विश्वसंचार : मल्हार कृष्ण गोखले आपल्या कारकीर्दीत तर ते लोकप्रिय होतेच, पण आजही जनतेच्या मनातलं ज्यांचं स्थान जराही ढळलेलं नाही, असे काही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होऊन गेलेत. त्यांनी खरोखरच इतिहास घडवलाय्. पहिला मान अर्थातच जॉर्ज वॉशिंग्टनचा. मग बेंजामिन फ्रँकलीन, अब्राहम लिंकन, फर्डिनांड रुझवेल्ट आणि शेवटी जॉन केनेडी. सुरुवातीच्या काळात राष्ट्राध्यक्षांची पत्नी हा फारसा कुतूहलाचा, बातमीचा वगैरे विषय नव्हता. फर्डिनांड रुझवेल्ट यांच्या वेळेपर्यंत हा काळ पालटला होता. त्यामुळे रुझवेल्ट यांची पत्नी एलेनॉर हिला प्रसिद्धिमाध्यमांनी खूप प्रसिद्धी दिली. मुळात रुझवेल्ट लोकप्रिय होते आणि एलेनॉरही तिच्या मोकळ्या-ढाकळ्या स्वभावामुळे लोकप्रिय बनली. पण, पती आणि पत्नी प्रसिद्धी, लोकप्रियततेच्या बाबतीत एकमेकांशी जणू स्पर्धा करताहेत, असं घडलं ते जॉन केनेडी आणि जॅकी केनेडी यांच्या बाबतीत. केनडी हे कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे प्रसिद्धीच्या झोतात होते. देखणे, तडफदार, राजकारणात वेगळी चमक दाखवणारे, शिवाय अमेरिकेच्या इतिहासात राष्ट्राध्यक्ष झालेले पहिलेच कॅथलिक, असे त्यांचे वेगवेगळे पैलू होते. जॅकेलिन बोव्हाये ही मूळची फ्रेंच कुटुंबातली. हे कुटुंब अत्यंत श्रीमंत. जॉन राष्ट्राध्यक्ष झाले त्यावेळी या जोडप्याला एक छोटी मुलगी होती. नंतर जॉन (ज्युनिअर) जन्मला. राष्ट्राध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीला मूल होणं ही घटनाही अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत होती. त्यामुळे जॉन, जॅकी आणि त्यांच्या मुलांना माध्यमांनी अभूतपूर्व प्रसिद्धी दिली. या चौकोनी कुटुंबाच्या कौतुकात सगळी अमेरिका स्वत:ला विसरून बसली. जॉन केनेडी तसे ‘सर्वगुणसंपन्न’ होते. ते कुटुंबवत्सल होतेच, पण त्याच वेळी मेरलिन मन्रोसारख्या मदालसेपासून इतरही अनेक ललनांशी त्यांचे उत्तम आधिभौतिक संबंध होते. उत्तम मद्य आणि उत्कृष्ट क्यूबन सिगारचेही ते भोक्ते होते. निवडून येण्यासाठी माफिया टोळ्यांची मदत घेणं त्यांच्या नीतीत सहजपणे बसत होतं. निवडून आल्यावर त्याच माफिया टोळ्यांच्या मागे ते हात धुऊन लागले. राजकीय क्षेत्रात अमरिकन जनतेला आवडेल, अशीच कणखर भूमिका त्यांनी घेतली होती. सोविएत रशियाबरोबरचं शीतयुद्ध शिखराकडे पोचत होतं. अमेरिकेचा अध्यक्ष फक्त एक बटण दाबून अवघ्या दोन मिनिटांत सोविएत रशिया उद्ध्वस्त करू शकतो, अशा प्रकारची अण्वस्त्रांची पेरणी झालेली होती. या काळातली काही माहिती अलीकडेच उजेडात आली आहे. जगभरात सर्वत्र क्रांतीची निर्यात करण्याचे सोविएत सत्ताधार्यांचे प्रयत्न सुरूच होते. स्टालिनचा आकस्मिक मृत्यू होऊन सत्तासूत्रे निकीता खुश्चेव्हच्या हाती आलेली होती. खुश्चेव्हने स्टालिनच्या पाककृत्यांचा जाहीर पाढा वाचला असला, तरी रशियाचं परराष्ट्र धोरण स्टालिनच्या काळातलंच होतं. क्युबा हा अमेरिकेच्या अगदी अंगणातला देश. अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांताच्या सेबल या भूशिराच्या आणि क्युबाच्या मध्ये फक्त एक सामुद्रधुनी एवढंच अंतर. भारत शोधायला निघालेल्या कोलंबसला अटलांटिक महासागराच्या पश्चिम तटावर जी बारकीसारकी बेटं सापडली त्यातलंच एक क्युबा. या क्युबात क्रांती झाली आणि फिडेल कॅस्ट्रो व अर्नेस्टो गव्हेरा या दोघा क्रांतिकारकांनी चक्क साम्यवादी सरकार स्थापन केलं. रशिया ही संधी कशी बरं सोडेल? त्याने क्युबात- अमेरिकेच्या अगदी अंगणात- अण्वस्त्रं उभारली. १९६१ सालची ही गोष्ट. जॉन केनेडी राष्ट्राध्यक्ष होते. या समस्येवरनं आता तिसरं महायुद्ध पेटणार की काय, असं वातावरण निर्माण झालं. केनेडींनी प्रश्न दमदारपणे हाताळायला सुरुवात केली. प्रारंभ झाला तो क्युबाबरोबरच्या व्यापारबंदीने. पण, त्या अगोदर एक गंमत झाली. राष्ट्राध्यक्षांनी आपल्या एका साहाय्यकाला हुकूम सोडला, ‘‘मला ताबडतोब उत्तम दर्जाचे एक हजार हॅवाना सिगार हवे आहेत.’’ थोड्याच वेळात साहाय्यकाने हजाराऐवजी बाराशे हॅवाना सिगारची पाकिटं केनेडींसोर ठेवली. केनेडी समाधानाने हसले. मग त्यांनी टेबलावरची एक फाईल उघडली आणि एका आदेशावर सही ठोकली. क्युबाशी व्यापार बंद करण्याचा तो आदेश होता. हॅवाना हा क्यूबात बनणारा सिगार आहे. ही व्यापारबंदी अगदी आजतागायत चालू आहे. सोविएत रशियाने माघार घेतल्यामुळे क्युबाचा पेचप्रसंग मिटला. केनेडींची प्रतिमा आणखी उजळून निघाली. ते हळूहळू पुढच्या अध्यक्षीय निवडणुकीची तयारी करू लागले. ते जिंकणार याची सगळ्यांनाच खात्री होती आणि २२ नोव्हेंबर १९६३ या दिवशी अचानक त्यांचा खून झाला. सगळं जग हादरलं. संशयाचा काटा फार मोठ्या प्रमाणावर झुकत होता के. जी. बी. म्हणजे रशियन गुप्तहेर खात्याकडे. पण, पोलिस तपासात ली हार्वे ओस्वाल्ड नावाचा अमेरिकन माणूसच सापडला. हा ओस्वाल्ड रशियाला जाऊन आलेला होता. तेवढ्यात न्यायालयात नेल्या जाणार्या ओस्वाल्डला जॅक रुबी नावाच्या आणखी एका इसमाने गोळी घातली आणि नंतर तो स्वत: तुरुंगात मेला. या सगळ्या रहस्यमय घटनाक्रमाचा शोध घेण्यासाठी न्या. वॉरन यांचा आयोग स्थापन करण्यात आला. वॉरन आयोगाच्या चौकशीत के. जी. बी. चा हात आढळून आला नाही. पण, ओस्वाल्डने केनेडींना गोळया का घातल्या, याचं कारणही कळलं नाही आणि जॅक रुबीने ओस्वाल्डला ठार मारण्याचं कारण, आपल्या लाडक्या नेत्याच्या खुन्याला या जगातून नाहीसं करणं एवढंच होतं, असं चौकशी आयोगाला आढळलं. जॉन केनेडींच्या हत्येनंतर आठच दिवसांनी जॅकीने सोविएत अध्यक्ष निकीता खुश्चेव यांना लिहिलेलं व्यक्तिगत पत्र अलीकडेच उजेडात आलं आहे. जॅकी लिहिते, ‘‘तुम्ही व जॉनविरोधक होतात, पण जगाचा विध्वंस होऊ नये, अशी खबरदारी घेणारेही तुम्हीच दोघे होता. तुम्हा दोघांना एकमेकांबद्दल आदर होता आणि कदाचित तुम्ही एकत्र बसून बोलणीही केली असती. आता नवे अध्यक्ष लिंडन जॉन्सन माझ्या पतीचंच धोरण पुढे चालवत आहेत आणि त्यांना तुमची मदत हवी आहे.’’ अमेरिका आणि रशिया दोघेही अण्वस्त्रसज्ज असले, तरी खरोखर अणुयुद्ध पेटलं तर दोघांसकट सगळ्या जगाची राख होईल, हे सत्य दोघांनाही माहीत होतं. जॅकीच्या पत्रातून तेच व्यक्त होत आहे. हॅवाना जॉन केनेडी आणि क्युबन सिगारचा अगोदर दिलेला किस्सा प्रसिद्ध झाल्यावर, त्या सिगारच्या लोकप्रियतेत आणखीनच भर पडली. सिगार म्हणजेच चिरुट. क्युबन सिगारला हॅवाना असं लोकप्रिय नाव आहे. विन्स्टन चर्चिल कायम सिगार फुंकत असत. तो त्यांना हॅवानाचाच लागे. ‘‘माझ्या ओठांवर कायमच क्युबा असतो,’’ असं ते गमतीनं म्हणत. चे गव्हेराला दमा होता, तरीही तो कायम भला थोरला हॅवाना सिगार तोंडात खुपसून बसायचा. फिडेल कॅस्ट्रोही हॅवाना सिगारचा भोक्ता आहे. ‘‘जगातल्या कुठल्याही उत्तम मद्याची एक वेळ नक्कल होऊ शकेल, पण हॅवाना सिगारची नक्कल करणं कुणालाही शक्य नाही,’’ असं तो तोंडातून धुराचे ढगच्या ढग सोडत म्हणत असतो. याला तशीच कारणंही आहेत. मुळात तंबाखू ही वनस्पती याच भूमीतली. लाकडी पाईपमधून तंबाखूची वाळकी पानं जाळून त्याचा धूर घशात ओढणारे इथले स्थानिक लोक पहिल्यांदा पाहिले ते कोलंबसाने. तंबाखू फुंकून पाहिल्यावर त्यालाही म्हणे तरतरी वाटली आणि मग त्याच्यामार्फत ही नवी वनस्पती जगभर पोहोचली. सन १५६० साली फ्रान्सची राणी कॅथरिन डि मेडिसी हिला पोर्तुगालमधला फ्रेंच वकील वॉ निकॉट याने तंबाखूचा धूर ओढण्यातली गंमत दाखवली. म्हणून तर तंबाखूतल्या द्रव्याला निकोटीन हे नाव पडलं. आज तंबाखू हे क्युबाचं सर्वांत जास्त उत्पन्न देणारं पीक आहे आणि या तंबाखूपासून बनणारा हॅवाना सिगार जगभर लोकप्रिय आहे. भारतात आयातबंदीच्या विविध नियमांमुळे सोन्याची तस्करी होते, अमेरिकेत क्युबाबरोबरच्या व्यापारबंदीमुळे हॅवाना सिगारेटची तस्करी होते. स्रोत: तरुण भारत, 10/5/2011
Posted by : AMAR PURANIK | on : 9 Oct 2011 Filed under : Blog Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper.. You can follow any responses to this entry through the RSS 2.0 You can leave a response or trackback to this entry