Home » Blog » रेड्डी, पाटील किती खरं बोललात!

रेड्डी, पाटील किती खरं बोललात!

 सडेतोड : अरुण रामतीर्थकर
राष्ट्रपती प्रतिभा पाटील किंवा आमदार प्रणिती शिंदे या उच्चपदस्थ आहेत, पण त्यांचा पोषाख किती नीटनेटका असतो ते पहा. बारावी किंवा एफ.वाय.ला असलेल्या पोरींनाच टी-शर्ट, पँट घालावी का वाटते? यालाच स्त्रीमुक्ती, महिला स्वातंत्र्य म्हणायचे, तर बलात्काराच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करू नका. एक पोलीस अधिकारी व एक मंत्री हेच सांगत आहेत.

२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. स्वामीजी अमेरिकेत असताना त्यांच्या भाषणांनी खूप लोक प्रभावित झाले होते. मात्र  ते बोलतात तसे आहेत का? अशी शंका काहीजणांना आली. स्वामीजींची परीक्षा घेण्यासाठी एक सुस्वरूप, सुडौल तरुणी त्यांच्याजवळ येऊन म्हणाली, ‘मला अगदी तुमच्यासारखाच मुलगा हवाय.’ त्यावर स्वामीजी म्हणाले, ‘मग त्यासाठी ९ महिने वाट कशाला पाहतेस माते? हा बघ, तुझा मुलगा तुझ्यासमोर आताच उभा आहे.’ यावर त्या तरुणीने स्वामीजींचे पायच धरले.

‘परस्त्री मातेसमान’ ही आपली संस्कृती आहे. आपली संस्कृती सर्वात प्राचीन आणि महान आहे. तरीही महिलांवरील अत्याचार, त्यातही विनयभंग आणि बलात्कार यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. ‘महिला मुक्ती किंवा विमेन्स लिब.’ चळवळ सुरू झाल्यानंतर हे प्रकार कमी न होता उलट वाढलेले दिसतात. या संदर्भात आंध्र प्रदेशचे पोलीस महासंचालक व्ही. दिनेश रेड्डी यांनी २ जानेवारीला एक वक्तव्य केले. फॅशनच्या नावाखाली तरुणी अत्यंत तोकडी वस्त्रे वापरतात. अंग झाकण्यापेक्षा ते उघडे ठेवण्याकडे त्यांचा कल असतो. त्याचा परिणाम पुरुषांच्या वासना चाळवण्यात होतो. त्यामुळे विनयभंग, बलात्कार यांत वाढ होताना दिसते. त्यामुळे पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो.
आंध्र प्रदेशच्या पोलीस महासंचालकांप्रमाणेच कर्नाटकचे महिला बालकल्याण खात्याचे मंत्री सी.सी. पाटील यांनीही याच भावना व्यक्त केल्या आहेत. ‘किती तोकडे कपडे घालावेत, अंग किती झाकावे, किती उघडे टाकावे? हे महिलांनीच ठरवायला हवे.’ या दोघांची मते स्पष्ट आहेत. १०० टक्के नाही तरी बलात्कार, विनयभंगात उत्तान देहप्रदर्शन करणारे कपडे हे ५० टक्के कारण तरी निश्‍चितच आहे. ग्रामीण भागातील स्थिती वेगळी आहे. तेथील विनयभंग, बलात्कार या प्रकारांना महिलांचा पोषाख याला पुरुषी वासना हेच कारण असते. शहरी भागात उलट चित्र आहे. एक तर हे प्रकार खोटे असतात किंवा तंग कपडे हे बहुतांश कारण असते.
एक संस्कृत वचन आहे : ‘द्रष्टा दृश्यवशात बद्धा: दृश्यभावात विमुच्यते’ याचा अर्थ मनुष्यास जे दृष्टीस पडते त्यानुसार त्याच्या मनात भाव-भावना निर्माण होऊन तशी कृती करण्यास तो उद्युक्त होतो. रस्त्याने जाताना देऊळ दिसले, घंटानाद ऐकू आला तर आपोआपच हात जोडले जातात. तसेच ओढणी न घेता वक्षस्थळे अर्धवट उघडी, पँट घातल्याने नितंबाचा आकार स्पष्ट दिसतो अशी तरुणी समोर आल्यावर मनात काय भाव येतील? स्त्रीमुक्तीच्या नावाखाली असे तोकडे वस्त्र घालणार्‍या आणि त्याचे समर्थन करणार्‍या महिलांनी या मानसशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. तरुणपणी फॅशन करायची नाही तर काय म्हातारपणी करायची? स्त्री-पुरुष समानता आहे. बायकांनी पँट आणि टी-शर्ट घातला तर बिघडले कुठे? हा युक्तिवाद तद्दन फालतू आहे! सर्वच तरुणी असे म्हणत नाहीत, फक्त हिंदू तरुणी आणि त्यांचे मूर्ख पालकच असे म्हणतात. मुस्लिम तरुणी आणि त्यांचे पालक असे कधीही म्हणणार नाहीत. बुरख्याची सक्ती होते असे कोण म्हणतो? लहानपणापासून संस्कार केले असतील ही सक्ती वाटत नाही. येथे काही तालिबानी राजवट नाही. मिशी ठेवायची की नाही, हे जसे पुरुषांना येथे स्वातंत्र्य आहे, तसेच बुरख्याचे आहे. मुस्लिम तरुणी स्वेच्छेनेच बुरखा घालतात. त्यांना फॅशनची गरज का वाटत नाही? तरुणी सोडा, लहान मुलीही कपाळापासून मोठा रुमाल मागे घेत केस झाकतात. लहान मुले खेळतानाही डोक्यावर गोल टोपी घालतात.
याच वयोगटातील मुस्लिम तरुणी जे बंधन पाळतात, ते त्याच वयाच्या हिंदू मुलींनी पाळण्यात कसला आलाय स्त्री-स्वातंत्र्याचा संकोच? वक्षस्थळे उघडी टाकून फिरण्यात स्त्री-स्वातंत्र्य आणि दोन्ही खांद्यावरून पदर घेणे हा गावंढळपणा असे कोणत्या मूर्खाने सांगितले? सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणून महिला मुक्तिदिन साजरा झाला. सावित्रीबाईंचे कपाळावरील ठसठशीत कुंकू आणि पदर हे का विसरता? कोपराच्या पुढे झंपर आणि डोक्यावरून पदर घेणार्‍या राष्ट्रपती प्रतिभा पाटील या काय अडाणी आहेत? किती मुली कुंकू लावून हातात बांगड्या घालतात? दोष त्यांचा कमी. त्यांच्या आई-बापांनाच अक्कल नाही! आपली तरुण मुलगी पँट, टी-शर्ट घालून घराबाहेर पडते, याचे जर आईबापांना कौतुक वाटत असेल, तर मग प्रश्‍नच मिटला! ज्या गोष्टीला विरोध करायचा, मानला नाही तर कानाखाली आवाज काढून सांगायचे त्या गोष्टीचे कौतुक केले तर पुरुषी वासना चाळवणारच!
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे मला वाईट वाटते! केशवपनाविरुद्ध लढा देऊन त्यावेळी त्यांनी उगीच स्वकीयांचा रोष ओढवून घेतला. आणखी १०० वर्षांनी विवाहिता आणि कुमारिकाही न्हाव्याकडे जाऊन बसतील आणि केस कापून येतील, हे अण्णा कर्वेंना काय माहीत? लज्जा आणि विपुल केशसंभार ही स्त्रीच्या सौंदर्याची लक्षणे आणि खरे दागिने! तरुणी आता लाजत नाहीत. स्वातंत्र्य दिलेल्या मुलीच्या आईबापांना नंतर लाजायची पाळी येते. जर आईच ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केस भादरून येत असेल, तर ती मुलीवर कसले डोंबलाचे संस्कार करणार! पूर्वी केस कापून आल्यावर घरात इतरत्र न वावरता थेट न्हाणीत जाऊन प्रथम अंघोळ करावी लागे. हिवाळ्यात पाणी तापले नसेल तर पाणी तापेपर्यंत घराबाहेरच थांबावे लागे. आता काही बायका आपल्या घरातच इतरांचे केस कापतात, या कर्माला काय म्हणावे?
मुळात हा विषय वादाचा नाहीच. बलात्कार, विनयभंग हे प्रकार कमी करायचे तर महिलांनीच स्वत:वर काही बंधने घालून घेतली पाहिजेत. त्यात प्रतिभा पाटील किंवा प्रणिती शिंदे यांच्यासारखा सभ्य पोषाख हा मस्ट. ‘सात’च्या आत घरी हे अति होत असेल तर ‘नवा’च्या आत तरी तरुण मुलींनी घरी आले पाहिजे! मुलींचे मोबाईल काढून घ्या. त्यांची पर्स नियमित तपासा. कॉलेजवर जाते म्हणजे नेमके कोठे जाते, हे आठवड्यातून दोन-तीनदा तपासा. या गोष्टी न केल्याने सोलापुरात किती मुली बलात्काराच्या शिकार झाल्यात हे मला माहिती आहे. लोकलाजेस्तव आई-बाप पोलिसात गेले नाहीत. त्यामुळे पोलीस रेकॉर्ड कमी संख्या दाखवेल. प्रत्यक्षात ती जास्त आहे. हे प्रकार रोखण्याची जबाबदारी पोलिसांपेक्षा तरुण मुलींच्या आर्ई-बापांवरच जास्त आहे.
नेमका हाच मुद्दा दिनेश रेड्डी आणि सी.सी. पाटील यांनी मांडला. महाराष्ट्र पुरोगामी आहे. त्यामुळे कदाचित महिला मंडळे त्यांच्या निषेधाचा मोर्चा काढतील. आपली तरुण मुलगी बलात्काराची शिकार होऊ नये, असे वाटत असेल तर रेड्डी व पाटील यांचे ऐका!
रविवार, दि. ०८ जानेवारी २०१२

Posted by : | on : 15 May 2012
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *