सडेतोड : अरुण रामतीर्थकर
नितीशकुमार म्हणतात हिंदुत्ववादी पंतप्रधान नको. हे विधानच मूर्खपणाचे आहे. ज्या देशात ८५ टक्के लोक हिंदू आहेत त्या देशातच हिंदुत्ववादी पंतप्रधान होईल. पाकिस्तान किंवा इटलीत होणार नाही. नितीशकुमारना हिंदुत्वाची एवढी ऍलर्जी असेल तर त्यांनी नवीन पटनाईक यांचा मार्ग अवलंबावा. हिंदुत्वामुळे नव्हे, तर गरज संपताच त्यांनी भाजपाशी मैत्री संपवली. वादविवाद न करता. हिम्मत असेल तर बिहारमध्ये ९८ संख्याबळ असलेल्या भाजपाशी मैत्री तोडावी. समविचारी म्हणजेच सेक्युलर लालू आणि कॉंग्रेस यांच्याशी युती करून सत्ता राबवावी. भाजपाची मदतही घ्यायची आणि भाजपाबद्दल अवमानित भाषाही वापरायची हा समाजवादी आचरटपणा बास करावा.
समाजवादी म्हटले की, काही तरी कटकट, त्रांगडे हे अगदी ठरून गेले आहे. ते इतके तत्त्वनिष्ठ की त्यांचे कोणाशीच पटत नाही. भांडायला दुसरा कोणी मिळाला नाही तर ते आपापसातच भांडतील, पण भांडणे हा स्वभावधर्म कधीच सोडणार नाहीत. खोटे वाटतेय का? एस्सेम जोशी आणि ना.ग. गोरे हे दोघे ग्रेट समाजवादी. दोघेही पुण्याचे. सदाशिव पेठेत राहणारे. दोघेही कोकणस्थ ब्राह्मण. त्यांचेही एकमेकांशी पटले नाही. मूळ समाजवादी पक्ष या दोघांनी फोडला. एक प्रजासमाजवादी, तर दुसरा संयुक्त समाजवादी. एका गल्लीत दोन दोन पक्षाध्यक्ष त्यावेळी बघायला मिळाले.
७७ साली सारे समाजवादी जनता पक्षात आले. आणीबाणीत संघ-जनसंघ कार्यकर्त्यांबरोबर काही महिने कारागृहात काढल्यामुळे संघद्वेषाची काविळ थोडे दिवस बरी झाली होती. लोकांनी जनता पक्षाला भरभरून मते देऊन सत्ता दिली. कॉंग्रेसची अगदी दयनीय अवस्था होती. सोनिया गांधी इटलीला परत जाण्याच्या बेतात होत्या. १३ विलिंग्डन क्रिसेंट येथे इंदिरा गांधी राहात होत्या. राहुल, प्रियंकाला शाळेत पोहोचवण्यास पायी रस्त्याने जात असलेल्या इंदिरा गांधी अनेकांनी पाहिल्या. अशा वेळी मधू लिमये या थोर समाजवादी नेत्यास पहिली काविळ झाली. दुहेरी सदस्यत्वाचा वाद काढला. म्हणजे जनता पक्षात अनेक जण संघ स्वयंसेवक होते. लिमयेंचा मुद्दा त्यांनी जनता पक्ष किंवा संघ या पैकी एकात राहावे.
गंमत अशी की, एस्सेम जोशी त्यावेळी जनता पक्षाचे अध्यक्ष होते. जनता सरकार महाराष्ट्रात आले असते, पण लाडक्या निहाल अहमदाना (वंदे मातरम् म्हणणार्या नगरसेवकांना सभागृहाबाहेर काढणारे मालेगावचे कट्टर समाजवादी महापौर) मुख्यमंत्री करता येत नाही असे दिसताच गजानन गरुड या समाजवादी आमदाराला कॉंग्रेसमध्ये पाठवून त्यांनी जनता पक्षाचे बहुमत घालवले. अन्यथा महाराष्ट्राच्या नशिबी पुलोद आलेच नसते. या एस्सेमनी जनता पक्षाचे अध्यक्ष होताच, ज्या गावात राष्ट्र सेवा दलाची शाखा नाही त्या गावात मी जाणार नाही असे घोषित केले. म्हणजे सेवा दल आणि जनता पक्ष चालतो, पण संघ आणि जनता पक्ष चालला नाही. या समाजवाद्यांनी सरकार पाडले.
समाजवाद्यांचे आधी दोन तुकडे होते. आता तुकडे तुकडे झालेत. समाजवादीही विखुरले. त्यांचे नेते कोण तर देवेगौडा, मुलायमसिंह, लालूप्रसाद, रामविलास पासवान, मुलायम लोहियावादी तर बाकीचे जेपी अनुयायी. डॉ. राममनोहर लोहिया यांची आख्खी हयात नेहरू आणि कॉंग्रेसच्या विरोधात गेली. त्या लोहियांना आदर्श मानणारे मुलायमसिंह आज कॉंग्रेसच्या चमच्याची भूमिका बजावताना दिसतात. यालाच म्हणतात समाजवाद.
याच समाजवाद्यांपैकी एक म्हणजे नितीशकुमार. जेपींचे चेले, मधू लिमयेंनी जसा कारण नसताना दुहेरी सदस्यत्वाचा वाद उकरून काढला तसाच नतद्रष्टपणा नितीशकुमारनी ३४ वर्षांनंतर सुरू केला आहे. वेळ पण नको ती निवडली. सारा देश राष्ट्रपती निवडणुकीचे नाट्य पाहात आहे. एन.डी.ए. संगमांना पाठिंबा देण्याचे ठरवत आहे. त्यामुळे बिजू जनता दल आणि अण्णाद्रमुक हे दोन नवे मित्र एन.डी.ए.ला मिळतील. विजय मिळेल न मिळेल पण प्रत्येकांचे रंग दिसतील. आता जसे मुलायमसिंह, मायावती आणि बाळासाहेब ठाकरे एका लायनीत आले तशा काही चमत्कारिक गोष्टी दिसतील. राष्ट्रपती कोण या प्रश्नाची देशात चर्चा चालू असताना २०१४ नंतर पंतप्रधान कोण यावर नितीशनी वादंग उभे केले. यालाच म्हणतात समाजवादी डोके, नेहमी भरकटतच जाणार.
शरद पवारांचे राष्ट्रीय राजकारण अलीकडे फारच हास्यापद ठरू लागले आहे. दिल्लीत त्यांचा सल्ला कोणी विचारत नसताना ‘पुढील राष्ट्रपती अराजकीय असावा’ अशी पुडी सोडली. तेच खरे मत असेल तर डॉ. कलाम यांना पाठिंबा द्यायला हवा होता. मग लाल दिव्याची गाडी गडप झाली असती. त्या गाडीसाठी तर त्यांचे राजकारण. आता ते प्रणव मुखर्जींना पाठिंबा देत आहेत. ४२ वर्षे राजकारणात असलेले मुखर्जी अराजकीय आहेत का? ए.बी.बर्धन नावाचे एक कम्युनिस्ट पुढारी आहेत. पवारांसारखे. कोणीही त्यांना पुसत नाही तरी मत द्यायचे. बर्धन म्हणाले, ‘दलित महिला राष्ट्रपती झाली पाहिजे.’ पवार, बर्धन एकाच माळेचे मणी. याच पवारांनी तातडीने नितीशकुमार यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. जणू काही आपल्या पाठिंब्याने नितीशना १० हत्तींचे बळ मिळेल ही त्यांची भाबडी समजूत.
२०१४ अजून लांब आहे. दोन वर्षांत काहीही घडेल. कॉंग्रेस आणि भाजपा हे दोनच देशव्यापी, पक्ष आहेत. यु.पी.ए.चे पुन्हा बहुमत झाले तर कॉंग्रेसचा आणि एन.डी.ए.चे बहुमत झाल्यास भाजपचा पंतप्रधान होणार हे उघड आहे. त्यावेळी पटले नाही तर हा मुद्दा काढायचा, पण एवढा सारासार विचार केला तर ते समाजवादी डोके कशाला म्हणायचे?
नितीशकुमार म्हणतात हिंदुत्ववादी पंतप्रधान नको. हे विधानच मूर्खपणाचे आहे. ज्या देशात ८५ टक्के लोक हिंदू आहेत त्या देशातच हिंदुत्ववादी पंतप्रधान होईल. पाकिस्तान किंवा इटलीत होणार नाही. कॉंग्रेस राजवटीत प्राचीन हिंदू संस्कृती आणि ज्ञान यांचा पद्धतशीर र्हास होत आहे. तो रोखण्यासाठी कोणाला हे हिंदुराष्ट्र व्हावे असे वाटण्यात गैर काय? हा देश सेक्युलर हवा असे म्हणता येत असेल, तर हिंदुराष्ट्र व्हावे असे म्हणण्यातही काही आक्षेपार्ह नाही. संसदेत दोन तृतीयांश बहुमत मिळाले तर हे होईलही. अगदी लोकशाही मार्गानेच. मग नितीशकुमारांच्या पोटात कळ यायचे कारण काय? लोकेच्छेतून हिंदुराष्ट्र बनण्याची वेळ येईल तेव्हा असे ५६ नितीशकुमार आडवे गेले तरी ते टळणार नाही. नितीशकुमारांचा रोख नरेंद्र मोदींवर आहे. मोदी हे भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतीलही किंवा नसतीलही. नितीशनी मोदींवर रागवायचे कारण बिहारचा विकास जातीयवादाने कसा खुंटला हे मोदींनी राजकोटच्या भाषणात सांगितले. रोख लालूप्रसादवर होता. लालूप्रसादनी चध माय हे म्हणजे मुस्लिम-यादव हे समीकरण आणून सत्ता मिळवली. नितीशनी कुर्मी व इतर जाती एकच आणून म्हणजेच जातीच्या आधारावरच लालूंना हरवले. बिहारमध्ये आणि देशात जातीचे राजकारण खुलेआम केलेले चालते. मात्र जातीच्या पलीकडे जाऊन धर्माचे केलेले राजकारण चालत नाही. असे का? जाती जातीत विखुरलेला हिंदू समाज हिंदू म्हणून एक करणे हे देशकार्य आहे. कॉंग्रेस-समाजवादी आणि कम्युनिस्टांना हेच नको आहे. सेक्युलॅरिझमच्या नावाखाली हे पक्ष जातीचे राजकारणच करत आहे. नितीशकुमारांची सेक्युलॅरिझम ही वैचारिक धारा कॉंग्रेसशी मिळती जुळती असेल तर गेली १२ वर्षे ते भाजपाशी मैत्री का ठेवून आहेत. मुलायम आणि सीताराम येचुरी यांनी हा विषय कधी मनात आणला का? त्यांनी कॉंग्रेसला मदत केली, पण भाजपाला विरोधच केला. नितीशकुमारना हिंदुत्वाची एवढी ऍलर्जी असेल तर त्यांनी नवीन पटनाईक यांचा मार्ग अवलंबावा. हिंदुत्वामुळे नव्हे, तर गरज संपताच त्यांनी भाजपाशी मैत्री संपवली. वादविवाद न करता. हिम्मत असेल तर बिहारमध्ये ९८ संख्याबळ असलेल्या भाजपाशी मैत्री तोडावी. समविचारी म्हणजेच सेक्युलर लालू आणि कॉंग्रेस यांच्याशी युती करून सत्ता राबवावी. भाजपाची मदतही घ्यायची आणि भाजपाबद्दल अवमानित भाषाही वापरायची हा समाजवादी आचरटपणा बास करावा.
रविवार, दि. २४ जून २०१२