११ ऑगस्ट रोजी जी घटना मुंबईच्या आझाद मैदान परिसरात घडली, ती सामान्य दंगल नव्हती. त्यात सहभागी झालेल्यांनी थेट पोलिसांवर हल्ला चढवला. त्यांनी पोलिसांची वाहने जाळली. त्यांनी माध्यमांच्या गाड्यांवर व पत्रकारांवरही हल्ला चढवला. त्यांनी महिला पोलिस व अन्य महिलांनाही सतावले. मो्डतोड केली. त्यांनी तिथेच असलेल्या अमर जवान स्मारकाचीही विटंनबा केली. आणि हे सर्व होत असताना तिथे मोठ्या प्रमाणावर पोलिस उपस्थित असूनही कुठली कठोर कारवाई झाली नाही. दंगा करणार्यांच्या हाती त्या परिसराचे सर्वाधिकार जणू पोलिस आयुक्तांनी सोपवून दिले असावेत अशीच परिस्थिती होती. म्हणुनच जितका वेळ त्या गुंडांना मस्ती करायची होती व जशी मोडतोड करायची होती, तशी त्यांनी केली आणि कंटाळा आल्यावर ते निघून गेले. ते निघून गेले म्हणून शांतता प्रस्थापित झाली. पोलिसांनी कारवाई करून व कायद्याचा बडगा उगारून शांतता प्रस्थापित केली नाही; की परिस्थिती नियंत्रणात आनली नाही. जशी वादळी लाट अडवता येत नाही म्हणुन ती ओसरण्याची प्रतिक्षा केली जाते, तसा कायदा व पोलिस यंत्रणा दंग्याचा भर ओसरण्याची प्रतिक्षा करत होते. जे लोकांनी पाहिले व त्याची दृष्ये आपापल्य कॅमेराने टिपली; त्यातून हेच सिद्ध होते. जेव्हा माणुस अशा अनुभवातून जातो व त्याला आपले पोलिस म्हणजे आपला रखवालदारच इतका हतबल झालेला दिसतो, तेव्हा त्याचा जगण्यातल्या शाश्वती व सुरक्षेवरचा विश्वासच उडून जातो. ते पहिल्याच दिवशी झालेले होते. पण नंतरच्या घटनाक्रमाने मुंबईकरांचा धीरच सुटत गेला. मुंबईत व महाराष्ट्रात सरकार व कायदा सुव्यवस्था उरलेली नाही, अशी सामान्य माणसाची खात्रीच पटली. असुरक्षिततेच्या भावनेने लोकांना पछाडले होते. कारण चित्रण, छायाचित्रे व पुरावे उपलब्ध असतानाही पुढल्या आठवडाभरात पोलिस व सरकारकडून त्या दंगा माजवणार्या गुंडांना पकडण्याच्या कुठल्याही हालचाली होताना दिसत नव्हत्या. मग लोकांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचे? या मुंबईत व देशात आपला कोणीच वाली उरला नाही अशीच एक सार्वत्रिक भावना तयार झाली होती.
तिथेच हा घटनाक्रम संपत नाही. मुंबईत त्या मुस्लिम गुंडांनी जो हैदोस घातला त्यात महिला पोलिसांचा विनयभंग करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. पण तरीही त्यांच्यावर झटपट कारवाई सरकार करत नसल्याने खुद्द पोलिस खात्यातच कमालिची अस्वस्थता पसरली होती. मग सामान्य माणसाची काय अवस्था असेल, त्याची नुसती कल्पनाच केलेली बरी. जे सरकार व पोलिस आयुक्त आपल्या महिला पोलिसांच्या अब्रूशी खेळल्यावरही गुंडांना हात लावायला धजावत नाहीत, त्याच्याकडून आपली सुरक्षा कशी होणार, असे लोकांना वाटणे स्वाभाविक होते. त्यातच मग अफ़वांचे रान पिकले. मुंबईत दंगल आणि त्यात पोलिसांना मारहाण झाली असताना चेन्नई, बंगलोर व पुणे-नाशिक सारख्या महानगरातून ईशान्य भारतातील लोकांचे स्थलांतार सुरू झाले. त्यांना फ़ोन किंवा मोबाईल संदेशातून रमझान संपला मग असामींची कत्तल होणार, अशा धमक्या दिल्या जात होत्या. त्यातूनच हे स्थलांतर सुरू झाले होते. याचाही परिणाम मग मुंबईच्या मनोधैर्यावर होणे स्वाभाविक होते. राज ठाकरे यांच्या मोर्चाच्या घोषणेला हीच पार्श्वभूमी लाभली होती. कोणीतरी अशा नाकर्तेपणा व गुंडगिरीच्या विरोधात आपल्याला आधार द्यायला आणि धमकावणार्याला आवाज द्यायला उभा रहावा; अशीच मुंबईकरांची अपेक्षा होती. पुर्वीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असा आवाज द्यायला पुढे येत असत. हल्ली ते प्रतिक्रिया व्यक्त करतात. पण त्यांच्या नुसत्या मतप्रदर्शानानंतर पुर्वी जशी मुंबईत शिवसैनिकांची संतप्त प्रतिक्रिया उमटलेली दिसायची, तशी हल्ली दिसत नाही. त्यामुळे ती पोकळी भरून काढणारा कोणी आहे काय, अशा शोधात लोक होते. त्याच दिशेने पहिले पाऊल टाकत राज ठाकरे यांनी मोर्चाची घोषणा केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यापासून राज यांनी काढलेला हा पहिलाच मोर्चा आहे. पण त्यांनी तो अशा मोक्याच्या क्षणी काढला, की नागरिकांचा त्याला उत्स्फ़ुर्त प्रतिसाद मि्ळेल याची हमीच होती. कारण जे घडले त्यावरील संप्ताप व्यक्त करण्याची संधी सामान्य माणूस शोधत होता. आणि सामान्य माणूस याचा अर्थ केवळ नागरिक असा नाही, तर त्यात पोलिसांचाही समावेश होता. अगदी उघडपणे आपल्या सेक्युलर मुखवट्याला तडा जाऊ नये म्हणून तसे न बोलणार्या पत्रकारांचाही त्यात समावेश होतो. अशा सर्वानाच मोर्चा हवा होता. त्यामुळेच त्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यासाठी कुठलेही खास प्रयास मनसेला करावे लागले नाहीत. त्या मोर्चात एका पोलिस वसाहतीमधली पोलिसांची मुले मुद्दाम वेगळ्या वेशात आली होती. महिलाही मोठ्या प्रमाणात त्यात सहभागी झाल्या होत्या. त्या दिवशीही राज ठाकरे आपल्या मराठी बाण्याला चिकटून राहिले, पण त्यांनी त्या दिवशी बिगर मराठी नागरिकांचीही मने जिंकली. त्या्चे पडसाद केवळ मुंबईतच नव्हेतर थेट आसाममध्येही उमटले. मोर्च्याचा दुसर्या दिवशी तिथल्या तमाम आसामी भाषिक दैनिकांनी राज ठाकरे व मनसेचा मुंबईतील मोर्चा; यांची पहिल्या पानावर नुसती बातमीच दिली नाही तर त्याच बातमीची हे्डलाईन केली होती. राजच्या सभेला लोटलेल्या गर्दीचे मोठमोठे फ़ोटो त्या वृत्तपत्रांनी का छापावेत? देशातले तमाम पक्ष व त्यांचे दिग्गज नेते आसामी जनतेला पाठींब्याचे व सुरक्षेचे हवाले देत आहेत. पण त्यांच्या बाबतीत आसामी माध्यमांनी इतकी आस्था कुठे दाखवली नाही. ती आस्था राजच्या त्या एका दणदणीत मोर्चाने का मिळवावी? आपल्याकडले राजकीय अभ्यासक त्याचा विचार तरी करणार आहेत काय? त्याचा विचार केला तरच राजने मोर्चा काढून काय साधले त्याचे खरे उत्तर मिळू शकेल.
आजवर सतत मराठी बाणा घेऊन परप्रांतियांच्या लोंढ्यावर आघात करणार्या राजने सतत मुंबईतल्या अन्य भाषिकांचा राग ओढवून घेतला होता. पण एक मोर्चा नेमक्या वेळी काढून त्यांनी त्या सर्वांना जिंकून घेतले. कारण स्वत:ला राष्ट्रीय वा अखिल भारतीय म्हणवून घेणारे सर्वच पक्ष घडल्या प्रकाराबद्दल गप्प होते किंवा तोंडी प्रतिक्रिया देऊन गप्प झाले होते. कोणाला मुंबईच्या असुरक्षिततेची फ़िकीर नव्हती. मनोधैर्य गमावलेले पोलिस आणि भेदरलेला मुंबईकर यांच्या वेदनेवर फ़ुंकर घालायला आला तो राज ठाकरे. अन्य वेळी त्याच अमराठी मतांसाठी राजकारण करणारे मूग गिळून गप्प होते. जणू दंगल केली ते सगलेच परप्रांतिय असावेत आणि त्यांच्या विरुद्ध बोलले तर मते जातील; अशी सर्वांना भिती होती काय? की दंगा करणारे मुस्लिम आहेत म्हणुन त्यांच्या विरोधात बोलणे म्हणजे आपल्यावर हिंदूत्वाचा शिक्का बसेल म्हणून सगळे पक्ष गप्प होते काय? जे घडले ते मुस्लिम गुंडांकडून घडले तरी त्याचा धर्माशी संबंध नव्हता. आणि असेल तर त्याच्या पलिकडे जाऊन राष्ट्रप्रेमासाठी पुढे येण्याची गरज होती. कारण हैदोस घालणार्यांनी कुठले मंदिर पाडले म्हणुन मोर्चा काढायचा नव्हता. त्यांनी जो हल्ला चढवला तो कुणा हिंदूवर चढवला नव्हता. तो हल्ला तुमच्या आमच्या भारतीय असण्य़ावरचा हल्ला होता. भारतीय सार्वभौमत्वावर केलेला हल्ला होता. महिला पोलिसांची अब्रू घेतली म्हणजे भारतीय महिलेची अब्रू घेतली होती. आणि त्यासाठीच त्या हिंसेच्या विरोधात अवाज उठवणे अगत्याचे होते. त्याला कोणी हिंदूत्व समजणार असेल तर पर्वा नाही, असे म्हणायची हिंमत दाखवायला हवी होती. ती राजने दाखवली. आणि म्हणूनच त्याने त्या एका मोर्चातून फ़क्त मुंबईकर महाराष्ट्राच्या जनतेचीच मने जिंकली नाहीत; तर हजारो मैल दूर असलेल्या आसामी जनतेची मने जिंकली. ते खुल्या दिलाने मान्य करायला तिथल्या पत्रकारांना लाज वाटली नाही. त्यांनी राजच्या त्या मोर्चाला मोठ्या प्रमाणात ठळक प्रसिद्धी देऊन त्याचीच साक्ष दिली आहे.
महाराष्ट्रात आपण मराठी भाषेच्या आग्रहासाठी आक्रमक असलो तरी जेव्हा राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय तेवढा गंभीर असेल तेव्हा आपण तेवढेच आक्रमक होऊ शकतो आणि आहोत; हेच राजने दाखवून दिले. म्हणूनच त्याने त्या एका मोर्चातून देशाभिमानी भारतियांची मने मंगळवारी जिंकली आहेत. इथे मुंबईत दंगा करणारे, महिलांची अब्रू चव्हाट्यावर घेणारे, तिकडे उत्तरप्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची व बुद्ध मुर्तीची विटंबना करणारे, अमर जवान स्मारकाची मोडतोड करून पायदळी तुडवणारे; अशा अराजकासमोर उभा रहाणारा कोणीही नेता या देशात नव्हता. ना मायावतींनी तिकडे आवाज उठवला ना इथे दलित नेत्यांनी आवाज उठवला. ना मुंबईतल्या कोणा पक्ष वा नेत्यांनी घडल्या प्रकारानंतर रस्त्यावर येण्याची हिंमत दाखवली. त्यामु्ळे नुसते मुंबईकरच नव्हे तर संपुर्ण देशातच अस्वस्थता होती. कोण या रझा अकादमी नावाच्या झूंडशाही विरुद्ध उभा राहील, याची अवघ्या देशात प्रतिक्षा चालु होती. कारण झाला तो मुंबईवरचा हल्ला नव्हता, की पोलिसांवरचा हल्ला नव्हता. आणि झाला त्या हल्ल्यनंतरही राज्य सरकार व केंद्र सरकार गप्प होते. कुठेतरी सामान्य दंगल व्हावी असेच प्रतिसाद होते. प्रत्येकजण गुंड मुस्लिम आहेत म्हणुन त्यावर बोलायला बिचकत होता. राजने तीच कोंडी फ़ोडली. लोक काय म्हणतील वा आरोप काय होतील, याची फ़िकीर न करता त्याने मोर्चासाठी पुढाकार घेतला. तिथेच त्यांनी बाजी मारली.
गुंड देशाच्या स्वाभिमानाला पायदळी तुडवतात, तेव्हा त्यांच्याकडे धर्माच्या नजरेने बघण्याचीच गरज नसते. आणि अशा गुंडांच्या विरोधात बोलणे किंवा मैदानात उतरणे म्हणजे हिंदूत्व असेल तर मग हिंदूत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व होत नाही काय? देशाभिमानासाठी लढायला रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदूत्व असे कोणाला म्हणायचे आहे काय? त्याचा अर्थ उलट असा होतो, की सेक्युलॅरिझम म्हणजे मुस्लिम गुंडांना राष्ट्राभिमान पायदळी तुडवण्याची खुली मुभा. सेक्युलॅरिझम म्हणजे मुस्लिम गुंडांना महिलांच्या अब्रूशी खेळायचा खास अधिकार. तसेच या सेक्युलर म्हणून मिरवणार्यांना वाटते काय? नसेल तर त्यांनीच असा मोर्चा काढण्यात पुढाकार का घेतला नाही? आज राज ठाकरे काय बोलले त्याच्या विरोधात डरकाळ्या फ़ोडणारे आहेत, त्यांना महिला पोलिसांच्या अबृवरचा घाला लज्जास्पद वा्टत नाही काय? उत्तरप्रदेशात बुद्ध मुर्तीची विटंबना वा बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यावर रागसुद्धा आला नाही काय? मग त्यांनी मुंबईत हल्ला झाल्यावर मोर्चा काढण्यात पुढाकार का घेतला नाही? की सेक्युलर विचार म्हणजे मुस्लिम गुंडांना कुणाच्याही विटंबनेचे खास अधिकार, असे त्यांचे सेक्युलर मत आहे? नसेल तर त्यांच्यापैकी कोणी मोर्चासाठी पुढाकार का घेतला नाही? तेच कशाला खुद्द मुस्लिमांची पार्टी म्हणून ओळखल्या जाणार्या समाजवादी पक्षाने किंवा मुस्लिमांच्या मतांसाठी सतत स्पर्धा करणार्या कॉग्रेस वा राष्ट्रवादी पक्षाने असा मोर्चा काढण्यात पुढाकार का घेऊ नये? अण्णा हजारे यांनी शरद पवार यांच्याबद्दल काही म्हटले म्हणून पितृतुल्य पवारांच्या प्रतिष्ठेसाठी ठाण्यात अण्णांचा पुतळा जाळणार्या जितेंद्र आव्हाड यांचा राष्ट्राभिमान कळव्याच्या मुस्लिम मतांखाली गाडला गेला आहे काय? त्यांनी या गुंडांच्या विरोधात मोर्चा का काढला नाही?
यातल्या प्रत्येकाने एकच गोष्ट दंग्यानंतर सिद्ध केली, की सेक्युलर म्हणजे मुस्लिम धर्मांधतेचे चोचले पुरवणे. मुस्लिम धर्मांधतेसमोर राष्ट्राभिमान गहाण टाकणे. सेक्युलर राजकारण म्हणजे राष्ट्राभिमानाची पायमल्ली; असाच सिद्धांत यामुळे मांडला गेला आहे. किंबहूना या सर्व सेक्युलर पक्षांनी एकच गोष्ट या निमित्ताने दाखवली; की ते गुंड मुस्लिमांनाच मुस्लिम मानतात व जे मुस्लिम शांत जीवन जगतात, त्यांना इथले सेक्युलर मुस्लिम मानतच नाहीत. असल्या राजकीय भूमिकेने सामान्य मुस्लिम उर्वरित लोकांसमोर बदनाम होत आहे आणि त्याला त्या गुंडांपेक्षा सेक्युलर पक्ष व विचारवंतच जबाबदार आहेत. राजने आपल्या या मोर्चातून त्या सेक्युलर थोतांडालाही तडाखा दिला आहे. देशाभिमानी मुस्लिमांना सेक्युलर पक्ष साथ देत नाहीत; तर गुंड मुस्लिमांनाच साथ देतात, हे पितळ त्या मोर्चाने उघडे पाडले आहे. आणि तीच मला वाटते या मोर्चाची सर्वात मोठी उपलब्धी आहे. आपले धर्मनिरपेक्ष धोरण कायम राखताना आणि हिंदूत्वाची कास न धरताही, राजने सेक्युलर पाखंडाला नागडेउघडे करून टाकले आहे. कारण त्याने गुंडगिरीच्या विरोधात व रा्ष्ट्रद्रोहाच्या विरोधात मोर्चा काढला होता, त्यात जो कोणी हिंदूत्व शोधतो, त्याचा सेक्युलॅरिझम बेगडी आहे हे पुराव्यासह सिद्ध झाले. कारण या लोकांनी सेक्युलर म्हणून गुंड मुस्लिमांना पाठीशी घालताना देशाभिमान व सरकारी कायदा अपमानित व्हायलाही मान्यता दिलेली आहे. पण त्यामुळेच आता सामान्य लोकांसमोर स्पष्ट पर्याय उभे राहिले आहेत. यापुढे लोकांना काय हवे त्याचा निर्णय सोपा झाला आहे.
सेक्युलर विचारवंत, पत्रकार, माध्यमे किंवा पक्ष यांचा राज ठाकरेवर कोणता आक्षेप आहे? त्यांनी मोर्चा काढला तो मुस्लिम गुंडगिरीच्या विरोधात काढला. त्या मुस्लिम गुंडांनी काय केले होते? त्यांनी अमर जवान स्मारकाची विटंबना केली होती. आणि राजने काय केले? त्याच गुंडगिरीच्या विरोधात मोर्चा काढला होता. असा मोर्चा काढणे म्हणजे सेक्युलर लोकांना हिंदूत्व वाटत असेल, तर हिंदूत्वाचा (त्याच सेक्युलर शहाण्यांच्या मते) काय अर्थ होतो? महिलांच्या अब्रूवर हात टाकणे म्हणजे सेक्युलॅरिझम. राष्ट्रीय स्मारकाची विटंबना करणे म्हणजे सेक्युलॅरिझम. आणि हिंदूत्व म्हणजे काय तर महिलांच्या अब्रूला संरक्षण, राष्ट्रीय स्मारकाचा अभिमान म्हणजे हिंदूत्व. कायद्याचे प्रतिक असलेल्या पोलिस यंत्रणेच्या पाठराखणीला उभे रहाणे म्हणजे हिंदूत्व. तसे असेल तर लोकांनी आता निवड त्याच दोन पर्यायातून करायची आहे. लोकांना देशाचा अभिमान जपायचा आहे का? मग त्यांना आज सेक्युलर म्हणुन मिरवणार्यांची साथ सोडावी लागेल. महिलांना आपली अब्रू जपायची असेल तर त्यांना सेक्युलर विचारांच्या लोकांकडे पाठ फ़िरवून हिंदूत्वाची कास धरली पाहिजे. त्याऐवजी त्यांनी सेक्युलर पक्षांना साथ दिली तर त्यांच्या अब्रूचे पुढल्या काळात धिंडवडे निघणार आहेत. आणि त्यांच्यासाठी कोणीही सेक्युलर पुढे सरसावणार नाही. उलट सेक्युलर राजकारणी सत्तेवर असतील तर अब्रू लुटणार्यांना अभय मिलणार आहे. आणि त्या गुन्ह्याविरुद्ध कोणीही आवाज उठवणारा सुद्धा शिल्लक उरणार नाही.
परवाच्या मोर्च्याने तेच सिद्ध झाले, राज ठाकरे यांनी तेच सिद्ध केले म्हणून तर आसामसारख्या दूरच्या प्रांतामध्ये त्याला इतकी अफ़ाट प्रसिद्धी मिळू शकली आहे. या एका मोर्चातुन राजने स्वत:ला थेट राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले आहे. या देशात सेक्युलर थोतांडाला जनता कंटाळाली आहे. त्यापासून मुक्ती देणार्या नेत्याच्या शोधात सर्वच प्रांतामधली जनता आहे. त्यामुळेच गुजरातच्या नरेंद्र मोदींना माध्यमे दहा वर्षे बदनाम करीत असूनही भावी पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे लोक आशेने बघत आहेत. प्रत्येक चाचणीत तेच नाव अधिक पाठींब्याने पुढे येत आहे. राज ठाकरे यांनी नेमकी तीच भूमिका घेऊन मोठी राजकीय बाजी मारली आहे. त्यांनी काय साधले, त्याचे हे असे सोपे सरळ उत्तर आहे.
( २६/८/१२)