आजचा अभिमन्यू
शेवटी टीम अण्णाने समाजकारणातून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला व सर्वच मी्डियामध्ये चर्चेच्या फ़ैरी झडू लागल्या. की ‘हा निर्णय योग्य की अयोग्य?’ किंवा ‘हा निर्णय भारतात येणार्या काळातील राजकारणाला कलाटणी देईल का?’ किंवा ‘आजचा शिक्षित तरूण जो बदनाम राजकारण्यांमुळे सक्रीय राजकारणात येण्यास घाबरत होता तो या प्रवाहात सामील होईल का?’ वगैरे. हे सर्व कार्यक्रम पहाताना एक घटना आठवली. साधारणत: १९६८ च्या सुमारास महाराष्ट्रात ‘युवक क्रांति दल’ नावाची एक तडफ़दार तरूणांची समाजकारण करणारी संघटना जन्माला आली. कुमार सप्तर्षीप्रणित या संघटनेत विद्यमान खासदार हुसेन दलवाई, विद्यमान न्यायाधीश हेमंत गोखले, अर्थतज्ञ भालचंद्र मुणगेकर विचरवंतांबरोबर माझी बहिण शैला सातपुते व मोठा भाऊ गिरीश नार्वेकर हेही संस्थापक सभासद होते. आमच्या वरळी नाक्या्वरील खोलीसमोरच्या पडवीत हे भारावलेले तरूण रात्र रात्र बसून मार्क्स, ट्रॉटस्की, जयप्रकाश नारायण, गांधीजी, कम्यूनिझम, भांडवलशाही, समाजवाद वगैरेवर हिरीरीने चर्चा करीत. मी युक्रांदिय नसलो तरी ते ऐकत असे. म्हणुन असेल, मी युक्रांदच्या गाजलेल्या राशीन गावातल्या तीन दिवसाच्या शिबीराला गेलो होतो. तिथे त्यावेळचे झुंजार व द्रष्टे नेते जॉर्ज फ़र्नांडीस यांनी आपल्या भाषणात समाजकारण करणार्या संस्थांपुढील समस्या सांगताना इंग्लंडचे प्रसिद्ध राजकारणी अटली यांचा किस्सा सांगितला. अटलींना समाजकारणाची आवड. तरूण वयातच ते रस्त्यावर उतरून मोर्चात व चळवळीत सहभागी होऊ लागले. एकदा त्यांना एका वयस्कर नेत्याने सांगितले, की लोकांच्या या समस्या रस्त्यावर उतरून नाही तर पालिकेत जाऊन सोडवल्या जातात, तेव्हा अटली निवडणूक लढवून पालिकेत गेले. तिथे छोटे-मोठे प्रश्न सुटले; पण मोठे प्रश्न तसेच राहिले. तेव्हा ते विधानसभेवर निवडून गेले. तिथेही काही प्रश्न धसास न लागल्यामुळे सल्ल्यानुसार ते संसदेत गेले. तिथेही विरोधी पक्षात बसून कळकळीने मुद्दे मांडत राहिले. तेव्हा एका अत्यंत बुजूर्ग नेत्याने सल्ला दिला, की ‘जनता रस्त्यावर येत नाही तोपर्यंत राजकारण्यांना जाग येणार नाही!’ आज समाजकारण व राजकारण हे एकमेकात गुंतून अटलींनी अनुभवलेलं कधीही न संपणारं दुष्टचक्र जनतेभोवती तयार झाले आहे. ते भेदण्यासाठी नेत्यांच्या हाकेला वारंवार प्रतिसाद देऊन आजचा अभिमन्यू म्हणजेच तळागाळातला सामान्य माणुस या चक्रव्युहात शिरतो: पण हे चक्रव्युह भेदण्याची शक्ती नसल्याने व परत फ़िरण्याचा मार्ग माहित नसल्याने वीरमरण पत्करणे; हे त्याचे नशीब पाच हजार वर्षापुर्वीचे होते व आजही आहे. मागच्या पिढीनेसुद्धा अभिमन्यूचे नशीब भोगले होते. आणिबाणीचा विरोध म्हणून जेपींच्या नेतृत्वाखाली ‘संपुर्ण क्रांती’चा नारा देत त्यावेळच्या चारित्र्यवान नेत्यांनी सामान्य माणसांच्या हक्कासाठी जनता पार्टीची स्थापना केली. आम्हीही इलेक्शनमध्ये झपाटून दिवसरात्र काम केले. जनता पार्टी निवडूनही आली; पण तीनच वर्षात वैचारिक मतभेदांमुळे फ़ुट पडून सरकार कोसळले आणि सक्रीय राजकारणातून समाजकारण करण्याची बहुतेक तरूणांची इच्छाशक्तीच अभिमन्यूसारखी मृत झाली आणि मीही तिथून निघून सिनेमाच्या चकचकीत विश्वात रमून गेलो. – एन चंद्रा चित्रपट निर्माता
आज जेवढ्य़ा आवेशात केजरीवाल बोलतात वा शिसोदिया अवघे सत्य आपल्याला गवसले असल्याच्या सुरात सांगतात, तसेच तेव्हाच्या युक्रांदीयांची अवस्था होती. पण त्यांचा तो निव्वळ मुर्खपणा कसा आहे, त्याकडे एका द्र्ष्ट्या नेत्याने त्यांचे लक्ष वेधले होते. त्याचे नाव जॉर्ज फ़र्नांडिस. लोकशाही नावाचा चक्रव्युह कसा असतो, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यातले चंदूचे भाष्य़ मला खुप आवडले. चक्रव्युह भेदायचे तंत्र ठाऊक नसलेल्या अभिमन्यूने तेव्हा पाच हजार वर्षापुर्वी त्यात शिरून तो भेदण्याचा जो मुर्खपणा केला, त्यातूनच आजही आवेशातले तरूण पुढे जातात आणि तसेच फ़सतात, बळी जातात, चंदूचा हा निष्कर्ष अप्रतिम आहे. तो सप्तर्षींपासून हुसेन दलवाई व निलम गोर्हेपासून भालचंद्र मुणगेकर यांच्यापर्यंत सर्वांना सारखाच लागू होतो. फ़रक किरकोळ आहे. कालचे हे अभिमन्यु आजच्या अभिमन्यूंना मुर्ख ठरवण्यात आपला शहाणपणा शोधत असतात. किंवा आपण फ़सलोच नव्हतो, असा आव आणत असतात. म्हणून तर संसदिय लोकशाहीच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलण्यात आपले उमेदीचे आयुष्य खर्ची घालणारे हेच लोक, आज त्याच लोकशाहीचे गुणगान करण्यात धन्यता मानताना दिसतात. अर्थात चंदूने ज्या काळाची गोष्ट सांगितली आहे, तेव्हा आजचे वाहिन्यांवरचे अनेक राजकीय विश्लेषक अर्ध्या चड्डीत वावरत होते वा गोट्या तरी खेळत होते किंवा पाळण्यात आपल्या पालकांना आपले पाय तरी दाखवत असावेत. त्यात आसबेसरांपासून चिंतनशील समर खडसपर्यंत सर्वांचा समावेश होतो. आपण ज्यांच्याकडून हे उष्टे खरकटे विश्लेषण बाळकडू म्हणून घेतले आहे, तेही त्याच चक्रव्युहात घुसमटून गेलेले बावळट अभिमन्यूच होते, याचाही यांना थांगपता नाही. तेव्हा त्यांनी त्याच वाटेवरून निघालेल्या केजरिवाल किंवा अण्णा टीमची टवाळी करावी यात नवल नाही.
कशी गंमत असते बघा. जेव्हा मुलगी वयात येते किंवा मुलगा तरूण होतो आणि ते प्रेमात वगैरे पडत असतात ना, तेव्हा मानवी इतिहासात प्रथमच काही आगळावेगळा प्रयोग आपण करीत आहोत; अशी त्यांची पक्की समजूत असते, असे प्रेम दुसर्या कोणी केले नाही आणि यापुढे कोणाला जमणार नाही. असेच त्या दोघांना ठामपणे वाटत असते. त्याशिवाय कधी ‘ठाम मत’ तयार होऊ शकते का? सहाजिकच ठाम मताचे विचारवंत किंवा विश्लेषक म्हणुन जे वाहिन्यांवर तोंडाची वाफ़ दवडत असतात, ते विसरतात, की कालपरवा त्यांनीही हनीमून केलाच होता की. मग आजच्या नवविवाहीतांना नाके मुरडण्यात काय हशील आहे? आता खुद्द अण्णा टीमनेच लोकपाल आंदोलनाची कास सोडली आहे व राजकारणाकडे मोर्चा वळवला आहे. तेव्हा, एक वर्षभर चालू असलेली ही लेखमाला इथेच संपवून थोडे अन्य विषयांवर लक्ष केंद्रित करावे असे मलाही वाटते. जेव्हा १४ ऑगस्टला ही लेखमाला लिहिणे सुरू केले, तेव्हा ती इतकी वळणे घेत दिर्घकाळ चालु राहिल अशी माझीही अपेक्षा नव्हती. पण संदर्भ आणि मुद्देच असे निघत गेले, की वर्ष केव्हा संपले ते कळलेच नाही. असो, उद्यापासून नव्याने हरिओम करावे म्हणतो.
१४/८/१२