सडेतोड : अरुण रामतीर्थकर
राहुलला धोबीपछाड बसल्याने दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. गांधी घराणेे म्हणजे लोकांनी नतमस्तक होण्याचे दिवस संपले. किंवा गांधी घराण्याचे वारस असला म्हणून काय झाले तुमच्या कथित त्यागाची सव्याज परतफेड झाली आहे म्हणत झिडकारले. हे असे झाले म्हणून बरे, नाही तर रॉबर्ट वडेरा आणि प्रियंकाची शेंबडी पोरंही गांधी घराण्याचे वारस म्हणून आपल्या बोडक्यावर बसली असती.
पा
च राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांची उपलब्धी काय या प्रश्नावर मी आनंदाने उत्तर देईन, बरे झालेे, राहुल गांधी नावाचा एक बुडबुडा गेली ४-५ वर्षे फुगत चालला होता. तो फुटला. त्याचबरोबर त्याची, प्रियंकाची, तिच्या नवरा रॉबर्टची चापलुसी करणार्या वृत्तवाहिन्यांचेही थोबाड फुटले. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपूर्वी असा माहोल बनवण्यात आला की, राहुलनी २१२ सभा घेऊन सारा उत्तर प्रदेश पिंजून काढला. त्यामुळे कॉंग्रेसला २०४ जागा मिळतील. किमान तो दुसर्या क्रमांकाचा पक्ष राहील. तसे झाले तरी सत्तेच्या चाव्या कॉंग्रेसच्या हाती राहतील. राहुलमुळे राज्यात कॉंग्रेसला संजिवनी प्राप्त झाली असून, कॉंग्रेस बलशाली स्वरूपात पुनर्जन्म घेत आहे.
कॉंग्रेसी चमचे म्हणत होते तसेच दुर्दैवाने झाले असते तर मनमोहन सिंग घरी बसले असते आणि हे बाह्या सावरत भन्नाट स्वप्नांच्या बाता करणारे पोरटे चक्क पंतप्रधान झाले असते. या देशाचे नशीब वाईट आहे म्हणून कॉंग्रेस नावाच्या पक्क्या जातीयवादी पक्षाची सत्ता या देशावर आहे, पण नशीब एवढेही वाईट नाही की, राहुल पंतप्रधान व्हावा. तूर्त तरी चापलुसी पत्रकार आणि कॉंग्रेसचे लाचार नेते भावी पंतप्रधान म्हणून राहुलचे नाव घेणार नाहीत. राहुलचा सामना मुलायम, मायावती, उमा भारती यांच्याशी झाला असता तर हा राजकारणात नवखा, ते सर्व मुरलेले असे कारण लाचारांनी दिले असते, पण येथे राहुलला अस्मान दाखवले ते त्यालाही ज्युनिअर असलेल्या अखिलेश यादव या तरुणाने. प्रचाराच्या वेळी या अखिलेशला कोणी गृहितही धरले नव्हते. राहुल आणि प्रियंका. पेडन्यूज वाटण्या एवढी त्यांना प्रसिद्धी. त्याहून किळसवाणा प्रकार म्हणजे ही प्रियंका आपल्या दोन पोरांना घेऊन स्टेजवर यायची. मुंबईत बोरिवली स्टेशनवर किंवा कोणत्याही स्टेशनवर चिल्लीपिल्ली एक-दोन पोरं घेऊन भीक मागत बसलेली बाई आणि स्टेजवर दोन पोरं आणून मतांची भीक मागणारी प्रियंका यात काहीच फरक नाही. लालुप्रसादने बिहारच्या निवडणुकीत लादेनसारखा दिसणारा, त्या पेहेरावातील माणूस स्वत:बरोबर ठेवला होता. प्रचारातील ती नीचतम पातळी असे मी आजवर समजत होतो, पण पोरं स्टेजवर आणून प्रियंकाने प्रचाराची पातळी त्याही खालच्या स्तरावर नेली. प्रियंका राजकारणात नवखी मानली तरी राहुल खासदार आणि त्याच्या पक्षाचा सरचिटणीस आहे. जाहीरसभेत दुसर्या पक्षाचा जाहीरनामा फाडणे हा काय आचरटपणा. राहुलचे नशीब एवढे फुटके की त्याने ज्या पक्षाचा जाहीरनामा जाहीरपणे फाडला त्याच पक्षाला मतदारांनी भरभरून मते दिली.
अडनाव गांधी असले तरी त्याचा राजकीय वारसा नेहरू घराण्याचा आहे. राहुलचे आजोबा फिरोज गांधींचे नावही ऐकू येत नाही आणि हे म्हणे गांधी घराण्याचे वारस. राहुलला धोबीपछाड बसल्याने दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. गांधी घराणेे म्हणजे लोकांनी नतमस्तक होण्याचे दिवस संपले. किंवा गांधी घराण्याचे वारस असला म्हणून काय झाले तुमच्या कथित त्यागाची सव्याज परतफेड झाली आहे म्हणत झिडकारले. हे असे झाले म्हणून बरे, नाही तर रॉबर्ट वडेरा आणि प्रियंकाची शेंबडी पोरंही गांधी घराण्याचे वारस म्हणून आपल्या बोडक्यावर बसली असती. गांधी घराण्याची जादू सुशिक्षित मतदारांवर नसली तरी अडाणी मतदारांवर एकेकाळी नक्कीच होती. इंदिरा गांधी कर्नाटकातील चिकमंगळूर, आंध्रातील मेडक मतदारसंघातून निवडून आल्या तर ८ वर्षांपूर्वी सोनिया गांधी कर्नाटकातील बळ्ळारी मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. आता संपले ते दिवस येथे पायजमा, कुडता घालून फिरायचे. रोड शो, दलितांच्या घरी जेवण हे सर्व नाटक आहे, हेेे मतदारांना कळले. ५ वर्षांपूर्वीही राहुलने उत्तर प्रदेशचा एकहाती प्रचार केला तेव्हा कॉंग्रेसला २२ जागा मिळाल्या. राहुलनी प्रचार केला म्हणून २२ तरी मिळाल्या अन्यथा दोनही मिळाल्या नसत्या, असे त्या अपयशाचेे समर्थन झाले. गेल्या ५ वर्षांत काय पक्षबांधणी केली? ५ वर्षांनंतर कॉंग्रेस २२ वरून २८ वर गेली. याला कोणी समर्थ नेतृत्व म्हणत असेल, तर खुशाल म्हणावे. अखिलेशने कसा राजकारणात उडी घेेताच पराक्रम दाखवला तसे राहुलला जमले नाही. दोन वर्षांपूर्वी बिहारमध्ये असेच झाले. भाजप-जदयू सरकार हटवण्यासाठी राहुलने किती तरी सभा घेतल्या. झाले उलटे, भाजपचे आमदार ६८ वरून ९९ झाले.
तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्म घेणे, अशी इंग्रजीत म्हण आहे. राहुल तसा जन्मला आहे. वडील, आजी, पणजोबा सर्वच पंतप्रधान त्यामुळे हा बाबाही तसे गृहित धरून चालला. राजीव गांधी १९८२ साली नोकरीचा राजीनामा देऊन, राजकारणात आले. भाषण कसे करायचे याचे दोन वर्षभरात शिक्षण घेतले. बस्स. एवढ्यावरच ८४ साली पंतप्रधान झाले. कसलेही परिश्रम न घेता त्यांच्या भाषणाची तर टवाळी होत होती. बाष्पीभवन होऊन नदीचे पाणी कमी झाले. पाणी टंचाई आहे, अशी ग्रामस्थांनी तक्रार करताच नदीच्या पात्रावर ताडपत्रीचे आच्छादन घालून बाष्पीभवन रोखण्याचा आदेश राजीव गांधींनी अधिकार्यांना दिला होता. काय करणार? वैमानिकाच्या नौकरीत त्यांनी भारत देश, नद्या, डोंगर २२ हजार फुटांवरून पाहात होते. जमिनीवरून पाहण्याची पहिलीच वेळ होती. आयते पद मिळाले. ५ वर्षांनी स्वकर्तृत्व दाखवण्याची वेळ येताच फुगा फुटला. माजी पंतप्रधान झाले. लोकसभेत त्यानंतर कॉंग्रेसला कधीच बहुमत मिळाले नाही. मिळाले असते तर मनमोहन सिंग ८ वर्षांपूर्वीच पेन्शनीत गेले असते. सोनिया गांधींच्या कितीही मनात असले तरी यु.पी.ए. तील इतरांना ते मान्य व्हायला हवे. उत्तर प्रदेशच्या परीक्षेत राहुल नापास झालाय, पण आईला ते मान्य नाही. कसला आजार झालाय ते त्यांनाच माहिती. सारख्या परदेशी पळतात. निकालाच्या बरोबर एक दिवस आधी दिल्लीत हजर. उत्तर प्रदेश जिंकलेला असेल, पंजाबातही सत्ता आली असेल. विजयोत्सव साजरा करून राहुलचा राज्यारोहण समारंभ घडवून आणणे असा आईचा मनसुबा होता.
पोराला दोष देईल तर आई कसली? राहुलबद्दल चकार शब्द नाही. सोनियाजी म्हणाल्या, ‘नेते खूप झाले. उमेदवार अपात्र निघाले.’ दोन्ही थापा. कॉंग्रेसमध्ये सोनिया-राहुल सोडल्यास एकही नेता नाही. मग खूप नेते आले कुठून? उमेदवारांची निवड करते कोण? राहुल अपयशी ठरला हे खरे कारण लपवून श्रीमती सोनिया गांधी यांनी इतरच थापा मारल्या.
स्वातंत्र्य मिळाल्यावर कॉंग्रेसचे काम संपले. आता हा पक्ष विसर्जित करा, असे गांधीजींनी म्हटले होते, पण सत्तालोलूप नेहरूंनी ते केले नाही. उलट गांधीवधाचे भांडवल करत निवडणुका जिंकल्या. गांधीजींची ती अपूर्ण इच्छा नेहरूंनी पूर्ण केली नाही, तरी नेहरूंचा पणतू ती पूर्ण करत आहे ही आनंदाची बाब आहे. प्रश्न आहे यु.पी.ए.तील इतरांचा. ममता बँनर्जींना जाणीव झाली आहे. राहुल गांधी कप्तान असलेले जहाज आता बुडायला लागलेले आहे. या बुडत्या जहाजातून उतरण्याची तयारी काहींनी केली असेलच. त्यामुळेच सोनियांना य.पी.ए. शाबूूत आहे, असे सांगावे लागले. विश्वास ठेवायचा त्यांनी ठेवावा, पण सव्वाशे वर्षांच्या कॉंग्रेसचा अंत जवळ आला आहे. त्याचे यशस्वी नेतृत्व राहुल गांधी करत आहे. या एका गोष्टीबद्दल राहुलचे ऋण मानायलाच हवे.
रविवार, दि. ११ मार्च २०१२