सडेतोड : अरुण रामतीर्थकर
नरेंद्र मोदी यांचे नाव येताच कॉंग्रेस, समाजवाद्यांना उचकी लागावी, हे स्वाभाविक आहे. मात्र अण्णा चमूलाही तसेच होत असेल असे वाटले नाही. मोदी-रामदेवबाबा यांना एका व्यासपीठावर पाहून केजरीवाल, संजयसिंह संतापले. खुद्द अण्णा हजारे यांची भूमिका काय? अण्णा चमूही सेक्युलर झाला की काय?
नरेंद्र मोदी ही व्यक्ती अशी आहे की, टीकेमुळे ती अधिकाधिक प्रसिद्ध आणि लोकप्रिय होतआहे. इतर माणसे प्रसिद्धी मिळवण्यासाठी धडपडतात. नरेंद्रभाईंना असे कधीच धडपडावे लागले नाही. तरीही देशातील ४ मुख्यमंत्र्यांची नावे सांगा असे विचारले तर पहिले नाव मोदींचेच येईल. त्यांच्यामुळे इतरही प्रसिद्धी मिळवतात. तिस्ता सेटलवाड हे त्यापैकीच एक नाव. एक खोटारडी आणि अक्कलशून्य बाई. मोदीविरोधात खर्याखोट्याची चाड न बाळगता वर्तन करून आज तिला केवढी प्रसिद्धी मिळाली! केवळ बुद्धीच्या जोरावर ओळखायचे म्हटले असते तर तिस्ता सेटलवाड हे नाव वृत्तपत्रात कधीच आले नसते.
शाहीद सिद्दिकी नावाचे एक राजकारणी आहेत. उत्तर प्रदेशातील भाजपा सोडून बाकी सर्व पक्षांतून त्यांची ये जा होऊन गेली आहे. सिद्दिकी भाजपाच्या वाटेवर आहेत असे म्हणतात. या सिद्दिकींच्या वडिलांनी नई दुनिया हे वृत्तपत्र काढले. सध्या त्याचा कारभार शाहीद बघतात. उत्तर भारतात ३-४ राज्यांत त्याचा खप आहे. हे वृत्तपत्रही फार थोड्यांना माहिती होते. शाहीदनी नरेंद्र मोदींची मुलाखत घेऊन छापली आणि लगेच सिद्दिकी आणि त्यांच्या वृत्तपत्राचे नाव भारतभर झाले. या मुलाखतीमुळे समाजवादी पक्षाने त्यांना लगेच पक्षातून काढले (वृत्तपत्र स्वातंत्र्य झिंदाबाद).
विजय दर्डा हे कॉंग्रेसचे खासदार आहेत. अहमदाबादमध्ये जैनांच्या एका व्यासपीठावर दर्डा-मोदी आले. तेथे रामदेवबाबाही होते. यावेळी केलेल्या भाषणात दर्डांनी मोदींचे वर्णन ‘गुजरातचा सिंह’ असे केले. आता कॉंग्रेस पक्षाने दर्डांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या दर्डांनी खासदार निधीचा आत्यंतिक दुरुपयोग केल्याचे माहिती अधिकारामुळे सर्वतोमुखी झाले आहे. या गोष्टीबद्दल कॉंग्रेसने आणि संसदेने त्यांना खुलासा विचारायला हवा होता. कारवाई करायला हवी होती. हे गंभीर प्रकरण दुर्लक्षित, पण येथे असलेल्या रामदेवबाबांनी काय करावे काय करू नये हे सांगण्याचे धारिष्ट्य त्यांनी दाखविले.
अण्णा हजारेंचा लोकपाल विधेयक हा वादाचा मुद्दा आहे. लोकपालाच्या हाती किती अधिकार द्यावेत? याबाबत सत्तारूढ कॉंग्रेसविरोधी भाजपा या दोन्ही प्रमुख पक्षांची वेगळी मते आहेत. भ्रष्टाचार संपवला पाहिजे यात वाद नाही, मात्र त्याच्या मार्गाबाबत मतभिन्नता आहे. रामदेवबाबांनी विदेशी बँकेत असलेला भारतीयांचा काळा पैसा हा जो विषय घेतला, तो वादातीत आहे. तो नि:संशय देशकल्याणाचा आहे. देशहिताच्या दृष्टीने विचार केला तर लोकपाल अस्तित्वात आला काय, न आला काय, सामान्य माणसाला काहीच फरक पडत नाही पण विदेशातील काळा पैसा परत आणण्यात जर यश आले तर अशी समृध्दी येईल की, कोणीही गरीब राहणार नाही हाच मुद्दा महत्त्वाचा आहे. रामदेवबाबा यांचे भगवे कपडे, त्यांच्या व्यासपीठावरील साध्वी ऋतंबरा यांची उपस्थिती किंवा मोदींच्या व्यासपीठावर रामदेवबाबा यांची उपस्थिती या गोष्टी ज्यांना खटकत असतील त्यांनी रामदेवबाबांच्या चळवळीपासून दूर व्हावे. अण्णा चमूने रामदेवबाबांशी संबंध तोडायचे ठरवले तर तसा निर्णय अण्णा हजारे यांनी घ्यायला हवा. रामदेवबाबा आणि अण्णा हजारे यांनी एकमेकांच्या सहयोगाने लोकपाल आणि काळे धन यासाठी आंदोलन करावे, अशी सर्वसामान्य माणसाची इच्छा आहे. असे होऊ नये अशी कॉंग्रेसची जशी इच्छा आहे, तशीच केजरीवाल यांची असेल तर प्रश्न वेगळा.
मात्र हा निर्णय अण्णा हजारे यांनी घ्यायला हवा. ते तसे लवचिक आहेत. व्यासपीठावरून ते वंदे मारतरम्च्या घोषणा देतात. त्याला आक्षेप घेण्यात आला. त्याचवेळी इन्कलाब झिंदाबाद घोषणेचा आग्रह धरला गेला. अण्णा आता भारत माता की जय, वंदे मातरम् आणि इन्कलाब अशी घोषणा देतात. सेक्युलरांच्या समाधानासाठी त्यांनी वंदे मातरम् घोषणा वगळली नाही. मोदी अत्यंत कार्यकुशल आणि स्वच्छ चारित्र्याचे असताना त्यांना करप्ट आणि कम्युनल म्हणण्याची काही लोकांची फॅशन आहे. मोदींबद्दलचे दोन चांगले शब्द कॉंग्रेसला झोंबले. खासदार म्हणून दर्डांची कामगिरी शून्य आहे. त्यांना आजपर्यंत (स्वतःचे वृत्तपत्र सोडून) जेवढी प्रसिध्दी मिळाली, त्याच्या दसपट प्रसिध्दी एका मोदी भेटीमुळे मिळाली.
असा आहे मोदी महिमा! समाजवादी किंवा कॉंग्रेसला त्यांच्या नावाचे ओवळे वाटणे हे मी समजू शकतो. मात्र मोदी आणि रामदेवबाबा एकाच व्यासपीठावर आल्यामुळे टीम अण्णाला पोटशूळ उठावा, हे न समजण्यासारखे आहे. मुलायम-सोनिया आणि अण्णा हजारे यांना एकाच वैचारिक पातळीवर आणण्याचा हा प्रकार आहे. अरविंद केजरीवाल आणि संजयसिंह या टीम अण्णाच्या सदस्यांनी रामदेवबाबांबर टीका करून कॉंग्रेसप्रमाणेच आपणही स्युडो सेक्युलर असल्याचे दाखवून दिले आहे. केजरीवाल आणि संजयसिंह हे कोण? हे गेल्या वर्षीच्या ऑगस्टपूर्वी कोणाला माहितीही नव्हते. अण्णा हजारे यांचे नेतृत्व लाभले म्हणून ते प्रकाशमान झाले. आत्तादेखील केजरीवाल उपोषणास बसले तेव्हा जंतरमंतरवर शुकशुकाट होता. त्यामुळेच अण्णांना प्रकृती ठीक नसताना उपोषणास बसावे लागले. अण्णा उपोषणाला बसताच जंतरमंतरवर पूर्वीसारखी गर्दी झाली. गर्दी आपल्यामुळेच होते असा भ्रम केजरीवाल आणि संजयसिंह यांना झाला. त्यामुळेच मोदी-रामदेवबाबा भेटीवरील टीमअण्णांची भूमिका, वादग्रस्त भूमिका त्यांनी परस्पर मांडली.
आपल्या व्यासपीठावर रामदेवबाबा यांना बोलावयाचे नाही, असे केजरीवालांना वाटत असेल तर त्यांनी खुशाल तसा निर्णय घ्यावा. रामदेवबाबा हे केजरीवाल यांच्याप्रमाणे परप्रकाशी नाहीत. त्यांचे योगप्रसार हे ध्येय आहे. काळ्या पैशाविरुध्द लढा हा त्यांचा स्वतंत्र कार्यक्रम आहे. रामलीला मैदानावर रामदेवबाबांसाठी हजारो लोक जमले होते. रामदेवबाबा स्वयंप्रकाशित आहेत. आपल्यामुळे रामदेवबाबांना प्रसिध्दी मिळाली, असा केजरीवालांना भ्रम झाला आहे. त्यामुळेच अण्णांच्या बरोबरीचे बिच्चारे १० वर्षे कोकलून दमले. मोदी यांच्यावर ओरखडाही उठलेला नाही. मात्र अण्णांच्या तंबूतून मोदी यांच्यावर कोणी बाण सोडत असेल तर ते अण्णांच्या परवानगीने की परस्पर, हे कळले पाहिजे. मोदी करप्ट आणि कम्युनल आहेत असे अण्णांना वाटत असेल तर त्यांनी तसे जाहीर करावे. म्हणजे अण्णांच्या आंदोलनाबाबत फेरविचार करण्याचा इतरांचा मार्ग मोकळा होईल.
रविवार, दि. ०५ ऑगस्ट २०१२