•चौफेर : अमर पुराणिक•
राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने किंवा केंद्राच्या दृष्टीने युतीच्या समिकरणाची वेगळी कारणे आहेत तर राज्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने वेगळी आहेत. केरळमध्ये माकपाच्या नेतृत्वातील एलडीएफ आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वातील युडीएफ यांच्यात धृ्रवीकरण कायम आहे. या दोन्हीही युत्या केंद्रात सत्तेत असलेल्या रालोआचे विरोधक आहेत. तर या उलट तामिळनाडुत प्रमुख दोन पक्ष अण्णा द्रमुक आणि द्रमुक हे आहेत. या दोन्ही पक्षांचे केंद्रातील रालोआ सरकारशी वैरही नाही किंवा मैत्रीही नाही असे संबंध आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस आणि डावी आघाडी यांच्यात लढत आहे. निरंतर ३४ वर्षांच्या डाव्यांच्या शासनकाळानंतर मागच्या वेगळी बंगालच्या जनतेने तृणमूल कॉंग्रेसला डाव्या आघाडीला भूईसपाट करत ममतादीदींच्या हातात निरंकुश सत्ता सोपवली. त्यामुळे आधीच्या काळात एकमेकांविरोधात असलेले माकपा आणि कॉंग्रेस मतांचे ध्रुवीकरण टाळण्यासाठी आणि ममतादीदींच्या तृणमूलला सत्ताच्यूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडु, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यात दिनांक ४ एप्रिल ते १६ मे दरम्यान विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकींच्या तारखा जाहीर झाल्यापासून या पाच राज्यात प्रचाराची राजकीय धूळवड सुरु झाली आहे. या पाचही राज्यात भाजपा सत्तेवर नाही. आसाम वगळता इतर चार राज्यात भाजपाचे अस्तित्व अतिशय नगण्य आहे. त्यामुळे या पाच राज्यात खरी परिक्षाही कॉंग्रेस आणि डाव्यांची आहे.
बहुदा निवडणुकांचा सीझन सुरु झाला की विरोधी पक्षांच्या एकतेची चर्चा सुरु होते. त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही की या पाच राज्यातील निवडणुका जाहीर झाल्यापासून विरोधकांच्या युती-प्रतियुतीच्या हलचाली सुरु झाल्या आहेत. या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे आपले एक स्वतंत्र वैशिष्ठ आहे. संसदेतील एकुण जागांपैकी या पाच राज्यातून एक चतुर्थांशपेक्षा थोडे कमी प्रतिनिधी निवडुन आले आहेत. त्यामुळे काही राजकीय अभ्यासक याला दुय्यम महत्त्व देतात. असे असले तरीही या निवडणुकांचे महत्त्व नाकारता येत नाही. कारण बर्याचा बहुमताच्यावेळी ही नगण्यता महत्त्वाची ठरत असते. त्यामुळे या निवडणुकांचे राजनीतिक अर्थ शोधणे अवघड होऊन जाते.
राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने किंवा केंद्राच्या दृष्टीने युतीच्या समिकरणाची वेगळी कारणे आहेत तर राज्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने वेगळी आहेत. केरळमध्ये माकपाच्या नेतृत्वातील एलडीएफ आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वातील युडीएफ यांच्यात धृ्रवीकरण कायम आहे. या दोन्हीही युत्या केंद्रात सत्तेत असलेल्या रालोआचे विरोधक आहेत. तर या उलट तामिळनाडुत प्रमुख दोन पक्ष अण्णा द्रमुक आणि द्रमुक हे आहेत. या दोन्ही पक्षांचे केंद्रातील रालोआ सरकारशी वैरही नाही किंवा मैत्रीही नाही असे संबंध आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस आणि डावी आघाडी यांच्यात लढत आहे. निरंतर ३४ वर्षांच्या डाव्यांच्या शासनकाळानंतर मागच्या वेगळी बंगालच्या जनतेने तृणमूल कॉंग्रेसला डाव्या आघाडीला भूईसपाट करत ममतादीदींच्या हातात निरंकुश सत्ता सोपवली. त्यामुळे आधीच्या काळात एकमेकांविरोधात असलेले माकपा आणि कॉंग्रेस मतांचे ध्रुवीकरण टाळण्यासाठी आणि ममतादीदींच्या तृणमूलला सत्ताच्यूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशीच स्थिती थोड्याफार फरकाने इतर राज्यातही आहे.
या पाच राज्यातील निवडणुकीपैकी सर्वात महत्त्वपुर्ण निवडणुक ठरली आहे ती आसामची. येथे सत्तेत असलेल्या कॉंग्रेस पक्षाकडून सत्ता खेचून आणण्यासाठी भाजपा गंभीरपणे प्रयत्न करत आहे आणि भाजपाला यात यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच बिहारप्रमाणे भाजपाविरोधात सर्व विरोधकांनी एकत्र लढण्याचा विचार झाला होता. पण तो यशस्वी झाला नाही. येथे भाजपाने आसाम गण परिषद आणि इतर काही छोट्या पक्षांशी युती केली आहे. भाजपाच्या या प्रयत्नांची गंभीरता यामुळेही वाढते की २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने एकट्याने आसाममध्ये लोकसभेच्या जागांवर बहुमताने केवळ कब्जाच केला नव्हता तर अर्ध्यांहून अधिक विधानसभांच्या जागांवर आघाडीही घेतली होती. आसाममधील लोकसभेच्या १४ जागांपैकी ७ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. भाजपा एकट्याने येथे सत्तेवर येऊ शकतो असे असले तरीही भाजपाने युती करण्याचा निर्णय घेतला. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या कॉंग्रेसच्या तरुण गोगोई सरकारची यावेळी मात्र परिस्थिती गंभीर झाली आहे.
भाजपाने आसाममध्ये सर्बनंद सोनेवाल यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणुन घोषित केले आहे. लोकसभेच्या कॉंग्रेसच्या पराभवानंतर हेमंत बिस्वाल शर्मा यांनी कॉंग्रेसला रामराम करत ९ कॉंग्रेसच्या आमदारांसह भाजपात प्रवेश केला आहे. याशिवाय अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. याचा फायदा भाजपला मिळण्याची शक्यता आहे.
आसामनंतर तामिळनाडुची निवडणुक अतिशय रोमहर्षक ठरणार आहे. तामिळनाडुतील चार नेत्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. तामिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता, डीएमकेचे प्रमुख करुणानिधी, तमिळ अभिनेता विजयकांत आणि पीएमके नेता डॉ. रामदास यांच्या दृष्टीने करो या मरोची लढत ठरणार आहे. विशेष म्हणजे हे चारही नेते स्वतंत्रपणे लढत आहेत त्यामुळे येथील लढती चौरंगी होणार आहेत. त्यामुळे मतांचे विभाजन होणार हे निश्चित. या मतविभागणीचा फायदा जयललितांना मिळणार आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत जयललितांच्या पक्षाने तामिळनाडुतील ३९ जागांपैकी ३७ जांगांवर विक्रमी विजय मिळवला होता. एकुण मतांच्या ४४ टक्के मते जयललितांच्या पारड्यात पडली होती. २०११ च्या विधानसभा निवडणुकीत जयललितांच्या अद्रमुकला १५१ जागा मिळाल्या होत्या आणि ३८ टक्के मते मिळाली होती. यावषींच्या निवडणुकीत जयललितांनी कोणाशीही युती केलेली नाही. अनेकांच्या प्राथमिक अभ्यासातून हाच अंदाज समोर आला आहे की जयललितांचा अद्रमुक पुन्हा बहुमताने निवडुन येईल.
निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्याबरोबर बहुसंख्य निवडणुक सवेंक्षणानुसार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींना पुन्हा सत्ता मिळणार आहे. इतकेच नाही तर मागच्या निवडणुकीपेक्षां मोठ्या बहुमतांनी ते सत्तेत येतील असा अंदाज वर्तवला गेला आहे. २०११ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसला ४० टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. ममतांच्या तृणमूल कॉंग्रेसची ही २०११ च्या निवडणुकीतील लाट याही वेळी कायम रहाणार आहे असे दिसते. दुसर्याबाजूला काही अभ्यासकांच्या मते ममता सरकारच्या ५ वर्षांच्या कालावधीत तमाम संविधानिक संस्था आणि लोकशाही मुल्यांचे अवमुल्यन केल्यामुळे त्याचे दुष्परिणाम तृणमूलला भोगावे लागणार आहेत. बंगालमध्ये गुंडगिरी, हिंसाचाराच्या घटना मोठ्याप्रमाणात घडल्या आहेत. विशेषत: हिंदूंवर मोठ्याप्रमाणात अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून भाजपाने पश्चिम बंगालमध्ये जोरदार कार्य सुरु केले आहे. पक्ष बांधणी बरोबरच सामाजिक समस्यांवर आणि हिंसाचारावर भाजपाने जोरदार आणि खंबीर भूमिका घेतली आहे त्याचा फायदा भाजपाला मिळणार हे नक्कीच. शिवाय नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे बंगालची अस्मिता जपणारे आणि सुभाषबाबूंना मानणारा मोठा वर्ग यावेळी भाजपाच्या पाठीशी उभा राहणार आहे. ममता राज्यात हिंदूंवर मोठ्याप्रमाणात अत्याचार झाले तेव्हा भाजपाने खंबीर भूमिका घेतली त्यामुळे मोठ्याप्रमाणात भाजपाच्या मतांत वाढ होणार आहे. भाजपा सत्तेत येणार नसला तरीही यावेळी भाजपाचा बंगालमधील राजकीय पाया पक्का होणार हे निश्चित आहे.
यात खरी दूरावस्ता होणार आहे ती माकपाची. कॉंग्रेसची स्थिती बंगालमध्ये गेल्या तीन दशकांपासून वाईटच आहे. पण डाव्यांची स्थिती सुधारण्याची याहीवेळी लक्षण दिसत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. डाव्यांच्या मताला तृणमूल आणि भाजपामुळे खिंडार पडणार आहे. भाजपा या निवडणुकीत डाव्यांची आणि तृणमूलची पारंपारिक मते मोठ्याप्रमाणात खाणार आहे. याचा परिणाम तृणमूलला इतका होणार नाही पण डाव्यांना मात्र मोठे नुकसान सोसावे लागणार असल्याचे बोलले जाते. केरळमध्ये मात्र कॉंग्रेस आणि डाव्यांमध्ये तुल्यबळ लढत होणे अपेक्षित आहे. यावेळी डावे केरळमध्ये कॉंग्रेसवर मात करतील असा मतचाचण्यांचा प्राथमिक अंदाज आहे. एकंदर या निवडणूका भाजपाच्या विरोधकांची परिक्षाच ठरणार असल्या तरीही भाजपाला या राज्यात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी झटणे आवश्यक आहे. या राज्यात आपली मते वाढवून भाजपा जर दोन आकडी जागा जिंकू शकला तर हे मोठे यश म्हणावे लागेल आणि याचा फायदा भविष्यात या राज्यात पक्षाला होणार हे नव्याने सांगायला नको. आणखी पुढे होणार्या दूसर्या, तिसर्या टप्प्यातील मतचाचण्यातून अधिक स्पष्ट चित्र समोर येईलच.