Home » Blog » बॉम्बस्फोट, भारतीय सुरक्षा यंत्रणेला आव्हान

बॉम्बस्फोट, भारतीय सुरक्षा यंत्रणेला आव्हान

बॉम्बस्फोट, भारतीय सुरक्षा यंत्रणेला आव्हान
राष्ट्ररक्षा: व्रि. हेमंत महाजन
 दिल्ली संसदेवरील हल्ला प्रकरणातील आरोपी अफझल गुरू याची फाशीची शिक्षा माफ केली जावी, अशी मागणी करणार्‍या विधेयकावर जम्मू-काश्मीर विधानसभेत चर्चा केली जाणार आहे. राजीव गांधी हत्याप्रकरणातील आरोपींची फाशी माफ केली जावी, या आशयाचे विधेयक तामिळनाडू विधानसभेने पारित केल्यानंतर काश्मिरातही अफझल गुरूविषयीचे विधेयक सादर करण्यात आले. चर्चा आणि मतदानाने निर्णय अशी तरतूद असणार्‍या नियमांतर्गत हे विधेयक सादर झाले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या परिसरात झालेल्या बॉम्ब-स्फोटप्रकरणी एनआयएने महत्त्वाचा धागा सापडल्याचा दावा केला आहे. या स्फोटामागे हुजी दहशतवादी संघटना असल्याचे म्हटले आहे. स्फोटाचा कट जम्मू-काश्मीरमध्ये रचण्यात आला होता. सुरक्षा यंत्रणांनी हुजीच्या अतिरेक्यास जम्मू काश्मीरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. आमीर ऊर्फ हाफिजला स्फोटाचा मास्टर माईंड असल्याचे सांगण्यात आले आहे. इतर पाच जणांच्या मदतीने त्याने स्फोट घडवून आणला. दहशतवादी पथकाला देशभराचा पास काढून द्या, त्यांना कधी कुठे जावे लागेल सांगता येत नाही. तसेच चिदंबरम्‌कडून निषेधाचा मजकूर, अतिरेक्यांना द्यायचे फुसके इशारे, मृतांच्या नातेवाईकांना द्यावयाच्या आर्थिक मदतीचे तक्ते त्यात आकडे टाकून तयार करून घ्या, फक्त त्यात तारीख, वार टाका, म्हणजे त्याची झोपमोड व्हायला नको आणि नेहमी तेच तेच बोलून त्यांचे तोंड दुखायला नको! या अतिरेक्यांना मॅनर्स कसे ते नाहीत, एखाद्या मंत्र्याला किती किती त्रास द्यायचा? त्याच्या झोपेचा काही विचार? आग्र्‍यातला बॉंबस्फोट मुंबई आणि राजधानी दिल्लीत दहशतवाद्यांनी घडवलेल्या शक्तिशाली बॉंबस्फोटाचे धागेदोर गुप्तचर यंत्रणांना अद्याप सापडलेले नाहीत. दिल्लीतला स्फोट घडवल्यावर यापुढेही असे स्फोट घडवू, ते रोखून दाखवा, असे आवाहन दहशतवादी संघटनांनी सरकारला दिले होते. या पार्श्‍वभूमीवर आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ आग्रा शहरातल्या रुग्णालयात बॉंबस्फोट घडवायचे धाडस दहशतवाद्यांना व्हावे, ही सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. ताजमहालपासून अवघ्या अडीच किलो मीटर अंतरावरच्या जय हॉस्पिटलमध्ये स्वागत कक्षात हा स्फोट झाला. दूर नियंत्रकाच्या ऐवजी दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवायसाठी टायमरचा वापर केला असावा, असा निष्कर्ष प्राथमिक चौकशीत पोलिसांनी काढला आहे. हा स्फोट झाला तेव्हा स्वागतकक्षात फारसे लोक नव्हते. त्यामुळे स्फोटात सात लोक जखमी झाले. या हॉस्पिटलच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या. शहरात दहशत निर्माण करण्याचा दहशतवाद्यांचा डाव मात्र सफल झाला. दहशतवाद्यांना मदत करणारे घरभेदी आग्रा, अहमदाबाद, मुंबई, बंगलोर, कानपूर, वाराणसी या शहरात असल्याचे यापूर्वी ठिकठिकाणी घडलेल्या स्फोटांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. दिल्लीत स्फोट घडवणार्‍या दहशतवाद्यांचे धागेदोरे पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनांशी असावेत. पण, तो स्फोट घडवणारे संशयित आरोपी मात्र अद्याप सापडलेले नसतानाच, हा स्फोट व्हावा, ही बाब गुप्तचर यंत्रणांच्या परस्पर समन्वयातील त्रुटीच चव्हाट्यावर आणणारी ठरते. ताजमहाल पहाण्यासाठी परदेशी पर्यटकांची संख्या मोठी असल्याने, याच शहरात स्फोट घडवून सुरक्षा यंत्रणांना हादरा द्यायचा आणि भीतीचे वातावरण निर्माण करायचे, असा दहशतवाद्यांचा हेतू असावा. दिल्लीतल्या बॉंबस्फोटाच्या तपासाचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठीही हा स्फोट घडवला गेल्याची शक्यता आहे. वारंवार घडणारे स्फोट हे सरकारचे अपयश असल्याची कबुली केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी दोनच दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर आग्रा शहरात हा स्फोट झाला. तो कमी शक्तिशाली असला तरी, देशाच्या सर्व भागात दहशतवाद्यांनी आपले जाळे विणल्याचेही या स्फोटाने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी करून तळ ठोकून राहिलेल्या बांगला देशी आणि पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवायची मोहीम केंद्र सरकारने तातडीने राबवायला हवी. त्याशिवाय दहशतवाद्यांना मदत करणार्‍यांची फळीही नष्ट होणार नाही. गृहमंत्री काय करीत आहे सीमेच्या पलीकडे दहशतवाद्यांच्या शिबिरात पुन्हा सशस्त्र कारवाया आणि हिंसाचाराचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सांगितले. मुंबई आणि दिल्लीत झालेल्या शक्तिशाली बॉंबस्फोटांच्या मागे परकीय शक्ती सक्रिय असल्याचे सांगून ते म्हणाले, सीमेवरून दहशतवादी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात आहे. दहशतवाद्यांची ही शिबिरे बंद झाली पाहिजेत त्याशिवाय हिंसाचार रोखता येणार नाही. पोलिस व गुप्तचर राज्यांच्या महासंचालकांच्या तीन दिवसांच्या बैठकीत बोलताना, त्यांनी दहशतवाद्यांच्या कारवाया कठोरपणे मोडून काढाव्यात, असे आवाहनही केले. दिल्लीत नुकत्याच झालेल्या परिषदेत पंतप्रधान मनमोहनसिंग आणि गृहमंत्री पी. चिदम्बरम् यांनी सीमेपलीकडून दहशतवादाचा धोका आहे, असे सांगितले. सीमेपलीकडून दहशतवादाचा धोका आहे हे पोलिसांना सांगायला पंतप्रधान व गृहमंत्र्यांची गरज नाही. देशातील प्रत्येक नागरिकाला हे ठावूक आहे. कधी, कुठे, अवचित बॉम्ब फुटून जीव कधी जाईल याची खात्री नाही. सीमेपलीकडील सूत्रधारांनी ही अनिश्‍चितता निर्माण केली, भारताशी त्यांनी छुपे युद्ध सुरू केले आहे, हे नागरिकांना माहीत आहे. ही अनिश्‍चितता संपविण्यासाठी, अधिक सुरक्षित आयुष्य देण्यासाठी तुम्ही आहात? या प्रश्‍नाचे उत्तर पंतप्रधान वा गृहमंत्री देत नाहीत. पाकिस्तानात सुमारे अडीच हजार दहशतवादी प्रशिक्षण घेऊन तयार असून काश्मीरमध्ये ते घुसखोरी करण्याची शक्यता असताना भारतासारखा बलाढ्य देश काय करतो. काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया पुन्हा जोर धरत आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील हे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेची मदत भारत सरकार घेत नाही? अल कायदा व तालिबानचे अनेक तळ अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झाले. तेच तंत्रज्ञान भारतासाठी अमेरिका उपलब्ध करून का देत नाही? इथे देशात आपण काय करीत आहोत, सर्व सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वय असावा असे पंतप्रधान म्हणाले. असा समन्वय राखण्याची जबाबदारी ही गृहमंत्रालयाची आहे. समन्वय नसल्याची तक्रार गेली कित्येक वर्षे सुरू आहे. बॉम्बस्फोटाचा तपास करतानाही प्रत्येक यंत्रणा एकमेकीशी स्पर्धा करीत असते. हे थांबविण्यासाठी सरकारने काय केले? पोलिस व गुप्तचरांमध्ये व्यावसायिक कौशल्य वाढविण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले. असे कौशल्य वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा पुरविण्यात सरकार अजून मागे का राहते? प्रशिक्षण, संपर्क यंत्रणा, शस्त्रे या सर्वच महत्त्वाच्या गोष्टींमध्ये सरकारी अनास्थेचा फटका सुरक्षा यंत्रणांना बसतो. पोलिसांची संख्या आवश्यकतेपेक्षा फारच कमी आहे. पोलिस व अन्य सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम व अद्ययावत करण्याऐवजी दहशतवाद रोखण्यासाठी नवी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचा गृहमंत्र्यांचा बेत आहे. आणखी एक नवा पोलिस आल्याने दहशतवाद थांबविता येईल? देशाच्या सुरक्षेवरही मतपेटीच्या राजकारणाची छाया असेल, तर सीमेपलीकडील सूत्रधारांचे नक्कीच फावणार. मीडिया हे दहशतवाद्यांचे एक माध्यम राजधानी नवी दिल्लीतील हायकोर्टाच्या आवारात बुधवारी दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट करून भारतीय सुरक्षा यंत्रणेला पुन्हा आव्हान दिले आहे. मुंबईवरील हल्ला, त्यानंतर या वर्षी जुलै महिन्यात मुंबईमध्ये झालेले बॉम्बस्फोट आणि दिल्लीतील हा बॉम्बस्फोट हा क्रम लक्षात घेता दहशतवाद्यांना सरकारवर नव्हे, तर सामान्य जनतेच्या मनोधैर्यावर हल्ला करायचा आहे. आपल्या इथला इलेक्ट्रॉनिक मीडियाही एवढा वेगवान आहे की ते बॉंबस्फोट घडल्यानंतर काही मिनिटांतच घटनास्थळी जाऊन वृत्तांकन करण्यात चढाओढ सुरू करतात. त्यामुळे देशभर अशा हल्ल्यांविषयी संतापाची लाट उमटते आणि दहशतवाद्यांचे ईप्सित साध्य होते. पण ही हिंसा अधिक प्रभावी कशी दाखवता येईल, याकडे या दहशतवादी संघटनांचे लक्ष असते. हे प्रभावीपण अप्रत्यक्षपणे आपल्याकडील मीडिया, विशेषत: इलेक्ट्रॉनिक मीडिया दाखवतो. शहरांमध्ये देशातील प्रमुख मीडिया सेंटरची कार्यालये आहेत. एखादा हल्ला झाला की विविध टीव्ही वृत्तवाहिन्या मोठ्या प्रमाणात अशा घटनांचे वृत्तांकन करण्यासाठी चढाओढ करतात. सातत्याने हल्ल्याची तीच-तीच दृश्ये दाखवून किंवा ब्रेकिंग न्यूज देऊन या वृत्तवाहिन्या एखाद्या हल्ल्याचा दसपट परिणाम संपूर्ण देशभरात सेकंदात नेऊन पोहोचवतात. हल्ल्यानंतर दहशतवादी संघटनांना भारतातील इलेक्ट्रॉनिक मीडियाचा शहरी जनतेवर असलेला मोठा प्रभाव पहिल्यांदाच लक्षात आला. त्यानुसार त्यांनी आपल्या दहशतीचा परिणाम काय आहे हे सांगण्यासाठी मीडिया हे दहशतवाद्यांचे एक माध्यम म्हणून वापरण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमाची अप्रत्यक्षपणे मदत घेऊन या संघटना आपला अजेंडा राबवत असतात.
तरुण भारत, 9/24/2011
Posted by : | on : 28 Sep 2011
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *