सडेतोड : अरुण रामतीर्थकर
शाळांच्या पटपडताळणीनंतर वाचनालयांची तपासणी झाली. दोन्हींचा उद्देश अनुदानाचा गैरवापर रोखणे हा होता. प्रत्यक्षात महसूल कर्मचार्यांनी प्रामाणिकपणे काम करणार्यांना गैरमार्गांची शिकवण दिली. एका वाचनालय तपासणीचा हा किस्सा.
महसूल कर्मचारी म्हणजे समाजाची डोकेदुखी झाली आहे. धरलं तर चावतं, सोडलं तर पळत अशी किंवा सांगता येत नाही अशी काहीशी अवस्था या खात्याबद्दल आहे. दिल्लीहून रुपया मंजूर होतो, लाभार्थीपर्यंत त्याचा पैसा होतो या वाक्यात स्वर्गीय राजीव गांधी यांनी यांची लायकी दाखवली. यांचे काम बंद आंदोलन वारंवार होते. काम बंद साठी यांना कोणतेही पादरे कारण चालते. गंमत अशी की एरवीही ते कधी काम करताना दिसत नाही, जागेवर नसतात. एखाद्या कारखान्यात कामगारांनी काम बंद आंदोलन केले तर उत्पादनावरचा विपरित परिणाम लगेचच दिसतो. महसूल कर्मचार्यांनी काम बंद केल्याचा परिणाम दिसत नाही कारण ते कधी कामच करत नाहीत. लोकशाही दिनात सातत्याने तक्रारीच्या बाबतीत महसूल विभाग प्रथम क्रमांकावर असतो. याबद्दल शरम वाटण्याऐवजी त्यांना भूषण वाटत असावे. महसूल विभाग म्हणजे सरकारचा कणा. दुसर्या शब्दात पिंडीवरचा विंचू. जोड्याने मारायला हवे पण मारता येत नाही.
सरकारने ऑक्टोबर महिन्यात शाळा तपासणी केली. गावोगावी शिक्षण सम्राट पैदा झाल्याने सगळाच राडा होता. या मोहिमेतून थोडी फार घाण बाहेर आली, पण महसूल कर्मचार्यांची ख्याती लक्षात घेतली तर याहून मोठी घाण बाहेर पडली असती, ती दाबली गेली असे दिसते. त्यानंतर वाचनालयांची तपासणी झाली. शाळांप्रमाणे वाचनालयांनाही अनुदान असल्याने केवळ अनुदानासाठीच भरमसाट वाचनालये आहेत. त्यांच्या तपासणीतील एक किस्सा माझ्यापर्यंत आला. त्यावरून या तपासण्या काय लायकीच्या होत्या हे सहज लक्षात येते.
जिल्ह्यातील एक लहानसे, ग्रामपंचायतीचे गाव. तेेथे एक वाचनालय चालू आहे. खरेखुरे वाचनालय. तपासणीसाठी साहेब येणार असा निरोप आल्यावर वाचनालय सुरु करणारे गृहस्थ वाचनालयात सकाळी १० पासून खुर्ची टाकून बसले. १२ च्या सुमारास मोटरसायकलवरून दोघे आले. गाडीवरून उतरताच ‘कोण हाय इथं’ असा एकाने आवाज देऊन वाचनालयात प्रवेश केला.
एक जण सिगारेट ओढत होता, दुसर्याच्या तोंडात गुटखा होता. वाचनालय प्रमुखाने सिगारेट विझवा किंवा बाहेर जाऊन ओढून आत या असे सांगितले. दुसर्यालाही येथे जवळपास थुंकू नका असे सांगितले. वाचनालयात सिगारेट ओढू नये असे ज्यांना सांगावे लागते ते तपासणी कशी करणार याचा अंदाज आधीच आला. तसेच झाले. पुस्तक रजिस्टरप्रमाणे २ हजार पुस्तके होती. त्यावरचा संवाद.
तपासनीस : २ हजार पुस्तके कशी?
प्रमुख : आहेत. जमवलीत. तपासून पाहा.
तपासनीस : तुम्ही ड वर्गात. ७०० पुस्तके हवीत. मग जादा कशी?
प्रमुख : नियमापेक्षा कमी पुस्तके असतील तर बोला. जादा आहेत हा दोष झाला का?
तपासनीस : जादा बोलू नका. पुस्तके एवढी कशी?
प्रमुख : साहेब, आहे हे असे आहे. तुम्हाला तपासायचे ते तपासा. जो शेरा द्यायचा तो द्या.
तपासनीस : ही जागा तुमची की भाड्याची?
प्रमुख : जागा ग्रामपंचायतीची, भाड्याने घेतली.
तपासनीस : भाडे किती?
प्रमुख : महिना ५० रु.
तपासनीस : आँ, एवढे कमी भाडे कसे?
प्रमुख : साहेब ग्रामपंचायतीचा ठराव आहे. ही ठरावाची प्रत. भाडे कमी का हे सरपंचांना विचारा. मी काय सांगणार.
साहेबांनी पुस्तके पाहिली. ग्रंथपालाशी बोलले. त्याचा पगार २ हजार. वर्षाचे २४ हजार. अनुदान मिळते २० हजार. यानेही साहेब चक्रावला.
वृत्तपत्रे किमी येतात याची चौकशी केली. ७ वृत्तपत्रे हवीत. ११ वृत्तपत्रांच्या फायली हा पण सायबाला धक्का होता. हे अस बरोबर नाही असे ते पुटपुटत होते. मग त्यांनी कोल्डड्रिंक, सिगारेटचे पाकीट, गुटखाच्या पुड्या मागवल्या. सभ्यता म्हणून पूर्तता केली. ५-१० मिनिटे इकडे तिकडे करून म्हणजे कशाची तरी वाट पाहून ते गेले.
सायंकाळी एक अपरिचित गृहस्थ आले. तुम्ही ग्रंथपाल काढून टाका, पुस्तके वृत्तपत्रावर एवढा खर्च कशाला करता. तुम्ही आत्ता २५ हजार रु. द्या. तुमचे अनुदान त्यापेक्षा अधिक वाढवून मिळेल. पुढील वर्षापासून आख्खे अनुदान तुमच्या खिशात. त्यासाठी आत्ता २५ हजार द्या. अशी लाच देऊन वाचनालय चालवायचे असते तर आत्तापर्यंत या माणसाने पदरमोड करून वाचनालय चालवलेच नसते. तपासणीसाठी आलेल्या मूर्खाला कळले नाही. तपासणी म्हणजे त्रुटी काढून त्यालेखी न करण्यासाठी जाडजूड पाकीट मागणे एवढेच त्यांना माहिती.
वाचनालय चालवणारे गृहस्थ पन्नाशी पार केलेले. अल्पशिक्षित. म्हणजे फक्त लिहिता वाचता येते. घरची शेती भरपूर. गावात शाळा सुरू झाली. मग वाचनालयही हवे हा ध्यास घेतला. त्यातून पदरमोड करून वाचनालय सुरू केले. आषाढीला जाणारा वारकरी किंवा कुंभमेळ्यास जाणारे देवभक्त जसे सरकारच्या भरोश्यावर नाही तर देवभक्तीच्या प्रेरणेने येतात. हे गृहस्थ तसेच अनुदानासाठी नाही तर वाचनसंस्कृती वृद्धिंगत व्हावी या हेतूने वाचनालय चालवतात. त्यामुळे तपासणीसाठी आलेल्यास आधी सिगारेट टाक असे बजावण्याचे धाडस त्यांना झाले. २५ हजार न मिळाल्याने हा तपासनीस फार तर वाईट शेरा लिहील. अनुदान बंद होईल. मुळात अनुदानासाठी वाचनालय चालवत नसल्याने वाचनालय बंद होणार नाही. पुढील वर्षापर्यंत ४००-५०० पुस्तके वाढतीलही.
तपासणीचा उद्देश अनुदानाचा गैरवापर रोखणे हा होता, अशी माझी प्रामाणिक समजूत आहे. प्रत्यक्षात प्रामाणिकपणे चालवले जाणार्या वाचनालयास गैरमार्ग अवलंबण्याचा सल्ला तपासणीतून मिळाला. ही तपासणी त्यासाठी होती का? तपासणीसाठी आलेले दोघे महसूल खात्याचे होते. महसूल खाते म्हटल्यावर प्रश्नच मिटला. त्यांना खाण्याशिवाय येत काय? वाचनालय तपासणी अशी झाली असेल तर शाळा तपासणी अशीच झाली असणार.
रविवार, दि. २२ जुलै २०१२