पंचनामा : भाऊ तोरसेकर
गेल्या आठवड्यात दोन गोष्टी बातम्या म्हणून अशा आल्या, की त्यांची सांगड कशी घालावी तेच सामान्य माणसाला कळणार नाही. एक बातमी होती युरोपातल्या एका अदभूत विज्ञान प्रयोगाची. त्यात भूपृष्ठापासून कित्येक मैल खोल भुयारात एक स्फ़ोट घडवण्यात आला. त्यातून एक नवा परमाणु सापडला. त्याला शास्त्रज्ञांनी गॉड पार्टीकल म्हणजे देवकण असे नाव दिले आहे. अवघ्या जगाचीच नव्हेतर विश्वाची निर्मिती त्याच कणापासून झाली असावी, असा वैज्ञानिकांचा आजचा दावा आहे. मग बातम्या देणार्यांना काय हवे असते? त्यांनी साक्षात देवाचाच शोध लागल्याचे आपल्या वाचक, प्रेक्षकांना सांगून टाकले. कोणी देव अवतरला, असा दावा केला तर कोणी आता देव भिंतीपलीकडेच आसल्याच्या थाटात बातम्या दिल्या. नशीब म्हणायचे कोण्या वाहिनीने थेट देवाशीच संपर्क साधून त्याची प्रतिक्रिया घेतली नाही. सबसे तेज धावणार्या आपल्या देशातील उपग्रह वाहिन्यांच्या आजच्या जमान्यात देवालाही “आजचा सवाल” विचारण्याची हिंमत असलेले संपादक असल्यावर त्याच्या्पुढे विज्ञानाची काय बिशाद आहे? कायबीइन लोकमत वाहिनीवर मात्र इतर वाहिन्या कायबी सांगतात असा दावा करण्यात येत होता. त्याला वेगळेपण म्हणावे की वागळेपण म्हणावे ते प्रेक्षकांनीच ठरवावे. दुसरी बातमी तशी सार्वत्रिक नव्हती. बराच काळ अडगळीत पडलेली ती बातमी फ़क्त कायबीइन लोकमतसाठी प्राईम टाईमची बातमी होती. अठरा वर्षे अडगळीत पडलेले अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक, अशी ती बातमी होती. त्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आश्वासन दिल्याने ते विधेयक याच अधिवेशनात संमत होईल, अशी आशा बाळगून वागळ्यांनी त्यावर आपला सवाल बेतलेला होता. पण त्यात भाग घेतलेल्यांनी नेहमीप्रमाणेच हमरातुमरी करण्यात धन्यता मानली.
माझ्या दृष्टीने दोन्ही बातम्यांवर सामान्य माणसाने चर्चा करण्यासारखे का्हीच नाही. कारण एक बातमी हा विज्ञानाचा गंभीर विषय आहे, तर दुसरी बातमी हा एका अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन दुसर्या अंधश्रद्धेचे निर्मुलन करू बघणार्या रिकामटेकड्यांचा पोरखेळ आहे. त्यात अर्थातच अंधश्रद्धा निर्मूलन पीठाचे शंकराचार्य डॉ. नरेंद्र दाभोळकर हजर होते. तो त्यांच्यासह वागळे इत्यादिंचा देवघेवीचा मामला असतो. दाभोळकरांनी आपल्या संस्थेच्या कार्यक्रमात वागळेंना बोलावून सत्कार करायचा आणि वागळ्यांनी अधूनमधून दाभोळकरांना कायबीइन लोकमतवर बोलावून परतफ़ेड करायची, असाच मामला असतो. कधी त्याला ग्रेट भेट म्हणायचे तर कधी त्याला सवाल नाव द्यायचे. पण माझ्यासारख्या चोखंद्ळ प्रेक्षकांसाठी ते उत्तम मनोरंजन असल्याने मी नेहमी असे कार्यक्रम अगत्याने बघत असतो. अंधश्रद्धा निर्मूलनात मनोरंजन कुठले, असे काही वाचकांना वाटु शकेल. तर त्याच्या शंकांचे निरसन करणे मला भाग आहे. शिवाय एका अंधश्रद्धेचे समर्थन करणारा दुसर्या अंधश्रद्धेचा विरोध करतो म्हणजे काय, असाही प्रश्न वाचकांना पडू शकतो. तेव्हा आधी त्याचाच खुलासा करणे भाग आहे.
जे विधेयक अंधश्रद्धा निर्मूलनाचे म्हटले जाते, ते प्रत्यक्षात जादूटोणा प्रतिबंधक विधेयक आहे असेही म्हटले जाते. पण त्यातल्या तरतुदींविषयी वादविवाद चालू होता. त्यात मग दाभोळकरांनी आपल्यालाच अवघे विज्ञान समजले आहे, असा आव आणत निरूपण करावे हे स्वाभाविकच होते. नवा कायदा कुठल्याही धर्मात ढवळाढवळ करणारा नसून तो अलौकिक शक्ती अंगी असल्याचा दावा करून भोळ्या लोकांची दिशाभूल करणार्यांच्या विरोधातला कायदा आहे; असाच दाभोळकरांचा निर्वाळा आहे. निदान त्यांनी कायबीइन लोकमतवर बोलताना तसेच वक्तव्य केले आहे. तेवढ्यावर ते थांबले असते तर माझी काहीही हरकत नव्हती. पण ज्या विधेयकासाठी ते कित्येक वर्षे झगडत आहेत, तेच विधेयक या अधिवेशनात हमखास संमत करून घेतो असे त्यांना अजितदादांनी आश्वासन दिल्याचे दाभोळकर सांगतात, त्याने मी थक्क झालो. त्यात थक्क होण्यासारखे काय आहे? तर दाभोळकर यांनी दादांवर दाखवलेला विश्वास मला थक्क करून गेला. दिलेले आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पाळतात, याचा कुठला पुरावा दाभोळकर सादर करू शकतील काय? राजकारणात आल्यापासून अजितदादांनी केलेली वक्तव्ये आणि विधाने कधी दाभोळकरांनी गंभीरपणे अभ्यासली आहेत काय? असतील तर अजितदादा जणू सत्ता हाती आली म्हणजे आपल्या हाती अलौकीक शक्तीच आल्याच्या थाटात वागत असतात, याचीच साक्ष मिळते. शिवाय तसा माझाच दावा नाही. दादांचे समर्थक व मंत्रालयातील अनेक जनसंपर्क अधिकारीही त्याचीच ग्वाही देतात. त्यांच्यापलीकडे दैनिक सकाळचे प्रमुख पत्रकार संजय मिस्कीन यांनीही अजितदादांच्या अंगी अलौकीक शक्ती असल्याचे दावे केलेले आहेत. त्याची रितसर व सविस्तर उलट तपासणी मी यापुर्वीच घेतली आहे. ज्या विज्ञानाचा नामजप दाभोळकर अहोरात्र करत असतात, त्याच्या आधारावर त्यांनी कधीतरी अजितदादांच्या त्या अलौकीक शक्तीची परिक्षा घेतली आहे काय? नसेल तर दादांच्या आश्वासनावर विसंबून दाभोळकर विधेयक संमत होण्याची आशा बाळगतात, हीच एक अंधश्रद्धा नाही काय?
गेली अठरा वर्षे हे विधेयक धुळ खात पडले आहे आणि जेव्हा जेव्हा ते विधीमंडळात मांडले गेले, तेव्हा त्याला विरोध करणार्यात कॉग्रेस व राष्ट्रवादीच्याच आमदारांचा पुढाकार होता, असेच हवाले दाभोळकरांनी दिले. मग आज कुठल्या विश्वासावर ते त्याच पक्षांच्या पाठिंब्याने विधेयक संमत होईल असा दावा करत आहेत? अजितदादांनी आश्वासन दिले म्हणजे विश्वास ठेवायचा काय? मग निर्मल बाबावर विश्वास ठेवणारे व दाभोळकर यांच्या नेमका कितीसा फ़रक उरला? हे विधेयक ज्या सरकारी पक्षाने आणले त्याचेच सदस्य त्याच्या विरोधात राहिले आहेत ना? मग दाभोळकरांच्या आजच्या विश्वासाचा आधार काय? निव्वल श्रद्धाच त्याचा आधार नाही काय? जेवढे भोळे लोक निर्मल बाबावर विश्वास ठेवतात, तेवढाच आंधळा विश्वास खुद्द दाभोळकरही अजितदादांवर ठेवत नाहीत काय? आणि असे दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलन मोहिमा चालवण्रार, हा विनोद नाही काय? आणि कायदा झाला म्हणजे अंधश्रद्धा संपते काय? कुठल्या कायद्याने आजवर काही करून दाखवले आहे? ज्यांच्यावर दाभोळकर इतकी अंधभक्ती दाखवतात, त्या अजितदादांच्या सरकार व शासनाने कोणत्या कायद्याचा अंमल करून दाखवला आहे? मग त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणे ही अंधश्रद्धाच नाही काय?
कालपरवाच मंत्रालयात आग लागली तेव्हा याच दादांनी काय केले? अग्नीशमन व आपत्ती निवारण यांचेही कायदे अस्तित्वात आहेत. म्हणून कुठली आपत्ती चुकली आहे? आपत्ती आल्यावर कुठ्ले निवारण झाले आहे? कधीही कुठेही बॉम्ब फ़ुटतात. कधीही पाकिस्तानतून हल्लेखोर येऊन कुणाही निष्पाप नागरिकाची हत्या करतात. यातल्या कुणाला हे सरकार वा कायदा संरक्षण देऊ शकला आहे? त्या कसाबने शेकडो लोकांची हत्या करून आता चार वर्षे उलटून गेली. त्याला कुठली शिक्षा होऊ शकली आहे? संसदेवर हल्ला करणारा अफ़जल गुरू तुरूंगात मजा मारतो आहे. त्याला कुठल्या कायद्याने शिक्षा होऊ शकली आहे? स्त्रीभ्रूणहत्येच्या विरोधी कायदा कित्येक वर्षे अंमलात आहे, मग डॉ. सुदाम मुंडे कोणत्या संरक्षणाखाली गर्भपात करत होता? कायद्याने सर्वकाही होते हीच मूळात अंधश्रद्धा नाही काय? तिकडे दिल्ली वा उत्तर भारतात तो निर्मल बाबा अशीच लोकांची फ़सवणूक करत असतो.
मुझे डोसा क्यू दिख रहा है? चटनी कौनसी थी? लाल चटनी क्यू नही थी? हरी चटनीने कृपा रोख रखी है. अशा थापा मारून तो बाबा लोकांची दिशाभूल करतो. मग अमूक कायदा झाला मग अंधश्रद्धा संपणार अशी भाकिते करणारा दाभोळकर बाबा वेगळे काय करतो आहे? त्याची कृपा कुठल्या चटनीने रोखून धरली आहे? की अजितदादांच्या अलौकीक शक्तीनेच अंधश्रद्धा निर्मूलन होईल, म्हणुन आता दाभोळकर बारामतीच्या बाबांना शरण गेले आहेत? ज्या देशात आज कायदा हीच एक अंधश्रद्धा झाली आहे, त्याच देशात अंधश्रद्धा निर्मूलनाचा वेगळा कायदा मागणे हीच एक अंधश्रद्धा नाही काय? अन्य लोकांनी आपल्या अलौकीक शक्ती वा दैवीशक्तीचे वैज्ञानिक पुरावे द्यावेत, अशी मागणी दाभोळकर करतात, तर त्यांनी अजितदादांकडे विधेयक संमत करून घेण्यासाठी कोणती अलौकीक शक्ती आहे, त्याची चाचपणी केली आहे काय? की त्यांना दादांच्या अलौकीक शक्तीचे दाखले संजय देशमुख वा जनसंपर्क अधिकार्याने वा सकाळचा पत्रकार संजय मिस्किन याने दिले आहेत?
मंत्रालयाला लागलेल्या आगीत अजितदादा मंत्रालयाचे सहा जिने अवघ्या एका मिनीटात उतरून तळमजल्यावर पोहोचले, असा दाखला मिस्कीन यांनी आपल्या वार्तापत्रातून दिला होता. दादांकडे विधेयक संमतीचा नवस करायला गेलेल्या दाभोळकरांनी निदान त्या देशमुख-मिस्किन यांच्याकडून तरी दादांच्या अलौकिक शक्तिचे पुरावे मागायला नको काय? आर. के. लक्ष्मण यांच्या WAGALE’S WORLD नामक पुस्तकाच्या आधारे ’वागलेकी दुनिया’ नामक एक टिव्ही मालिका प्रदर्शित झाली होती. तसे दाभोळकर हे कायबीइन लोकमत म्हणजे वागळेच्या दुनियेत वावरतात असतात काय? इतर बाबांकडे वैज्ञानिक पुरावे मागताना त्यांनी आधी देशमुख, मिस्किन वा अजितदादांकडे मंत्रालयाच्या आगीत केलेल्या दैवी चमत्काराचे पुरावे का मागितलेले नाहीत? आणि अजितदादाच कशाला? आपल्या देशात सर्वकाही दैवीशक्तीच्या भरवशावर तर चालू आहे. तिथे वैज्ञानिक व भौतिक शास्त्राच्या आधारे काय चालू आहे? पोलिसांची कारवाई असो, कायद्याचे राज्य असो किंवा आरोग्य केंद्रातील सेवा शस्त्रक्रिया असोत, सर्वकाही रामभरोसे नाही काय? कालपरवाच उत्तर भारतातील अनेक दवखाने व रुग्णालयात सामान्य वॉर्डबॉय किंवा डॉक्टरांचा ड्रायव्हरसुद्धा शस्त्रक्रिया करतानाची दृष्ये छोट्या पडद्यावर झळकली आहेत. तिथे गेलेल्या रुग्णांना काय अंधश्रद्ध म्हणायचे? ते बिचारे तर वैद्यकशास्त्राचे पदवीधर उपचार करणार म्हणूनच गेलेले होते. पण त्यांच्यावर ज्यांनी उपचार वा शस्त्रक्रिया केल्या ते सामान्य अनपढ होते. ही दिशाभूल कोणी केली? निर्मल बाबा तर तिथे आरोग्यव्यवस्था राबवत नाही ना? सरकारी दवाखाने, रुग्णालये म्हणजे खात्रीचे उपचार, अशी जी समजूत आहे तिला कायद्यावरची, शासनावरची श्रद्धा म्हणायचे की अंधश्रद्धा म्हणायचे?
ज्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची कलमे दाभोळकर वाचून दाखवत होते आणि त्याच आधारावर अर्धवटराव वागळे अन्य कुणा हिंदुत्ववाद्यांना विज्ञानाचे धडे देत होते, त्यात काय तपशील होता? व्यक्तीला शारिरीक इजा व अपाय होणारी कृती असेल तर तो गुन्हा मानला जावा. अशी श्रद्धा ही अंधश्रद्धा मानली जावी. मग ज्या इस्पितळाची दृष्ये वाहिन्या दोनतीन दिवस दाखवत होत्या. ती इजा करणारी होती, की दिशाभूल करणारी होती? त्यातला गुन्हेगार कोण? त्यातला गुन्हा कोणता? इजा करणारा उपाय निर्मल बाबाने सांगितलेला असो की एखाद्या आधूनिक इस्पितळात इजा करणारा उपाय असो. दोन्हीकडे रुग्णाची झालेली फ़सगत सारखीच असते ना? अशी जी अंधश्रद्धा बोकाळली आहे, तिचे काय? ज्या विज्ञानाचे दाभोळकरांना प्रचंड कौतूक आहे, त्यातून सामान्य माणसामध्ये ज्या अंधश्रद्धा पसरवल्या जात आहेत व त्याच्या आरोग्याला इजा पोहोचवल्या जात आहेत, त्याबाबतीत दाभोळकर कायम मौन धारण करता असतात. आज सार्वजनिक जीवन कमालीचे असुरक्षित झाले आहे, पण त्याचवेळी सरकार व प्रशासन मात्र जीवन सुरक्षित असल्याचे दावे राजरोस करत असतात. ती अंधश्रद्धाच नाही काय? तिचा बंदोबस्त कोणी कसा करायचा? काही महिन्यांपुर्वी मी मुद्दाम याच विषयावर लिहिताना डॉ. श्रीराम लागू औषधविषय अंधश्रद्धा पसरवणार्या जाहिराती करतात, यावर झोड उठवली होती. तेव्हा अनेक दाभोळकर भक्तांना संताप आला होता. पण नंतर त्याच विषयावर आमिरखान याने सत्यमेव जयतेमधून तोफ़ा डागल्या. आज वैद्यकीय पेशामध्ये जी रुग्णांची लूटमार चालते त्यावर आमिरने टिप्पणी केली होती. ती लूटमार करणारे कोण आहेत? ते कोणी वैदू वा बाबा भगत नाहीत. तर लोकांच्या ज्या वैज्ञानिक अंधश्रद्धा तयार करण्यात आलेल्या आहेत, त्याच्याच आधारे लोकांचे शोषण करणारे सुशिक्षित आहेत ना? मग त्याला पायबंद घालण्यात दाभोळकर मागे कशाला असतात?
कायदा सर्व गोष्टींचा बंदोबस्त करतो हीच मुळात अंधश्रद्धा बनवण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात औषध प्राधिकरणाने ठराविक औषधांच्या विक्रीसंबंधी कठोर कारवाईचा पवित्रा घेतला, तर औषध विक्रेत्यांनी संपाचा इशारा दिला होता. ती काय भानगड होती? १९४५ सालातला जो औषध कायदा आहे. त्यातल्या अटी झुगारून खुलेआम औषधांची विक्री चालते. तशी चालू देणार नाही, असा पवित्रा घेतला गेला. तोही सगळ्याच औषधांसाठी नव्हेतर गर्भपाताशी संबंधित औषधांपुरताच तो कठोर पवित्रा होता. तरी विक्रेत्यांनी संपाची धमकी दिली. म्हणजेच कायदा होऊ शकतो, पण त्याच्या काटेकोर अंमलबजावणीची अपेक्षा बाळगता येत नाही. यालाच आपल्या देशातील कायद्याच्या अलौकीक शक्तीचा पुरावा म्हणतात. जो कायदा आहे व त्याचा कुठलाही अंमल होऊ शकत नाही, अशी प्रस्पर विरोधी वस्तुस्थिती असते. ही अलौकीक बाबच नाही काय? अजितदादा सहा मजले एका मिनीटात उतरून दाखवतात, ही अलौकीक शक्तीच नाही काय? आपल्या राज्यांचे मुख्यमंत्री फ़ायलीमध्ये कुठले कागद आहेत ते न बघताच त्यावर सही करतात, हे अलौकीक शक्ती साध्य सल्याखेरिज शक्य आहे काय? पोलिसांना कायदा ठाऊक नसतो, मुख्यमंत्र्याला सह्या कशावर केल्या ते ठाऊक नसते. पंतप्रधानाला कुठला मंत्री काय धोरण राबवतो, त्याचाच थांगपत्ता नसतो, वर्षभर लैला खानबद्दल बातम्या देणारे पत्रकार ती पाकीस्तानी असल्याचे दावे करत असतात. पण अखेर ती मुंबईत सांताक्रुझला जन्मलेली भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध होते. हे चमत्कार अलौकीक नाहीत काय?
दाभोळकरांना खरे चमत्कार बघायचे असतील तर त्यांनी जरा उत्तर भारतात जाऊन बघावे. उत्तरप्रदेशात तर एक मृतांचीच युनियन आहे. गेली कित्येक वर्षे ते आपण जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी संघर्ष करीत आहेत. जगाच्या पाठीवर असा कुठला देश आहे, जिथे मेलेल्यांची संघटना वा आंदोलन चालू आहे? इतके वैज्ञानिकच नव्हेतर कायदेशीर चमत्कार आपल्या देशात घडू शकतात. ते बघायला वैज्ञानिक दृष्टी असायला हवी. कायद्यावरची अंधश्रद्धा तिथे कामाची नसते. दाभोळकर पडले विज्ञाननिष्ठ अंधश्रद्ध. जेवढे निर्मलबाबांचे समर्थक अंधश्रद्ध निष्ठावान भक्त असतात, तेवढेच मग दाभोळकर वा वागळे हेसुद्धा विज्ञान वा कायद्याविषयी अंधभक्त असतात. निर्मल बाबांचे भक्त नसलेले गुण वा अलौकीक गुणवत्ता बाबांना चिकटवतात, तसेच हे विज्ञानाचे भक्त विज्ञानाला, कायद्याला अलौकीक गुण चिकटवत असतात. परिणाम सारखेच असतात. पोलिओ डोस घेतल्याने बालकांचे मृत्यू होतात ती अंधश्रद्धा नसते काय? डोळ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर ज्यांची दृष्टी गेली ते कसले बळी होते? किंवा कुणाचे बळी असतात? विज्ञान म्हणजेच अंतिम सत्य असल्याचा दावा करणार्यांना् श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फ़रक कधी कळला आहे काय? असता तर त्यांनी आपल्या अज्ञानाचे निर्मूलन करण्यासाठी आधी प्रयत्न केले असते. कायद्याचा आग्रह धरण्यापेक्षा लोकांचे प्रबोधन करून अंधश्रद्धांवर मात केली असती. ज्या देशात प्रत्येक कायदा दुबळा व निरुपयोगी ठरला आहे याच देशात कायद्याने अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी झटणे हीच अंधश्रद्धा नाही काय?
पण असे सवाल नेहमीच्या जगात जगणार्या तुम्हाआम्हाला पडत असतात. वागळेच्या दुनियेत वावरणार्यांचा वास्तव जगाशी संबंधच येत नाही. मग त्यांना वास्तवातल्या अंधश्रद्धांच्या निर्मूलनाचा विचार सुचेलच कसा? इथे कडक सुरक्षा असते, तरी कसाब राजरोस कत्तल करतो. इथे मुंबईतील सर्वात सुरक्षित इमारत असलेल्या मंत्रालयाला भीषण आग लागू शकते. इथे सामान्य माणसाला रेशनकार्ड मिळताना नाकी नऊ येतात. पण घातपात करायला आलेल्यांना पासपोर्टही सहज मिळून जातो. दोन दशके झगडणार्या गिरणी कामगारांच्या घराच्या मागणीसाठीच्या फ़ाईलवर सही करायला, विचार करायला मुख्यमंत्र्यांना वे्ळ मिळत नाही. पण तीन तीन मुख्यमंत्री आदर्श सोसायटीच्या फ़ाईलवर कागद उघडूनही न वाचता फ़टाफ़ट सह्या करतात. इतके अलौकीक चमत्कार घडणर्या राज्यात दाभोळकर अलौकीक शक्ती व चमत्काराचे पुरावे मागतात, याला आंधळेपणा म्हणायचे की कायद्याविषयीची अंधश्रद्धा म्हणायचे? माझे मत बाजूला ठेवा आईनस्टाईन तर वैज्ञानिक होता ना? तो म्हणतो ” मी अत्यंत श्रद्धाळू नास्तिक आहे. पण तीच एकप्रकारे धर्मश्रद्धा होत नाही काय?” स्वत:ला नास्तिक व विज्ञाननिष्ठ म्हणवणारे वागळे व दाभोळकर नेमके तसेच धर्मनिष्ठ अंधश्रद्ध आहेत ना?
(१५/७/१२) http://panchanaama.blogspot.in/