तुमच्या राजवटीत राज्य लुटले. उत्तर प्रदेशच्या तरुणांना माफिया व नक्षलवादी बनवले व त्याचे खापर आता दुसर्यांवर फोडता?
राहुल के नाम पें दे दे बाबा!
कॉंग्रेस पक्षाचे युवराज राहुल गांधी यांच्या अकलेची नव्हे तर बेअकलेची तारीफ करावी तेवढी थोडी. कधी काय मुफ्ताफळे उधळतील व अकलेचे चांदतारे तोडतील याचा नेम नाही. स्वातंत्र्य मिळाल्यापासून एखाद्दुसरा अपवाद वगळता सलगपणे राहुल गांधीचे घराणेच दिल्लीची गादी उबवीत आले आहे व आताही युवराज राहुलचेच नाव कॉंग्रेसचा अध्यक्ष आणि मनमोहन सिंगांच्या जागी भावी पंतप्रधान म्हणून घेतले जात आहे. अर्थात या लल्लूची तेवढी कुवत आहे काय? हा प्रश्न आहेच. उत्तर प्रदेशात सध्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. तेथील एका सभेत युवराजांनी उत्तर हिंदुस्थानींना विचारले, ‘पंजाबमध्ये जाऊन किती दिवस मोलमजुरी करणार? किती दिवस महाराष्ट्रात जाऊन भीक मागणार?’ युवराज राहुलच्या या वक्तव्याने राजकीय माहोल पुन्हा एकदा गरम झाला आहे व चारही बाजूंनी संतापाचे काहूर माजले आहे. उत्तर प्रदेशचा विकास होऊ शकला नसल्यामुळेच तेथील गोरगरीब लोकांवर उपासमारीची, बाहेरच्या राज्यांत जाऊन मोलमजुरी करण्याची, भीक मागण्याची वेळ आली आहे. सध्या उत्तर प्रदेशात ‘मायावती’ राज आहे व या राज्यात जिवंत माणसापेक्षा कांशीराम-मायावतीच्या पुतळ्यांचे मोल जास्त आहे. मायावतींचे राज्य हे भ्रष्ट व अकार्यक्षम असल्यानेच उत्तर हिंदुस्थानींवर बाहेरच्या राज्यांत जाऊन भीक मागण्याची वेळ आली असे युवराज म्हणतात, पण ते तितकेसे बरोबर नाही. उत्तर प्रदेशात सर्वाधिक काळ कॉंग्रेस पक्षानेच राज्य केले व त्यांच्याच राजवटीत उत्तर प्रदेश सर्वाधिक रसातळाला गेले. तेथील मुख्यमंत्र्यांची नामावली काढली तर त्यात सर्वाधिक मुख्यमंत्री कॉंग्रेसचेच दिसतील. इतकेच कशाला देशावर सर्वाधिक ‘राज्य’ करणारे पंतप्रधानही उत्तर प्रदेशनेच दिले. खुद्द पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री, व्ही. पी. सिंग असे दिग्गज पंतप्रधान ही कॉंग्रेसचीच देन होती. व्ही. पी. सिंग जनता दल सरकारचे पंतप्रधान होते हे खरे असले तरी मूळचे ते कॉंग्रेसवालेच. तरीही उत्तर प्रदेशच्या लोकांवर भीक मागण्याची वेळ यावी हे युवराजांच्या
कॉंग्रेसचेच पाप
नाही तर काय? तुमच्या राजवटीत राज्य लुटले, तिजोरी लुटली. उत्तर प्रदेशच्या तरुणांना माफिया व नक्षलवादी बनवले व त्याचे खापर आता दुसर्यांवर फोडता? उत्तर प्रदेशातून सर्वाधिक लोंढे मुंबई-महाराष्ट्रावर आदळत आहेत व त्यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईची पुरती वाट या लोंढ्यांनी लावली असली तरी आम्ही त्यांचा उल्लेख कधीच भिकारी किंवा कंगाल असा केला नाही. कारण शेवटी पोटाला जात नसते. प्रांत नसतो. हे खरे असले तरी स्वत:चे पोट भरण्यासाठी भूमिपुत्रांच्या ताटातला घास हिसकावून घेण्याचा अधिकार तुम्हाला मिळालेला नाही. या मुंबई शहरावर पहिला हक्क मराठी माणसाचाच आहे, असे आम्ही म्हणतो ते एका तळमळीने. तुमच्या राज्यकर्त्यांनी तुम्हाला उपाशी ठेवले म्हणून मुंबईसारख्या शहरांवर आक्रमण करायचे, कुठेही झोपडी बांधायची, फुटपाथ ताब्यात घ्यायचे हे कोणत्या कायद्यात बसते? घटनेतील 19 (ए) नामक कलमाने या देशातील जनतेला मुक्त वावर करण्याचा हक्क दिला आहे. म्हणजे या राज्यातून त्या राज्यात जाण्याचा अधिकार जरी दिला असला तरी जेथे जाऊ तेथे घाण करून ठेवण्याची, हवे तसे वागण्याची व स्थानिकांना त्रास होईल, त्यांचे हक्क मारले जातील असे वागण्याची परवानगी दिलेली नाही. हेदेखील आपल्या घटनेत लिहिले असले तरी ते वाचण्याची तसदी न घेता मुंबईतील उपटसुंभ पुरभय्ये नेते त्यांच्या तोंडाच्या डायरियाने हवे तसे फवारे सोडीत असतात. उत्तर हिंदुस्थान किंवा अन्य प्रांतातला नागरिक हा देशवासीयच आहे. तो काही आमचा दुश्मन नाही. आमच्या राष्ट्रगीतातल्या प्रत्येक प्रांताचा आम्ही आदर करतो. मात्र याचा अर्थ आम्ही ‘मुंबई’च्या बाबतीत, मराठी जनतेच्या बाबतीत पकड ढिली करून उपर्यांस येथे हवे तसे वागू देण्याची मुभा देणार नाही. पोट भरायला आलात ना? मग त्या औकातीतच राहा. मुंबई-महाराष्ट्राचे मालक बनण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमच्या राज्याची श्रीमंती वाढवा. तुमच्या घरावरही सोन्याची कौले टाका. आमच्या पोटात अजिबात दुखणार नाही. उलट देशाचा विकास होतोय म्हणून आम्हाला आनंदच होईल, पण आज तुमच्यावर
दारोदार फिरण्याची वेळ
आणली कोणी? हेसुद्धा विसरू नका. पंजाबात उत्तर हिंदुस्थानी मजूर आहेत, असा उल्लेख राहुल गांधी करतात. प्रत्यक्ष दिल्लीतही हे ‘लोंढे’ आहेतच व मुख्यमंत्री शीलाबाईंनी उत्तर हिंदुस्थानीचे, बिहारींचे लोंढे आवरा असे अनेकदा सांगितले. कोलकाता व आसामातही ते आहेत, पण राहुलने उल्लेख केला तो फक्त महाराष्ट्र व पंजाबचा. कारण हे दोन्ही प्रांत स्वाभिमानी व कमालीचे लढवय्ये. नेहरू-गांधी परिवाराला ते तसे शरण गेले नाहीत. काही लाचार कॉंग्रेसवाल्यांनी सदैव लोटांगणे घालण्यातच धन्यता मानली ही बाब अलाहिदा, पण पंजाबने, खास करून शिखांनी त्यांचे शौर्य कॉंग्रेसचे गुलाम होऊ दिले नाही व शेवटी एका शिखाकडूनच इंदिरा गांधींची हत्या झाली. शीख समाजाबद्दल हा डूख आजही गांधी घराण्याच्या मनात कायम आहे. महाराष्ट्रानेही पंडित नेहरूंना अनेकदा दाती तृण धरून शरण आणलं. नेहरूंकृत शिवरायांच्या अपमानाचा मुद्दा असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल. महाराष्ट्राच्या मर्दमर्हाटी जनतेने नेहरू व त्यांच्या पिलावळीचे अजिबात ऐकले नाही. ही खदखद आजही या घराण्याच्या मनात आहे व वेळोवेळी त्यास उकळी फुटत असते, पण हे विष ओकताना युवराज राहुललाच विषबाधा झाली व त्याने उत्तर प्रदेशमधील जनतेला भिकारी म्हटले. पंजाबात व महाराष्ट्रात जाऊ नका असे बजावले. युवराज, मग आम्ही तरी इतकी वर्षेे काय सांगत आहोत? तुमच्याच राज्यात स्वत:चा विकास करा. मुंबईत ‘लोंढे’ आणू नका. राहुल गांधींचे अकलेचे दारिद्य्र यानिमित्ताने दिसले. पण ते सहज सत्य बोलून गेले. वेडा कधी कधी बरळतो तेही सत्य असतं. या कठोर सत्यावर कृपाशंकर, आझमींसारखे ठार वेडे काय भाष्य करणार आहेत? राहुल गांधींच्या जागी दुसरे कोणी असे बोलला असता तर या बोलभांड नेत्यांनी त्याविरुद्ध गरळ ओकली असती. आता ते काय करणार आहेत? खरे तर त्यांनी काही करू नये. राहुलबाबाच्या नव्या व्याख्येनुसार आझमी, कृपाशंकर यांच्यासारखे बोलभांड मुंबई-महाराष्ट्रातले ‘भिकारी’च ठरतात. त्यामुळे त्यांनी आता एकच करावे. मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर किंवा लोकल गाड्यांमध्ये ‘राहुल के नाम पें दे दे बाबा’ असे म्हणत भीक मागत फिरावे! (दै. सामना)