Home » Blog » गुजरातमध्ये दंगलीचा भयगंड कोणी निर्माण केला?

गुजरातमध्ये दंगलीचा भयगंड कोणी निर्माण केला?

 पंचनामा : भाऊ तोरसेकर
   गुजरातची दंगल हा शब्द आता सार्वत्रिक झाला आहे. तिच्या आगेमागे काय झाले, कोण कसे वागले, याचा उच्चार सहसा होत नाही. गुजरातची दंगल २७ फ़ेब्रुवारी २००२ नंतर सुरू झाली. म्हणजे त्याच्या दुसर्‍या दिवशी झाली. मग २७ फ़ेब्रुवारी रोजी काय झाले होते? त्या दिवशी अयोध्येहून अहमदाबादकडे येणार्‍या साबरमती एक्सप्रेस या रेल्वेगाडीवर एका जमावाने हल्ला केला आणि त्यातला एक डबाच पेटवून दिला. त्यात आतल्या ५९ प्रवाश्यांचा जळून कोळसा झाला. ही घटना गोध्रा येथे घडली. ती गाडी सकाळच्या वेळेच त्या स्थानकात आली तेव्हा इथे प्रवासी व फ़ेरीवाले विक्रेते यांच्यात काही बाचाबाची झाली होती असे म्हणतात. त्यातून जो तणाव निर्माण झाला, त्यातूनच हा डबा पेटवण्यात आला असेही सांगितले जाते. असे प्रकार आजवर अनेकदा अनेक गाड्या, स्थानके व प्रवासी-फ़ेरीवाले यांच्यात झालेले आहेत. पण त्याचे पर्यवसान कधीही इतके भयंकर झालेले नाही. मग गोध्रा येथेच इतका भीषण प्रकार का घडावा? तर त्यामागे शिजलेले कारस्थान होते, असे सोपे उत्तर आहे. आणि दिसतेही तसेच. कारण ज्या प्रकारे परवा आझाद मैदानावर झटपट पोलिस व माध्यमांच्या गाड्या पेटवून देण्यात आल्या, तेवढ्याच वेगाने गोध्राची घटना घडलेली आहे. रेल्वेचा डबा सहज पेटवता येणे शक्य नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात ज्वालाग्राही पदार्थाचा वापर करावा लागतो. ज्याअर्थी तेवढा साठा अल्पावधीत गोध्रा येथे जमलेल्या जमावाकडे होता त्याअर्थी त्यांनी ती जाळपोळ करायचे आधीपासूनच ठरवलेले असणार व तयारी केली असणार. पण सवाल इतकाच, की ज्यांना आपण ओळखत सुद्धा नाही, त्यांना जाळून ठार मारायची योजना त्या जमावापैकी कोणीतरी योजावीच कशाला? त्यासाठी तयारी करावीच कशाला? असे काय घडले होते, की त्या जमावाने अशी रेल्वेप्रवाशांना जाळण्याची योजना बनवावी?

   पुन्हा सोपे उत्तर आहे. त्या रेल्वेतून अयोध्येला जाणारे कारसेवक येतील, त्यांना जाळायचा कुटील हेतू असावा. हे खरे आहे हे मी सुद्धा मान्य करतो. पण ते संपुर्ण सत्य नाही. कारण अयोध्येत राम मंदिर बांधायला जाणार्‍या कारसेवकांनाच मारायचे वा जाळायचे असेल, तर त्या आधी इतकी वर्षे असा प्रयत्न का झाला नव्हता? यापुर्वी निदान दहा बारा वर्षे तरी अशी कारसेवकांची लगबग देशाच्या कानाकोपर्‍या चालू आहे. आणि गोध्रा हे रेल्वेस्थानक पश्चिम रेल्वेचे जंक्शन आहे. त्या स्थानकावरून आजवर हजारो कारसेवकांनी येजा केलेली आहे. पण तेव्हा त्यांच्यावर तिथे कधी हल्ला झाला नव्हता, की कुठली जाळपोळ झालेली नव्हती. तशी कोणी बातमीसुद्धा दिलेली नव्हती. मग २७ फ़ेब्रुवारी २००२ च्या आधी असे काय घडले होते, की त्या स्थानकावर येणार्‍या गाडीतल्या कारसेवकांना जाळण्याची योजना गोध्राच्या काही लोकांनी योजली? अर्थात ते लोक किंवा तो जमाव मुस्लिमांचा होता हे वेगळे सांगायला नको. ती जाहिर गोष्ट आहे. पण ते केवळ मुस्लिम होते म्हणुन त्यांनी कारसेवकांना जाळण्याचे कारस्थान शिजवले, हे मला मान्य नाही. त्यासा्ठी काही वेगळे कारण आहे. आणि ते कारण होते अयोध्येत तेव्हा रामजन्मभूमी मंदिराचा शिलान्यास व्हायचा होता. त्यावरून माध्यमांनी उठवलेले काहूर इतके भयंकर होते, की प्रत्येक मुस्लिमाला आपलेच घर आता उध्वस्त होणार अशी भिती वाटावी. पहिली गोष्ट म्हणजे जन्मभूमी जमीनीचा विषय न्यायालयात असल्याने त्या वादग्रस्त भूखंडावर शिलान्यास वगैरे होण्याचा विषयच येत नव्हता. जी जमीन ताब्यात आहे त्याच जमीनीवर शिलान्यास व्हायचा होता. मग त्यावर काहुर माजवण्याचे कारण काय होते? त्याचा बाबरी भूखंडाशी संबंधच काय होता? पण सेक्युलर माध्यमांनी असे काही रान उठवले, की आता शिलान्यासाच्या निमित्ताने पुन्हा देशात हिंदू मुस्लिम दंगली उसळणार आहेत.

   यातले कायदेशीर तपशील सामान्य माणसाला कळत नाहीत. पण त्यातले भडक शब्द मात्र त्याच्या मनावर परिणाम करत असतात. मग तो हिंदू असो की मुस्लिम. त्यात पुन्हा मुस्लिम समाज आपल्या धर्मश्रद्धेविषयी भलताच ह्ळवा असल्याने त्याच्यावर अशा बातम्यांचा भयंकर प्रभाव पडत असतो. मग अशा बातम्यांनी मुस्लिम वस्तीमध्ये अस्वस्थता पसरते. आज देशाच्या कुठल्या भागात काय चालले आहे त्याचा सामान्य माणसाला पत्ता नसतो. अगदी म्यानमारमध्ये मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत हे लोकांना ठाऊक नसेल. पण सामान्य मुस्लिमाला ते नेमके ठाऊक असते. कारण शुक्रवारच्या नमाजानंतर होणार्‍या प्रवचनामध्ये अशा विषयांवर भाष्य केले जात असते. त्यामुळेच अयोध्येतील शिलान्यासाची भडक वर्णने देणार्‍या माध्यमांनी अफ़वांचे जे रान पिकवले, त्यातून मुस्लिम वस्त्या व परिसरामध्ये एक शंकास्पद वातावरण तयार झाले. मग त्याच भयगंडाने हल्ला होण्याआधीच प्रतिहल्ल्याची तयारी सुरू झाली. गोध्रामध्ये जो मुस्लिम जमाव विनाविलंब जमा झाला त्यासाठी तिथल्या मशीदीतून प्रचार झाला, आधी कारस्थान शिजले असा आरोप केला जातो. पण त्यासाठी आवश्यक असलेले स्फ़ोटक वातावरण कोणी तयार केले? त्यासाठी आवश्यक तो भयगंड मुस्लिम मनस्थितीत सेक्युलर माध्यमांनीच तयार केला ना? तिथे शिलान्यास म्हणजे कुठली वादग्रस्त घटना घडली नाही. पण घडली ती भलतीकडे म्हणजे गोध्रा येथे घडली. स्वत:च भयभीत झालेल्या मुस्लिम जमावाने कारसेवकांचा एक डबाच पेटवून दिला. आधी ती गाडी सिग्नलपाशी अडवण्यात आली. त्यात कारसेवक बसलेल्या डब्यावर प्रचंड दगडफ़ेक करण्यात आली. मग त्यांनी आतून दारेखिडक्या लावून घेतल्यावर तो डबाच पेटवून देण्यात आला. काही मिनिटातच त्याची बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून वाहिन्यांवर झलकू लागली. पण कुठेही त्याची प्रतिक्रिया उमटली नव्हती.

   घडल्या प्रकाराला एक दिवस म्हणजे चोविस तास उलटून गेले तरी कुठे त्याचे पडसाद उमटले नव्हते. अगदी गुजरातही शांत होता. पण दुसर्‍या दिवशी म्हणजे २८ फ़ेब्रुवारी रोजी त्या जळून कोळसा झालेल्या कारसेवक रेल्वेप्रवाशांचे भस्मसात झालेले मृतदेह अहमदाबादला आणण्यात आले; तोवर सर्वत्र शांतता होती. पण त्यानंतर अचानक वातावरण झपाट्याने बदलत गेले. ही वेळ आणि दरम्यान घडलेली एक घटना अत्यंत निर्णायक आहे. कारण त्याच घटनेने पुढली भीषण दंगल गुजरातभर पेट्वून दिली. आज आझाद मैदान दंगलीनंतर तिथे जे अमर जवान स्मारकाची विटंबना झाली, त्याची छायाचित्रे कोणी वृत्तपत्र छापत नाही, की वाहिनी दाखवत नाही. पण त्यावे्ळी दहा वर्षापुर्वी गोध्रा स्थानकानजिक साबरमती गाडीतील जाळलेल्या कारसेवकांचे कोळसा झालेले मृतदेह मात्र वाहिन्यांनी थेट प्रक्षेपणकरून दाखवले होते. ते दृष्य इतके भयानक होते, की कुणाच्याही मनाचा थरकाप उडावा. रेल्वेडब्यातून प्रवास करणार्‍यांना असे जाळून मारले जाणार असेल तर मग आपण आपल्या रहात्या घरात, वसाहतीमध्ये, शाळेत, कार्यालयात किंवा दुकान बाजारात कुठेही सुरक्षित नाही, असा भयगंड त्या मृतदेहांच्या प्रक्षेपणाने तयार केला. आधी याच माध्यमांनी शिलान्यासाचा भयगंड तयार करून मुस्लिमांना भयभित के्ले आणि त्यातून जे घडले त्याच्या प्रदर्शनातून हिंदूंच्या मनातही भयगंड तयार केला. आणि असा भयगंड काय करतो हे बर्ट्रांड रसेल यांनी सांगितलेच आहे. जे आपल्यातले नाहीत असे वाटते, त्यांच्या जीवावर उठणारे भीषण पाशवी क्रौर्य उदयास येते असते. सेक्युलर माध्यमांनी गोध्राच्या जळित मृतदेहांचे थेट प्रक्षेपण करून तोच भयगंड हिंदूम्च्या मनात निर्माण केला. म्हणूनच अहमदाबादला ते मृतदेह पोहोचल्यानंतरच्या प्रक्षेपणानेच दंगलीची ठिणगी टाकली होती.

 “अयोध्येत श्रीराम मंदिरासाठी कारसेवा करून परतणार्‍या हिंदूंची गोध्रा स्थानकातल्या रेल्वेगाडीला पेटवून जाळुन हत्या”. अशी २८ फ़ेब्रुवारीच्या वृत्तपत्रांची हेडलाईन लोकांनी सकाळी वाचली होती. मग दुपारी टिव्हीच्या छोट्या पडद्यावर लोकांनी ते जळलेले मतदेह थेट बघितले. त्यांची हत्या कशासाठी झाली होती? ते मंदिर बांधायला गेले म्हणुन. ते हिंदू आहेत म्हणुन. आणि हे सहन केले तर आपलीही अशीच हत्या होऊ शकते, अशी धारणा त्यातून माध्यमांनीच तयार केली. आणि त्यातून जो भयगंड तयार झाला, तो मग भीषण पाशवी स्वरूपाचा होता. आदल्या दिवशी जसा गोध्रातला मुस्लिमांचा जमाव पाशवी वृत्तीने साबरमती गाडीच्या त्या डब्यावर तुटून पडला होता. तसाच मग हिंसक हिंदू जमाव मुस्लिम वस्त्या शोधत फ़िरू लागला. जंगली श्वापद किंवा हिंस्र प्राण्याप्रमाणे मुस्लिमांची शिकार करू लागला. काही ठिकाणी जिथे मुसिम वस्ती मो्ठी होती तिथे तशीच उलट अवस्था कोंडीत सापडलेल्या हिंदूंची झाली, तर जिथे हिंदूंची मोठी लोकसंख्या होती, तिथे मुस्लिमांची कोंडी झाली. माणुसकी हरवून बसलेली लोकसंख्या गुजरातभर धुडगुस घालू लागली. माणुसकीच रसातळाला गेली. याला कोण जबाबदार होता?      २/९/१२

Posted by : | on : 2 Sep 2012
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *