या लेखात उद्धृत केलेल्या सत्य घटनेतील आई व मुलीचे आई बाप सुटले पण ज्यांना मुलीचे गुपचूप क्युरेटिंग किंवा ऍबॉर्शन करावे, लागते किंवा ‘मी खुशीने धर्मांतर करत आहे.’ असे ऍफिडेव्हिट मुलगी बापाच्या तोंडावर फेकते, तेंव्हा आई-बापास किती यातना होतात. अशी वेळ आपल्यावर येऊ नये असे आपणास वाटते का?
घटना कोणत्या गावात घडली हा मुद्दा एकदम नगण्य आहे. कारण आता परिस्थिती अशी आहे की हा प्रकार कोणत्याही गावात होऊ शकतो. संपूर्ण घटनेचे अवलोकन केल्यावर माझ्याकडे प्रश्न पडलाय की,या प्रकाराबद्दल नेमके दोषी कोणाला ठरवायचे. खूप विचार करूनही मी निर्णयाप्रत येऊ शकलो नाही.
प्रकार असा झाला की, एका गावातील एक तरुण-तरुणी. एकमेकावर प्रेम. लग्नाच्या आणाभाका वगैरे झालेही असेल. एक दिवस मुलाचा वाढदिवस येतो. मित्र-मैत्रिणींना घरी बोलावून घरगुती पदार्थांची पार्टी देत वाढदिवस साजरा करता येतो. कांदे पोहे, बटाटेवडे हे प्रकार गावंढळ वाटत असतील, तर मित्र-मैत्रिणींना हॉटेलात नेऊन मंचुरियन,पिझ्झा,बर्गर वगैरे खायला घालूनही वाढदिवस होतो. वाढदिवस हा सामुदायिकपणे साजरा करायचा असतो.
या घटनेतील तरुणास हे दोन्ही प्रकार मान्य नव्हते. गावाबाहेर लांब असलेल्या एका टेकडीवर जाऊन एकांतात वाढदिवस साजरा करायचे त्याने ठरवले. किमान त्या तरुणीने हा प्रस्ताव ठोकरायला हवा होता. पण तीही तयार झाली. दोघेजण मोटार सायकलीवरून टेकडीवर गेेले.
टेकडीवर दोघे तिघे असतील. त्यांना वर जाताना काहीनी पाहिले असेल. हा ग्रुप असता तर त्यांच्या वाटेला कोणी गेले नसते. आजुबाजुला नीरव शांतता, वर्दळ नाही. त्यात हे दोघेच. मग नको तेच झाले. ९ जणांची एक टोळी त्यांच्यावर चालून गेली. त्या दोघांजवळील पैसे, घड्याळ, चेन अशा सर्व वस्तू लुटल्या. मग त्या तरुणाला स्कार्फने गळा दाबून ठार केले. त्याचे प्रेत झाडीत लपवून ठेवले. नंतर त्या तरुणीवर ९ जणांनी बलात्कार केला.त्यानंतर तरुणीचा ही गळा दाबून खून केला. कार्यभाग उरकल्यावर ते सर्व पळून गेले. रात्र झाली तरी दोघे न परतण्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. रात्रभर तपास लागला नाही. दुसरे मुलाचे आणि मुलीचे पालक हरवल्याची फिर्याद देऊन आले.
दुसरे दिवशीच टेकडीवर फिरायला गेलेले किंवा गुराखी, कोणाला तरी तरुणाचे प्रेत दिसले. पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी येऊन मुलीचे प्रेत व मोटारसायकल ताब्यात घेतली. थोड्याशा प्रयत्नानंतर मुलाचे ही प्रेत सापडले. मोटारसायकलच्या नंबरवरून पालकांचा छडा लागला. ओळख पटवण्याचे सोपस्कार होऊन मृतदेह ताब्यात देण्यात आले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. काय प्रकार घडला हे लक्षात येण्यास पोलिसांना वेळ लागला नाही. कोणी केला एवढाच तपास होता. टेकडीच्या आसपास रहाणार्याचेच हे काम असणार हे गृहित धरून चौकशी सुरू करताच ४-५ जण फरारी झाल्याचे आढळले. हाती सापडले त्यांना अटक करून फरारी झालेल्यांनाही यथावकाश पकडून सर्वांवर ३०२, ३७६ कलमाखाली खटला भरण्यात आला.
सरकार पक्षातर्फे ५७ साक्षीदार उभे करण्यात आले. टेकडीवर जाताना किंवा परत येताना घटनेच्यावेळी आरोपींना पाहिले असे सांगणारेही साक्षीदार होते. पण नंतर त्यातील १६ साथीदार फुटले. परिस्थितीजन्य पुराव्याचे महत्त्व अनन्यसाधारण असते. येथे तो ठिसूळ निघाला. जप्त केलेला मुद्देमाल आरोपींकडून मिळाला ही महत्त्वाची बाबही सिद्ध, झाली नाही. डीएनए चाचणी तर आरोपींना सहाय्यभूत ठरली. तरुणीवर बलात्कार झाल्याचेही सिद्ध झाले नाही. परिणामी संशयाचा फायदा मिळत सर्व आरोपींची मुक्तता झाली.
आता प्रश्न असा उद्भवतो की, त्या तरुण तरुणीचे खून झाले हे शंभर टक्के सत्य आहे, तर ते कोणी केले हा प्रश्न अनुत्तरित का रहातो? प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसलेल्या खटल्यात पोलिसांना किती काळजीपूर्वक इमले उभे करावे लागतात. मारझोड करून घेतलेला कबुली जबाब न्यायालयात नाकारला जातो. पण कबुली जबाब मिळाल्यावर पुढचा तपास सोपा असतो. मुद्देमाल त्यामुळेच मिळाला होता. मग सर्व आरोपी सुटले कसे? साक्षीदार फुटणे हे समजू शकते. ते गृहित ही धरावे लागते. दिवसाढवळ्या दोन खून होतात. आरोपी हाताला लागूनही आरोप सिद्ध करण्यात सरकार पक्ष अयशस्वी ठरला. पोलीस खात्याला हे केवढे लांच्छन.
पण फक्त पोलिसांना दोष देऊन हा प्रश्न मिटतो का? अजिबात नाही. गावाबाहेर वर्दळ नसलेल्या ठिकाणी आपण दोघे जाऊ या प्रस्तावाला तरुणीने ठाम नकार दिला असता, तर ही वेळ आली असती का? प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे वाढदिवस सर्व मित्रांसह त्याच टेकडीवर साजरा केला असता तरी चालले असते. एकांतात जाण्याची त्याची किंवा दोघांची इच्छा वेगळीच सांगून जाते. ही शिक्षा नको त्या वयातील नको त्या इच्छेची आहे, हे खेदपूर्वक म्हणावे लागते. पुन्हा मुद्दा येतो की, त्या मुलीवर घरचे काय संस्कार होते. घरच्यांचा तिला किती धोक होता? एकांतात कशासाठी जायचे हे न कळण्याएवढी ती लहान नव्हती. त्याला तिने होकार द्यावा. हेच विनाशाचे कारण आहे. मुलींना शिकवण्याचा आणि मुलाप्रमाणे वाढवून पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या विचारधारेचा हा सपशेल पराभव आहे. हे दोघे मित्र असते तर हा प्रकार घडलाच नसता. मुलात आणि मुलीत हाच फरक आहे. हा फरक लक्षात घेतला नाही, तर असेच होणार.
हे दोघे जीवानिशी गेले म्हणून चर्चेचा विषय झाले. आज तोंडाला स्कार्फ गुंडाळून एखाद्या मुलासोबत मोटार सायकलीवरून आपली मुलगी गेली तरी तिचा बाप तिला ओळखू शकणार नाही. सूर्यप्रकाश आणि धुळीपासून संरक्षण या शेंड्या कोणाला लावता? १५-२० वर्षांपूर्वी सायकलीवरून कॉलेजात येणार्या मुलींना सूर्यप्रकाश काळे करत नव्हता का? तोंडाला फडके, वस्त्रावरून ओळख पडू नये म्हणून सनकोट, हातात मोबाईल या अवतारात घराबाहेर पडणार्या मुलीस पालकच का हटकत नाहीत? उलट पोरगी किती काळजी घेते याचे कौतुक पालकांच्या चेहर्यावर दिसते. सर्वच मुली अशा नाहीत. पण बहुसंख्य मुली चेहरा झाकून आणि सनकोट घालून बाहेर पडतात त्या सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण करतात असे नाही, तर उच्छृंखल वागण्याचा परवाना घेऊन बाहेर पडत असतात.
एक सरकारी घोषणा आहे. अडाणी आई, घर वाया जाई. तद्दन मूर्खपणाची ही घोषणा आहे. पन्नाशी ओलांडलेल्यांनी सांगावे, तुमची आई, आजी ,काकू, मामी या किती शिकल्या होत्या. चौथी पास म्हणजे खूप शिक्षण मानले जाई. त्या आया अडाणी होत्या. म्हणून किती घरे वाया गेली? उलट त्यांचेच प्रपंच व्यवस्थित झाले. शिकलेल्या, खूप शिकलेल्या पोरीच्या प्रपंचाची कशी वाट लागते ते डायव्होर्स पिटशिनचे आकडेच सांगतील. मुलींना १० वी पर्यंत जरूर शिकवा. १० वी तील मुलींचे प्रताप मला माहिती आहेत. तरीही १० वी पर्यर्ंत शिकवा. १० वी किंवा १२ वी आषाढी कार्तिकी करत कशीबशी ओलांडली असेल किंवा जेमतेमच पास असेल, तर पुढे शिकवण्याची कांहीही गरज नाही. अभ्यासात ढ असलेल्या पोरी कॉलेजात शिकण्यासाठी जातच नाहीत. आज पालकांच्या डोळ्यात पाणी आणणार्या पोरी अभ्यासात ढ च असतात. स्त्री मुक्ती, चूल आणि मूल या पासून सुटका, स्त्री पुरुष समानता असल्या भंपक आणि भ्रामक कल्पनांवर विश्वास असणार्यांना हे विचार आता पडणार नाहीत. पोरीने तोंडाला काळे फासल्यावर हे पटूनही उपयोग नाही, हे पक्के लक्षात ठेवा.
रविवार, दि. १२ फेब्रुवारी २०१२