दोन पटेल, दोन सौदे आणि दोन घोटाळे! •दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी दोन पटेल आणि दोन सौदे! एक सौदा खासदार खरेदीचा, तर दुसरा सौदा विमान खरेदीचा. २०-२२ खासदारांना खरेदी करणारे अहमद पटेल, तर ६८ विमानांच्या खरेदीत अडकलेलेे प्रफुल्ल पटेल! येणारा घटनाक्रम या दोन पटेलांवर केंद्रित झालेला असेल, असा स्पष्ट संकेत देत, संसदेचे पावसाळी अधिवेशन संपले. १ ऑगस्ट रोजी अधिवेशन सुरू झाले तेव्हा चर्चा होती स्पेक्ट्रम घोटाळ्याची आणि समारोपाच्या दिवशी ८ सप्टेंबरचा केंद्रबिंदू होता, दोन पटेलांवर आणि त्यांच्या घोटाळ्यांवर! घोटाळ्याची पायाभरणी गुरुवारी दुपारी १२ वाजता लोकसभेच्या पटलावर सीएजींचा अहवाल ठेवण्यात आला आणि हजारो कोटी रुपयांचा विमान सौदा घोटाळा देशासमोर आला. २०११ साल आता संपत आले आहे. सात वर्षांपूर्वी मे २००४ मध्ये केंद्रात मनमोहनसिंग सरकार सत्तेवर आले. शरद पवार देशाचे कृषिमंत्री झाले, प्रफुल्ल पटेल विमान वाहतूक मंत्री झाले. अगदी प्रारंभीच्या ८- १० दिवसांतील घटना. पवार यांनी आपल्या मंत्रालयात अनिल बैजल या आय. ए. एस. अधिकार्यास पाचारण करून त्यांच्याशी विमान वाहतूक मंत्रालयाबाबत चर्चा केली होती. त्या चर्चेचा शेवटचा टप्पा आता एका मोठ्या घोटाळ्याच्या रूपात देशासमोर आहे. सीएजी अहवालात कुठेही पवार यांचे नाव नाही. पण, या घोटाळ्याची पायाभरणी झाली ती पवार यांच्या कृषिमंत्रालयात त्यांनी अनिल बैजल यांच्याशी केलेल्या चर्चेने. मनमोहनसिंग सरकार आजवर दोन प्रमुख घोटाळ्यांनी घेरले गेले होते. एक म्हणजे स्पेक्ट्रम घोटाळा, दुसरा राष्ट्रकुल घोटाळा. संसदेचे अधिवेशन सुरू होताना सरकारच्या खात्यावर हे दोन प्रमुख घोटाळे जमा होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी यात आणखी दोन घोटाळ्यांची भर पडली- विमान खरेदी घोटाळा आणि गोदावरी खोर्यातील गॅस घोटाळा. या चार घोटाळ्यांपैकी स्पेक्ट्रम, विमान खरेदी व गोदावरी गॅस घोटाळा या तिन्ही प्रमुख घोटाळ्यांत एक समान सूत्र आहे. ते सूत्र आहे- खातेवाटपाचे. पहिला टप्पा देशाच्या लाखो कोटी रुपयांची लूट करणार्या या तिन्ही घोटाळ्यांचा पहिला टप्पा होता संबंधित मंत्रालय बळकावण्याचा. तामिळनाडूतील द्रमुकसाठी हे काम नीरा राडिया या लॉबिस्टने केले. या सार्या बाबी ऐकीव नाही, तर नीरा राडियाच्या संभाषणाच्या टेप उपलब्ध आहेत. स्पेक्ट्रम घोटाळा ३-४ वर्षांनी उघडकीस आला. प्रथम मंत्रालय मिळविण्यात आले. मग घोटाळ्याची तयारी सुरू झाली. घोटाळा झाला. तो उघडकीस आला. वर्षभर ते प्रकरण गाजले. मग राजा तिहारमध्ये गेला. स्पेक्ट्रमचा पैसा बिचार्या एकट्या राजाला मिळाला काय? नंतर करुणानिधींची मुलगी कानिमोझी तुरुंगात गेली, त्यांची पत्नी दयालू अम्मा अशिक्षित आहे, हे कारण सांगून सध्या तुरुंगाबाहेर आहे. गोदावरी गॅस घोटाळा गोदावरी गॅस घोटाळ्याचा प्रारंभ मुरली देवरा यांना पेट्रोलियम मंत्रालय देण्याने झाला. हे मंत्रालय रिलायन्सच्या इशार्यावरून देण्यात आले आहे, हे सर्वांना पहिल्याच दिवशी लक्षात आले. एका मोठ्या घोटाळ्याची सुरुवात झाली होती. रिलायन्सला फायदा पोहोचविणारा घोटाळा झाला, त्याची कुजबुज सुरू झाली आणि आता सीएजी अहवालात तो अधिकृतपणे बाहेर आला. विमान खरेदी घोटाळा विमान खरेदी घोटाळ्याची सुरुवात पवार यांनी आपल्या पक्षासाठी विमान वाहतूक मंत्रालय मागण्यापासून झाली. पवार यांच्या पक्षाचे ८-१० खासदार होते. त्यातही पटेल यांचे राजकीय वजन झिरो मानले जाते. पवार यांच्या दबावाखातर पटेल यांना विमान वाहतूक मंत्रालय देण्यात आले आणि एका घोटाळ्याचे जणु बीज रोवण्यात आले, त्यातून जो घोटाळा झाला त्याचा विषवृक्ष सीएजी अहवालातून देशासमोर आला आहे. घोटाळ्याची रक्कम स्पेक्ट्रम घोटाळा समोर आला तेव्हा, तो काही घोटाळा नाही, असे सांगण्यात आले. कपिल सिब्बल नावाच्या मंत्र्याने ‘झिरो लॉस’चे प्रतिपादन केले होते. प्रत्यक्षात १ लाख २४ हजार कोटींचा हा घोटाळा झाल्याचे समोर आले. बरोबर तोच युक्तिवाद चेहरा पडलेले प्रफुल्ल पटेल करीत आहेत. एअर इंडियाच्या सेवांचा कसा विस्तार झाला, देशात हवाई सेवेचा कसा विकास झाला हे ते सांगत आहेत. पण, गरज नसताना हजारो कोटी रुपयांची विमाने का व कशी खरेदी करण्यात आली, यावर त्यांच्याजवळ उत्तर नाही. गोदावरी गॅस घोटाळा व विमान खरेदी घोटाळा या दोन्ही घोटाळ्यांमध्ये हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही रक्कमही लवकरच देशासमोर येईल. एका घोटाळ्यात मुरलीभाई आहेत, तर दुसर्या घोटाळ्यात प्रफुल्लभाई. आणि समजा या दोघांनीही घोटाळे केले नाहीत, तर मग त्यांची मंत्रालये का बदलण्यात आली? मुरलीभाईंना तर मंत्रिमंडळाच्या बाहेर करून, त्यांच्या मुलाला राज्यमंत्री करण्यात आले आणि प्रफुल्लभाईंचे मलाईदार, सुंदर चेहर्यांचे मंत्रालय काढून त्यांना अवजड उद्योग हे भकास-उदास चेहर्यांचे मंत्रालय देण्यात आले. प्रफुल्लभाई दोषी नाहीत, तर त्यांनी व पवार यांनी हे मंत्रालय कसे काय स्वीकारले? कारण, ज्या कामासाठी हे मंत्रालय मागण्यात आले होते, ते काम पूर्ण झाले होते. ते किती वेगात पूर्ण करण्यात आले, हेही सीएजींच्या अहवालात सांगण्यात आले आहे. ‘लाभार्थी’ कोण? स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरण जसे विरोधी पक्षांनी व सर्वोच्च न्यायालयाने लावून धरले तसेच विमान खरेदी घोटाळ्याचे प्रकरणही धसास लावले जाईल, असे संकेत आहेत. आज राजा, कानिमोझी, कलमाडी, रिलायन्सचे अधिकारी तुरुंगात अडकून पडले आहेत. ‘आज जेल, उद्या बेल’ ही स्थिती आता देशात राहिलेली नाही. विमान सौदा प्रकरणातही सरकारला कारवाई करावी लागेल. भ्रष्टाचार हा एक मुद्दा ठरला असताना, दागी प्रफुल्ल पटेल यांना सरकारमध्ये ठेवणे मनमोहनसिंगांना जड जाणार आहे. सीएजी अहवालानंतर हा अहवाल पुढील कारवाईसाठी लोकलेखा समितीकडे जाईल. विमान घोटाळा प्रकरण संपलेले नाही व संपणारेही नाही. प्रफुल्ल पटेल यांचे स्थान मंत्रिमंडळात नाही, तर दुसरीकडे आहे, असे खासदारांना वाटू लागले आहे. ज्या मंत्र्याने एअर इंडियाच्या महाराजास कंगाल केले, त्या मंत्र्याला केवळ सीएजींचा ‘ठपका’ ही शिक्षा पुरेशी नाही, असे मानले जाते. विमान खरेदी सौदा कायद्याच्या कचाट्यातून सुटता कामा नये, या घोटाळ्याचे लाभार्थी तिहारच्या भिंतीआड गजाआड व्हावेत, अशी तीव्र प्रतिक्रिया संसदभवनात नोंदविली जात होती. सत्यमेव जयते संसद हे भारतीय लोकशाहीचे सर्वोच्च व्यासपीठ. संसदभवनात एका ठिकाणी लिहिलेले आहे, सत्यमेव जयते! हे सुभाषित केवळ देखाव्यासाठी नाही, तर त्याला कायद्याचे अधिष्ठान आहे, हे अधिवेशन संपता संपता दिसले. २००८ च्या खासदार खरेदी प्रकरणाचा सूत्रधार अमरसिंह यांना चक्क तिहारमध्ये जावे लागले. संसदभवनात गरजणारा, प्रसारमाध्यमांसमोर डरकाळ्या फोडणारा हा सिंह, न्यायालयात कसा थरथर कापत होता. केंद्रीय मंत्रिमंडळात जाण्यासाठी खासदार खरेदी प्रकरण घडवून आणणारे अमरसिंह, तिहारबाहेर येण्यासाठी किती गयावया करीत होते, हे सार्या देशाला दिसले. माझ्या किडनी खराब झाल्या आहेत, मला टीबी झाला आहे असे सांगून, मला बेल द्या, असे आर्जव करणार्या अमरसिंहांना कायद्याची कठोरता लक्षात आली. धर्मचक्र प्रवर्तनाय लोकसभा सभापतींच्या आसनाच्या वरच्या भागाला आणखी एक सुभाषित सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहे- धर्मचक्र प्रवर्तनाय. धर्माचे चक्र फिरत राहील, असे ते सुचवीत आहे. धर्माचे चक्र फिरत राहिले आणि नियतीचे चक्रही फिरत राहिले. २००८ च्या शक्तिपरीक्षणात मनमोहनसिंग सरकार विजयी झाल्यानंतर अमरसिंहांनी विजयाने बेधुंद होत, तत्कालीन विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासाठी जाहीरपणे अपशब्द वापरले होते. त्यानंतर अनिल अंबानी यांनी केलेल्या सूचनेनुसार अमरसिंहांनी अडवाणींकडे दूरध्वनी करून माफी मागण्याचा प्रयत्न केला होता, जो अडवाणींनी स्वीकारला नव्हता. २०११ मध्ये पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अडवाणी एका योद्ध्याच्या आवेशात गर्जत होते, आपल्याला तिहारमध्ये पाठविण्याचे आव्हान सरकारला देत होते आणि अमरसिंह तिहारमधून बाहेर येण्यासाठी धडपडत होते. घोटाळ्यांचा मास्टरमाईंड! स्पेक्ट्रम घोटाळा राजाचा सचिव चंडोलिया वा अन्य अधिकार्यांपर्यंत थांबला नाही, राजाला तिहारमध्ये जावे लागले, कानिमोझीला तिहारमध्ये जावे लागले, राष्ट्रकुल घोटाळा भानोतसारख्या लहान व्यक्तीपर्यंत थांबला नाही, कलमाडींना तिहारमध्ये जावे लागले. खासदार खरेदी प्रकरण संजीव सक्सेनापाशी थांबले नाही, अमरसिंहांना तिहारमध्ये जावे लागेल, पण अमरसिंह हा काही खासदार खरेदी प्रकरणाचा शेवटचा थांबा नाही. अमरसिंहांनी खासदारांची खरेदी कुणासाठी केली? अमरसिंहांनी, सोहेल हिंदुस्थानीला सांगितले होते, तुम्ही उशिरा आला आहात, तुम्हाला तीन-तीन कोटी मिळतील. काल जास्त रक्कम मिळाली असती. विरोधी खासदारांना शक्तिपरीक्षणात अनुपस्थित राहण्यासाठी, सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी १० ते १५ कोटी रुपये देण्यात आले. म्हणजे जवळपास ३०० ते ४०० कोटी रुपये यासाठी वापरण्यात आले. अमरसिंह हे पक्के व्यावसायिक आहेत. ते आपल्या पैशाने खासदारांची खरेदी का करतील? हा पैसा त्यांना कुणी दिला होता, त्यांना किती पैसा मिळाला आणि त्यांनी त्यातील किती वाटला, किती ठेवला? या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे अहमद पटेल देऊ शकतील. कायद्याचे हात अहमद पटेल यांच्यापर्यंत पोहोचल्यास स्वच्छ पंतप्रधान काय करतील? खासदार खरेदी प्रकरणाचा पुढील थांबा सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल राहणार आहेत, तर सीएजी अहवालात उघडकीस आलेल्या विमान सौदा घोटाळ्याची आता नुकतीच सुरुवात झाली आहे. हा घोटाळा एअर इंडियाच्या अधिकार्यांपर्यंत थांबणार नाही. तो प्रफुल्ल पटेल यांच्यापर्यंत थांबणार नाही. खासदार खरेदी व विमान खरेदी हे दोन्ही घोटाळे ‘मास्टरमाईंड’च्या दारापयर्र्ंत निश्चित जातील. तिहारमध्ये होत असलेल्या गर्दीने ती आशा निर्माण झाली आहे. दै. तरुण भारत, दि. ६ सप्टेंबर २०११
Posted by : AMAR PURANIK | on : 28 Sep 2011 Filed under : Blog Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper.. You can follow any responses to this entry through the RSS 2.0 You can leave a response or trackback to this entry