मोदींच्या उपवासाने राजकीय उष्मा वाढला! दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी विजयाची अभिव्यक्ती दोन प्रकारे करता येते. उन्माद आणि विनम्रता. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सर्वोच्च न्यायालयात त्यांना मिळालेला विजय विनम्रतेनेे साजरा करण्यासाठी तीन दिवसांचा उपवास करीत आहेत. मोदी हा विजय ढोल-नगारे वाजवूनही साजरा करू शकत होते. पण, अभिव्यक्तीचा तो प्रकार योग्य ठरणार नाही याची मोदींना पूर्ण कल्पना होती. म्हणून त्यांनी उपवास करून सर्वोच्च न्यायालयात त्यांना मिळालेल्या विजयाची अभिव्यक्ती केली, असे दिसते. २००२ सालात गुजरातमध्ये दंगली झाल्या. त्यात मोठ्या प्रमाणावर प्राणहानी झाली. या नरसंहारासाठी मोदींना जबाबदार ठरवून त्यांना अटक करण्याची मागणी केली जात होती. दुसर्या महायुद्धातील कैद्यांवर न्यूरेंबर्ग येथे जसा खटला चालविण्यात आला, तसाच खटला मोदींवर चालविण्यात यावा, अशी मागणी केली गेली. मोदींनी किमान माफी मागावी, खेद प्रकट करावा, असे आवाहन करण्यात येत होते, पण मोदींनी यापैकी काहीच केले नाही. कारण, एखादी चूक घडल्यानंतर काही वर्षांनी का होईना त्याबद्दल माफी मागणे यासाठी एक नैतिक साहस लागते, पण कोणतीही चूक नसल्याने माफी मागण्यास नकार देणे याला त्यापेक्षाही मोठे नैतिक साहस लागते. मोदी दुसर्या श्रेणीत येणार्यांपैकी आहेत. भगवतींचा पश्चात्ताप सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्या. पी.एन. भगवती यांनी १९७५ च्या आणीबाणीबद्दलचा आपला निवाडा चुकीचा होता, अशी कबुली देत, आपल्या त्या निवाड्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला आहे. आणीबाणीच्या काळात नागरिकांचा जगण्याचा अधिकारही रद्द करता येतो, असा निवाडा १९७६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने दिला होता. चार न्यायाधीशांनी निवाड्याच्या बाजूने, तर न्या. हंसराज खन्ना यांनी निकालाच्या विरोधात निर्णय दिला होता. न्या. भगवती यांनी ३५ वर्षांनतर आपली चूक कबूल केली. मोदींची कोंडी दुसरीकडे मोदी यांनी, त्यांनी न केलेल्या गुन्ह्यासाठी माफी मागावी, दिलगिरी व्यक्त करावी, चूक कबूल करावी अशी एक मागणी मागील ९ वर्षांपासून केली जात होती, पण मोदींनी त्याबाबत कधीही कोणतीही प्रतिक्रिया नोंदविली नाही. त्यांनी माफी मागण्यास नकार दिला नाही आणि माफीही मागितली नाही. वास्तविक मोदी माफी, दिलगिरी हे शब्द वापरून आपली प्रतिमा सुधारू शकत होते. गुजरात दंगलीचे कारण सांगून अमेरिकेने त्यांना व्हिसा नाकारला. माफी मागून ते हा व्हिसा मिळवू शकत होते. मोदींनी यापैकी काही केले नाही. सी.बी.आय. चौकशी, एसआयटी चौकशी, एसआयटीकडून ९ तास कसून चौकशी याला ते सामोरे गेले. साधारणत: एप्रिलचा महिना होता. मोदी यांना अटक करण्याची तयारी केंद्र सरकारने केली होती. गुजरातमध्ये झालेल्या काही पोलीस चकमकींच्या संदर्भात ही अटक केली जाणार होती, पण बहुधा केंद्र सरकारचे पाय गारठले आणि मोदींना अटक झाली नाही. आयपीएस अधिकारी, राज्यपाल व आता लोकायुक्त अशा वगेवेगळ्या मार्गांनी मोदींची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. त्या सर्वांतून मोदी बाहेर पडले आणि मागील आठवड्यात गुजरात दंगलीबाबतचे सत्य सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्याने समोर आणले. हा निवाडा भारतीय राजकारणाला प्रभावित करणारा आहे, असे अनेकांना वाटते. गुजरातमधील गाजलेल्या गुलबर्गा सोसायटी हत्याकांडाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोदींना जवळपास क्लीन चिट दिलेली आहे. एसआयटीच्या अहवालावर सर्वोच्च न्यायालयाने कोणताही आदेश न देणे याला एक प्रकारे क्लीन चिट मानले जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निवाड्यानंतर कॉंग्रेसने पुन्हा मोदींकडून गुजरात दंगलीबाबत माफीची मागणी केली. मोदींनी त्यावर काहीही न बोलता तीन दिवस उपावासाची घोषणा केली. उपवासाचा अर्थ मोदी यांनी या उपवासाची घोषणा करताना राज्यातील जनतेला दोन पत्रे लिहिली आहेत. पहिल्या पत्रात त्यांनी आपल्या उपवासामागची भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील सर्व गुजरातींमध्ये सद्भावना व सामंजस्य निर्माण करण्यासाठी आपण हा उपवास करीत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे, तर दुसरे पत्र अधिक स्पष्ट आहे. कोणीही शंभर टक्के बरोबर राहू शकत नाही, आपल्या हातून झालेल्या चुका ज्यांनी दाखविल्या त्या सर्वांचा मी आभारी आहे, राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे दु:ख आपले दु:ख आहे असे त्यांनी या पत्रात लिहिले आहे. आपल्या पत्रात त्यांनी राज्यातील सर्व गुजराती असा शब्दप्रयोग वापरला आहे. मोदींच्या या पत्राचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. मोदी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर उपवास करून राज्यातील जनतेला एकजूट होण्याचा संदेश देत आहेत, असे काहींना वाटते. मोदींना मुस्लिमविरोधी ठरविण्याचा जो प्रयत्न करण्यात येत आहे, त्याला हे पत्र एक प्रत्युत्तर वाटते. गुजरातमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या मोठी आहे आणि मोदींच्या शासनकाळात मुस्लिमांशी कोणताही भेदभाव झालेला नाही. त्यांना शिक्षणाच्या, नोकरीच्या समान संधी उपलब्ध आहेत. मुस्लिमांसाठी प्रतिष्ठित अशा देवबंद विद्यापीठाचे मौलाना वस्तानवी यांनी मोदी सरकारची प्रशंसा केली होती, त्याबद्दल त्यांना हटविण्यात आले. मोदी यांनी पुन्हा मुस्लिम समाजातील युवकांचे शिक्षण हा मुद्दा मांडला आहे. मोदींच्या उपोषणाला असे वेगवेगळे अर्थ आहेत. यातील कोणता अर्थ खरा असावा याची कल्पना नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यात मोदींना आपला विजय दिसतो व त्या विजयाची अभिव्यक्ती उन्मादाने करण्याऐवजी उपवासाने करण्याचे त्यांनी ठरविले आहे आणि याचा एक अनुकूल संदेश केवळ गुजरात नाही, तर संपूर्ण देशात जाईल असे साधारणत: मानले जाते. अमेरिकन कॉंग्रेस अहवाल सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा, मोदींची उपवासाची घोषणा यापाठोपाठ घडलेली घटना म्हणजे, अमेरिकन कॉंग्रेसच्या थिंक टँकचा ९४ पृष्ठांचा अहवाल. अमेरिकन कॉंगेे्रसचे सदस्य, सिनेटर यांना जगातील घटनांची अधिकृत, अभ्यासपूर्ण, खात्रीशीर माहिती मिळत राहावी यासाठी हा थिंक टँक काम करीत असतो. या थिंक टँकने तयार केलेल्या अहवालात, मोदी यांनी गुजरातमध्ये केलेल्या कामगिरीची प्रशंसा करण्यात आली आहे. थिंक टँकने मोदींबद्दल प्रामुख्याने तीन प्रमुख निष्कर्ष काढले आहेत. एक मोदींनी गुजरातला आर्थिक प्रगतीच्या मार्गावर नेले, त्यांनी प्रशासनातील लालफितशाही दूर केली आणि राज्यातील भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात घटविला. या तीन निष्कर्षांच्या आधारवर मोदींना २०१४ च्या लोकसभेतील निवडणुकीत पंतप्रधानपदाचे एक दावेदार मानण्यात आले आहे. थिंक टँकच्या या अहवालाला महत्त्वाचे मानले जाते, विश्वसनीय मानले जाते, पण शेवटी अनेक बाबी या अंदाजाच्या स्वरूपात असतात. लोकसभेची निवडणूक २०१४ मध्ये होईल, हे गृहित धरले आहे. मनमोहनसिंग सरकारची सध्याची स्थिती पाहता २०१४ पर्यंत ही लोकसभा चालेल, असे वाटत नाही. २०१२ च्या शेवटी वा १३च्या प्रारंभी लोकसभा निवडणुका होतील, असा एक अंदाज वर्तविला जातो. त्यावेळी निवडणुकीचे मुद्दे कोणते असतील, राजकीय वातावरण कसे असेल, उमेदवार कसे निवडले जातील हे व असे अनेक मुद्दे महत्त्वाचे ठरतील. २००४च्या निवडणुकीत वाजपेयी सरकार पराभूत होईल, असे अमेरिकेतील एकाही शोध संस्थेला वाटले नव्हते. भारतातही त्या काळात ज्या काही जनमत चाचण्या झाल्या त्यातही वाजपेयी सरकारच्या विजयाचाच अंदाज सांगण्यात आला होता, पण जे झाले ते सर्वांसमोर आहे. राहुल गांधी फॅक्टर अमेरिकन कॉंग्रेसचा थिंक टँक असो की भारतातील सर्वसामान्य जनतेची प्रतिक्रिया असो, मोदी आणि राहुल गांधी यांच्याबाबत एक समान विचारप्रवाह आढळून येतो. मोदींची प्रशासकीय क्षमता, आर्थिक विकासाची दृष्टी याबाबत देशात व परदेशातही प्रशंसेची भावना आहे, तर याउएलट राहुल गांधींच्या क्षमतेबद्दल सर्वत्र एक प्रकारचे प्रश्नचिन्ह लावले जात आहे. वर्षभरापूर्वी लंडनच्या एकॉनॉमिस्टने ‘मिस्टेरियस गांधी’ म्हणजे रहस्यमय गांधी या मथळ्याने एक लेख लिहिला होता. जवळपास तशीच भावना अमेरिकन कॉंग्रेसच्या थिंक टँकच्या अहवालात आढळून येते. राहुल गांधींचा उद्देश भलाही चांगला असेल, त्यांची प्रतिमा स्वच्छ असेल, पण त्यांना राजकारणावर प्रभाव पाडता आलेला नाही, असे मानले जाते. राजीव गांधींना राजकारणात नवखे मानले जात होते. राहुल गांधींना आपल्या पिताजींचीही बरोबरी करता आलेली नाही हे त्यांच्याबद्दलचे एक आकलन आहे. बिहार विधानसभा निवडणूक ते स्वत: हाताळीत होते. या महत्त्वाच्या राज्यात कॉंग्रेसची धूळधाण उडाली. त्यांना लोकसभेवरही आपला प्रभाव पाडता आली नाही. या सार्याचे प्रतिबिंब थिंक टँकच्या अहवालात दिसून येते. २०१४चा अंदाज २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा मुकाबला नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी होईल, हा या अहवालातील निष्कर्ष सुद्धा सर्वसामान्य राजकीय अंदाजावर आधारलेला आहे. राहुल गांधी हे कॉंगेे्रसचे स्वाभाविक उमेदवार असतील, त्याबाबत भाकीत करण्याचीही गरज नाही. मोदी हे भाजपाचे उमेदवार असतील, हाही एक अंदाज आहे. त्यांना पाठिंबा आहे ही बाब बरोबर असली, तरी शेवटी निर्णय पक्षाला करावा लागेल. दिल्लीचे राजकारण मुंबईच्या शेअरबाजारासारखे झाले आहे. आज हा शेअर वधारतो तर तो कोसळतो. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत कोणता मुद्दा असेल, कोणते नेते असतील हे ठामपणे कोणालाही सांगता येणार नाही, त्याबाबत फारतर अंदाज बांधता येईल. तसाच एक अंदाज अमेरिकन कॉंग्रेसच्या थिंक टँकच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. राजकीय उष्मा मोदींच्या उपवासाने अहमदाबाद व दिल्ली या दोन्ही ठिकाणचा राजकीय उष्मा अचानक वाढला असल्याचे दिसते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असलेल्या शंकरसिंग वाघेलांनी अहमदाबादमध्ये उपोषण-उपवास सुरू केला आहे, तर दिल्लीतून कॉंग्रेसच्या तोफा पुन्हा मोदींच्या दिशेने वळल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा, थिंक टँकचा अहवाल व उपवास या घटनांनी राजकीय घटनाक्रमाचा केंद्रबिंदू आज तरी नरेंद्र मोदी आहेत. दै. तरुण भारत, दि. २० सप्टेंबर २०११
Posted by : AMAR PURANIK | on : 28 Sep 2011 Filed under : Blog Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper.. You can follow any responses to this entry through the RSS 2.0 You can leave a response or trackback to this entry