पंचनामा : भाऊ तोरसेकर
माझ्यात आणि सुहास पळशीकर यांच्यात त्यानीच लिहिलेल्या एका पुस्तकाबद्द्ल झालेला पत्रव्य्वहार इथे मी मुद्दाम जसाच्या तसा दिला आहे. वाचकाच्या चिकित्सक बुद्धीवर माझा पुर्ण विश्वास आहे. म्हणूनच त्यातले एकही अक्षर वा शब्द मी कापलेला नाही. किंबहूना हा पत्रव्यवहार पुरेसा बोलका व स्पष्ट आहे. त्यातून सुहास पळशीकर हे किती प्रामाणिक व सचोटीचे गृहस्थ वा विचारवंत आहेत, त्याची त्यांच्याच शब्दात साक्ष मिळू शकते. तेवढेच नाही तर स्वत:ला विचारवंत व अभ्यासक म्हणवणारे पळशीकर व त्यांचे आज ढोल पिटून समर्थन करणारे किती लबाड असतात, त्याचाही पुरावा याच पत्रव्यवहारात सामावलेला आहे. वाचक मी काय लिहिले ते वाचू शकतात. आणि पळशीकर त्यातल्या सत्याला व मुद्द्याला कशी बगल देतात; तेही चाणाक्ष वाचकांच्या सहज लक्षात येऊ शकते. स्वत:ला सेक्युलर म्हणवणार्यांचे स्वभावगूणही त्यातून उघड होतात.
1995 सालात महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले, तेव्हा प्रथमच खर्या अर्थाने पहिले बिगर कॉग्रेस सरकार सत्तेवर आले होते. त्यामुळे त्याला राज्यातील पहिले व एकमेव सत्तांतर म्हणता येईल. त्यावर घाईगर्दीने ग्रंथालीने हे पुस्तक प्रकाशीत केले. पण ते लिहिताना लेखकांनी कुठलाही अभ्यास केला नव्हता. तर त्यांच्या ज्या व्यक्तीगत राजकीय समजूती व आग्रह आहेत, त्याचे विवरण करणारे हे लिखाण होते. त्यातले कुठलेही निष्कर्ष त्यांनी अभ्यास व संशोधन करून काढलेले नव्हते; तर त्यांच्या राजकीय भूमिकेला अनुसरून त्यांचे निष्कर्ष आधी ठरवण्यात आले व मग त्यासाठी आवश्यक असेल ती माहिती शोधण्याचा खटाटोप करण्यात आला. जिथे त्यांच्या निष्कर्षाला पुरक अशी माहिती, दाखले, घटना वा पुरावे मिळालेच नाहीत तिथे त्यांनी बेधडक न घडलेल्या घटनाप्रसंग, घुसडण्याचा उद्योग केला आहे. त्यासाठी सत्याचा अपलाप केला आहे. खोटे पुरावे किंवा भलतेच दाखले दिले आहेत. आणि म्हणुनच मी त्यांना या गोष्टी कुठून शोधल्या, त्याचे संदर्भ मागितले होते. पण जो थापा मारतो तो पुरावे किंवा संदर्भ देणार कुठून? त्यामुळेच पळशीकर व्होरा मला उत्तरे देऊ शकले नाहीत.
त्या दोघांची व माझी त्यावेळी भेटही झाली होती. त्या दोघांचे मत असे होते, की पुरावे किंवा तपशील दुय्यम असतो. जे सांगायचे आहे ते मुद्दे महत्वाचे असतात. मुद्दे मला का पटत नाहीत, याचे त्यांना आश्चर्य वाटले होते. याचा अर्थ इतकाच होता, की त्यांना पुरावे, घटना, प्रसंग वा तपशील महत्वाचा वाटतच नाही. जे आपण सांगतो त्यावर वाचकाने डोळे झाकून विश्वास ठेवावा, असेच त्यांचे मत होते. अर्थात हे मी आज सांगतो, तेव्हा पळशीकर तसेच म्हणाले, याचा पुरावा माझ्याकडे नाही. कारण मी आमच्यातल्या त्या संवादाचे ध्वनीमुद्रण केलेले नाही. पण त्याची गरज नाही. त्याचा पुरावा पळशीकर व्होरा यांच्या सोबतच्या पत्रातच त्यांनीच सादर केलेला आहे. मला पाठवलेल्या प्राथमिक पत्रोत्तरात ते काय लिहितात? ’आपण फ़ारच काळजीपुर्वक आमचे पुस्तक वाचले. तुम्हाला त्यातील गोष्टी खटकल्या त्या तुम्ही स्वत:च्या पाशीच न ठेवता आस्थापुर्वक आम्हाला दोघांना स्वतंत्रपणे तसेच आमच्या पुस्तकाच्या प्रकाशकांना कळवल्या याचे आम्हाला अप्रुप वाटले. या दिवसात असे स्पष्टपणे, सडेतोडपणे व निर्भिडपणे एखाद्या लेखनाची चिकित्सा होणे किती दुरापास्त झाले आहे, हे आपण सर्वजण जाणतोच.’
याचा अर्थ काय होतो? लोक काहीही गंभीरपणे वाचत नाहीत व म्हणूनच वाटेल ते बेधडक लिहावे व अभ्यास, संशोधन म्हणून वाचकाच्या गळी बेलाशक मारावे; अशीच पळशीकर यांची प्रवृत्ती यातून दिसत नाही काय? मी त्यांच्या थापा काळजीपुर्वक वाचून, त्या त्यांच्या नजरेस आणल्या याचे त्यांना “अप्रुप” वाटले होते आणि त्यांनी तसे मला अगत्यपुर्वक लिहून कळवले होते. आपण खोटे वा असत्य संदर्भहीन लिहिले, याचे कुठलेही वैषम्य त्यात दिसत नाही. त्यापेक्षा एक वाचक एवढा बारकाईने वाचून चुका काढतो, याचे आश्चर्य त्यांनी व्यक्त केले आहे. त्यासाठी मला चिकित्सक, निर्भिड, सडेतोड व स्पष्टवक्ता अशी विशे्षणेही दिली आहेत. यातला फ़रक लक्षात घ्यायला हवा. मी त्यांच्यावर अशा कुठल्याही विशेषणांचा वर्षाव केला नव्हता. उलट त्यांना जाब विचारला होता. तर हे महाशय किती ढोंगीपणा करतात बघा. तेच लिहितात, ’ज्या वैचारिक संस्कृतीचा आग्रह आपण सर्वजण धरतो आहोत, त्याचा तुमचे पत्र म्हणजे एक परिपाठच आहे.’
कुठली वैचारिक संस्कृती? जे दडपून खोटे लिहिले त्यावर खुलासा न देण्याची म्हणजे वैचारिक संस्कृती का? आज व्यंगचित्राच्या वादाने जो वैचारिक दंगलखोरीचा गदारोळ चालू आहे, त्यात हेच सगळे वैचारिक संस्कृतीचे पाईक दंगल माजवित आहेत ना? ज्यांच्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची, उपस्थित केलेल्या शंकांची उत्तरे वा खुलासे देण्याची सभ्यता नाही, त्यांनी वैचारिक संस्कृतीचे दावे करावेत; यापेक्षा दुसरा कुठला ढोंगीपणा असू शकतो? माझ्या पत्रातून त्यांना मी स्पष्टपणे खोट्या व चुकीच्या माहिती व प्रसंग व संदर्भाचा जाब विचारला आहे. तर हे महाशय ’मला खटकलेल्या गोष्टी’ असा त्याचा उल्लेख करतात. त्यांना शद्ब व भाषाही कळत नाही काय? खटकणे म्हणजे शंकास्पद, पण खोटे म्हणजे निराधार असते; हे या राज्यशास्त्राच्या प्राध्यापकाला मी समजावून सांगण्याची गरज आहे काय? मी त्यांच्या त्या अभ्यासपुर्ण, संशोधनपुर्ण पुस्तकातील दोन डझन चुका व खोट्या माहितीची यादीच त्यांना पाठवली होती. अगदी पृष्ठ क्रमांकासहीत ती यादी होती. ते सर्व इथे सांगणे शक्य नाही. पण हे महान प्राध्यापक व संशोधक किती बेधडक खोटे वा परस्पर विरोधी लिहितात, त्याचे त्यांच्या पुस्तकातील दोन नमू्ने इथे पेश करतो. म्हणजे ग्रंथाली सारखी संस्थाही वाचक चळवळ म्हणुन लोकांची किती फ़सवणूक करते, त्यावर प्रकाश पडू शकेल. ’सत्तांतर’ या पुस्तकाच्या पृष्ठ 3 व 17आणि 19 यात पळशीकर काय लिहितात वाचा-
पृष्ठ 3- अशाप्रकारे लोकशाहीवादी पंचायतराज्य, विकासवादी सहकार चळवळ, बहुजनांचे प्रतिनिधीत्व करणारा मराठा- कुणबी जातीगट आणि या तिन्हींचे संयोजन-संघटन करणारा कॉग्रेस पक्ष ही महाराष्ट्राच्या राजकारणाची 1960-1970 या दशकातील ठळक वैशिष्ठे सांगता येतील.
पृष्ठ 17- महाराष्ट्रातील कॉग्रेसची पडझड चालू असल्यामुळे ज्या नविन शक्तींना वाव मिळाला, त्यापैकी शेतकरी चळवळ ही एक शक्ती होय. ज्या शेतकरी जाती हा कॉग्रेसचा पारंपारिक कणा होता, त्यांच्या संघटनाचे प्रयत्न 1960 नंतर कॉग्रेसने केले नाहीत.
पृष्ठ 19- पुढे 1985 च्या रा्जीवस्त्रविरोधी आंदोलनच्या निमित्ताने अल्पकाळ शरद जोशी, दत्ता सामंत आणि बा्ळ ठाकरे एकत्र आले.
पळशीकर व्होरा यांच्या “सत्तांतर” पुस्तकातील हे अभ्यासपुर्ण दावे आहेत. शेवटचा प्रथम बघू. मी चार दशके एक सामान्य मराठी पत्रकार म्हणुन राज्यातल्या राजकारणाचा विद्यार्थी आहे. पण छातीठोकपणे सांगू शकतो, की कुणाच्या लग्न, बारसे, श्राद्ध वा मुंजीलासुद्धा कधी ठाकरे, सामंत व जोशी एकत्र आलेले नाहीत. मग एका आंदोलनासाठी एकत्र येण्याचा प्रश्नच कुठे येतो. पण पळशीकर पडले संशोधक व अभ्यासक. त्यांचे आदेश शिवसेनाप्रमुखही मानत असावेत, अन्यथा त्यांनी या तीन टोकाच्या नेत्यांना आपल्या पुस्तकात एकत्र आणायचे धाडस कशाला केले असते? हा धडधडीत खोटेपणा होता. ते मी त्यांना लिहून कळवले तर ते म्हणतात, तो मला खटकलेला मुद्दा आहे. खोटेपणा आणि खटकणे यात किती फ़रक असतो?
आता पहिले दोन मुद्दे बघू. 1960 नंतर म्हणजेच 1960-1970 असते ना? मग पळशीकर पान ३ वर मराठा कुणबी या शेतकरी जातीगटाचे कॉग्रेस संयोजन-संघटन करीत असल्याबद्दल त्या पक्षाची पाठ थोपटतात. पण चौदा पाने पुढे सरकून पान 17 वर येत असताना त्यांची बुद्धी फ़िरते आणि त्याच कॉग्रेसवर शेतकरी जातीगटाच्या संघटनाचे प्रयत्नच त्याने 1960 नंतर केले नाहीत; म्हणुन आरोप करतात. मग काय समजायचे? पळशीकर व्होरा यांना वर्षे शतके दशके यांचे ज्ञानच नाही काय? की 1960 नंतर जे दशक येते त्याला 1960-1970 म्हणतात याचेच त्यांना भान नाही समजायचे? हे कसले संशोधन आहे? की बेधडक खोटेपणा म्हणजे संशोधन व अभ्यास, असाच त्यांचा दावा आहे? तेव्हा व्होरा पुणे विद्यापीठामध्ये राज्यशास्त्राचे प्रमुख होते, तर पळशीकर त्यांचे सहाय्यक होते. आज पळशीकर स्वत:च राज्यशास्त्राचे प्रमुख आहेत. मग गेल्या काही वर्षात पुणे विद्यापीठात ज्यांनी राज्यशास्त्राचा अभ्यास केला, त्या विद्यार्थ्यांच्या बुद्धीचे या दोघांनी काय लोणचे घातले असेल, त्याचा अंदाज येऊ शकतो.
अशा माणसाने अकरावी किंवा अन्य कुठल्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके तयार केली असतील, तर त्यात शेकडो चुका वा खोटेपणा असणार याची ते नवे पुस्तक न बघताच मी म्हणून तर खात्री देऊ शकतो. कारण कोणी पुस्तके काळजीपुर्वक वाचत नाहीत. यावर पळशीकर यांची गाढ श्रद्धा आहे. त्यामुळेच ज्यात बाबासाहेबांचे व्यंगचित्र छापले, तेही पुस्तक कोणीच (अगदी ज्यांना ते पाठ्यपुस्तक म्हणून लावले जाईल ते विद्यार्थी सुद्धा) वाचणार नाहीत याची पळशीकरांना खात्री असणार. म्हणुन त्यांनी आपल्या थापा तिथेही संशोधन व अभ्यास म्हणून खपवल्या असणार. मी म्हणूनच ते पुस्तक आता माझ्या “पळशीकर संशोधनासाठी” मागवून घेतले आहे. मला खात्री आहे, जर खरेच ते पळशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिले गेले असेल, तर त्यात शेकडो चुका व खोटेपणाचा समावेश असणार. मात्र या निमीत्ताने माझा योगेंद्र यादव यांच्याबद्दल भ्रमनिरास झाला. मी टीव्हीवर त्यांना बघितले व ऐकले आहे. त्यातून मला तो माणूस खरा अभ्यासक व संशोधक वाटला होता. पण ज्याप्रकारे त्याने पळशीकरांकडून आंबेडकर समजून घेतल्याचा दावा केला, त्यानंतर मात्र त्याच्याही बुद्धीची मला कींव करावीशी वाटली.
तेवढेच नाही. हा वाद उफ़ाळल्यानंतर पुणे विद्यापीठातील आणखी दोघा अभ्यासकांनी माझी साफ़ निराशा केली. त्यात एक आहेत तत्वज्ञान विभागाचे डॉ. सदानंद मोरे व दुसरे आहेत हरी नरके. मी त्यांना गंभीर अभ्यासक संशोधक समजत होतो. पण त्यांनीही या वादात पळशीकर यांच्या अभ्यासूवृत्तीची ग्वाही दिल्याने मला त्यांचेही लेखन आता “अभ्यासू’ नजरेने वाचावे असे वाटू लागले आहे. कारण जे माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराला पळशीकरांच्या खोटेपणाचे दर्शन झाले, ते सोबत वावरत असून या दोघा संशोधक साहित्यिकांना झाले नसेल, तर त्यांच्या संशोधकवृत्तीवर शंका घेणे भाग आहे. मोरे व नरके यांनी आपल्या चिकित्सक (पळशीकरांनी मला लावलेले विशेषण) वृत्तीने पळशीकरांचे लेख वा पुस्तके वाचली आहेत काय, याचीच मला शंका येते. तसे असते तर त्यांनी हा वाद उफ़ा्ळल्यावर कोणी प्रतिक्रीया विचारता कानावर हात ठे्वले असते. पण तसे झालेले नाही. बाकी जे कोणी वाहिन्यांवर पळशीकर यांच्या संशोधनाचे व लिखाणाचे गोडवे गात होते, त्यांना मी गंभीरपणे घेत नाही. इतर कोणी गंभीरपणे त्यांच्या बडबडीकडे लक्ष देण्याचीही गरज नाही.
पळशीकर वा तत्सम अभ्यासकांचे संशोधन हे पोलिस तपासाप्रमाणे चालते. पोलिस नेहमी आधी गुन्हा नोंदवतात. म्हणजे त्यांनी तपासापुर्वीच कोणाला तरी आरोपी बनवलेले असते. मग त्याला गुंतवणारे पुरावे ते गोळा करतात. जे पुरावे त्याच्या निर्दोष असण्याला पुरक असतात, त्याची पोलिस कधीच दखल घेत नाहीत. उलट ते पुरावे लपवतात. आणि समजा पुरावे मिळत नसतील तर खोटे पुरावे पोलिस तयार करतात. पळशीकर यांचे सत्तांतर पुस्तक अशाच तपासाचा अहवाल आहे. त्यात संशोधन वगैरे काहीही नाही. संशोधन करणारा आधी सगळी माहिती मिळवतो. त्याचा तौलनिक अभ्यास करतो. मग त्यातून निष्कर्ष काढत असतो. पळशीकर वा तत्सम सेक्युलर अभ्यासक तसे करतात का? माझा तरी तसा अनुभव नाही. त्याचे मी पळशीकर यांच्याप्रमाणेच अन्य काही लेखक, संपादक वा अभ्यासकांचे दाखले देऊ शकतो.
++++++++संदर्भ++++++++
पंधरा वर्षापुर्वीचा पत्रव्यवहार
प्रति,
श्री राजेंद्र व्होरा/ सुहास पळशीकर
यांस, स. न. वि. वि.
विषय; महाराष्ट्रातील सत्तांतर हे आपले पुस्तक
महोदय,
आपण संयुक्तरित्या लिहिलेले आणि ग्रंथाली या मान्यवर प्रकाशन संस्थेने प्रकाशीत केलेले; ’महाराष्ट्रातील सत्तांतर’ हे पुस्तक वाचनात आले. आपण स्वत: माहिती मिळवून आणि इतरांच्या मदतीने माहिती जमा करून त्यावर अभ्यासपुर्ण राजकीय विश्लेषण करणारा हा खळबळजनक राजकीय ग्रंथ लिहिला असल्याची प्रस्तावना-शिफ़ारस प्रकाशकांनी मलपृष्ठावर केलेली आहे. आपणही आरंभीच्या निवेदनात बारीकसारीक तपशील गोळा केल्याचे म्हटले आहे. खेरीज दिर्घकाळ, काहीवर्षे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी व प्रक्रियांचा अभ्यास करीत असल्याचा दावाही केलेला आहे. परंतू हे पुस्तक वाचताना त्यामध्ये अनेक न घडलेल्या घटना, प्रसंग अथवा अस्तित्वात नसलेल्या गोष्टी, काल्पनिक माहिती, घटनांवर आधारित केलेली विधाने व निष्कर्ष वाचनात आले. म्हणून हा पत्रप्रपंच केला आहे.
मी गेली 30 वर्षे मुंबईत पत्राकारिता करीत असून त्या निमित्ताने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घटना व घडामोडींवर माझे अपरिहार्यपणे लक्ष असते. म्हणूनच आपल्या लिखाणातील वास्तवाच्या व संदर्भाच्या या चुका प्राथमिक वाचनातच लक्षात आल्या. तपशीलातील या चुकांविषयी प्रकाशक दिनकर गांगल यांच्याशी संपर्क साधण्याचा व त्यात दुरूस्ती व्हावी, असे सुचवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. उलट प्रथमावृत्तीमधल्या सर्व ढोबळ बारीकसारीक चुकांसह पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाल्याचे आढळले. सामाजिक बांधिलकी बोलणार्या व्यक्ती व संस्थांकडून अशी बेपर्वाई, दडपेगिरी मनाला खटकली. कारण अशा अपुर्ण, चुकीच्या व धडधडीत खोट्या माहितीने वाचकाची दिशाभूल होत असते. म्हणूनच मुद्दाम पत्र लिहून आपले याकडे लक्ष वेधत आहे.
सोबत आपल्या पुस्तकातील बेलाशक खोट्य़ा घटना, न घडलेले प्रसंग आणि अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा उल्लेख व संदर्भ आल्याचे उतारे पृष्ठ क्रमांकानुसार यादी बनवून पाठवत आहे. वाचकांच्या संवेदनाक्षम भावनांबद्दल आपण तरी संवेदनाशील असाल, ही अपेक्षा असल्याने हे पत्र. पुस्तकामध्ये ही माहिती कुठून कशी मिळवली आणि कोणत्या हेतूने वापरली, त्याचा खुलासा कराल अशी आशा वाटले, आपल्या खुलासेवार पत्राची प्रतिक्षा करीत आहे. कळावे,
आपला स्नेहांकित,
भाऊ तोरसेकर
(1 ऑगस्ट 1997)
———————————-
प्रिय भाऊ तोरसेकर,
राजेंद्र व्होरा/सुहास पळशीकर यांना लिहीलेल्या पत्राची प्रत वाचून थक्क झालो. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधून त्याचे काय करायचे ते ठरवतो व कळवतो. दरम्यान आपण भेटून एखादे नवे वेगळे तुमच्या अनु्भवाचे पुस्तक तयार होते का, ते पाहुया का? तसे मी पुर्वीही आपणाशी बोललो होतो. कळावे.
आपला
दिनकर गांगल
(11 ऑगस्ट 1997)
———————————-
प्रति, भाऊ तोरसेकर,
स. न.
आपले 1 ऑगस्टचे पत्र मिळाले. आपण फ़ारच काळजीपुर्वक आमचे पुस्तक वाचले. तुम्हाला त्यातील गोष्टी खटकल्या त्या तुम्ही स्वत:च्या पाशीच न ठेवता आस्थापुर्वक आम्हाला दोघांना स्वतंत्रपणे, तसेच आमच्या पुस्तकाच्या प्रकाशकांना कळवल्या याचे आम्हाला अप्रुप वाटले. या दिवसात असे स्पष्टपणे, सडेतोडपणे व निर्भिडपणे एखाद्या लेखनाची चिकित्सा होणे किती दुरापास्त झाले आहे, हे आपण सर्वजण जाणतोच. म्हणूनच तुमचे मन:पुर्वक आभार मानणे, हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. ज्या वैचारिक संस्कृतीचा आग्रह आपण सर्वजण धरतो आहोत, त्याचा तुमचे पत्र म्हणजे एक परिपाठच आहे, असे म्हटले तरी वावगे होणार नाही. तुमची आमची यापुर्वीच ओळख झाली असती तर किती बरे झाले असते. हे पुस्तक आम्ही तुम्हाला प्रकाशन होण्यापुर्वीच दा्खवले असते. परंतू ते होणे नव्हते. असो.
तुम्ही सहा पाने भरून तुम्हाला खटकणार्या व तुम्हाला न पटणार्या मुद्द्यांची जंत्री दिली आहे. ते पडताळून पहाणे, त्याबाबत आमचे काय म्हणणे आहे, हे ठरविणे यास काही दिवस लागतील. म्हणून आम्हाला पत्र मिळाल्या मिळाल्य़ा हे उत्तर प्राथमिक स्वरूपातील तुम्हाला आज रोजी पाठवित आहोत. आम्ही तुमच्या पत्राची गंभीरपुर्वक दखल घेत आहोत व लवकरच त्यास योग्य ते उत्तर आम्ही तुम्हाला पाठवू. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानून हे पत्र संपवतो. कळावे.
आपले,
राजेंद्र व्होरा, सुहास पळशीकर
19 ऑगस्ट 1997
………………………………
http://panchanaama.blogspot.in/