Home » Blog » सिर सलामत तो अविष्कार स्वातंत्र्य पचास

सिर सलामत तो अविष्कार स्वातंत्र्य पचास

पंचनामा : भाऊ तोरसेकर
गेल्या जानेवारी महिन्याच्या अखेरीस महापालिका निवडणूकांचा फ़ड रंगला होता आणि त्याचे डावपेच एकमेकांचे उमेदवार किंवा नेते फ़ोडण्यातून खेळले जात होते. मग एके दिवशी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी शिवसेनेचा एक खासदार आपल्याशी संपर्काता असून दोन दिवसात राष्ट्रवादीमध्ये दाखल होईल, अशी गर्जना केली होती. त्यातून मग तो खासदार कोण याचा शोध सुरू झाला आणि प्रत्येकाने आपापल्या अकलेनुसार “सुत्रांचे” हवाले देत बातम्या रंगवल्या होत्या. त्यात महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्राने सेनेचे आनंदराव अडसूळ फ़ुटणार असल्याची बातमी दिली होती. त्यामुळे संतप्त झालेले त्यांचे पाठीराखे त्या दैनिकाच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी मोडतोड केली होती. त्यानंतर नेहमीप्रमाणे आविष्कार स्वातंत्र्यावर हल्ला झाल्याचा एक देशव्यापी तमाशा रंगला होता. महाराष्ट्रात तो नेहमीच होत असतो. त्यातले काहीजण थेट मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले व पत्रकारांना खास संरक्षण देणार्‍या विशेष कायद्याची जुनीच मागणी करण्यात आली. खरेच तो अविष्कार स्वातंत्र्यावरचा हल्ला होता काय? हेमंतभटजी देसाईंपासून निखिलशास्त्री वागळ्य़ांपर्यंत तमाम मंड्ळी उपरणे सावरत स्वातंत्र्ययुद्धात उतरल्या होत्या. साधारण जानेवारी फ़ेब्रूवारी यांच्या सीमेवरची वृत्तपत्रे शोधली तर त्याचे अनेक उतारे सापडतील. जणू शिवसैनिक पत्रकारांच्या जीवावरच उठले आहेत असा प्रचंड कांगावा करण्यात आला होता. असा केवढा मोठा हल्ला झाला होता? काही संगणक व कागदपत्रांसह सामानाची मोडतोड झाली होती. दोनतीन लाखापेक्षा ती नासधूस मोठी नव्हती. शिवाय कोणाला इजासुद्धा झाली नव्हती. पण कांगावा एवढा चालू  होता की जणू अडसुळ यांच्या पाठीराख्यांनी टाईम्सच्या दगडी चाळीवर क्षेपणास्त्रच सोडलेले असावे. किंवा मोठासा बॉम्बस्फ़ोटच घडवला असावा. तेव्हा मटाच्या संपादकांनी ‘तोडफ़ोड संस्कृतीचे पाईक’ असा खास संपादकीय लेख लिहिलेला सुद्धा आठवतो. असे काही घडले मग महानगरी पत्रकार व कायबीईन लोकमतच्या निखिल वागळे यांना भलताच चेव चढतो. त्यामुळे त्यानेही त्या जत्रेत नाचून घेतले तर नवल नव्हते. माझी त्याबद्दल तक्रार नाही. पण जे लोक साध्या संगणक व सामानाच्या मोडतोडीनंतर इतका गहजब करतात, त्यांनी पत्रकारांवर खरोखरच जीवघेणा हल्ला झाला तर किती धमाल उडवून द्यायला पाहिजे ना? म्हणजे कुठल्या वाहिनीची ओबी व्हॅन जाळली किंवा फ़ोटोग्राफ़र कॅमेरामनला मारले, तर किती आकाशपताळ एक करायला हवे ना? पण कुठे काही होताना दिसत नाही.

   शनिवारी मुंबईत रझा अकादमीच्या मेळाव्यासाठी जमलेल्या जमावाने जो धिंगाणा केला, त्यात तीन ओबी व्हॅन जाळल्या आहेत. शिवाय पत्रकार व कॅमेरामन यांना बेदम मारले आहे. पण कोणी मायका लाल पत्रकार त्याबद्दल अवाक्षर बोलायला तयार दिसत नाही. हा काय चमत्कार आहे? गेला बाजार निखिलने तरी त्यासाठी ओरडायला नको का? आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आहे, ‘गावात लगीन आणि कुत्र्याक बोवाळ’. म्हणजे गावात लग्न वगैरे असले मग जी धावपळ किंवा गडबड चालु असते; त्यात भटकी कुत्री उगाच गोंगाट करत इकडेतिकडे पळत असतात. त्याला बोवाळणे म्हणतात, कुठल्याही पत्रकाराला शिवसैनिकांनी थप्पड मारली किंवा नुसती धमकी दिली, तरी निखिल दिवसभर बोवाळतो. त्यानेही शनिवारपासून अविष्कार स्वातंत्र्याचा कुठलाही बोवाळ करू नये; याचे मला खरेच आश्चर्य वाटले आहे. माझ्या माहितीप्रमाणे आजवर मुंबईत कधीही माध्यमांवर, पत्रकारांवर सरसकट इतका मोठा हिंसक हल्ला कधीच झालेला नाही. मग हे सगळे गप्प कसे? अगदी त्यात एबीपी माझाच्या जोडीदार वाहिनीचे थेट प्रक्षेपण करणारे वाहनही जाळण्यात आले आहे. पण कदाचीत “रझा”चा तो “माझा” म्हणत त्या वाहिनीवरचे जोशी हल्लेखोरांवर खुपच “प्रसन्न” असावेत. कारण त्याही वाहिनीने दंगलीवर चर्चा केली. पण पत्रकार माध्यमांवर हल्ला झाल्याचा चकार शब्द कोणी उच्चारला नाही. कमाल आहे ना? मग असा प्रश्न पडतो, की अविष्कार स्वातंत्र्यावर हल्ल्याची यांची नेमकी व्याख्या तरी काय आहे? शिवसेना किंवा तत्सम कोणी शिवी घातली, की हल्ला होतो व स्वातंत्र्य धोक्यात येते आणि अन्य कोणी जिवघेणा हल्ला केला, तरी अविष्कार स्वातंत्र्य सुखरूप असते का? की रझा अकादमीच्या पाठीराख्यांना माध्यमांवर प्राणघातक हल्ला करण्याचे विशेष अधिकार राज्यघटनेने दिलेले आहेत? आणि म्हणून ही अविष्कार स्वातंत्र्यवादी मंडळी शनिवारच्या घटनेनंतरही गप्प आहेत? त्यांनी तसे सांगायला तरी हवे होते ना?

   “बुवा, काय करणार रझा अकादमी ही मुस्लिमांची संघटना आहे आणि त्यांनी आमची गाडी जाळली, कॅमेरामनला झोडपले, आमचे कॅमेरे तोडले, टाईम्सच्या कार्यालयावर दगडफ़ेक केली; तरी आम्ही बोलू शकत नाही. काय करणार अल्पसंख्यांक म्हणुन त्यांना माध्यमे वा आविष्कार स्वातंत्र्यावर हल्ला करण्याचा खास अधिकार सेक्युलर राज्यघटनेने दिला आहे” असे तरी निदान स्पष्टपणे सांगून टाकावे. मग सामान्य लोकांचा गोंधळ उडणार नाही. मग पत्रकार इतक्या भीषण हल्ल्यानंतरही का गप्प आहेत, त्याच्याबद्दल लोकांच्या मनात शंका येणार नाहीत. अगदी ‘तोडफ़ोड संकृतीचे पाईक’ असा २९ जानेवारी २०१२ रोजी खास अग्रलेख लिहिणार्‍या महाराष्ट्र टाईम्सच्या संपादकांना काय झाले आहे? शनिवारी जे त्यांच्या कार्यालया समोर सीएसटी परिसरात घडले, ती तोडफ़ोड नव्हती असे त्यांना म्हणायचे आहे काय? कारण त्यात त्यांच्याच संस्थेत काम करणार्‍या श्रीराम वेर्णेकर नामक छायाचित्रकाराचा कॅमेरा फ़ोडण्यात आला आहे. त्याचे छायाचित्रही प्रसिद्ध झाले आहे. मग या ‘मटा’च्या संपादकांना त्यांचाच भाईबंद वेर्णेकर त्यातला गुन्हेगार वाटतो काय? नसेल तर ते गप्प का आहेत? हे सगळे अविष्कार स्वातंत्र्याचे मोठे लढवय्ये योद्धे आता अचानक कुठल्या बिळात दडी मारून बसले आहेत? ज्यांनी त्याच्यावर खरा प्राणघातक हल्ला चढवला; त्यांच्यासमोर येऊन त्यांच्याशी तिथल्या तिथे दोन हात करावेत अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. पण निदान तक्रार तरी कराल की नाही? निदान रडून दाखवाल की नाही? दुखते खुपते म्हणायची तरी हिंमत दाखवाल की नाही? की जे झाले तो माध्यमांवरचा, अविष्कार स्वातंत्र्यावरचा हल्लाच नाही असे म्हणायचे आहे?

   ही घटना घडल्यापासून मला अनेक वाचकांनी फ़ोन करून पत्रकार व माध्यमे कशी पक्षपाती आहेत ते ऐकवले. हीच गडबड शिवसेनेकडून झाली असती आणि यापेक्षाही किरकोळ असती, तर याच माध्यमांनी “हिंदूत्ववाद्यांचा हैदोस” अशी किंकाळी फ़ोडली असती. पण त्यात एक मुस्लिमांची संघटना गुंतलेली असल्याने कोणी त्याला मुस्लिम गुंडही म्हणत नाही, तर दंगेखोर म्हणतात, अशी या वाचकांची तक्रार आहे. शिवसेनेच्या गडबडीला जर धर्माचे लेबल लागत असेल तर रझा अकादमीच्या गुंडगिरी, दंगेखोरीला धर्माचे लेबल का लागत नाही? माध्यमे ते लेबल का लावत नाहीत? त्या वाचक मित्रांचे शंका समाधान व्हावे म्हणुनच हा सर्व तपशील लिहिला आहे. मित्रांनो जे पत्रकार व माध्यमे स्वत:वर प्राणघातक हल्ला झालेला असताना, त्याला हल्ला म्हणायलाही घाबरलेली आहेत, त्यांच्याकडून आपण सत्य बोलण्य़ाची अपेक्षा बाळगू शकतो का? सत्य बोलण्यासाठी हिंमत लागते आणि जो घाबरलेला असतो तो कधीच सत्य बोलत नसतो. ज्याला घाबरलेला असतो किंवा ज्याची त्याला भिती वाटत असते, त्याचे समाधान होईल असे तो भेदरलेला बोलत असतो. म्हणुनच माध्यमे खरे बोलत वा सांगत नाहीत, तर ज्याचा त्यांना धाक आहे, त्याला सुखावणारे सत्य सांगत असतात. शिवसेनेची कुठल्याही पत्रकाराला अजिबात भिती वाटत नाही. कारण सेना कुणाचाही जीव घेणार नाही याची त्यांना पुर्ण खात्री आहे. फ़ार तर शिवसैनिक काय करतील मोडतोड गदारोळ करतील. पण ज्यांच्यात जिहाद संचारला आहे ते जीव घ्यायलाही मागेपुढे बघणार नाहीत, याची खात्री आहे ना? मग भले व्हॅन जाळल्या किंवा कॅमेरे फ़ोडले म्हणून रझा अकादमीच्या विरोधात बोलायची हिंमत कोण दाखवणार? ‘सिर सलामत तो अविष्कार स्वातंत्र्य पचास’ हे या अविष्कार स्वातंत्र्यवीरांचे ब्रीदवाक्य आहे. मग शनिवारी त्यांना झोडपले म्हणून कोण चकार शब्द त्याबद्दल बोलेल? म्हणून तर सगळे वागळे अविष्कार स्वातंत्र्याचे योद्धे शनिवारपासून बिळात दडी मारून बसले होते. अजून आठवडा होत आला तरी त्यातल्या कुणाला अजून कंठ फ़ुटलेला नाही.      १७/८/१२

———————————————–

छायाचित्रे -फ़ोडलेला कॅमेरा दाखवताना टाईम्सचे श्रीराम वेर्णेकर आणि पोलिसांच्या तावडीतून आपला कॅमेरा वाचवू बघणारे मिडडेचे अतुल कांबळे

Posted by : | on : 20 Aug 2012
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *