‘आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आज प्रत्येक सुजाण पालक जागरूक आहेत. आजचे विद्यार्थी अभ्यास, खेळ, संगीत, नृत्य, स्पर्धात्मक परीक्षा या आधुनिक चक्रव्यूहामध्ये अडकले आहेत. त्यामुळे आजचे विद्यार्थी हे भांबावून दिशाहीन होत आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन लाभल्यास ते मोठी कामगिरी करू शकतील, असे मत केएलई इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शिवानंद शिरगावे यांनी व्यक्त केले. तर पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या समन्वयानेच विद्यार्थ्यांना या चक्रव्यूहातून सोडवून त्यांचे भवितव्य उज्ज्वल घडवू शकतो. उद्याचा सुजाण नागरिक घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारी आमची संस्था या सर्व अपेक्षापूर्तींसाठी सतत प्रयत्नशील आहे आणि आम्ही यात यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास केएलई संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केला.
भारताचे उज्ज्वल भविष्य हे पवित्र ज्ञानमंदिरातच घडतेे. उद्याचे तज्ज्ञ व सुज्ञ घडविणार्या शिक्षक व शिक्षण संस्थांचे योगदान देशाच्या उज्ज्वल भविष्यात सर्वात मोठे योगदान असते. त्याचप्रमाणे आदर्श व संस्कारी नागरिक घडविण्यातही अशा शिक्षण संस्थांचा सिंहाचा वाटा असतो. यात अग्रक्रमाने नवा घ्यावे लागते ती शिक्षण संस्था म्हणजे ‘कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी’ अर्थात ‘केएलई’. सन १९१६ साली, म्हणजे ९५ वर्षांपूर्वी सर्वसामान्य जनमानसाला शिक्षणोत्तेजना देऊन ज्ञानज्योतीने आसमंत उजळून टाकणार्या के.एल.ई शिक्षण संस्थेचा उदय झाला.
त्याकाळी सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते. बेळगावात उच्चशिक्षणाची सोय नव्हती. यासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात जावे लागत असे. हे गरीब पालकांना शक्य नव्हते. याचा विचार करून शिक्षणमहर्षी व समाजसुधारकांनी अनेक शिक्षणसंस्था सुरू केल्या. याच काळात पुण्याच्या फर्ग्युसन व स.प. महाविद्यालयांत शिक्षण घेणार्या बेळगावच्या ७ तरुणांनी महर्षी धोंडो केशव कर्वे, लोकमान्य टिळक व भाऊराव पाटलांच्या या कार्यापासून प्रेरणा घेत बेळगावमध्ये सर्वांना शैक्षणिक सुविधा प्राप्त करून देण्याचा निर्धार केला. ते तरुण म्हणजेच श्री.एस.एस. बसवनाळ, श्री. बी.बी. ममदापूर, श्री.एम.आर. साखरे, श्री.पी.आर. चिकोडी, श्री.व्ही.व्ही. पाटील, श्री.बी.एस. हंचिनाळ, श्री.एच.एफ. कट्टीमनी या सप्तर्षींनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून शिक्षणोेत्तेजनाचे कार्य हाती घेतले. १३ नोव्हेंबर १९१६ रोजी ‘कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना करून आपल्या लोकोत्तर शिक्षणोत्तेजन कार्याची मुहूर्तमेढ रोवली. १९१६ हे वर्ष शैक्षणिक विश्वात एक महत्त्वाचे व क्रांतिकारी वर्ष ठरले, कारण याचवर्षी के.एल.ई.सोबत एस्.एन्.डी.टी व म्हैसूर विद्यापीठाचीही स्थापना झाली होती. के.एल.ई.ने याचवर्षी बेळगावात अँग्लो व्हर्नाकुलर स्कूल सुरू करून शाखाविस्तारही केला. या सप्तर्षींनी ९५ वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपट्याचे आज भल्यामोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
के.एल.ई.ची कला, वाणिज्य, विज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी, अध्यापक, पदव्युत्तर महाविद्यालये, विधी, दंत, फार्मसी, नर्सिंग, बिझनेस मॅनेजमेंट, कॉम्प्युटर, हॉटेल मॅनेजमेंट ऍन्ड केटरिंग, टुरिझम, फॅशन डिझायनिंग आदी बहुविध विषयांतील व शाखांची अनेक महाविद्यालये कार्यरत आहेत. २११ हून अधिक ज्ञानशाखा केएलई संस्थेने सुरू केलेल्या असून, साधारणपणे ८० हजारांहून अधिक विद्यार्थी केएलई शिक्षण संस्थेत ज्ञानार्जन करीत आहेत. या संपूर्ण संस्थांमधून ९१०० कर्मचारी कार्यरत आहेत. के.एल.ई.च्या संस्थापकांची दूरदृष्टी व संचालक मंडळांचे अथक परिश्रम यांचे फलस्वरूप म्हणजेच आज झालेल्या केएलईच्या असंख्य शाखांचा विस्तार होय. के.एल.ई.ने आपले कार्यक्षेत्र कर्नाटकापुरतेच मर्यादित न ठेवता महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात आणि परदेशातही ज्ञानदानाचे व्यापक जाळे विणले असून, संचालक मंडळ ही धुरा यशस्वीपणे सांभाळतच संवर्धितही करीत आहे.
सन १९८४ पर्यंत संस्थेच्या ३८ विद्याशाखा होत्या. सन १९८४ साली विद्यमान चेअरमन मा. डॉ. प्रभाकर कोरे यांनी केएलई संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून संस्थेची अखंड गतीने घोडदौड सुरू असून, या २५ वर्षांच्या कारकीर्दीत संस्थेने उत्तुंग भरारी घेतली आहे. शैक्षणिक कार्याबरोबरच के.एल.ई.ने बेळगावमध्ये मेडिकल रिसर्च सेंटर काढून परिसरातील रुग्णांची आरोग्य रक्षणाची सोय केली. आज केएलई मेडिकल रिसर्च सेंटरचा नावलौकिक देशभर पसरला आहे. बेळगावच्या कॉलेज रोडवर केएलईचे भव्य कार्यालय असून, याच मुख्य कार्यालयातून संस्थेचा कारभार चालविला जातो.
के.एल.ई.संस्था नेहमीच दूरदृष्टीने आपले कार्य करीत आहेत. महाराष्ट्रातील जनमानसाच्या हृदयात शिक्षणाच्या ज्योतीने महाराष्ट्र व कर्नाटकातील नाते दृढ व्हावे व ज्ञानाची गंगा ही प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी या उद्देशाने सोलापूर येथेही के.एल.ई संस्थेने आपल्या शाखेचा विस्तार केला आहे.
सोलापूर येथे शिवयोगी श्री. सिध्दरामेश्वरांच्या पावन नगरीत के.एल.ई. इंग्लिश स्कूल सुरू करून सरस्वतीच्या प्रसादाचा लाभ सोलापूरकरांना मिळवून दिला आहे. भारतीय संस्कृती जोपासत, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरीत २००६ -०७ या वर्षी जुळे सोलापूर येथे सी.बी.एस.ई.(दिल्ली) संलग्नित अभ्यासक्रम असलेल्या शाळेची स्थापना करण्यात आली आहे.
संस्थेच्या सर्वच इमारती टोलेजंग असून, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सोलापूरच्या जुळे सोलापूर परिसरात १४,०८३ चौरस फुटात उभारलेली के. एल. ई. शाळेची भव्य इमारत सर्वांचेच लक्ष वेधून घेते.
उच्च दर्जाचे शिक्षण प्रत्येकाच्या घरात पोहोचविण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्या या संस्थेने शाळेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सोय केली आहे. नवीन एज्युकॉम शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे सखोल ज्ञान मिळते. या शिक्षणप्रणालीमुळे जगातील सर्व विषयांचे सखोल ज्ञान सहज शक्य होते. यात नर्सरी ते ९ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषय इंटरनेटच्या सहाय्याने दृक-श्राव्य पद्धतीने शिकविला जातो. शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्यास वैयक्तिकरीत्या संगणक हाताळण्यास मिळतो.
ज्ञानात भर टाकण्यासाठी संस्थेचे सुसज्ज ग्रंथालय महत्त्वाची भूमिका बजावते. विज्ञानाच्या सर्व साहित्यांसह परिपूर्ण अशी प्रयोगशाळा, आधुनिक वाद्यवृंदासह सजलेले संगीत व नृत्याचे दालन, मनोबल व आरोग्यवृद्धीसाठी सज्ज असलेले योगकक्ष व शारीरिक व मानसिक ताणतणावापासून मुक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांना ध्यानधारणा देखील शिकवली जाते. या जगाला चित्रातून साकारणार्या बालकलाकारांसाठी चित्रकलेचे दालनही या शाळेची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. या विविध विभागांसाठी तज्ज्ञ व विशारद शिक्षकवृंद ज्ञानदानासाठी उद्युक्त असतात. निर्भीड व्यक्तिमत्त्व, शिस्त, खिलाडूवृत्ती हे खेळातूनच साकारते, यासाठी विविध खेळ साहित्यांसहित सुसज्ज असे क्रीडांगण आहे.
विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून एक अष्टपैलू विद्यार्थी घडावा, या उद्देशाने महिन्याच्या दुसर्या, चौथ्या शनिवारी शाळेअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी शाळेत अनेक स्पर्धांत्मक परीक्षांचेही आयोजन केले जाते. त्यामध्ये राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा, राष्ट्रीय सायबर ऑलम्पियाड, सायन्स ऑलम्पियाड, मॅथ्स ऑलम्पियाड, एम.टी.एस., एन.टी.एस वैदिक गणित परीक्षा, गणित अध्यापक, हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा, भरतनाट्यम्, संगीत, अबॅकस आदी परीक्षांचे आयोजनही केले जाते. त्यामुळे स्पर्धात्मक परीक्षांबरोबरच विद्यार्थ्यांनी कला व क्रीडा क्षेत्रांतून राष्ट्रीय विभागातून, राज्य व जिल्हा पातळीवर अनेक पारितोषिके मिळवली आहेत. शाळेच्या नियमानुसार एका वर्गात विद्यार्थ्यांची संख्या फक्त ३५ इतकीच मर्यादित असल्याने प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते.
‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी शाळेने नियमितपणे नेमून दिलेल्या डॉक्टरांकडून वेळोवेळी विद्यार्थ्यांची आरोग्यतपासणी करण्यात येते. त्याचप्रमाणे साथीच्या रोगांपासून बचाव कसा करावा? आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? याचे मार्गदर्शन व किशोरवयीन मुला-मुलींना योग्य समुपदेशन तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जाते.
ज्ञानगंगा जितकी वाहत राहते तेवढीच ती स्वच्छ, निर्मळ व पारदर्शक असते. या उद्देशाने दरवर्षी के.एल.ई. संस्थेमार्फत आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण संस्थेतील शिक्षक, अध्यापकांना दिले जाते. या प्रशिक्षणामुळे ज्ञानाचे पुनरावलोकन होऊन त्यांच्या ज्ञानात पडणारी भर ही विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरते. नियोजित व शिस्तबध्द वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडादिन याचबरोबर शैक्षणिक सहलीही विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. विज्ञानदिन, साक्षरतादिन, नेत्रदानदिन, हिंदीदिन, महापुरुषांची जयंती आदी भारतातील महत्त्वाच्या दिनविशेषांची माहिती सांगून हे दिवस साजरे करण्याची परंपरा संस्थेेने जोपासली आहे.
नर्सरी ते यु.के.जी.च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कौतूक करावे तितके कमीच आहे! अवघ्या तीन वर्षांची मुले आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा अतिशय उत्साहात करतात. या भारताच्या भविष्यासाठी संस्था अनेक उपक्रम राबविते.
शिक्षणाचा ध्यास व ध्येयवादी दूरदृष्टी ठेवणारे संस्थेचे सर्वोसर्वा, ज्ञानमहर्षी श्री. प्रभाकर कोरे यांचे कार्य अनुकरणीय असून, त्यांची कार्यप्रवणता व ज्ञानपिपासू वृत्तीमुळे संस्थेच्या प्रगतीचा आलेख अखंडपणे चढताच राहिला आहे. तसेच आधुनिक विचारसरणीचे अनुभवी प्राचार्य श्री. शिवानंद शिरगावे यांचे अनमोल मार्गदर्शन व तज्ज्ञ शिक्षकांची फौज या सर्वांना पूरक अशी अत्याधुनिक साधनसामुग्रीमुळे के.एल.ई.संस्थेने अल्पावधीतच उत्तुंग यशोशिखर गाठले आहे. संस्कारक्षम विद्यार्थ्यांना केएलईमुळे परिसच लाभला! असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नियोजित, शिस्तबध्द कामकाज व छडीविना शाळेत शिस्तप्रिय व प्रसन्न वातावरण असणारी सोलापुरातील एकमेव शाळा असल्याचा अनुभव नक्कीच सर्वांना येईल.
के.एल.ई. संस्था ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी झटत असते. भारतीय संस्कृती जोपासणारी, सुसंस्कारी व आदर्श नागरिक घडविण्याचा प्रयत्नही या संस्थेमार्फत होत असतो.
या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आज प्रत्येक सुजाण पालक जागरूक आहे. आजचा विद्यार्थी अभ्यास, खेळ, संगीत, नृत्य, स्पर्धात्मक परीक्षा या आधुनिक चक्रव्यूहामध्ये अडकला आहे. त्यामुळे आजचा विद्यार्थी हा भांबावून दिशाहीन होत आहे. पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या समन्वयानेच विद्यार्थ्यांना या चक्रव्यूहातून सोडवून त्यांचे भवितव्य उज्ज्वल घडवू शकतो.
प्रत्येक पालकाला शाळांकडून खूप गोष्टींची अपेक्षा असते. विद्यार्थ्यांनी मोठ्यांचा आदर करावा, त्याची वागणूक नम्रतेची असावी, लहानांवर प्रेम करावे, आपणही समाजाचे काहीतरी लागतो, अशी सामाजिक भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी. वेळेचे तत्परतेने पालन करावे, भारतीय नागरिकांच्या कर्तव्याची जाणीव त्यांच्यात असावी, आपल्या मातृभूमीवर जिवापाड प्रेम करावे, या सर्व गुणांनी संपन्न असा अष्टपैलू आपला पाल्य असावा, असे प्रत्येकाला वाटते.
उद्याचा सुजाण नागरिक घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार्या व या सर्व अपेक्षापूर्तींसाठी एकमेव विश्वासपात्र असे ठिकाण म्हणजेच के.एल.ई संस्था होय !
डॉ. प्रभाकर कोरे यांचे मनोगत
|
केएलई संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे |
शिक्षणात विविधता निर्माण करण्यासाठी विशेष जबाबदारीची गरज असते. स्फूर्ती आणि गती अबाधित राखणेही तेवढेच आव्हानात्मक आहे, असे प्रतिपादन केएलई संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले. आपल्यापैकी अनेकजण अशा अध्ययन कार्यक्रमांच्या शोधात आहेत, की जे चालू अध्ययन सिद्धांत आणि अध्यापन शास्त्र प्रतिबिंबित करतात. अध्ययन, अध्यापन प्रक्रियेसाठी लागणारा पैसा, नवी दिशा आणि उत्तेजित करणारी महत्त्वाकांक्षा यामुळे अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेत बदल घडवून आणला जाऊ शकतो, असेही मत डॉ. प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केले. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांत महर्षी मानले जाणारे व्यक्तित्त्व डॉ. प्रभाकर कोरे यांनी ‘सोलापूर भरारी’च्या माध्यमातून ‘दै. तरुण भारत’शी संवाद साधला.
के. एल. ई. इंग्लिश मीडियम शाळेचे वेगळेपण याच्यात दिसून येईल की, सुधारित मूल्यांवर आधारित पाठ्यक्रम निर्मितीसाठी आणि गरजा भागवण्यासाठी एक सुवर्णसंधीची निर्मिती आमची संस्था करीत आहे. विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षण क्षेत्रातील मंडळींना आज आणि येत्या काळात शाळा ही एक आव्हान असेल. या आव्हानामुळे शाळा, शिक्षण संस्था आणि संस्थेचे हितचिंतक विद्यार्थ्यांना आधुनिक व वेगळ्या अनुभवांची प्रचिती देतील.
के. एल. ई. संस्थेचे कार्यकारी मंडळावरील मी आणि माझे सहकारी आम्ही तुमचे स्वागत करण्यासाठी असू अशा परिसराची की जे तुम्हाला व तुमच्या मुलांना प्रेरित करेल, मैलाचा दगड निर्माण करेल, की जे वास्तविक जगात काम करण्यासाठी उपयोगी पडेल, असा आशावाद व्यक्त केला. या आव्हानात्मक जगात काम करण्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या मुलांना चांगल्या कार्यासाठी शुभेच्छा!
केएलईचे शैक्षणिक धोरण : श्री. शिवानंद डी. शिरगावे
|
प्राचार्य श्री. शिवानंद शिरगावे |
सोलापूरवासीयांमध्ये मराठीबरोबरच इंग्रजी माध्यमातून दिल्या जाणार्या शिक्षणाचे महत्त्व वाढावे, तसेच सोलापुरातील जनमानसात आधुनिक पद्धतीच्या शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांच्यामधील शिक्षणाचा दर्जा उंचवावा, असा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून सोलापूर येथील आमच्या केएलई संस्थेने केएलई इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना केली असल्याचे केएलई इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री. शिवानंद शिरगावे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
स्वत:जवळील पैशाचा अपव्यय न होता आपल्या पाल्याला उच्च दर्जाच्या शिक्षणसंस्थेत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण घेण्याची संधी मिळावी. आपला पाल्य विद्याविभूषित व्हावा, हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. हे स्वप्न फलद्रूप करण्याचे काम केएलई संस्थेने केएलई इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून व्हावे, असा मानस व संकल्प केएलईच्या संस्थाचालकांनी केला असल्याचे शिवानंद शिरगावे यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्याला शारीरिक, मानसिक व बौध्दिक प्रकारचे शिक्षण मिळावे आणि केएलईमधून सर्वगुणसंपन्न असा अष्टपैलू विद्यार्थी बाहेर पडावा हे केएलईचे ध्येय आहे. सोलापुरातील प्रत्येक पालकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केएलई संस्थेची निर्मिती केली आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेली शाळा, सुप्तगुणांना वाव मिळण्याची हमी, अभ्यासाला पूरक वातावरण, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने अनेक सुविधा उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केएलईने केला असल्याचे शिवानंद शिरगावे म्हणाले.
तरुण भारत, सोलापूर, रविवार, दि. १६ जानेवारी २०११