोधून काढण्यासाठी औषध कंपन्या खूप खर्च करतात. मग त्याचे गोळ्या वा द्रव असे औषध होते. त्याला नाव दिले जाते. त्यावर कर बसतो. नफा लक्षात घेऊन ते बाजारात येते. अर्थातच ते मूलसूत्रापेक्षा महागच असते. याबाबत एका प्रख्यात डॉक्टरशी बोललो असता नवे मुद्दे मिळाले. औषध कंपन्या भरमसाट नफा कमवतात. त्यांना वेसण घालणे हा खरा उपाय आहे. जेनेटिक हा नाही. कारण आज प्रसिद्ध कंपन्याची औषधाच्या नावासारखे नाव आणि सारखे वेष्टन घेऊन बनावट औषधे बॉंबे मेडिसिन म्हणून सर्रास विकली जातात. पेटंट आहे, नाव आहे तरीही हा खोटेपणा होतो. जेनेटिक औषधांना तसे नावच नाही. ते मूलसूत्र आहे की नाही हे कळणार नाही. किंमत कमी नक्की असेल, पण बनावट मालाची शक्यता दसपट वाढेल. रुग्णांच्या जीवाशी खेळ होईल. तरी हा बिनडोक आमीर खान जेनेटिक औषधांचा आग्रह धरतो. एकाही राज्याने अजून जेेनेटिकचा वापर सुरू केला नाही. कारण त्यात धोके अधिक आहेत.
मला चीड आली ती ८ जुलैच्या भागामुळे. हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेवर हा भाग होता. जातीव्यवस्था नाही असे मी म्हणत नाही. अस्पृश्यता गुन्हा ठरवून, व्यवसाय स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार ठरवून आणि आरक्षणाद्वारे ती कमी होत आहे. अट्रॉसिटीही आहे. शहरी भागातून तरी ती कमी होत आहे. पूर्वी प्रत्येक हॉटेलात, ‘येथे धर्म, वंश, लिंग, जात’ यावरून कोणालाही प्रवेश नाकारला जाणार नाही अशा पाट्या असायच्या आता त्या पाट्या दिसतच नाहीत. शहरातील चित्र कालांतराने ग्रामीण भागातही दिसेल. ते दिसावे म्हणून पूर्वीही आणि आजही हिंदूच प्रयत्नशील आहेत. घेतलेल्या विषयाशी आमीर खान प्रामाणिक असता तर जातीभेद निर्मूलनासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेनेच्या प्रतिनिधींना बोलावले असते. ते शक्यच नव्हते. कारण जातीभेद नष्ट करू पाहाणार्यांनाच जातीयवादी म्हटले जाते आणि मुस्लिम, कॅथॉलिक यादव, ठाकूर, रजपूत, कुर्मी, मीणा, नायर, नाडर अशा जात पंथांना हाताशी धरून समाजात फूट पाडण्याचे राजकारण करतात तेच पुरोगामी आणि सेक्युलर ठरतात. आमीर खानला हेच माहिती होते. त्यामुळे त्याने असेच नग बोलावले. रात्री ९.३० ला फोन आला. आजचा एपीसोड जरूर पाहा असे एकाने कळवले म्हणून पाहिला. दलित न वाटणारी एक महिला दलित म्हणून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगत होती. पेहरावावरून तर ती शिक्षित आणि संपन्न वाटत होती. पाणी नाकारले असेल तर कायदेशीर कारवाई करता येते एवढे कळण्याजोगे तिचे शिक्षण नक्कीच असेल. एक दलित झाल्यावर एक ब्राह्मण आला. निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, दुर्दैव असे की, धर्माधिकारी सप्तर्षि, शास्त्री अशी आडनावे लावणारी मंडळीच धर्मबुडवी निघत आहेत.
या धर्माधिकारींनी ‘मी ब्राह्मण आहे, पण ब्राह्मण्य पाळत नाही’ असे सांगितले. मिलॉर्ड, तुम्ही काय पराक्रम केलात? तुमच्यासारखे किती ब्राह्मण आणि लिंगायत तरुण दाखवू? नुसतेच मटण नाही, १० नंबरचे मटण खातात. संकष्टी चतुर्थीलाही. बामणानी आणि वाण्यांनी आमचं मटण महाग केलं ही जुनी ओरड आहे. मिलॉर्ड तुम्ही ब्राह्मण्य सोडले म्हणजे काय पराक्रम केलात? ब्राह्मणाची कर्तव्ये आणि जबाबदार्या यांची ओळख तरी तुम्हाला आहे का? मिलॉर्ड हे वाक्य बोलले आणि हर्षवायू झाल्याप्रमाणे आमीर खानने टाळ्या वाजवल्या. तुमच्याप्रमाणे मीही नमाज पडणे सोडून दिले असे तो म्हणतो का याची मी वाट पाहिली. तो बोलला नाही आणि टी.व्ही. बंद केला.
हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेवर हिंदूंनी किंवा फार तर बौद्धांनी बोट ठेवावे. खानाला हा अधिकार कोणी दिला. दुसर्याच्या धर्मात डोकावताना आपल्या धर्मात तेच आहे हे आमीर खान लपवून ठेवतो. आमीर खानच्या धर्मात अश्रफ (उच्चकुलीन), अजलफ (क्षुद्र), अरजल (अतिक्षूद्र) अशी व्यवस्था आहे की नाही? हिंदू धर्मातच जातीव्यवस्था असेल तर अन्सारी, हजाम, दर्जी, बागवान, तांबोळी, अत्तार, कुरेशी, मण्यार, शिकलगार, फकीर, मुजावर अशा मुस्लिमातील २४ जाती ओबीसीत कशा? कोट्यात सबकोटा ठेवण्याची गरज एका राज्यसरकारला का वाटली? आमीर खान, राजेंद्र सच्चर, रंगनाथ मिश्रा यांचे अहवाल साफ खोटारडे आहेत असे तरी म्हण किंवा हिंदू धर्माप्रमाणे मुस्लिम धर्मातही जातीव्यवस्था आहे. मुस्लिमांचे सारे लाभ फक्त अश्रफ उपटत आहेत. अजलफ आणि अरजल यांना न्याय नाकारण्यात आला. त्यांची अवस्था निधर्मी राजवटीतही दुर्धर आहे. असे तरी कबूल कर. आमीर खान तू या पैकी काहीच करणार नाहीस. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. हिंदू धर्मावर टीका करायला धाडस लागत नाही. धर्माधिकारी बोलले, आमीरने टाळ्या पिटल्या. असे का बोलला असे धर्माधिकारींना कोणी विचारणार नाही. मात्र नमाज पडत नाही असे आमीर म्हणाला असता तर २४ तासही जिवंत राहिला नसता.
मुस्लिम धर्मातही जातीभेद आहेत. अजलफ आणि अरजल हे आरक्षणासाठी मोर्चे काढत आहेत. बौद्ध, शीख, पारशी, जैन या सर्वांना जितके दिले त्यापेक्षा चौपट अल्पसंख्य म्हणून मुस्लिमांना दिले तरी ही अवस्था. आमीर खान स्वतःच्या नाकाचा शेंबूड तसाच ठेवून दुसर्याच्या धर्मव्यवस्थेची चर्चा करतो. या आमीर खानचे असली स्वरूप उघड झाल्यावर त्याचा सत्यमेव जयते आणि चित्रपट याचे किती कौतुक करायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे.
रविवार, दि. १५ जुलै २०१२