प्रहार : दिलीप धारुरकर केंद्र सरकारचे प्राण अगदी कंठाशी आले होते. प्रणव मुखर्जी यांनी चांगलीच हाराकिरी केली होती. जे झाकली मूठ उघडली गेली आणि पी. चिदंबरमच नव्हे तर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याही अंगाशी हा प्रवण मुखर्जी यांचा लेटरबॉम्ब आला होता. अखेर सोनिया गांधी यांनी डोळे वटारले आणि प्रणव मुखर्जी यांनी कशीबशी कसरत करत न पटणारा खुलासा करून वादावर पडदा टाकल्यासारखे केले. या देशातील प्रसारमाध्यमे ही सुद्धा बातम्या आणि घटना कशात तोलतात असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. असाच किंवा यापेक्षाही थोडा जरी वाद भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही राज्य, केंद्र सरकारात झाला असता तर ही माध्यमे अक्षरश: तुटून पडली असती. मोदी यांनी सद्भावना उपवास केला तर त्या बाबत मुलाखत घेताना एका वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी अटलजींनी गुजरातच्या दंगलीच्या वेळी दहा वर्षांपूर्वी मोदी यांना राजधर्माची आठवण करून दिली होती तो मुद्दा उकरून काढून खोदून खोदून त्याबाबत स्मृती इराणींना विचारत होता. मात्र इथे देशाचे केंद्र सरकार पार कोसळण्याच्या स्थितीत आले होते. अर्थमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ मंत्री असलेल्या प्रणव मुखर्जी यांनी पत्रास्त्र टाकले होते ते थेट गृहमंत्री चिदंबरम् आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर! मात्र मॅडमनी डोळे वटारताच मुखर्जी यांनी ते पत्र अर्थमंत्रालयाचे असले आणि खाली सही माझी असली तरी त्या पत्रातील मते मात्र माझी मते नाहीत असा अजब खुलासा केला. प्रसारमाध्यमांनी लगेच कसा काय कोण जाणे या खुलाशावर विसंबून या वादावर पडदा टाकून दिला! दुसर्याच दिवशीपासून सर्व माध्यमे भारतीय जनता पक्षात मोदी आणि आडवाणी यांच्यात कसा वाद उफाळला आहे याची रसभरीत वर्णने पहिल्या पानापासून अग्रलेखापर्यंत रंगवू लागली. एका क्षणात कॉंग्रेसने इतकी दाबादाबी केली तरी कशी? प्रसार माध्यमांनी आपली तोंडे कशाने बंद केली? वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नही होती हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम| असा जो शेर आहे त्याचा प्रत्यय गेल्या तीन दिवसांत लागोपाठ आला. प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता अशामुळे पार संपत जाणार आहे. वास्तवापासून दूर राहण्याचा प्रयोग फार दिवस यशस्वी होत नसतो. केंद्र सरकारमध्ये हे गंभीर संकट कसे काय तयार झाले? अचानक प्रणव मुखर्जी यांना काय झाले? त्यांनी आपल्या आधी अर्थमंत्री असलेल्या चिदंबरम यांना या वादात खेचले इतकेच नव्हे तर चिदंबरम् यांनी मनात आणले असते तर टू जी स्पेक्ट्रमचा कोट्यवधी रूपयांचा घोटाळा रोखता आला असता असे मत व्यक्त करत थेट पंतप्रधानांना पत्र पाठविले. अर्थमंत्रालयाने पाठविलेले हे पत्र जगजाहीर होताच प्रचंड चर्चा सुरू झाली. मुखर्जी यांना खुलासा विचारण्यात येऊू लागला. त्यावर प्रणवदांनी आणखी एक लेटरबॉम्ब फेकला. स्पेक्ट्रम घोटाळ्यात पी. चिदंबरम यांच्यावर दोषारोप करणार्या पत्रातील मजकूर हा कायदा खाते, अर्थ खाते, दूरसंचार खाते आणि पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे असे सांगून टाकले. चक्क एका दगडात चार पक्षी मारले. अगदी पंतप्रधान कार्यालयाला यामध्ये ओढत खुद्द पंतप्रधानांनाही एका अर्थाने वादात ओढले. प्रणव मुखर्जी यांनी अशा प्रकारे उघड उघड बंड केले. एक ज्येष्ठ मंत्री अशा प्रकारे जाहीरपणे तलवार उपसून फिरवू लागतो. ज्या घोटाळ्यात एक केंद्रीय मंत्री तुरूंगात गेले त्याच प्रकरणात गृहमंत्री आणि पंतप्रधान यांच्यावरही थेट दोषारोप करणारे पत्र केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रणव मुखर्जी लिहितात ही सरकारचे वस्त्रहरण करणारी घटना होती. आता हे सरकार राहणार की कोसळणार असा प्रश्न या पत्राची बातमी आल्यानंतर लोक एकमेकांना, जाणकारांना विचारू लागले होते. एकूण बाका प्रसंग पाहून सोनिया गांधी यांंनी यात हस्तक्षेप केला. प्रणव मुखर्जी, चिदंबरम यांच्यात समेट घडवून आणला. आता सरकारला धोका निर्माण झाला आहे आणि सत्ता अशा प्रकारे गेली तर बाबाही गेला अन् दशम्याही गेल्या असे होईल याची त्यांनी या वाद घालणार्यांना जाणीव करून दिली. नगर जिल्ह्यातील सहकारातील ज्येष्ठ नेते शंकरराव काळे एकदा मला म्हणाले होते की, ‘साहेब आम्ही कॉंग्रेसची माणसं एरवी भांडतो पण निवडणुका आल्या की एकत्र येतो. विरोधी पक्षातले लोक मात्र एरवी एकत्र असतात आणि निवडणुका आल्या किंवा सत्ता मिळाली की भांडतात.’ काळे -कोल्हे वाद असून कोपरगाव कॉंग्रेसचा बालेकिल्ला कसा काय? यावर मी काढलेल्या चर्चेवर काळे यांचा हा युक्तिवाद होता. दिल्लीतील हा चिदंबरम्, प्रणव मुखर्जी यांच्यातील वादाचा घटनाक्रम पाहिला तेव्हा शंकरराव काळे यांच्या या विधानाची मला आठवण झाली. अखेर फुगलेले चेहरे बदलून मुखर्जी, चिदंबरम एकत्रितपणे पत्रकारांना सामोरे गेले. आपल्या पत्रातील मजकूर हा कायदा, दूरसंचार, अर्थ या खात्यातून आणि पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीवर आधारित होता असे लेखी पत्रात लिहिणारे मुखर्जी पत्रकारांना म्हणाले की, हे पत्र जरी माझ्या कार्यालयाकडून लिहिलेले असले असले आणि त्यावर खाली माझी सही असली तरी त्या पत्रातील मजकूर हा माझा नाही. हा एक नवाच प्रकार! विशेष म्हणजे सेक्युलर मीडियाने या युक्तिवादाला मान्यता दिली. हा वाद मिटला असे जाहीर करून त्यावर पडदाही टाकला. केंद्रातले सरकार दोलायमान करणार्या या गंभीर वादावर नंतर ना विश्लेषण, ना पाठपुरावा, ना काही अन्य बातम्या .. ! कशाच्या बदल्यात मीडिया इतका गप्प बसला? मॅडमनी हाताची घडी तोंडावर बोट अशी आज्ञा दिल्यावर प्रणव मुखर्जी, चिदंबरम, मनमोहनसिंग यांनी तसे करणे ठीक आहे मात्र, देशातील मीडियाने हा आदेश कसा काय पाळला, हे एक गौडबंगालच आहे. मीडियाने मौन ठेवले म्हणून घडलेल्या वास्तव घटनेबाबत सामान्य माणूस विचार करायचा थांबत नाही किंवा मीडिया एखाद्याच्या मागे हात धुवून लागला म्हणून सामान्य माणूस त्या व्यक्तीला खलनायक ठरवत नाही असा अनुभव यापूर्वी अनेकदा आला आहे. आणिबाणीत मीडियाचे बाहुले बनवून इंदिरा गांधींनी वीस कलमाची जपमाळ ओढायला लावली म्हणून काही लोकांनी त्यांना पुढच्या निवडणुकीत निवडून दिले नाही आणि मीडिया गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा विडा उचलल्यासारखे सदैव ओरडत असला तरी लोकांनी मोदी यांना हिरो करण्याची एकही संधी सोडलेली नाही. तसे या प्रकरणातही मीडियाने मौन पाळले तरी लोक मौन पाळत नाहीत. एक लाख ७६ हजार ३७९ कोटी रुपयांचा महाघोटाळा एकट्या ए. राजा यांनी केला असेल यावर लोकांचा विश्वास नाही. या घोटाळ्यात एकेक नावे पुढे येत आहेत. सुब्रम्हण्यम स्वामी यांनी तर या घोटाळ्यात गृहमंत्री चिदंबरम, पंतप्रधान मनमोहनसिंग, सोनिया गांंधींची बहीण, जावई रॉबर्ट वधेरा यांना ओढले आहे. गतीने तपास झाला तर मंत्रीमंडळाची बैठक तिहारमध्येच घ्यावी लागेल इतक्या संख्येने केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री संशयाच्या घेर्यात आहेत अशी टीका नितीन गडकरी यांनी केली आहे. जे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाला पडले ते सामान्य माणसालाही सहज पडू शकतात. २००७ साली स्पेक्ट्रमचा घोटाळा होणार अशी कुणकुण पंतप्रधानांना लागली होती. तसे लेखी पत्र त्यांनी ए. राजा यांच्या कार्यालयाला पाठविले होते. मात्र त्यानंतर हा घोटाळा चालू राहिला. माहिती असूनही घोटाळा होत असताना पंतप्रधानांनी मौन का पाळले, हा प्रश्नच आहे. त्यावेळी अर्थमंत्री असलेले पी. चिदंबरम् यांनी या प्रकरणाकडे कशाच्या आधारे डोळेझाक केली, असे प्रश्न सामान्य माणसाला पडले आहेत. पंतप्रधानपदाचे आपणच लायक उमेदवार आहोत असे राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हापासून ज्या प्रणव मुखर्जी यांना वाटते आहे त्यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी लेटरबॉम्बचा धमाका उडवून दिला. नंतर त्यांनी सारवासारव केली. पण जो बूँद से गई वो हौदौं से नही आती, अशातला हा सगळा प्रकार आहे. या सरकारचे प्राण अगदी कंठाशी आले होते. आता कसेबसे सलाईन लावून जगविण्याचा प्रकार चालला आहे. लोकांना या लोकांच्या बेईमानीची, बेबनावाची, बेबंदशाहीची, स्वार्थाची, वादाची सर्व जाणीव झाली आहे. आगामी काळात हे सरकार परस्परांना डोळे वटारत टिकले तरी निवडणुकीत जनता यांना धडा शिकविण्याची शक्यता जास्त आहे. त्या दिशेनेच राजकीय संज्ञापन आणि ध्रुवीकरण देशात घडले पाहिजे. उघड उघड देशाच्या सरकारमधील बेबनाव, बेबंदशाही चव्हाट्यावर येते. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याने यांचे हात बरबटलेले असल्याचे त्यांचेच एक ज्येष्ठ सहकारी सांगतात. आणि त्यानंतर पुन्हा झाकपाक होते आणि सर्व काही अलबेल? डोळे मिटून दूध प्याले किंवा अंधार केला म्हणून केलेले पाप झाकले जाईल अशी कोणाची समजूत असेल तर ते झूट आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असे मानले जाणार्या या देशातील लोकशाहीचा आधार असलेली जनता भलेही निरक्षर असो पण सूज्ञ आहे, संवेदनशील आहे. देशहिताच्या मुद्यावर या जनतेने टोकाची सखोल एकात्मता आणि प्रगल्भता दर्शविली आहे. त्यामुळे या स्पेक्ट्रमच्या महाघोटाळ्याचे पाप कोणी कसेही झाकले तरी झाकले जाईल असे वाटत नाही. आता यांचे प्राण कंठाशीच आले आहेत यात संदेह नाही! स्रोत: तरुण भारत, 10/2/2011
Posted by : AMAR PURANIK | on : 9 Oct 2011 Filed under : Blog Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper.. You can follow any responses to this entry through the RSS 2.0 You can leave a response or trackback to this entry