•चौफेर : अमर पुराणिक•
देशाच्या सर्वोच्च मानले गेलेल्या संसदेवर हल्ला करणार्या अफजल गुरुचे समर्थन करत देशाचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मिरला भारतापासून तोडण्याच्या पाकिस्तान आणि चीनच्या कारस्थानाला खतपाणी घालणार्या सेक्यूलर आणि डाव्यांना भारतमातेचा जयघोष सहन होत नाहीये. याच अस्वस्थतेतून वाटेल तो युक्तीवाद करत जनतेच्या मनावर थोपवण्याचा प्रयत्न केला जातोय. राष्ट्रप्रेमाबाबत जनतेच्या भावना बोथट करण्याचा घातकी उद्योग आता थांबवावाच लागेल.
भारत मातेच्या जयघोषावरुन सध्या जो वाद घातला जातोय तो पाहता वाटतेय की राष्ट्राला दुय्यम ठरवले जातेय की काय? राष्ट्रवादाला फाटा देत डाव्यांनी आणि सेक्यूलर बुद्धीवंतांनी या विषयावर अतिशय विकृत भूमिका स्विकारली आहे. प्रथमदर्शनी असे दिसते की हा वाद ओवैसी यांनी भारत माता की जय म्हणण्यास विरोध केला आणि त्यांच्या सारख्या आणखी काही नेत्यांनी अनावश्यक विधाने करत फतवा जारी केला.
खरे तर एक मुस्लिम लेखक, समिक्षक, राजकीय अभ्यासक फिरोज बख्त अहमद यांनी समर्पक उत्तर आपल्या एका हिंदी दैनिकातील लेखातून दिलंय. भारतमातेच्या जयजयकारावरुन मुस्लिम नेता आणि संघटनांनी वाद घालून भारतीय मुस्लिमांच्या भावनांवर आघात केला आहे. फतवेबाजी करणार्या व स्वत:ला मुसलमानांचे ठेकेदार समजणार्या या मंडळींनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी की भारत प्रत्येकाच्या धार्मिक सद्भावना जपणारा देश आहे. येथे हिंदू – मुसलमान समाधानाने नांदत असताना त्यांच्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. अशा लोकांनी आता हेही समजुन घेतले पाहिजे की भारत माता की जय आणि मादरे वतन जिंदाबाद यांत काहीही फरक नाही. त्यामुळे अशा नेत्यांच्या अनावश्यक सक्रियतेमुळे खांद्याला खांदा लावून चालणार्या हिंदू -मुसलमानांमध्ये दरी निर्माण करण्याचा आणि ती वाढवण्याचा उद्योग करु नये, असा लेखक श्री फिरोज बख्त अहमद यांनी अतिशय योग्य सल्ला अशा फतवेबाज नेत्यांना दिला आहे.
भारत मातेच्या जयकाराचा वाद प्रथमदर्शनी ओवैसी यांच्यामुळे पेटला असल्याचे दिसत असले तरी हा वाद काही तथाकथित सेक्यूलर विचारवंतांनी आणि डाव्यांनी उकरुन काढला आहे. यात तेल ओतण्यात माध्यमेही सामिल आहेतच. असल्या भोंगळ सेक्यूलर विचारवंतांना आणि डाव्यांना जवाहरलाल नेहरु विद्यापीठात देशविरोधी घोषणा दिलेले चालते पण भारत मातेचा जयघोष चालत नाही. भारत मातेचा जयघोष करणे हे त्यांच्या व्यक्तीस्वांतत्र्यावर घाला घातल्यासारखे वाटते. जेएनयूमध्ये ‘भारत बरबादी तक जंग रहेगी’ सारख्या देशद्रोही घोषणा देणे हे त्यांना योग्य वाटते पण भारताचा जयजयकार करणे मात्र चालत नाही आणि वर उलट राष्ट्रवादावर बाष्कळ चर्चा करतात. हा कसला त्यांचा राष्ट्रवाद?
खरे तर हा खेदाचा विषय आहे की भारतासारख्या विशाल देशात अनेक गंभीर समस्या आहेत. त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे सोडून ही कम्यूनिस्ट, सेक्यूलर आणि कॉंग्रेसची नेते मंडळी विनाकारण वाद निर्माण करणारे विषय शोधत आहेत. भाजपा नेते, सरसंघचालक व इतर संघाच्या प्रवक्त्यांच्या विधानांची मोडतोड करुन सोयीचे अर्थ लावत हा वाद पेटवण्याचा सध्या एककलमी कार्यक्रम सुरु आहे. काही सेक्यूलर विचावंत लेखकांनी तर आपल्या विकृत कल्पनाविलासाला स्वैर भरारी देत लवकरच संघ परिवार भारत मातेचा जयघोष करवून घेण्याची सक्तीची मोहिम राबणार असल्याची मखलाशी केली आहे. नकार देणार्यांना लाखोंच्या संख्येने सिर कलम करण्याची धमकी देणार असल्याचाही विकृत कल्पनाविलास केला आहे.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्र विधानसभेत एका स्वरात भारत माता की जय म्हणण्यास नकार देणार्या वारिस खान पठाण या आमदाराला या सत्रासाठी विधानसभेतून निलंबित केल्याचाही दुखडा या लेखकाने व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आहे आणि त्यांचे भरपूर आमदार आहेत हे ही सेक्यूलर लेखक मंडळी विसरली की काय? आणि महाराष्ट्रातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी जर भारतमातेच्या जयघोषाला पाठींबा देत पठाण यांच्या निलंबनाला पाठिंबा देत असेल तर या सेक्यूलर आणि डाव्यांच्या पोटात का दुखतेय? हा पोटशूळ उठण्याचे एकच कारण की या सेक्यूलर आणि डाव्यांना कन्हैय्या कुमारसारखी ‘लाल’वाळवी देश पोखरण्यासाठी सोडायची आहे. मोदी सरकार केंद्रा सत्तेत आल्यापासून देशात देशभक्ती आणखीन रुजतेय आणि राष्ट्राचा सर्वांगीण विकास होतोय म्हंटल्यावर डाव्यांचे मार्क्स प्रेम उफाळून येत आहे. चीनच्या दावणीला बांधलेल्या डाव्यांना कायमच देशभक्ती म्हणजे मुर्खपणा वाटत आला आहे. पण थेट बोलल्यास जनता मुस्काटात मारेल या भीतीने आता भाजपाचा सांप्रदायिक राष्ट्रवाद आदी सारख्या शब्दांचे प्रयोजन करुन देशभक्तीचे नकारात्मक मुल्यमापन करण्याचा धंदा सध्या सेक्यूलर, डाव्या विचारवंतांकडून सुरु आहे. ‘भारत माता की जय म्हणणे कायद्याने बंधनकारक नाही!’, ‘भारताविरोधी घोषणा देणे म्हणजे राष्ट्रद्रोह नाही, भारत की बरबादी तक जंग रहेगी म्हणणे म्हणजे देशद्रोह नाही’ अशा शब्दांचे खेळ गेले दोन महिने झाले सुरु आहे. मुळात भाजपा सरकारने कोणावरही कसलीही बंदी किंवा बंधन लादलेले नाही. पण राष्ट्रभक्ती म्हणून भारत माता की जय म्हणणे या सेक्यूलर आणि डाव्यांना खुपतेय. राष्ट्रभक्ती सिद्ध करण्यासाठी भारत माता की जय म्हणणे आवश्यक नाही असा पोकळ युक्तीवाद केला जातोय. काहीनी तर यावरही कहर करत संघ-भाजपा तालिबानीकरण करत असल्याचीही गरळ ओकली आहे. संघ, भाजपा राष्ट्राचा जयजयकार करत समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेवर निशाना साधत आहे आणि भारताचा अपमान करत असल्याची बतावणी सेक्यूलरांकडून केली जातेय.
संघ, भाजपा कम्यूनिस्ट आणि पुरोगामी लोकांचा अपमान करत असल्याचे सांगत काही सेक्यूलर आणि डाव्या विचारवंतांनी काश्मिर, पंजाब आणि इतर राज्यात कम्यूनिस्टांनी आंतकवादाशी संघर्ष केला आणि मोठ्या संख्येने आपले प्राण दिल्याचे धडधडीत खोटे लिखाण केले आहे. नक्सलवादाचे निर्माते आणि पोषक असलेल्या कम्यूनिस्टांनी कधी देशासाठी जीव दिलाय? हे या विचारवंतांनी सांगावे. काश्मिर, पंजाब आणि इतर कोणत्या राज्यात किंवा कोणत्या राष्ट्रीय संकटात तरी या लोकांनी जनतेकडे ढूंकुन पाहिले आहे काय? कामगारांना संपाचे शस्त्र वापरुन देशोधडीला लावणार्या कम्यूनिस्टांनी कामगार, शेतकर्यांच्या हिताच्या फोकळ गप्पा मारु नये. राष्ट्रवादाबाबत तर डाव्याचा लांब-लांबपर्यंत कोणताही संबंध नाही. त्यामुळे भारत माता की जय या जयघोषाचे महत्त्व त्यांना कधीच कळणार नाही आणि तशी अपेक्षाही नाही. असल्या बाबीवर वाह्यात चर्चा करुन, वाद घालून देशाच्या विकासात अडथळा आणण्याचा उद्योग सेक्यूलर आणि डाव्यांनी आता थांबवावा.
देशाच्या सर्वोच्च मानले गेलेल्या संसदेवर हल्ला करणार्या अफजल गुरुचे समर्थन करत देेशाचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मिरला भारतापासून तोडण्याच्या पाकिस्तान आणि चीनच्या कारस्थानाला खतपाणी घालणार्या सेक्यूलर आणि डाव्यांना भारतमातेचा जयघोष सहन होत नाहीये. याच अस्वस्थतेतून वाटेल तो युक्तीवाद करत जनतेच्या मनावर थोपवण्याचा प्रयत्न केला जातोय. मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे देशद्रोह आणि देशप्रेम यांती लक्ष्मणरेषा पुसट करुन राष्ट्रप्रेमाबाबत जनतेच्या भावना बोथट करण्याचा घातकी उद्योग आता थांबवावाच लागेल. आज अफजल गुरुचे समर्थन होतेय. कन्हैया कुमारला हिरो बनवले जातेय. उद्या दुदैवाने याहून घातक घटना घडल्या तर जनतेच्या भावना बोथट झाल्यास, हे काय नेहमीचच आहे म्हणून लोक गप्प बसतील. हेच सेक्यूलर आणि डाव्यांना साधायचे आहे. पण जनता इतकी दुधखुळी नाही हे त्यांनी विसरु नये.