Home » Blog » दिल्ली दरबार

दिल्ली दरबार

दिल्ली दरबार: रविंद्र दाणीरेकॉर्ड
    जम्मू- काश्मीर विधानसभेत सोमवारी एक अभूतपूर्व घटना घटली. सदस्यांनी- मंत्र्यांनी असांसदीय शब्दांचा वापर करणे आणि सभापतींनी ते शब्द कामकाजातून काढून टाकणे ही सामान्य बाब समजली जाते. लोकसभा- विधानसभांमध्ये हे होत आलेले आहे.पण, जम्मू – काश्मीर विधानसभेत सभापती मोहम्मद अकबर लोन यांनी पीडीपीच्या नेत्यासाठी- मौलवी इफ्तिखार अन्सारी यांच्यासाठी अतिशय आक्षेपार्ह असे शब्द वापरले. दूरचित्रवाणी वाहिन्यांनी ते शब्द गाळून वृत्त दिले. पण, सभागृहाच्या कामकाजात त्यांची नोंद झालेली आहे. हे शब्द कामकाजातून कसे बाहेर काढले जाणार, त्यातील कोणते शब्द राहणार आणि कोणते काढले जाणार. विधानसभा सचिवालयाने याबाबात विधितज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे ठरविले असून, त्यानंतर या असांसदीय शब्दांबाबत निर्णय घेतला जाईल, असे समजते. विधिज्ज्ञांचा सल्ला येईपर्यंत सभापतींनी उच्चारलेले असांसदीय नव्हे तर असभ्य शब्द कामकाजाच्या रेकॉर्डमध्ये राहणार आहेत.
    स्मृतिभ्रंश
    गृहमंत्री पी. चिदंबरम् यांना स्मृतिभ्रशांच्या आजाराने ग्रासले आहे. गृहमंत्रालयाच्या नियमित पत्रपरिषदेत पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना चिदंबरम् याचा संकेत देत होते. अलीकडच्या काळात माझी स्मृती कमजोर झाली आहे, असे सांगत चिदंबरम् सर्व प्रश्‍नांना उत्तरे देण्याचे टाळत होते. तुम्ही आतापर्यंत किती वेळा राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडला, असे विचारले गेले असता चिदंबरम् उत्तरले, आजकाल मी अंकांची गणना करण्यास विसरलो आहे. चिदंबरम् यांच्या सहकार्‍यांना त्यांच्या या उत्तरांचे आश्‍चर्य वाटत आहे. कारण, दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एका मंत्र्याने चिदंबरम् यांच्या विभागाशी संबंधित एक स्पष्टीकरण विचारले होते. त्याला सरळ उत्तर न देता चिदंबरम् यांचे उत्तर होते, अमुक अमुक अहवालाच्या पृष्ठ क्रमांक ५६ वर परिच्छेद क्रमांक १२ वर याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व गोष्टी चिदंबरम् यांना आठवतात, पण पत्रपरिषदेत स्पेक्ट्रम आणि राजीनामा हे दोन शब्द उच्चारले गेले की त्यांचा स्मृतिभ्रंश होतो. हे मंत्री म्हणाले, चिदंबरम्‌ही कलमाडींच्या मार्गाने तर जात नाहीत ना? मंत्रिमहोदय कोणता संकेत करीत होते, हे पत्रकारांच्या लक्षात आले होते.
     दादागिरी
    अर्थमंत्री प्रणव मुखर्जी संतप्त आहेत. प्रणवबाबूंना तसाही संताप लवकर येतो. आणि समोर चिदंबरम् असल्यावर तर दादाचा पारा लवकर भडकतो. चिदंबरम् यांनी प्रणवबाबूंविरुद्ध एक बातमी छापून आणली. ही बातमी खालच्या दर्जाची होती. त्यानंतर मुखर्जीच्या कार्यालयात हेरगिरीचे प्रकरण घडले. स्पेक्ट्रम प्रकरणात मुखर्जी-चिदंबरम् संघर्षात जे काही प्रसिद्ध होत होते, ते सारे चिदंबरम् यांच्या गोटातून होत होेते असे समजते. प्रणव मुखर्जींनी सोनिया गांधींची भेट घेतली. तोडग्याचा तपशील ठरविण्यात आला. या तोडग्याला स्वीकृती देण्यासाठी प्रणवबाबू १०,जनपथवर पोहोचले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी सोनिया गांधींना सर्वप्रथम दूरचित्रवाणी संच सुरू करण्यास सांगितले. सोनिया गांधींना आश्‍चर्य वाटले. सोनिया गांधींनी आपल्या सहायकास तशी सूचना केली. एका चॅनेलवर बातम्या सुरू होत्या. प्रणव मुखर्जीशी सोनिया गांधी काय बोलणार आहेत, कोणता तोडगा काढण्यात आला आहे हे सार्‍या चॅनेलवर सांगितले जात होते. यानंतर प्रणवबाबूंनी विचारले, मॅडम! जी गोष्ट तुम्ही, मी व चिदंबरम् या तिघांनाच माहीत आहे ती या सर्व चॅनेलवाल्यांना कशी कळली. सोनिया गांधींना प्रणवबाबूंचा प्रश्‍न समजला तर होता, पण, त्यावर त्यांच्याजवळ तोडगा नव्हता. कारण, एकीकडे दादा होते, तर दुसरीकडे दादागिरी होती.
    तोडगा
    अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि गृहमंत्री चिदंबरम् यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धात मनमोहनसिंग सरकार होरपळले आहे. प्रत्यक्षात हा संघर्ष मनमोहनसिंग विरुद्ध प्रणवबाबू असल्याचे सोनिया गांधी व कॉंग्रेसच्या लक्षात आले आहे. पंतप्रधान स्वत: कोणतीही समस्या हाताळू शकत नाहीत, त्यांना प्रत्येक बाबीसाठी प्रणवबाबूंवर अवलंबून राहावे लागते आणि याचा गैरफायदा मुखर्जी उठवितात, असे पंतप्रधानांना वाटत असल्याचे म्हटले जाते. अण्णा हजारे यांचे आंदोलन असो की स्पेक्ट्रम घोटाळा प्रणव मुखर्जीनी सरकारला अडचणीत आणले, असे मनमोहनसिंग यांना वाटते, तर प्रणव मुखर्जी सर्व समस्यांसाठी पंतप्रधान व गृहमंत्री जबाबदार असल्याचे सांगत आहेत. स्पेक्ट्रम घोटाळ्यात पंतप्रधान व गृहमंत्री एकीकडे, तर प्रणवबाबू दुसरीकडे अशी स्थिती तयार झाली होती. यावर मार्ग शोधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मुखर्जींना पंतप्रधान केले जाईल, असे कुणालाही वाटत नाही. मात्र, सरकार व प्रणवबाबू यांना सांभाळण्यासाठी प्रणवबाबूंना राष्ट्रपतिभवनात पाठविण्यात यावे, असा एक प्रस्ताव समोर येत आहे. प्रणव मुखर्जींच्या नावाला विरोधी पक्षही पाठिंबा देतील. एका दगडात दोन पक्षी मारले जातील. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांना पराभूत करता येईल आणि सरकारमधील विरोधकाला- प्रणवबाबूला बाजूला करता येईल.
स्रोत: तरुण भारत, 10/9/2011
Posted by : | on : 9 Oct 2011
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *