सडेतोड : अरुण रामतीर्थकर
यशवंतराव थोर होते यात वादच नाही. पण ते राजकारणी म्हणून नव्हे. उलट राजकारणात त्यांनी दोनदा एकच चूक केली, पण त्याचे परिणाम भोगायची तयारी ठेवली नाही. त्यामुळे शेवटच्या पर्वात त्यांचे अध:पतनच झाले. मात्र राजकारणात राहून स्वच्छ हात, कलाप्रेम, साहित्यप्रेम, सुसंस्कृतपणा टिकवला जो आज शोधून सापडत नाही. या दुर्मिळ गुणांबद्दल यशवंतरावांना अभिवादन.
यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या जन्म शताब्दीस प्रारंभ झाला आहे. ज्यांचे स्मरण आजही आवश्यक आहे अशा स्वातंत्र्योत्तर काळातील मोजक्या नेत्यांपैकी ते एक आहेत. स्वातंत्र्य मिळून सत्ता उपभोगण्याची संधी मिळाल्यावर अनेकजण भ्रष्ट झाले. खुद्द नेहरूंप्रमाणे कृष्णमेनन, बिजू पटनाईक, प्रतापसिंग कैरॉं, बक्षी गुलाम महंमद अशी अनेक नावे सांगता येतील. बक्षींच्या घरात दोन भावात मिळून एक सायकल होती. काश्मिरचा मुख्यमंत्री झाल्यावर तो ९२ टॉकीजचा मालक झाला. सत्ता म्हणजे समाजाच्या सेवेसाठी देवाने दिलेली सुवर्णसंधी असे मानणारे जसे लालबहादूर शास्त्री होते, तसेच यशवंतराव. त्यावेळी खाण्याचे प्रमाण कमी होते. आता ते एवढे वाढले आहे की कोण खात नाही हे शोधावे लागेल. सलग १० वर्षे राष्ट्रपती राहिलेले बाबू राजेंद्रप्रसाद निवृत्त झाल्यावर उर्वरित आयुष्य सदाकत आश्रमात व्यतीत करून निर्धन अवस्थेत निवर्तले. दोनदा हंगामी पंतप्रधान झालेले गुलझारीलाल नंदा हे तर मृत्यूसमयी औषधोपचारालाही महाग झाले होते. स्वातंत्र्याची ऊर्मी ओसरत गेली तसे राजकारण वेगाने भ्रष्ट व्हायला लागले. त्याच काळात म्हणजे १९५६ ते १९७७ या २१ वर्षात यशवंतराव सत्तेवर होते. मुंबई प्रांतात मंत्री, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, संरक्षण, गृह, अर्थ, परराष्ट्र अशी केंद्रातील महत्त्वाची पदे या २१ वर्षांत त्यांनी हाताळली. पण सत्तेच्या दुरुपयोगाचे एकही उदाहरण शोधूनही सापडणार नाही. स्वच्छ चारित्र्य, स्वच्छ कारभार ही गुणवैशिष्ट्ये असलेल्या यशवंतरावांना शतश: नमस्कार.
अशा यशवंतरावांची ७७ नंतरची शेवटची ८ वर्षे वाईट, अपमानास्पद का गेली. तो नशिबाचा भाग नव्हता. उलट नशीब त्यांना नेहमी साथ देत होते. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा निर्णय झाला तेव्हा पहिले मुख्यमंत्री म्हणून नाशिकच्या भाऊसाहेब हिरे यांचे नाव आघाडीवर होते. नेहरूंनी यशवंतरावांच्या बाजुने कौल दिला आणि यशवंतराव मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे हे त्यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यानचे वक्तव्य त्यांना उपयोगी पडले. १९६२ साली संरक्षणमंत्री म्हणून केंद्रात गेल्यावर १९६९ पर्यंत सर्व ठीक होते.
६९ साली राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचे निधन झाले. तो पर्यंत इंदिरा गांधी गुंगी गुडीया होत्या. बंगलोरच्या ग्लास हाऊसमध्ये कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक होऊन संजीव रेड्डी यांचे नाव पक्के झाले. मोरारजी, स.का.पाटील( ज्यांचा उल्लेख अत्रे नासका पाटील करत) ब्रह्मानंद रेड्डी, निजलिंगप्पा, कामराज, संजीव रेड्डी आणि यशवंतराव असा गट झाला होता. या गटाला शह देण्यासाठी इंदिराजी संधी शोधत होत्या. रेड्डींच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून त्यांनी सही केली, पण दिल्लीत जाताच व्ही. व्ही. गिरी यांची उमेदवारी घोषित केली. कॉंग्रेसचे बहुमत असताना रेड्डी पडले व गिरी विजयी होऊन इंदिराजी ही काय चीज आहे ते जगाला कळले. या घडामोडीत इंदिराजींची कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्याचा ठराव झाला. यशवंतराव त्याचे समर्थक होते. या वादात कॉंग्रेस फुटली. बैलजोडी हे चिन्ह गेले. इंदिरा गांधींनी गायवासरू चिन्हासह नवा पक्ष काढला. या वादात योग्य बाजू घेण्यात यशवंतराव चुकले.
ही चूक वेळीच सुधारत १९७१ च्या निवडणूकीपूर्वी ते पुन्हा इंदिरा गोटात गेले. इंदिरा गांधींनी त्यांना सन्मानपूर्वक त्यांच्या पक्षात घेतले. १९७७ पर्यंत हे ठीक चालले. ७७ साली जनता लाटेत इंदिरा गांधी पराभूत होताच यशवंतरावांनी पुन्हा ६९ ची चूक केली. पुन्हा इंदिरा गांधींना पक्षातून काढले. त्यांनीही हात हे दुसरे चिन्ह घेत नवा पक्ष काढला. मोरारजी, रेड्डी हेच काय जगजीवनराम हेही जनता पक्षात आले. यशवंतरावांपुढे दोन पर्याय होते, जनता पक्षात जाणे किंवा इंदिरा गांधी बरोबर. त्यांनी स्वतंत्र रहायचे ठरवले. कारण कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेता हे पद त्यांच्याकडे होते. इंदिरा गांधींच्या विरोधात जाण्याची चूक त्यांनी दुसर्यांदा केली.
एका वर्षात स्थिती बदलली. मोहसिना किडवाई उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीतून लोकसभेवर निवडून आल्या. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या सर्व ८४ जागांवर कॉंग्रेस हरली होती. त्यानंतर काही महिन्यातच हा चमत्कार झाला. त्यानंतर खुद्द इंदिरा गांधी चिकमंगळूरमधून निवडून आल्या. त्यामुळे एकेक खासदार यशवंतरावांची साथ सोडून इंदिरा गोटात जाऊ लागला. नंतर वेळ अशी आली की, इंदिरा कॉंग्रेसचे खासदार अधिक झाल्याने यशवंतरावांचे विरोधी पक्षनेता हेही पद गेले आणि गुलबर्ग्याचे सी.एम.स्टीफन हे खासदार विरोधी पक्ष नेता झाले. दिल्लीतील यशवंतरावांचे महत्त्व पूर्णपणे संपले.
खरे तर त्यावेळी दिल्लीचा निरोप घेऊन त्यांनी महाराष्ट्रात परत यायला हवे होते. मोरारजी, नानाजी देशमुख, मोहन धारिया यांनी दिल्लीला रामराम केला. कराडला परतून लेखन, वाचन, मार्गदर्शन करत राहिले असते, तर त्यांचा पूर्वीचा आब कायम राहिला असता. पण त्यांना दिल्ली सोडवेना. ८० च्या निवडणुकीतून ते पुन्हा दिल्लीला गेले. एव्हाना इंदिरा गांधी सर्वशक्तीमान झाल्या होत्या. त्यांना कोणाची गरज नव्हती. महाराष्ट्रात अंतुले होते. ८१-८२ च्या सुमारास यशवंतरावांनी एस.टी.दरवाढ विरोधी आंदोलन केले. त्यांच्या अटकेचा आदेश अंतुलेंनीच दिला होता. नुसतीच अटक नाही, तर एक रात्र लॉकअपमध्ये ठेवले. अंतुलेंना जाब विचारण्याची हिंमत एकातही नव्हती. यशवंतराव तेथे संपलेच होते. तरी ही त्यांनी कॉंग्रेस प्रवेशासाठी अर्ज केला. ६९ साली त्यांना सन्मानाने प्रवेश मिळाला होता. दुसर्यांदा दगलबाजी झाल्यावर इंदिराजींनी वर्षभर त्यांचा अर्ज पेंडिंग ठेवला. असे खूप ताटकळत ठेवल्यावर मग प्रवेश दिला. त्यांचा मान म्हणून सातव्या वित्त आयोगाचे अध्यक्षपद दिले. हे पद कॅबिनेट दर्जाचे व लाल दिव्याच्या गाडीचे आहे. ज्याने अर्थमंत्रीपद भूषवले त्याने नंतर वित्त आयोगाचे अध्यक्ष व्हावे याला तुम्ही काय म्हणाल? केवळ लाल दिव्याच्या गाडीचा अट्टाहास असे त्याचे स्वरूप नव्हते कां?
यशवंतराव किती मोठे होते हे सांगताना काहीजण माजी उपपंतप्रधान ही उपाधी लावतात. खरे तर हा यशवंतरावांचा अविचार होता. इंदिरा गांधींना अटक करणार्या चरणसिंह यांनी त्यांच्याच पाठिंब्याने सरकार बनवणे हाच विनोद होता. त्या सरकारात यशवंतराव उपपंतप्रधान. इंदिराजींनी एका दगडात दोन पक्षी मारले. चरणसिंह आणि यशवंतराव दोघेही देशाच्या राजकारणात हास्यास्पद ठरले होते. त्यामुळे यशवंतरावांना माजी उपपंतप्रधान म्हणणे हा त्यांचा अपमान ठरेल.
इंदिरा गांधी यांच्या मूल्यमापनात यशवंतराव दोनदा चुकले. पहिली चूक आपण स्वाभाविक म्हणू. पण तशीच चूक दुसर्यांदा केल्यावर तरी त्याचे परिणाम भोगायला हवे होते. दुसर्यांदा इंदिरा गांधींच्या दारांत कॉंग्रेस प्रवेशासाठी जाताना त्यांनी वयाची सत्तरी ओलांडली होती. त्या वयात पदासाठी धडपड कितपत समर्थनीय होती. चूक आणि पुनरावृत्ती यामुळे त्यांच्या मोठेपणाला ग्रहण लागले. आज त्यांच्या पुतळयाला आणि फोटोला हार घालणारे कॉंग्रेसवाले सत्तेवरील यशवंतरावांना नमस्कार करतात. मी तसा नमस्कार करणार नाही. जे कमावले ते सत्तरी उलटल्यावर त्यांनी घालवले. मात्र सच्छिल राजकारणी, कलाप्रेमी, साहित्यप्रेमी, दुर्गा भागवत यांचे कराडचे कडक भाषण ऐकूनही न रागावणारे (७६ चे साहित्य संमेलन),राजकारणी व्यासपीठावर नको असे सूर निघताच खाली श्रोत्यात जाऊन बसणारे (७७ चे इचलकरंजी साहित्य संमेलन) यशवंतराव नक्कीच सज्जन आणि सुसंस्कृत होते. त्यांच्यातील राजकारण्याला नव्हे तर स्वच्छ हातांना आणि सुसंस्कृत मनाला माझे मनापासून अभिवादन.
रविवार, दि. १८ मार्च २०१२