Home » Blog » ब्रह्मदागखान बुगती

ब्रह्मदागखान बुगती

ब्रह्मदागखान बुगती 
विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले
स्वित्झर्लंडमधलं जिनिव्हा हे शहर नाना प्रकारच्या आंतरराष्ट्रीय परिषदांचं शहर म्हणूनच ओळखलं जातं. जगभरच्या सर्व देशांमधले विविध प्रकारचे लोक नेहमीच तिथल्या रस्त्यांवर, बाजारात, रेस्टॉरंट्‌समध्ये पहायला मिळत असतात. तो पहा, छानसा सूट घातलेला, कोरीव दाढी ठेवलेला, उमदा आणि तरतरीत दिसणारा तरुण. वय जेमतेम तीस असेल. कोण आहे तो? कुणी प्राध्यापक? संशोधक? नाही? मग एखाद्या कॉर्पोरेट बँकेचा मॅनेजर तरी? नाही. यापैकी तो काहीच नाही. तो आहे ब्रह्मदागखान बुगती. बलुचिस्तानातल्या बुगती कबिल्याचा म्होरक्या. बलुच रिपब्लिकन पार्टी या पक्षाचा परांगदा होऊन स्वित्झर्लंडचा राजकीय आश्रय घेणारा राजकीय नेता. तोे म्हणतोय्, ‘लोक आता चिडले आहेत. तुम्ही जर संघर्ष करण्याचे शांततामय मार्ग बंदच केलेत, राजकीय कार्यकर्त्यांना पकडून त्यांचा छळ केलात, त्यांना गोळ्या घालून, त्यांचे मृतदेह रस्त्यावर फेकून दिलेत, तर मग नक्कीच ते शांततापूर्ण आंदोलनाच्या मार्गाकडून हिंसात्मक मार्गाकडे वळणारच.’  
बाप रे! प्राध्यापक, संशोधक किंवा बँकर भासणारा हा उमदा तरुण एकदम जहाल भाषा बोलतोय्. त्याला कारणही तसंच आहे. २००६ सालच्या ऑगस्ट महिन्यात त्याचे आजोबा अकबरखान बुगती हे ठार झाले. म्हणजे सरकारने त्यांचा खूनच केला. जम्हूरी वतन पार्टी हा त्यांचा राजकीय पक्ष बलुचिस्तानमधला सर्वात लोकप्रिय पक्ष होता. सरकारच्या दडपशाहीला कंटाळून या पक्षाने स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी केली होती. सरकारला हे सहन होत नव्हतं. त्याने अकबरखान बुगतींना त्यांच्या डेरा बुगती या गावात राहणं अशक्य केलं. तेव्हा त्यांनी डोंगराळ भागात कोहलू या ठिकाणी एका गुहेत आश्रय घेतला. २६ ऑगस्ट २००६ रोजी लष्कराने तोफा डागून त्यांची ही गुहाच उद्ध्वस्त केली.  
अकबरखान आणि त्यांचे बरेच साथीदार ठार झाले. पण त्यांचा हा नातू ब्रह्मदागखान मात्र निसटला. त्याने बलुच रिपब्लिकन पार्टी हा नवा पक्ष काढला. या पक्षाला त्याच्या बुगती या टोळीखेरीज इतरही टोळ्यांचा चांगला पाठिंबा मिळाला. सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय बलुची लोक या पक्षाकडे आकर्षित होऊ लागले. त्यामुळे सरकार आणखीनच खवळलं. पक्षाच्या कार्यकर्त्यांचे डागलेले, भाजलेले, विटंबना केलेले, अवयव तोडलेले आणि गोळ्यांनी चाळण झालेले मृतदेह रस्त्याकडेला फेकून दिलेले आढळू लागले, महिन्याला किमान वीस एवढ्या प्रमाणात!  
हा सगळा इतिहास नव्हे, तर वर्तमान आहे! फक्त चौसष्ट वर्षांपूर्वी भारताचाच एक भाग असलेल्या बलुचिस्तानचं! वास्तविक पाकिस्तान सरकार आणि बलुची नागरिक दोघेही मुसलमान आहेत, सुन्नी मुसलमान आहेत. तरीही बलुची लोकांची वांशिक कत्तल उडवताना पाकिस्तानी सरकारला जराही कचरायला होत नाही. कारण, ही परंपराच मुळी औरंगजेबी आहे. तीन सख्खे भाऊ आणि एकंदर छत्तीस जवळच्या नातलगांची कत्तल करताना औरंगजेब कुठे कचरला होता?  
पाकिस्तान या देशाचे एकंदर चार प्रांत आहेत. पंजाब, सिंध, वायव्य सरहद्द प्रांत आणि बलुचिस्तान, शिवाय १९४८ साली भारताकडून हडपलेल्या काश्मीरच्या प्रदेशला ते पाचवा प्रांत मानतात. त्याला ते आझाद काश्मीर म्हणतात; आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो.  
ते असो. तर फाळणीपूर्व काळात भारतातल्या म्हणजे मुख्यत: उत्तर प्रदेशमधल्या मुसलमानांनी मुंबईकर गुजराती असलेल्या महंमदअली जीनांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करून, इंग्रजांच्या पाठिंब्यामुळे नि हिंदू नेतृत्वाच्या नेभळटपणामुळे ती यशस्वी केली. आधुनिकदृष्ट्या विकसित असलेल्या पंजाब आणि सिंध प्रांतातल्या मुसलमानांचा फाळणीला म्हणजे स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीला फारसा पाठिंबा नव्हता. फाळणीपूर्व काळातल्या निवडणुकीत तिथे मुस्लिम लीग अल्पमतात गेली होती. वायव्य सरहद्द प्रांत आणि बलुचिस्तान हे पंजाब आणि सिंधच्या पलीकडचे प्रांत. वायव्य सरहद्द प्रांतात पठाण टोळ्यांचं नि बलुचिस्तानात बलुची टोळ्यांचं प्राबल्य होतं. सरहद्द प्रांताला खान अब्दुल गफारखान ऊर्फ सरहद्द गांधी हे नेते तरी होते; बलुचिस्तान प्रांताला तर असं एकमुखी, सर्वमान्य नेतृत्वही नव्हतं. सिंध आणि पंजाबबरोबर या दोन्ही प्रांतांनाही पाकिस्तानमध्ये सामील व्हावंच लागलं. खान अब्दुल गफारखान उद्वेगाने कॉंग्रेस नेत्यांना म्हणाले होते, ‘तुम्ही आम्हाला लांडग्यांच्या पुढ्यात टाकलंत.’  
पाकिस्तान निर्माण झाल्यावर वर्षभरातच जीना मरण पावले. तेव्हापासून पाकिस्तान सरकारवर कायम पंजाबी मुसलमान जबरदस्त पकड ठेवून आहेत. याला अपवाद म्हणजे झुल्फिकार अली भुत्तो. ते सिंधी मुसलमान होते. जनरल झिया उल् हक या पंजाबी हुकूमशहाने त्यांना फासावर लटकवले. तेव्हापासून आतापर्यंत पंजाबी सोडून अन्य कुणीही राजकीय नेता पाकिस्तानी राजकारणात पाय रोवू शकलेला नाही. बेनझीर भुत्तो पुन्हा प्रभावी होणार असं दिसताच तिचा काटा काढण्यात आला.  
सिंधी मुसलमान नेते, जे पैशाने गब्बर आहेत नि राजकीयदृष्ट्या सजग आहेत, ते सुद्धा जर टिकू शकत नाहीत, तर सरहद्द प्रांत आणि बलुचींना कोण विचारतो? त्यांना पाकिस्तानच्या राजकीय जीवनात काहीही स्थान नाही. पंजाबी मुसलमान म्हणजे पाकिस्तान. राजकारणात, लष्करात, जी काही थोडीफार कारखानदारी, शेती वगैरे आहे तिच्यात, सर्वत्र पंजाबी मुसलमान दादागिरी करणार. सर्व प्रकारचे फायदे तेच उपटणार. बाकी सगळे जणू दुय्यम नागरिक.  
बलुचिस्तान हा प्रांत इराण आणि अफगाणिस्तान यांना लागून आहे. प्राचीन हिंदू कालखंडात या लोकांना बलोक्ष असं म्हटलं जात होतं. उत्खननामध्ये बलुचिस्तानात हिंदू मंदिरं आढळली आहेत. इथे असंख्य टोळ्या किंवा कबिले किंवा जमाती आहेत. प्रत्येक कबिला एका विशिष्ट भागात वसाहत करून असतो. प्रत्येक कबिल्याचा एक सरदार असतो. त्याच्या कबिल्यात आणि त्या कबिल्याच्या प्रदेशात तो म्हणेल ते सर्वांना मान्य असतं. पण हा सरदार हुकूमशहा नसतो. कबिल्यातल्या वयोवृद्ध, अनुभवी आणि शहाण्या माणसांच्या सल्ल्याने तो टोळीचा कारभार चालवतो. तथाकथित जगज्जेत्या अलेक्झांडरने भारतावर स्वारी केली, त्यावेळी सिंध प्रांतापर्यंत पोहोचण्यापूर्वी त्याला अनेक गणराज्यांचा सामना करावा लागला होता. एक गाव किंवा नगर म्हणजे एक गणराज्य असे. प्रचंड पर्शियन साम्राज्याचा चक्काचूर करून भारताकडे निघालेल्या अलेक्झांडरच्या विशाल नि विजयी सेनेला या प्राचीन हिंदू गणराज्यांनी रडवलं होतं. बलुची आणि पठाणी टोळ्या म्हणजे या गणराज्यांचेच अवशेष होत. अलेक्झांडरसारख्या निष्णात सेनापतीला लीलेने छातीवर झेलणार्‍या या पराक्रमी हिंदू गणराज्यांनी इतिहासाच्या कोणत्या टप्प्यावर इस्लाम स्वीकारला हे माहीत नाही. सनातन धर्माचे संस्कार ढिले झाले की अध:पतन सुरू होतं आणि मग ते चालूच राहतं! शतकानुशतकं! बलुचिस्तानातले लोक ब्राहुई, बलुची, हझरागी आणि पर्शियन या भाषा बोलतात; उर्दू नव्हे. या सर्व भाषा संस्कृतोद्भव आहेत. पण पाश्‍चिमात्त्य भाषाशास्त्रज्ञ मात्र त्यांना इंडो-इरानियन भाषा म्हणतात. कारण संस्कृतोद्भव भाषा म्हटलं तर संस्कृतचं प्राचीनत्व मान्य करावं लागतं ना! बलुची लोकांनाही ते मूळचे भारतीय हिंदू न म्हणता इराणी-अफगाणी नि शक वंशाचे असं म्हणतात. भारताने म्हणजे हिंदूंनी आक्रमक शकांचा पूर्ण नि:पात करून, शकांना हिंदू संस्कृतीत सामावून घेतलं होतं, पचवून टाकलं होतं, ही वस्तुस्थिती हे तज्ज्ञ सोयीस्करपणे विसरतात. 
अठराव्या शतकात भारत जिंकण्यासाठी इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात सरळच स्पर्धा होती. ती इंग्रजांनी जिंकली. पण या स्पर्धेत आणखीही एक भिडू होता, तो म्हणजे रशिया. अफगाणिस्तानमार्गे भारतापर्यंत पोहोचण्याचा रशियाचा प्रयत्न होता. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजांनी अफगाण युद्धे सुरू केली. पठाण आणि बलुची यांचं आपसात सख्य नव्हतंच. बलुची लोक पठाणांसारखे माथेफिरूही नव्हते. शिवाय ते उत्तम लढवय्येही होते. इंग्रजांनी याचा फायदा घेत आपल्या सैन्यात बलुच सैन्यतुकडी उभी केली. टेन्थ बलुच या नावाने प्रस्थान असलेल्या या रेजिमेंटने दोन्ही महायुद्धांमध्ये रणांगण गाजवलं. फाळणीनंतर इंग्रजी सेनापतींनी बलुच रेजिमेंटला पाकिस्तानकडे देऊन टाकलं. बलुची सैनिक पाकिस्तानात जायला अजीबात तयार नव्हते. पण त्यांच्या इच्छेला कोण विचारतो? अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेलं क्वेट्टा शहर ही बलुचिस्तानची राजधानी. इंग्रजांनी तिथे मोठी लष्करी छावणी उभारली.  
पाकिस्तान निर्माण झाल्यापासून गेल्या चौसष्ट वर्षांत बलुचिस्तान प्रांताने केंद्र सरकारविरुद्ध पाच वेळा सशस्त्र उठाव केला. प्रत्येक वेळी सरकारने म्हणजेच लष्कराने तो अमानुषपणे चिरडून टाकला. बलुची लोकवस्तीचा भाग बलुचिस्तान इराण सीमेलगत आणि इराणी प्रदेशातही बराच खोलवर पसरलेला आहे. इराणला आपल्या सरहद्दीवर गडबड नको होती. त्यावेळी इराणचे शहा रेझा पेहेलवी हे सत्तेवर होते. ते अमेरिकेचे दोस्त. पाकिस्तानला तर अमेरिकेने कायमच पदराखाली घेतलेलं. (अमेरिका पदर केव्हापासून घेऊ लागली, असा इरसाल प्रश्‍न मनात न आणता वाक्याचा भावार्थ समजून घ्या.) त्यामुळे पाकिस्तान आणि इराणच्या संयुक्त सैन्याने एफ-१४ सारख्या त्यावेळच्या अत्याधुनिक अमेरिकन बॉम्बफेक्या विमानांचा वापर करून बलुची बंडखोरांना अक्षरश: भाजून काढलं.  
बुगती या बलुची टोळीचे प्रमुख अकबरखान यांनी या दडपशाहीविरुद्ध राजकीय मार्गाने लढा दिला. अकबरखान हे ऑक्सफर्डचे पदवीधर असून, आधुनिक राजकीय प्रणालीत चांगलेच वाक्‌बगार होते. जम्हूरी वतन पार्टी या त्यांच्या पक्षाने हळूहळू संपूर्ण प्रांतात चांगला जम बसवला. इतर टोळीप्रमुखही त्यांना मानू लागले.  
पाकिस्तान सरकारात प्रस्थ होऊन राहिलेले नि लष्कर, आय. एस. आय., तालिबान, अल् कायदा यांच्यावर वर्चस्व गाजवणारे पंजाबी मुसलमान यामुळे चिडले. त्यांनी अकबरखान बुगतींना ठार मारले. ब्रह्मदागखान बुगती हा त्यांचा नातू. तो त्या कत्तलीतून बचावला. पण अखेर त्यालाही देश सोडून स्वित्झर्लंडमध्ये राजकीय आश्रय घ्यावा लागला. हे करण्यासाठी त्याने भारतीय पासपोर्ट वापरला असं म्हणतात. आपली सरकारं ही भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काहीच करू शकत नसली, तरी पाकिस्तानचं संकट ही आपली संधी, हे समजणारी काही थोडी मंडळी आपल्या प्रशासनात असावीत, असं वाटतं. त्यामुळेच ब्रह्मदागखानाला भारतीय पासपोर्ट मिळाला असावा. ते कसंही असो. समजा, अगोदर सांगितल्याप्रमाणे बलुची आंदोलकांनी सशस्त्र बंड सुरू केलं, तर काय होईल? पाकिस्तानचे तुकडे पडतील? जर तसं घडलं तर स्वतंत्र बलुचिस्तान भारताला अनुकूल राहील, असं धोरण आखायला हवं. 
तरुण भारत, 9/21/2011
Posted by : | on : 28 Sep 2011
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *